Sunday, 28 August 2022

E. जहांगीर (१६०५ - १६२८)

  E. जहांगीर (१६०५ - १६२८)

 अकबर जोधाबाई पासून ३० ऑगस्ट १५६९ रोजी सलीमचा (१६०५ १६२८) जन्म झाला. अजमेरचे सुफी संत शेख सलीम चिश्तीला नवस केला. त्याच्याच आशिर्वादाने हे पुत्ररत्न झाल्याने त्याचे नाव सलीम ठेवले. अकबर त्याला प्रेमाने ‘शेखूबाबा’ म्हणत. अकबराला त्याच्या इतर दोन स्त्रियापासून मुराद १५७० आणि दानियल १५७२ ही दोन मुले झाली. अकबर दक्षिण भारताच्या मोहिमेत गुतंला असताना मोगल बादशाही हस्तगत करण्याच्या इराद्दयाने सलीमने अकबराविरुध्द १५९९ मध्ये बंड केले. त्यानंतर त्याने अबुल फाझलचा खून घडवून आणला त्यामुळे अकबर संतप्त झाला परंतु पुत्रप्रेमामूळे काहीच करु शकला नाही.  इ.स. १५९९ मध्ये मुराद आणि इ.स. १६०४ मध्ये दानियल तरुण वयातच मृत्यु पावल्यने सलीम हा मुघल बादशाहीचा एकमेव वारस शिल्लक राहिला. यानंतर अकबर गंभीररित्या आजारी पडला व त्याने सलीमची स्वतःचा वारस म्हणून घोषणा केली. अकबराच्या मृत्युनंतर सलीम ३ नोव्हेंबर १६०५ रोजी नुरुद्दीन महंमद जहांगीर बादशहा गाझी अशी पदवी घेऊन तो सिंहासनावर बसला.

 १.  राजपुत्र खुसरोचे बंड (इ.स. १७६०)

जहांगीर गादीवर येण्यापूर्वी खुसरोस गादीवर आणण्याचा प्रयत्न फसल्यापासून खुसरो आग्राच्या किल्ल्यात नजरकैद होता. परंतु सम्राट होण्याचे भूत खुसरोच्या डोक्यातून गेले नव्हते. एके दिवशी अकबराच्या समाधीचे दर्शन घेण्याच्या निमित्ताने तो आपल्या साथीदारांसह गुप्तपणे आग्र्याबाहेर पडला. हळूहळू त्याच्या समर्थकांची संख्या वाढू लागली. लाहोर प्रांताचा दिवाण अब्दुल रहमान खुसरोच्या पक्षास येऊन मिळाला. जहांगिरास खुसरोच्या पलायनाची बातमी समजताच तो स्वतः खुसरोच्या बंदोबस्तसाठी लाहोरला आला. खुसरोचा पराभव करून त्याला पकडले. सम्राटाने त्याचे डोळे काढून त्यास कैदेत टाकले. खुसरोस मदत केल्याबद्दल शिखांचा पाचवा धर्मगुरु अर्जुनसिंह याचाही जहांगीरने हत्या केला. यामुळे शिख मोगलाच्या विरोधात गेले.

 

२. मेवाडवर प्रभुत्व (१६१४- १६१५)

मेवाड हे एक प्रमुख राजपूत राज्य होते. बादशहा अकबर आपल्या कारकिर्दीत संपूर्ण मेवाडवर वर्चस्व प्रस्थापित करु शकला नाही. महाराणा प्रतापने अकबराशी झुंज दिली. राणा प्रतापनंतर राणा अमरसिंह मेवाडचा राजा झाला. खुसरोचा बंदोबस्त केल्यानंतर जहांगीरने मेवाडकडे लक्ष दिले. इ.स. १६०६ ते १६१३ पर्यंत मोगल सैन्याने मेवाडवर अनेकदा हल्ले चढविले. परंतु त्यांना अमरसिंहाने दाद दिली नाही. म्हणून इ.स. १६१४ मध्ये जहांगीरने नूरजहानच्या सल्ल्यावरुन राजपुत्र खुर्रम व मिर्झा अजीज कोका यांना मेवाडच्या स्वारीवर पाठविले. राजपुत्र खुर्रमने राजपुत्रास दहशत बसविण्यासाठी कत्तलीस सुरूवात केली. त्याने या स्वारीत अनेक शहरे, खेडी, शेती जाळून उध्वस्त केली. शूर राजपुत्रांनी मोगलांच्या हल्ला परतवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु खुर्रमच्या पराक्रमापुढे त्यांचे काहीही चालले नाही. शेवटी राणा अमरसिंहाने तहाच्या वाटाघाटी सुरु केल्या. इ.स. १६१५ मध्ये उभयपक्षात समेट झाला. अमरसिंहाने जहांगीरचे आधिपत्य मान्य केले. सम्राटाने अमरसिंहाच्या जिंकलेला प्रदेश त्यास परत केला. तहानंतर अमरसिंहाने मुलगा युवराज कर्ण याला मोगल दरबारात पाठविले. जहांगीरने कर्णाला फार सन्मानाने वागविते. अशा रितीने उभय पक्षात मागील ७५ वर्षापासून चालत आलेला लढा समाप्त झाला.

 

३. दक्षिण धोरण (इ.स. १६०८-१६२१):

मोगल सम्राट अकबराने प्रथम दक्षिण जिंकण्याची मोहीम हाती घेतली. दक्षिणेतील अहमदनगरची निजामशाही जिंकण्याचे अकबराच्या कारकिर्दीत अपूर्ण राहिलेले कार्य जहांगीरने हाती घेतले. यावेळी अहमदनगरामध्ये राज्याची सूत्रे मलिक अंबर या स्वामीभक्त व राजकारण धुरंधर दिवाणच्या हातात होती. इ.स. १६०८ मध्ये सम्राटाने अब्दूर रहिमला प्रचंड सैन्यानिशी दक्षिण भारत जिंकण्यास रवाना केले. त्यानंतर राजपुत्र परवेज, आसफखान व अनेक मोगल सरदारांना दक्षिण मोहिमेवर पाठविले. परंतु मलिक अंबरच्या मराठा सैनिकांनी गनिमी युध्दपध्दतीचा उपयोग करून मोगल सैन्यावर मात केली.

शेवटी इ.स. १६१६ मध्ये मेवाड विजेत्या राजपुत्र खुर्रमवर ही कामगिरी सोपविण्यात आली. खुर्रमच्या पराक्रमाची किर्ती ऐकून मलिक अंबरने इ.स.१६१७ मध्ये मोगलांशी तह केला. या तहानुसार मलीक अंबरने बालाघाटचा प्रदेश आणि अहमदनगरचा भूईकोट किल्ला मोगलास दिला. विजापूरच्या आदिलशहाने सोळा लाख रुपयांचा नजराणा खुर्रमला पाठवून त्याची मैत्री संपादन केली. राजपुत्र खुर्रम दक्षिण भारताची यशस्वी स्वारी करुन राजधानीस आला. सम्राट जहागीरने त्याचे थाटाने स्वागत करुन त्याला 'शहाजहान' अशी पदवी दिली. खर्रमने उत्तेरकडे प्रयाण करताच मलिक अंबरने सम्राटाशी केलेला तह झुगारुन निजामशाहीचे सर्व प्रदेश पुन्हा जिंकले. या कार्यात मलिक अंबरला विजापूर व गोवळकोंड्याच्या सुलतानांचीही मदत होती. जहांगीरने खुर्रमला पुन्हा दक्षिणेत पाठविले. त्याने मलिक अंबरचा त्याच्या मदतनीसासह पराभव केला. इ.स. १६२१ मध्ये मलिक अंबरने खुर्रमशी दुसऱ्यांदा तह केला. या तहानुसार मलिक अंबरने मोगलांकडून जिंकलेले प्रदेश परत कले. तसेच अहमदनगर, विजापूर व गोवळकोंडा या तिन्ही मुसलमान राज्यानी सम्राटास खंडणी देण्याचे मान्य केले. दक्षिण विजयाने खुर्रमचे राजकारणात महत्त्व वाढले.

 

४.कांगडा विजय ( इ.स. १६२० ) :

कांगडा किल्ला पंजाबच्या डोंगराळ प्रदेशात एक प्रसिध्द डोंगरी किल्ला म्हणून अजिंक्य समजला जात होता. अकबराला कांगड्याचा प्रदेश जिंकता आला नव्हता. तो आता जहांगीरने जिंकून घेण्याचे निश्चित केले. हा किल्ला जिंकण्याची जबाबदारी प्रथमतः मुर्तुजाखान या सरदारावर सोपविण्यात आली. परंतु आपसातील वैमनस्यामुळे त्याला किल्ला जिंकण्यात यश लाभू शकले नाही. शेवटी दक्षिणेतील विजय मिळवून परत आलेल्या राजपुत्र खुर्रमवर ही जबाबदारी सोपविण्यात आली. खुर्रमने किल्ल्याला वेढा देऊन तेथील सर्व रसद बंद पाडली. चौदा महिन्यांच्या सतत वेढ्यानंतर कांगड्याचा किल्ला शहाजहानच्या हाती नोव्हेंबर १६२० मध्ये आला. जहांगीरची एक महत्त्वाकांक्षा अशा रितीने पूर्ण झाली.

 

१.      वायव्य सरहद्द धोरण - कंदहार (इ.स. १६२२)

अफगाणिस्थानातील कंदहार हे व्यापारी व लष्करीदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र होते. मध्य आशिया इराण व तुर्कस्थान इ. देशांशी याच मार्गाने भारताचा प्राचीन काळापासून व्यापार चालत असे. कंदहारवर आपला ताबा ठेवण्यात मोगल सम्राट आणि इराणच्या शहात स्पर्धा चालत असे. जहांगीरच्या वेळी इराणमध्ये शहा अब्बासचे राज्य होते. त्याने कंदहार घेण्याचे अनेक वेळा प्रयत्न केले. परंतू या कार्यात शहाला इ.स. १६२२ पर्यंत यश मिळू शकले नाही. शहाने जहांगीरच्या दरबारी आपले वकील पाठवून सम्राटास अनेक मौल्यवान वस्तू भेटी दाखल दिल्या. साहजिकच जहांगीरचे कंदहारकडे दुर्लक्ष झाले. या बेसावधपणाचा फायदा घेऊन शहा अब्बासने इ.स. १६२२ मध्ये कंदहारच्या किल्ल्याला वेढा दिला. यावेळी मोगल साम्राज्यात सत्तेकरिता सम्राज्ञी नूरजहान व राजपूत खुर्रममध्ये गृहयुध्द चालू होते. शहा अब्बासने या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन कंदहार जिंकून घेतले. ते परत मिळवण्याचे जहांगीरचे प्रयत्न अयशस्वी झाल्याने कंदहार कायमचे मुघलांच्या ताब्यातून गेले.

 

२.      सम्राज्ञी नूरजहानचा कारभार

नूरजहान ही मध्यकालीन भारतीय इतिहासातील एक अत्यंत प्रभावशाली स्त्री होती. तिचे वडील मिर्झा गियासबेग इराणचे होते. आपले नशीब काढण्यासाठी भारतात येण्यास निघाला वाटेत कंदहार येथे नूरजहानचा जन्म झाला. तिचे नाव मेहरुन्नीसा असे ठेवण्यात आले. पूढे गियासबेगने अकबराच्या दरबारी असलेल्या शेर अफगाण (अली कुलीखान) या इराणी सरदाराशी लग्न लावून दिले. या विवाहापासून मेहरुन्नीसाला एक मुलगी झाली. तिचे नाव लाडली बेगम होते. जहांगीरने बंड केले तेव्हा शेर अफगाण त्याच्याकडे होता. पुढे जहांगीर बादशहा झाल्यानंतर तो बंडात सामील झाल्याचा संशय असल्याने बंगालच्या सुभेदारास शेर अफगाणला कैदेत टाकण्याबद्दल लिहिले. परंतु त्यात झालेल्या चकमकी सुभेदार व शेर अफगाण दोघेही ठार झाले. यानंतर मेहरुन्नीसा आपल्या वडिलांकडे परतली. आग्रा येथे जहांगीरच्या आईच्या तैनातीत ती असताना जहांगीरच्या नजरेस पडली. जहांगीरने इ.स. १६११ मध्ये तिच्याशी विवाह केला. जहांगीरवर तिने आपले एवढे वजन बसविले की, जहांगीर सर्वस्वी तिच्या तंत्राने वागू लागला. जहांगीरने तिचे नाव नूरजहान असे ठेवले.

 

i.नूरजहान गट (Nurjehan junta)

इ.स. १६०५ ते १६२७ हा जहांगीरच्या कारकिर्दचा कालखंड असला तरी इ.स. १६११ ते १६२७ या कालखंडातील त्याची कारकिर्द हो खऱ्या अर्थाने नूरजहानचीच कारकिर्द होय. सम्राट जहांगीर सुखासीन प्रवृत्तीचा असल्यामुळे साम्राज्याची सर्व सूत्रे महत्त्वाकांक्षी नूरजहानच्या हातात आली. आपल्या समर्थकांच्या मदतीने तिने दरबारात एक शक्तीशाली गट तयार केला होता. त्याला नूरजहान गट (Nurjehan junta) असे म्हणतात. या गटात तिचे वडील मिर्झा गियासबेग, आई अस्मतबेगम, भाऊ आसफखान व राजपुत्र खुर्रम ही मंडळी होती. नूरजहान या गटाची मुख्य सुत्रधार होती. जहांगीरच्या कारकिर्दीत राजसत्ता याच गटाच्या हातात होती. सम्राट जहांगीरच्या राज्यकारभारातील नूरजहानच्या प्रभूत्वाचे ऐतिहासिकदृष्या दोन कालखंड पडतात.

 

ii.पहिला कालखंड

इ.स. १६११ ते १६२२ चा होता या काळातील तिची कामगिरी साम्राज्य हितास पोषक होती. तिच्या आज्ञेवरुन राजपुत्र खुर्रम याने मेवाड, कांगडा व अहमदनगर विजय संपादन केले. तिच्याच संकेतावरून खुर्रमने खुसरोचा गुप्तपणे काटा काढला.

 

iii.दुसरा कालखंड

इ.स. १६२२ ते १६२७ पर्यंतचा आहे. या कालखंडात मातापित्यांच्या मृत्युमुळे तिच्या सत्तापिपासेवर अंकुश लावणारे कोणीही वडीलधारी शिल्लक राहिलेले नव्हते. या कालखंडात तिच्या सत्तेच्या आसुरी मोहामुळे साम्राज्यावर अनेक संकटे कोसळली साम्राज्यात अनेक बंडाचा उपद्रव होऊन शासनव्यवस्था खिळखिळी झाली. तिच्या जाचाला कंटाळून राजपूत खुर्रम आणि सेनापती महाबतखान यांनी बंडे केली. इ.स. १६२८ मध्ये जहांगीरच्या मृत्युनंतर राजपूत खुर्रम गादीवर आला. तो नूरजहांचा प्रखर विरोधक होता. तिने राजकारणातून अंग पाहून काढून घेतले. नूरजहान लाहोर येथे स्वतःच्या मुलगी लाडली बेगमकडे गेली. उर्वरित आयुष्य शांतपणे व्यतीत केल्यानंतर इ.स १६४५ मध्ये लाहोरला मृत्यु झाला.

 

३.      जहांगीरची योग्यता

 

नूरजहांनच्या हाती कारभार सोपविल्यावर शहाजहानसारखा कर्तृत्वान मुलगा व महाबतखानसारखा सरदार असल्याने जहांगीरने राज्यकारभारकडे लक्ष दिले नाही. इ.स. १६२१ पासून तो आजारी होता. प्रकृती सुधारण्यासाठी तो काबूलहून काश्मीरला गेला पण तिथे थंडी खुप असल्याने तो लाहोरकडे परत येत असतांना राजोरी येथे २९ आक्टोंबर १६२७ रोजी तो मरण पावला. लाहोरला शाहदरा येथे त्याचे दफन करण्यात आले. जहांगीर अकबराप्रमाणे कर्तबगार नव्हता परंतु त्याने राज्यात शांतता व चांगली व्यवस्था ठेवली. न्यायदान चांगले व्हावे म्हणून न्यायशृखंला राजवाडयात टांगली होती. त्याच्या काळात शेती, उद्योगधंदे, व्यापार, संगीत, शिल्पकला, चित्रकला इत्यादीची चांगलीच प्रगती झाली. त्याने विद्येस उत्तेजन दिले होते. तो स्वतः चांगला लेखक होता. जहांगीरने तुर्की भाषेत तुजुके ए-जहांगीरी किंवा जहांगीरनामा या नावाने आत्मचरित्र लिहिले आहे.

===========================================


Thursday, 4 August 2022

2. हुमायून व शेरशहा संघर्ष : (इ.स. १५३२ - १५४०)

 

प्रकरण १. इ हुमायून  व शेरशहा संघर्ष : (इ.स. १५३२ - १५४०) 

 

बाबरच्या मृत्युनंतर त्याचा वडील मुलगा नासिरुद्दीन महंमद हुमायून इ.स. १५३० मध्ये दिल्लीचा सम्राट झाला. गादीवर आल्यानंतर हुमायूनला अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले. 

 

१. हुमायून पुढील अडचणी : 

 

·         हुमायूनने आपल्या पित्याच्या इच्छेप्रमाणे काबूल व पंजाब हे प्रांत कामरानला दिले. हिंदालला संबळची सुभेदारी दिली आणि मिर्झा अस्करीस मेवाडची जहागिर दिली. पूढे हे भाऊ स्वतंत्र झाल्याने हुमायूनचे मोठे नुकसान झाले काबूल व पंजाब ताब्यात न राहिल्याने तिकडून येणारे काटक व शूर सैन्य हुमायुनला मिळणे कठीण झाले. भावाच्या स्वार्थी धोरणाकडे दुर्लक्ष केले. 

·         बंगाल व बिहारमधील अफगाण सरदार पुर्वीपासुन त्याच्या विरोधात होते. हुमायुनचा कट्टर शत्रू म्हणजे महंमद लोदी त्याने सिहांसनावरील हक्क सोडलेला नव्हता. शेरशहासूर या दुसऱ्या अफगाण अमिरालाही अफगाणांचे स्वतंत्र राज्य स्थापन करावयाचे होते. बंगालचा सुलतान नुसरतशहा हा सुध्दा अफगाणांना मदत करीत होता. 

·         आलमखानने गुजराथचा सुलतान बहादुरशाहचा आश्रय घेतला होता. बहादुरशाहने अफगाणांना पूर्णपणे पाठिंबा दिला त्यामूळे त्याचा ही बंदोबस्त करणे गरजेचे होते. संकटकाळी त्याच्या भावांनाही त्याला मदत केली नाही. म्हणून हुमायुनला बऱ्याच अडचणींनी तोंड द्यावे लागले.

 

२. चुनारगडचे पहिले युध्द (१५३२):

 

बाबरच्या मृत्यूनंतर बिहारमध्ये अफगाणांनी पुन्हा डोके वर काढले. महंमद लोदीने प्रचंड सैन्य जमवून जौनपूरवर स्वारी केली. हुमायूनने त्याचा दोहरीयाच्या लढाईत पराभव केला. या लढाईच्या दरम्यान शेरशहा सुरी नावाच्या एका अफगाण सरदाराने चूनारगडच्या किल्ल्यावर चार महिने वेढा दिला. शेवटी समेट होऊन किल्ला शेरशहाकडेच राहिला. चुनारगडसारख्या लष्करीदृष्टया महत्वाचा किल्ला शेरशहाकडे राहू देण्यात हूमायूनने मोठी चूक केली.

 

३. चूनारगडचे दुसरे युद्ध (१५३७):

 

हुमायूनचा गुजराथच्या बहादुरशाहशी लढा सुरु झाला. हुमायून गुजरातमध्ये लढण्यात गुतंला आहे हे पाहून शेरशहा सुरीने बिहारमध्ये सत्ता वाढविण्यास सूरुवात केली. जौनपूरच्या मोगल अधिकाऱ्यास त्याने लाच देऊन आपल्या हालचालीचा सुगावा हुमायूनास लागू दिला नाही. अल्पावधीतच शेरशहाने दक्षिण बिहारवर आपला अंमल बसवून बंगालवर शस्त्र उगारले. तेव्हा हुमायून जागा झाला. पुन्हा हुमायुनने चुनारगडाच्या प्रयत्नानंतर किल्ला हुमायूनच्या ताब्यात आला. परंतु तत्पूर्वी शेरशहाने बंगालच्या सुलतानचा पराभव करुन बंगालची राजधानी गौडवर ताबा मिळविला होता.

 

३. बंगाल विजय (इ.स. १५३८):

 

चुनारहून हुमायून बनारसला आला. या ठिकाणी शेरशहाने हुमायुनशी बोलणी चालविली. या तहान्वये हुमायुनने बिहार प्रांत आपल्याकडे घ्यावा असे ठरले. परंतु याच्या मोबदल्यात शेरशहाने १० लाख रु. वार्षिक खंडणी द्यावी असेही ठरले. परंतु याचवेळेस बंगालचा सुलतान महंमद याने हुमायुनकडे मदतीची याचना केली. त्याच्या विनंतीला मान देऊन हुमायुनने तहाची बोलणी बंद करुन बंगाल जिंकण्याचे ठरविले अल्पशा प्रतिकारानंतर हुमायून बंगालची राजधानी गौड येथे १५ ऑगस्ट १८३८ रोजी पोहचला तत्पुर्वी शेरशहा गौडमध्ये मिळविलेल्या खजिन्यासह रोहतासगड येथे सुखरूप येऊन पोहचला होता. नेहमीच्या सवयीप्रमाणे हुमायून येथे आठ महिनेपर्यंत चैन व विलासात मन रहिला. इकडे शेरशहाने बंगालमध्ये हुमायुनची संपूर्ण नाकेबंदी करुन दिल्लीशी असलेला त्याचा संबंध तोडला.

 

४. चौसाची लढाई (इ.स. १५३९) : 

 

शेरशहाने हुमायूनचे दिल्लीकडे जाणारे सर्व मार्ग रोखून धरले असले तरी हुमायूनचे सैन्य आडमार्गाने पूढे सरकत बिहारमधील कर्मनासा नदीजवळ चौसा या ठिकाणी तळ दिला. शेरशहास ससैन्य सर्व तयारीनिशी तेथे दाखल झाला दोन्ही फौजा एक दुसऱ्यासमोर तीन महिनेपर्यंत मुक्काम ठोकून होत्या. वेळ काढण्याकरीता त्याने हुमायूनाशी तहाच्या वाटाघाटी करण्यास सुरुवात केली. २५ जून १५३९ रोजी शेरशहाने जाहीर केले की, शहाबाद जिल्हयातील आदिवासींचा बंदोबस्त करण्याकरिता तो जात आहे यामुळे हुमायूनचे सैन्य गाफील राहिले. परंतु त्याच दिवशी रात्रीनंतर शेरशहा परत मागे फिरला. २६ जून १५३९ रोजी सकाळी हुमायूनच्या बेसावधपणे झोपलेल्या सैन्यावर शेरशहाने अचानक तीन बाजूंनी हल्ला केला. हुमायूनच्या सैन्यात एकच गोंधळ उडाला. सारेसैन्य पळून गेले. शेरशहाचा प्रचंड विजय झाला. एका पखालजीच्या मदतीने हुमायूनने कशीबशी गंगा नदी ओलांडली आणि स्वतःचे प्राण वाचविले. युध्दाच्या गडबडीत त्याचा जनानखान मागेच राहिला होता. शेरशहाने शाही कुटूंबातीलत सर्व स्त्रियांना सन्मानाने हूमायूनकडे आग्राला परत पाठविले. लढाईत विजयाने शेरशहाचा आत्मविश्वास अधिक वाढला.

 

५. बिलग्रामची लढाई (इ.स. १५४०) :

 

चौसाच्या पराभवानंतर हुमायून आग्र्याला आला. शेरशहाच्या वाढत्या शक्तीचा बंदोबस्त कसा करावा हा हुमायूनपूढे पेच होता. यासाठी त्याने सर्व भावांना आग्र्याला बोलविले. परंतु दुर्देवाने कोणत्याही योजनेवर त्याचे एकमत होऊ शकले नाही. कारण भावांची सहानुभूती त्यास कधीच मिळाली नव्हती सन १५४० च्या एप्रिलमध्ये हुमायून सैन्याची जमवाजमव करुन पुन्हा शेरशहाशी सामना करण्यासाठी निघाला. शेरशहाही तयारीनिशी पूढे आला. कनौज जवळील गंगा नदीच्या किनाऱ्यावर बिलग्राम या ठिकाणी दोन्ही सैन्याने समोरासमोर येऊन तळ दिला. १६ मे १५४० रोजी एकाएकी मुसळधार पाऊस पडला. मुघलांची छावणी नदीतीरावरील सखल भागात असल्याने नदीच्या पुराचे पाणी मुघलांच्या छावणीत शिरले. या संधीचा फायदा घेऊन १७ मे १५४० रोजी आफगाण सैन्याने मोगलांवर निरकाचा हल्ला चढविला. या अचानक हल्ल्यामुळे मोगल सैन्यात एकच तारांबळ उडाली. मोगलांचे सर्व सैन्य प्राण वाचविण्यासाठी पळू लागले. त्यांचा दारुण पराभव झाला. हुमायूनही आग्राकडे पळाला. आग्राहून सहकुटुंब खजिन्यासोबत दिल्ली व तेथून रोहटक, सरहिंद ओलांडून लाहोरकडे पळाला. शेरशहा लागोलाग दिल्लीवर चालून आला. हुमायूनच्या भावांनी हुमायूनला आश्रय दिला नाही. शेवटी हुमायूनला वनवास पत्कारावा लागला.

 

2. हुमायून व शेरशहा संघर्ष : (इ.स. १५३२ - १५४०)

प्रकरण १. इ हुमायून  व शेरशहा संघर्ष : (इ.स. १५३२ - १५४०) 


बाबरच्या मृत्युनंतर त्याचा वडील मुलगा नासिरुद्दीन महंमद हुमायून इ.स. १५३० मध्ये दिल्लीचा सम्राट झाला. गादीवर आल्यानंतर हुमायूनला अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले. 


१. हुमायून पुढील अडचणी : 


  • हुमायूनने आपल्या पित्याच्या इच्छेप्रमाणे काबूल व पंजाब हे प्रांत कामरानला दिले. हिंदालला संबळची सुभेदारी दिली आणि मिर्झा अस्करीस मेवाडची जहागिर दिली. पूढे हे भाऊ स्वतंत्र झाल्याने हुमायूनचे मोठे नुकसान झाले काबूल व पंजाब ताब्यात न राहिल्याने तिकडून येणारे काटक व शूर सैन्य हुमायुनला मिळणे कठीण झाले. भावाच्या स्वार्थी धोरणाकडे दुर्लक्ष केले. 

  • बंगाल व बिहारमधील अफगाण सरदार पुर्वीपासुन त्याच्या विरोधात होते. हुमायुनचा कट्टर शत्रू म्हणजे महंमद लोदी त्याने सिहांसनावरील हक्क सोडलेला नव्हता. शेरशहासूर या दुसऱ्या अफगाण अमिरालाही अफगाणांचे स्वतंत्र राज्य स्थापन करावयाचे होते. बंगालचा सुलतान नुसरतशहा हा सुध्दा अफगाणांना मदत करीत होता. 

  • आलमखानने गुजराथचा सुलतान बहादुरशाहचा आश्रय घेतला होता. बहादुरशाहने अफगाणांना पूर्णपणे पाठिंबा दिला त्यामूळे त्याचा ही बंदोबस्त करणे गरजेचे होते. संकटकाळी त्याच्या भावांनाही त्याला मदत केली नाही. म्हणून हुमायुनला बऱ्याच अडचणींनी तोंड द्यावे लागले.



२. चुनारगडचे पहिले युध्द (१५३२):


बाबरच्या मृत्यूनंतर बिहारमध्ये अफगाणांनी पुन्हा डोके वर काढले. महंमद लोदीने प्रचंड सैन्य जमवून जौनपूरवर स्वारी केली. हुमायूनने त्याचा दोहरीयाच्या लढाईत पराभव केला. या लढाईच्या दरम्यान शेरशहा सुरी नावाच्या एका अफगाण सरदाराने चूनारगडच्या किल्ल्यावर चार महिने वेढा दिला. शेवटी समेट होऊन किल्ला शेरशहाकडेच राहिला. चुनारगडसारख्या लष्करीदृष्टया महत्वाचा किल्ला शेरशहाकडे राहू देण्यात हूमायूनने मोठी चूक केली.


३. चूनारगडचे दुसरे युद्ध (१५३७):


हुमायूनचा गुजराथच्या बहादुरशाहशी लढा सुरु झाला. हुमायून गुजरातमध्ये लढण्यात गुतंला आहे हे पाहून शेरशहा सुरीने बिहारमध्ये सत्ता वाढविण्यास सूरुवात केली. जौनपूरच्या मोगल अधिकाऱ्यास त्याने लाच देऊन आपल्या हालचालीचा सुगावा हुमायूनास लागू दिला नाही. अल्पावधीतच शेरशहाने दक्षिण बिहारवर आपला अंमल बसवून बंगालवर शस्त्र उगारले. तेव्हा हुमायून जागा झाला. पुन्हा हुमायुनने चुनारगडाच्या प्रयत्नानंतर किल्ला हुमायूनच्या ताब्यात आला. परंतु तत्पूर्वी शेरशहाने बंगालच्या सुलतानचा पराभव करुन बंगालची राजधानी गौडवर ताबा मिळविला होता.


३. बंगाल विजय (इ.स. १५३८):


चुनारहून हुमायून बनारसला आला. या ठिकाणी शेरशहाने हुमायुनशी बोलणी चालविली. या तहान्वये हुमायुनने बिहार प्रांत आपल्याकडे घ्यावा असे ठरले. परंतु याच्या मोबदल्यात शेरशहाने १० लाख रु. वार्षिक खंडणी द्यावी असेही ठरले. परंतु याचवेळेस बंगालचा सुलतान महंमद याने हुमायुनकडे मदतीची याचना केली. त्याच्या विनंतीला मान देऊन हुमायुनने तहाची बोलणी बंद करुन बंगाल जिंकण्याचे ठरविले अल्पशा प्रतिकारानंतर हुमायून बंगालची राजधानी गौड येथे १५ ऑगस्ट १८३८ रोजी पोहचला तत्पुर्वी शेरशहा गौडमध्ये मिळविलेल्या खजिन्यासह रोहतासगड येथे सुखरूप येऊन पोहचला होता. नेहमीच्या सवयीप्रमाणे हुमायून येथे आठ महिनेपर्यंत चैन व विलासात मन रहिला. इकडे शेरशहाने बंगालमध्ये हुमायुनची संपूर्ण नाकेबंदी करुन दिल्लीशी असलेला त्याचा संबंध तोडला.


४. चौसाची लढाई (इ.स. १५३९) : 


शेरशहाने हुमायूनचे दिल्लीकडे जाणारे सर्व मार्ग रोखून धरले असले तरी हुमायूनचे सैन्य आडमार्गाने पूढे सरकत बिहारमधील कर्मनासा नदीजवळ चौसा या ठिकाणी तळ दिला. शेरशहास ससैन्य सर्व तयारीनिशी तेथे दाखल झाला दोन्ही फौजा एक दुसऱ्यासमोर तीन महिनेपर्यंत मुक्काम ठोकून होत्या. वेळ काढण्याकरीता त्याने हुमायूनाशी तहाच्या वाटाघाटी करण्यास सुरुवात केली. २५ जून १५३९ रोजी शेरशहाने जाहीर केले की, शहाबाद जिल्हयातील आदिवासींचा बंदोबस्त करण्याकरिता तो जात आहे यामुळे हुमायूनचे सैन्य गाफील राहिले. परंतु त्याच दिवशी रात्रीनंतर शेरशहा परत मागे फिरला. २६ जून १५३९ रोजी सकाळी हुमायूनच्या बेसावधपणे झोपलेल्या सैन्यावर शेरशहाने अचानक तीन बाजूंनी हल्ला केला. हुमायूनच्या सैन्यात एकच गोंधळ उडाला. सारेसैन्य पळून गेले. शेरशहाचा प्रचंड विजय झाला. एका पखालजीच्या मदतीने हुमायूनने कशीबशी गंगा नदी ओलांडली आणि स्वतःचे प्राण वाचविले. युध्दाच्या गडबडीत त्याचा जनानखान मागेच राहिला होता. शेरशहाने शाही कुटूंबातीलत सर्व स्त्रियांना सन्मानाने हूमायूनकडे आग्राला परत पाठविले. लढाईत विजयाने शेरशहाचा आत्मविश्वास अधिक वाढला.


५. बिलग्रामची लढाई (इ.स. १५४०) :


चौसाच्या पराभवानंतर हुमायून आग्र्याला आला. शेरशहाच्या वाढत्या शक्तीचा बंदोबस्त कसा करावा हा हुमायूनपूढे पेच होता. यासाठी त्याने सर्व भावांना आग्र्याला बोलविले. परंतु दुर्देवाने कोणत्याही योजनेवर त्याचे एकमत होऊ शकले नाही. कारण भावांची सहानुभूती त्यास कधीच मिळाली नव्हती सन १५४० च्या एप्रिलमध्ये हुमायून सैन्याची जमवाजमव करुन पुन्हा शेरशहाशी सामना करण्यासाठी निघाला. शेरशहाही तयारीनिशी पूढे आला. कनौज जवळील गंगा नदीच्या किनाऱ्यावर बिलग्राम या ठिकाणी दोन्ही सैन्याने समोरासमोर येऊन तळ दिला. १६ मे १५४० रोजी एकाएकी मुसळधार पाऊस पडला. मुघलांची छावणी नदीतीरावरील सखल भागात असल्याने नदीच्या पुराचे पाणी मुघलांच्या छावणीत शिरले. या संधीचा फायदा घेऊन १७ मे १५४० रोजी आफगाण सैन्याने मोगलांवर निरकाचा हल्ला चढविला. या अचानक हल्ल्यामुळे मोगल सैन्यात एकच तारांबळ उडाली. मोगलांचे सर्व सैन्य प्राण वाचविण्यासाठी पळू लागले. त्यांचा दारुण पराभव झाला. हुमायूनही आग्राकडे पळाला. आग्राहून सहकुटुंब खजिन्यासोबत दिल्ली व तेथून रोहटक, सरहिंद ओलांडून लाहोरकडे पळाला. शेरशहा लागोलाग दिल्लीवर चालून आला. हुमायूनच्या भावांनी हुमायूनला आश्रय दिला नाही. शेवटी हुमायूनला वनवास पत्कारावा लागला.


Monday, 1 August 2022

1. बाबर - मोगल साम्राज्याचा संस्थापक (१५२६-१५३०)

 (ब) बाबर - मोगल साम्राज्याचा संस्थापक (१५२६-१५३०)


लोदी घराण्याचा शेवटचा सुलतान इब्राहिम लोदी बाबर बरोबर झालेल्या पानिपतच्या पहिल्या युध्दात ठार झाला. त्यानंतर दिल्लीची सुलतानशाही संपुष्टात येऊन तेथे मोगलांची सत्ता प्रस्थापित झाली. ही नवीन मोगल राजवट भारतात सुमारे दोनशे वर्ष प्रभावी ठरली. या राजवटीने पूर्वीचे सुलतान काळातील धार्मीक धोरण बदलून धर्म व राजकारण यामध्ये फरक केला. त्यामुळेच सर्वसाधारण भारतीयांनी मोगल राजवटीस सुलतानशाहीप्रमाणे परकीय मानले नाही. दिल्ली सत्तेशी सतत विरोधात असलेले राजपूत आता मोगल साम्राज्य स्थापनेसाठी रक्त सांडताना दिसून येतात. म्हणून संपूर्ण भारतात मोगलांना साम्राज्यविस्तार मोठया प्रमाणात करता आला. परंतू हेच राजपूत औरंगजेबाच्या धर्माविरोधात गेले तेव्हा मोगलसाम्राज्याचे पतन अपरिहार्य ठरले.


1. भारतात येण्यापूर्वी बाबर : 


जहिरुद्दिन महंमद बाबर हा भारतीय इतिहासाचा मोगल वंशाचा संस्थापक व महान साम्राज्यनिर्माता म्हणून प्रसिध्द आहे. बाबरचा जन्म सन १४८३ मध्ये फरगणा प्रातांत झाला त्याचे वडील उमरशेख मिर्झा हा फरगणाचा राजा होता. मातापित्याकंडून बाबर आपला संबंध चंगेझखान आणि तैमुरलंग या मध्य आशियातील दोन सुप्रसिध्द विजेत्यांशी लावीत असे. बाबर वडिलांच्या मृत्युनंतर फरगणा प्रातांचा राजा झाला. परंतु राज्याच्या संरक्षणासाठी त्याला आपल्या नातेवाईकांबरोबर युध्दे करावी लागली. तो महत्वाकांक्षी असल्याने त्याला मोठे साम्राज्य स्थापन करावयाचे होते. त्यासाठी समरकंदरचे राज्य मिळविण्याचा त्याने तीन वेळा प्रयत्न केला पण त्यात त्याला अपयश आले नंतर विशेष लढा न देता काबूल बाबरच्या ताब्यात आले आणि गझनी येथे राज्य स्थापन केले. यानंतर बाबरने आपली दृष्टी भारताकडे वळविली. भारतावर वर्चस्व स्थापन करण्यासाठी त्याने काबूल वरुन भारतावर इ.स. १५९९ ते १५२५ या दरम्यान एकूण पाच मोहिमा काढल्या त्यातील पाचव्या आणि अंतीम मोहिमेची परिणीती पानिपतच्या पहिल्या युध्दात झाली.


2.  पानिपतची पहिली लढाई (२१ एप्रिल १५२६)


भारतात या काळात एकछत्री राज्य नव्हते. लहान लहान अनेक राज्ये होती. दिल्ली येथे इब्राहिम लोदी राज्य करीत होता. दौलतखानच्या पुत्रास सुलतानाने क्रूरपणाने वागविल्यामूळे त्याने पंजाबात आपले स्वातंत्र्य पुकारले. इब्राहिम लोदीला पदच्युत करण्यासाठी त्याने बाबरची मदत मागितली या संधीचा फायदा घेऊन बाबर पंजाबात पुन्हा आला. त्याला गुजरातचा सुभेदार इब्राहिम लोदीचा काका आलमखानही येऊन मिळाला. दौलतखानशी वितुष्ट आल्याने बाबरने प्रथम दौलतखानचा पराभव केला. पूढे बाबरच्या कैदेतच तो मरण पावला. अशा प्रकारे संपूर्ण पंजाब प्रांत बाबरच्या ताब्यात आल्यानंतर मोर्चा दिल्लीकडे वळविला.


पंजाबातील घटनांची हकीकत सुलतान इब्राहिम लोदीला समजताच पंजाबची प्राप्ती व बाबरची प्रगती रोखण्यासाठी तोही आपले एक लाख सैन्य घेऊन दिल्लीहून निघाला. उभय पक्षाच्या सैन्याची गाठ पानिपतच्या ऐतिहासिक युध्दमैदानावर झाली. बाबर आणि इब्राहिम या दोघांचे सैन्य एकमेकांसमोर आठ दिवस पावेतो तळ देऊन पडली होती. २१ एप्रिल १५२६ रोजी इब्राहिमचे शाही सैन्य पूढे सरसावले बाबरने डावपेचाने आपल्या सैन्याची निमुळती रचना करुन शत्रूंच्या सैन्यात मुसंडी मारली. त्याचबरोबर शत्रुच्या सैन्याची फळी फुटली आणि सर्वच गोंधळ निर्माण झाला. बाबरने लागलीच आपल्या तुलुगामा पध्दतीचा अवलंबन करुन बरोबर आणलेला तोफखाना शत्रूवर डागला. विस्कळीत झालेल्या इब्राहिमच्या सैन्याचे धैर्य सुटले. बाबरच्या सैन्याने याचा फायदा घेऊन दिल्लीच्या सैन्याची कत्तल सुरु केली. त्यात इब्राहिम ठार झाला. सर्वशक्तीमान ईश्वराच्या अपार कृपेने या युध्दात आम्हाला विजय मिळाला असा उल्लेख बाबरने केला आहे.

या पहिल्या पानिपतच्या लढाईचे महत्त्व म्हणजे या लढाईने दिल्लीवरील लोदीची सत्ता संपुष्टात आली आणि तिथे मोगल घराण्याची सत्ता प्रस्थापित झाली. पानिपतच्या विजयानंतर बाबरने दिल्ली व आग्रा ही शहरे काबीज केली. स्वतःला बादशहा अशी पदवी धारण केली.


3. खानुवाची लढाई (१६ मार्च १५२७): राजपुतांच्या विरुद्ध


..राजपुतांचा पूर्ण पराभव केल्याशिवाय मोगल साम्राज्य भारतात टिकणे अशक्य आहे याबाबत बाबरला पूर्ण जाणीव होती. बाबरने दिल्लीस आपले राज्य स्थापन केले हे राजपूतांना आवडले नाही. मेवाडचा राणासंग याला दिल्ली येथे आपली सत्ता स्थापन करावयाची होती. बाबर तैमुरलंगाप्रमाणे लूट घेऊन पुन्हा परत जाईल व दिल्ली आपल्याला घेता येईल अशी राणासंगाची कल्पना होती. परंतु ती चुकीची ठरली. बाबर कायमचा भारतात राहाणार असे कळल्यानंतर त्याची घोर निराशा झाली होती. राणासंगाने आता बाबरला भारताबाहेर घालवून देण्याची निश्चय केला. राजपूतांमध्ये राणासंगाला फार मान होता आणि त्याने हाक देताच राजस्थानमधील सर्व राजे त्याच्या ध्वजासाली एकत्र आले. राणासंग आणि बाबर यांच्या सैन्याची गाठ फत्तेपूर शिक्रीपासून १० मैलावर खानुवा या ठिकाणी झाली. बाबरचा राजपूतांबरोबर लढण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. तरी त्याने न डगमगता आपले सैन्य जमा केले. तोफखाना सज्ज केला. १६ मार्च १५२७ रोजी दोघे सैन्यामध्ये मोठी लढाई झाली. बाबरने आपल्या युध्द कौशल्यावर विजय मिळविला. या लढाईच्या वेळी सैन्याला उत्साह निर्माण होण्यासाठी जे आवेशयुक्त भाषण केले त्याचा चांगला परिणाम झाला. बाबर विजयी झाला आणि राणासंगाचा पराभव होऊन तो लढाईत जखमी झाला. त्याच्या सैनिकांनी त्याला उचलून रणक्षेत्राबाहेर पाहोचविले.


खानुवाचे युध्द हे अत्यंत महत्वपूर्ण समजले जाते. शेवटपर्यंत या लढाईत विजयी कोण होतो याचा निर्णय लागत नव्हता इतक्या अटीतटीची ही लढाई झाली. लढाई फक्त दहा तास झाली परंतु तिचे परिणाम दूरवर झाले. परकीय शत्रूला भारताबाहेर घालविण्याचा राजपूतांचा प्रयत्न पूर्णपणे अयशस्वी झाला. भारतात बाबरने स्थापन केलेले मोगल साम्राज्य स्थिर झाले. बाबरच्या दृष्टीने खानुवाचा विजय पानिपतपेक्षा महत्वाचा होता. या विजयामुळे बाबरची एक धाडसी आक्रमक ही भूमिका संपून मोगल राज्य संस्थापक म्हणून त्याच्या आयुष्यात सुरूवात झाली. सत्तेचा केंद्रबिंदू आजपर्यंत काबूलमध्ये होते ते आता कायमचे भारतात आले.


4. घाघराचे युध्द (६ मे १५२९) : पठानांच्या विरुद्ध 


खानुवाच्या विजयाने बाबरचे आसन स्थिर झाले. राजपूतांचा जरी बंदोबस्त झाला तरी अद्याप अफगाणांचा विरोध मोडून काढावयाचा होता. इब्राहिम लोदीचा भाऊ महंमद लोदी याने बिहार मध्ये आपली सत्ता स्थापन केली. बाबरविरुध्द लढण्याकरिता एक लाख सैन्य उभारले होते. बाबरास त्याच्या हालचाली कळताच तो ससैन्य अफगाणांचा पारिपत्यास निघाला. बंगालचा सुलतान नुसरतशहा हा पण महंमद लोदीच्या मदतीस आला होता. ६ मे १५२९ रोजी बाबराने अफगाण व नुसरतशहा यांच्या संयुक्त सैन्याचा घाघरा येथील लढाईत पराभव केला. या युध्दाने अफगाणांची दिल्लीचे राज्य जिंकण्याची आशा धुळीला मिळाली आणि बिहारचा प्रदेश मोगलांच्या अंमलाखाली आला. युध्दानंतर नुसरतशहा आणि बाबर यांच्यात आता तह झाला या तहान्वये बंगालच्या स्वातंत्र्याला धक्का लावू नये आणि नुसरतशहाने बाबरच्या शत्रूला आश्रय देवू नये असे ठरले.


5. बाबरांचा मृत्यू व योग्यता : 


भारतात पाच वर्षाच्या कालावधीत बाबराने पानिपत, खानवा व घाघरा या लढाया जिंकून मोगलांचे राज्य सिंधूपासून बिहारपर्यंत प्रस्थापित झाले. या एकसारख्या दगदगीमुळे तो आजारी पडला. वयाच्या ४८ व्या वर्षी तो २६ डिंसेबर १५३० रोजी मृत्यु पावला. समकालीन आणि आधूनिक इतिहासकारांनी एकमुखाने बाबरास मध्यकाळातील आशियाचा अत्यंत प्रभावशाली सम्राट मान्य केले आहे. भारतात तोफखाना व दारुगोळ्याचा प्रयोग करणारा तो पहिला मूसलमान शासक होता. बाबर कडवा मुसलामान होता. हिंदूना तो काफीर समजत असे तर अफगांणावर त्याचा अजिबात विश्वास नव्हता. आयोध्या, मथुरा व चंदेरी येथील अनेक मंदिरे त्याने जमीनदोस्त केली होती. इतकेच नव्हे तर मथूथुरा व आयोध्या येथे त्याने कृष्ण व राम यांच्या जन्मस्थानी मशिदी उभारल्या बाबरच्या अकाली निधनामुळे त्याला योग्य राज्यव्यवस्था बसवता आली नाही म्हणून पूढे हुमायूनला त्रास झाला बाबर विद्या व कलांचा भोक्ता होता. त्याने आपले आत्मचरित्र तुर्की भाषेत बाबरनामा किंवा तुझुक ए बाबरी लिहिलेले आहे.


Sunday, 31 July 2022

सातवाहन घराणे- गौतमीपुत्र सातकर्णी

D सातवाहन घराणे (Satvahan Period)
 
मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर उत्तर भारतात शुंग, कण्व, कुशाण घराण्यांचा उदय झाला तर दक्षिण भारतात ‘सातवाहन’ किंवा ‘आंध्र’ घराण्याचा उदय झाला. सातवाहन घराण्याची सत्ता इ. स. पु. २३० ते इ. स. २३० अशी जवळजवळ ४५० वर्षे द. भारतात होती. हे घराणे महत्वाचे होते कारण -
i. हे महाराष्ट्रातील पहिले महत्वाचे घराणे होते.
ii. हे महाराष्ट्रातील पहिले राज्य निर्माते होते.
iii. यांच्या काळात मराठी भाषा, मराठी संस्कृती याला आकार यायला सुरुवात झाली.
१. सातवाहन मुळचे कोण?
सातवाहन मुळचे कोण याबद्दल विद्वानांमध्ये मतभेद आहे. सातवाहनांची दोन नावे साधनांमध्ये येतात. अ. आंध्र किंवा आंध्रभृत्य ब. सातवाहन त्याचा अर्थ खालीलप्रमाणे सांगता येईल.
अ. ‘आंध्र किंवा आन्ध्रभृत्य’ :
पुराणामध्ये सातवाहनांचा उल्लेख ‘आंध्र’ किंवा ‘आंध्राभृत्य’ असा येतो. त्याचा अर्थ,
i. प्राचीन काळात ‘आंध्र’ नावाची जमात होती तीच पुढे राज्यकर्ते सातवाहन झाले
ii.किंवा आन्ध्र राजांचे सातवाहन सेवक असावेत किंवा
iii.सातवाहन राजांचे चे आंध्र सेवक असावेत.
iv.काही इतिहासकार म्हणतात कि, सातवाहन मुळचे आंध्रप्रदेशातील असावेत. नंतर ते महाराष्ट्राचे राज्यकर्ते झाले असावेत. पण सातवाहनांचे सुरुवातीचे शिलालेख महाराष्ट्रात सापडतात त्यामुळे सातावाहानाचे मुळ स्थान महाराष्ट्रातील असावे.
३. सातवाहन काळातील राजकीय जीवन : थोडक्यात :
ब. सातवाहन :
काही इतिहासकारांच्या मते, i. सातवाहन सूर्याचे उपासक होते, सूर्याच्या रथाला सात घोडे असतात. त्यामुळे या सुर्योपासक घराण्याला ‘सातवाहन’ असे नाव पडले असावे.
ii. सातवाहनांच्या मुळ पुरुषाचे नाव सातवाहन होते. त्यामुळे या घराण्याचे नाव सातवाहन पडले.
वरील चर्चेवरून हे स्पष्ट होते कि, सातवाहन हे मूळ महाराष्ट्रातील होते. प्रतिष्ठान(पैठण) ही सातवाहनांची दीर्घकाळ राजधानी होती.
 
२. सातवाहनांचा पहिला राजा : सिमुक-
सिमुक (शिमुक,शिन्धुक) हा सातवाहन साम्राज्याचा संस्थापक मानला जातो. सातवाहनाच्या उदय काळात त्यांना शकांच्या आक्रमणाचा सामना करावा लागला. त्यांनी सातवाहनाना पराभूत करून महाराष्ट्रात वर्चस्व मिळवले. सातवाहन घराण्यात अनेक राजे होऊन गेले. मात्र या सर्वात गौतमीपुत्र सातकर्णी हा सर्वात पराक्रमी राजा होऊन गेला.
 
३. गौतमीपुत्र सातकर्णी (इ.स. १०६-१३०):
सातवाहन घराण्यातील सर्वश्रेष्ठ राजा गौतमीपुत्र सातकर्णी होता. त्याने आपल्या अंगभूत पराक्रमाने सातवाहन राज्याचा विस्तार केला. गौतमीपुत्राच्या काळात सातवाहन राज्य तत्कालीन भारतातील एक प्रभावशाली राज्य बनले. गौतमीपुत्र सत्तेवर आला त्यावेळी सातवाहनांचा बराचसा भूभाग शक राजांनी जिंकला होता. तेंव्हा गौतमीपुत्रासमोर शक हेच प्रमुख आव्हान होते. त्याने प्रथम शकांशी युद्ध केले.
 
i.शकांचा पराभव :
गौतमिपुत्राने शक जमातीच्या क्षहारात घराण्याचा पराभव केला. पराभूत क्षहरात राजा नहपान याची ८००० चांदीची नाणी सापडली आहेत. या नाण्यावर गौतमीपुत्राची मुद्रा पुन्हा उमटवली आहे. यावरून गौतमिपुत्राने शकांचा पराभव केला हे स्पष्ट होते.
ii.माळवा जिंकला:
शकांचा पराभव केल्यानंतर गौतमीपुत्र सातकर्णी याने माळवा(आजचा मध्य प्रदेश) जिंकला. त्यामुळे सातवाहन राज्याचा विस्तार मध्य भारतातही झाला.
iii. शक-यवन-पहलव-निशुदन :
गौतमीपुत्राच्या शिलालेखात त्याने ही पदवी घेतली आहे. त्याचा अर्थ शक, यवन म्हणजे ग्रीक आणि पल्लव यांचा पराभव करणारा असा होतो.
iv. त्रिसमुद्रतोयपितवाहन :
नाशिक येथे एक शिलालेख गौतमिपुत्राच्या आईने कोरला आहे. त्यात तिने ही पदवी आपल्या मुलासाठी कोरली आहे. त्याचा अर्थ ज्याचे घोडे तिन्ही समुद्रांचे पाणी प्याले आहेत तो, असा होतो. म्हणजे त्याची सत्ता तीन समुद्राच्या मधल्या भागात म्हणजे दक्षिणापथात चालत असावी.
 
४. वाशिष्टीपुत्र पुलुयामी :
                               गौतमीपुत्र सातकर्णी नंतर वाशिष्टीपुत्र सत्तेवर आला. त्याची नाणी आंध्र प्रदेशात सापडल्याने त्याचे आंध्र भागावर वर्चस्व होते. हे स्पष्ट होते. त्याच्या काळात शक-सातवाहन संघर्ष पुन्हा उफाळून आला. शक राजा रुद्रदामन पहिला याने सातवाहनांचा दोनदा पराभव केला. परंतू सातवाहनांशी विवाहसंबध असल्याने त्यांचे राज्य नष्ट केले नाही.
 
५. यज्ञश्री सातकर्णी : 
या राज्यकर्त्याने शकांडून कोकण, माळवा हे प्रदेश जिंकून घेतले. त्याला समुद्र संचार व व्यापारात रस होता. त्याच्या नाण्यांवर शिडाच्या जहाजाच्या प्रतिमा आहेत. त्यावरून ही गोष्ट स्पष्ट होते. यज्ञश्री नंतर सातवाहन सत्तेला उतरती कळा लागली. इ.स. तिसऱ्या शतकात सातवाहन सत्तेला साम्राज्याचा ऱ्हास झाला.


Monday, 21 February 2022

शिवाजी महाराजांचे मानवतावादी तत्त्वज्ञान- श्रीमंत कोकाटे

 


Feb 19, 2022

 

छत्रपती शिवाजीराजांनी रयतेचे लोककल्याणकारी स्वराज्य निर्माण केले. त्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केले. प्रसंगी जीवघेणा संघर्ष केला. त्यांच्या जीवनात अनेक संकटे आली; परंतु ते हतबल झाले नाहीत. संकटसमयी ते लढणारे होते; रडणारे नव्हते. त्यांनी हाती शस्त्र घेऊन स्वराज्याच्या शत्रूंना धडा शिकविला. त्यांनी मोगल, आदिलशहा, पोर्तुगीज, सिद्धी यांच्याविरुद्ध लढा दिला; पण तो लढा राजकीय होता, धार्मिक नव्हता. याउलट त्यांचे कार्य सर्व धर्मांतील प्रजेच्या हिताचे होते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात भेदभाव केला नाही. याचे अनेक संदर्भ शिवचरित्रात अनेक ठिकाणी आहेत. शिवाजीराजांच्या काळात अनेक जाती होत्या, अनेक धर्म होते; परंतु धर्मांधता आणि जातीय विद्वेषाला त्यांनी पायबंद घातला. त्यांचे विचार आणि कार्य सकल मानवजातीच्या कल्याणाचे होते. याबाबत समकालीन गोव्याचा पोर्तुगीज व्हॉइसरॉय त्याच्या देशातील राजाला जानेवारी १६७०मध्ये पाठविलेल्या पत्रात पुढीलप्रमाणे कळवितो, ‘शिवाजीमहाराज हे प्रबळ राजे आहेत. त्यांची प्रजा त्यांच्यासारखीच मूर्तिपूजक असली, तरी ते सर्व धर्मांना नांदू देतात. या भागातील (भारतातील) अत्यंत धोरणी व राजकारणी (मुत्सद्दी) पुरुष म्हणून त्यांची ख्याती आहे.’ पोर्तुगीज व्हॉइसरॉयच्या पत्रावरून स्पष्ट होते, की छत्रपती शिवाजीमहाराज व त्यांची प्रजा मूर्तिपूजक असली, तरी मूर्तिपूजा न करणाऱ्यांच्या धार्मिक अधिकारावर त्यांनी अतिक्रमण केले नाही. याचा अर्थ त्यांनी बहुसांस्कृतिक मानसिकतेचा आदर केला. आपल्या धार्मिक श्रद्धा त्यांनी परधर्मियांवर लादल्या नाहीत किंवा त्यांचा धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार त्यांनी हिरावून घेतला नाही. यावरून स्पष्ट होते, की मध्ययुगीन काळातील ते सर्वांत प्रगल्भ राजे आहेत. इतर धर्मियांनी आपल्या धर्माला अनुकूलच वर्तन केले पाहिजे हा आततायीपणा त्यांच्या ध्येयधोरणात नव्हता. प्रागतिक विचारांबरोबरच अनेक धर्मियांच्या धार्मिक श्रद्धा जोपासायला हव्यात ही अत्युच्च विचारधारा शिवरायांची होती.

लोककल्याणकारी प्रशासन

छत्रपती शिवाजीमहाराज दक्षिण दिग्विजयासाठी तमिळनाडूत होते; तेथील प्रदेश त्यांनी जिंकून घेतल्यानंतर तिरूवाडी येथे असताना डच व्यापारी काही सवलती मागून व्यापारी करार करण्यासाठी शिवाजीराजांकडे आले. तेव्हा शिवाजीराजांनी डचांबरोबर केलेल्या व्यापारी करारात एक कलम आवर्जून घातले. ते पुढीलप्रमाणे, ‘‘इतर कारकिर्दीत (हा भाग जिंकून घेण्यापूर्वी) तुम्हाला स्त्री-पुरुष यांना गुलाम म्हणून खरेदी-विक्री करण्याची अनिर्बंध परवानगी होती; परंतु माझ्या राज्यात स्त्री-पुरुष यांना गुलाम म्हणून खरेदी-विक्री करण्याची परवानगी मिळणार नाही असे काही करण्याचा प्रयत्न कराल, तर माझी माणसे तुम्हाला प्रतिबंध करतील. या कलमाचे काटेकोर पालन झालेच पाहिजे.’ ज्या मध्ययुगीन काळात जगभर स्त्री-पुरुषांची गुलाम म्हणून खरेदी-विक्री केली जात होती, त्या काळात शिवाजीमहाराजांच्या राज्यात स्त्री-पुरुषांची गुलाम म्हणून खरेदी-विक्री केली जात नव्हती. युरोपसारख्या पुढारलेल्या खंडातदेखील मध्ययुगीन काळात गुलामगिरी होती. त्या काळात शिवाजीमहाराजांच्या स्वराज्यात गुलामीची प्रथा नव्हती. औद्योगिक क्रांतीत युरोप आघाडीवर होता; परंतु मानवतावादी धोरणात शिवाजीराजांचे स्वराज्य आघाडीवर होते याचा हा भक्कम पुरावा आहे. राज्य, राजकारण, राज्यकारभार, शासन आणि प्रशासन हे लोककल्याणकारी असले पाहिजे हा शिवाजीमहाराजांचा आग्रह होता, हे डच व्यापारी करारावरून स्पष्ट होते. ढाल-तलवारीच्या गदारोळात मानवता वृद्धिंगत झाली पाहिजे हे शिवाजीमहाराजांचे धोरण होते.

बहुसांस्कृतिक समाजव्यवस्था

पुण्याजवळील उरुळी आणि फुरसुंगी येथील मशिदीच्या व्यवस्थापनात मोकदम चांदखान ढवळाढवळ करत असल्याचे शिवरायांना समजले तेव्हा शिवाजीराजांनी त्याला समज दिली, ‘‘ज्याचा त्याचा अधिकार त्याला मिळायला हवा.’’ बहुसांस्कृतिक समाजव्यवस्थेत ज्याचा त्याचा अधिकार त्याला मिळावा, कोणावरही अन्याय होऊ नये; परंतु अन्याय-अत्याचार करणारे आततायी कृत्य शिवाजीराजांनी खपवून घेतले नाही. शिवाजीराजांनी लोककल्याणासाठी हाती तलवार घेतली. ती त्या काळाची गरज होती. त्यांनी अफजलखान, शाईस्तेखान यांचा बंदोबस्त केला; परंतु जखमी सैनिकांना औषधोपचार केला. अगदी शत्रूपक्षातील जखमी सैनिकांनादेखील त्यांनी जीवदान दिले. अफजलखानाला ठार मारल्यानंतर शिवाजीराजांनी पुढे काय केले याचे वर्णन समकालीन कृष्णाजी अनंत सभासद पुढीलप्रमाणे करतात, ‘‘मग राजे यांनी खानाचे पुत्रास व सरदार पळून गेले होते त्यांस धरून आणिले. राजा खासा प्रतापगडाखाली उतरोन कुल आपले लोक व अफजलखानाचे लोक व त्यांचे पुत्र भांडते माणूस होते तितकियांस भेटून, पोटाशी धरून, दिलासा करून, भांडते लोक जे पडले होते त्यांच्या लेकांस चालविले.’’ शिवाजीराजांनी दुष्ट अफजलखानाला मारले; परंतु त्याच्या मुलास अभय देऊन प्रेमाने वागविले, असे समकालीन सभासद सांगतात. त्यांचे धोरण मानवतावादी होते.

प्रजाहित रक्षक

शेतकऱ्यांच्या एका काडीचीदेखील तसनस (नासधूस) न व्हावी,’ अशी शिवाजीराजांची आज्ञा होती. शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाच्या साधनांचे रक्षण झाले पाहिजे या त्यांच्या सक्त सूचना होत्या. शिवाजीराजांनी आपल्या अधिकाऱ्यांना सांगितले, ‘संध्याकाळी झोपताना तेलवातीचे दिवे विझवून झोपा अन्यथा पेटलेली वात उंदीर घेऊन जाईल व त्यामुळे जनावरांचा चारा, पीक जळून खाक होईल. स्वयंपाकघरातील विस्तव विझवून झोपा अन्यथा चारा नष्ट झाल्यावर शेतकऱ्यांचे पीक, फांदी, लाकूडफाटा आणाल, हे तर मोगलांपेक्षा जास्त जुलूम केल्यासारखे होईल.’’ आई ज्या पद्धतीने मुलांची काळजी घेते त्याप्रमाणे शिवरायांनी प्रजेची काळजी घेतली.

·        


दुष्काळाप्रसंगी शिवाजीराजांनी आपल्या अधिकाऱ्यांना सांगितले, ‘बैलजोडी दगावली असेल, तर शेतकऱ्यांना बैलजोडी द्या. खंडी-दोन खंडी धान्य द्या. त्यासाठी आपल्या तिजोरीवर बोजा पडला तरी चालेल. वाढीदिडीने वसूल करू नका. मुद्दलच तेवढी घ्या.’ शिवाजीराजे संकटसमयी श्रमकरी, कष्टकरी, शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी रयतेला शून्य टक्के व्याजदराने कर्ज दिले. गरिबांचे संसार उद्‌ध्वस्त करणाऱ्या व्याज पद्धतीला त्यांनी आळा घातला. ते मानवतावादी होते, हे त्यातून स्पष्ट होते. म्हणून शिवकाळात अत्याधुनिकता नसली तरी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नाहीत. सर्जेराव जेधे यांना पाठविलेल्या पत्रात शिवाजीराजे म्हणतात, ‘‘तुमच्या इलाख्यात मोगलांची फौज येत आहे. हयगय न करता रयतेला लेकराबाळासह सुरक्षितस्थळी पाठवा. हयगय कराल, तर तुमच्या मस्तकी रयतेचे पाप बसेल.’’ संकटसमयी रयतेला मदत करणे हेच खरे पुण्य आहे, संकटसमयी रयतेला वाऱ्यावर सोडून देणे हे पाप आहे. अशी शिवाजीराजांची पापपुण्याची संकल्पना होती.

मानवतावादी धोरण

स्त्रियांचा आदर-सन्मान केला पाहिजे. शत्रूची असली तरी तिचा आदर-सन्मान करावा, ही शिवाजीराजांची राजनीती होती. शिवाजीराजांच्या या नैतिकतेचे वर्णन खाफीखानासारख्या समकालीन मोगल इतिहासकारांनीदेखील केलेले आहे. शिवाजीराजांनी रणांगण गाजविले. अनेक शत्रूंचा बंदोबस्त केला; परंतु लोककल्याणकारी, मानवतावादी धोरण त्यांनी कधीही सोडले नाही. त्यामुळेच समकालीन कृष्णाजी अनंत सभासद म्हणतात, ‘‘एवढा मराठा पातशहा छत्रपती जाहला, ही गोष्ट काही सामान्य झाली नाही.’’ शिवाजीराजांचे कार्य कर्तृत्व, जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा आणि राष्ट्राच्या सीमा ओलांडून वैश्‍विक दर्जाचे आहे. त्यांच्या जीवनाचे तत्त्वज्ञान मानवतावादी आहे.

 

Wednesday, 5 January 2022

भीमा कोरेगाव स्तंभाच्या स्मृतींचा इतिहास- डॉ श्रद्धा कुंभोजकर

भीमा कोरेगाव मधील जयस्तंभ आणि त्याभोवती असणारे स्पर्धक स्मृतींचे पदर उलगडण्याचा प्रयत्न या निबंधात केला होता. मूळ निबंध २०१२ मध्ये ईकनॉमिक एन्ड पोलिटिकल वीकली मध्ये प्रकाशित झाला होता. त्याच्यात सुधारणा करून केलेला अनुवाद परिवर्तनाचा वाटसरू आणि ऐसी अक्षरे वर २०१८ मध्ये प्रकाशित झाला होता. लेख वाचण्यासाठी इथे clik करा वा 

डॉ श्रद्धा कुंभोजकर

Wednesday, 14 July 2021

4.2 करोड इंग्रजी इ पुस्तके

 4.6 कोटी इंग्रजी अभ्यासाची पुस्तके। सर्व विषयांची।मोफत। राष्ट्रीय डीजीटल वाचनालय । खालील लिंक ओपन करा


https://historydepartmentsardacollege.blogspot.com/p/46-national-digital-library.html

Thursday, 1 July 2021

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींचे लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्सने भरवले ऑनलाइन प्रदर्शन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्स मध्ये शिकले, त्या संस्थेनं त्यांची आठवण जागवण्यासाठी हे ऑनलाइन प्रदर्शन तयार केलंय. त्यांनी भरलेल्या प्रवेश अर्जापासून पुढे अनेक महत्वपूर्ण दस्तऐवज यात पाहता येतात. आवर्जून पहावे असं प्रदर्शन. 
https://www.lse.ac.uk/library/whats-on/exhibitions

Tuesday, 22 June 2021

स्थानिक इतिहास: पळाशी गावचे कलावैभव- भूषण देशमुख

येथे क्लिक करा
पळशीचं शिल्पवैभव
-----
वर्षासहलीचा आनंद घेण्याबरोबर अदभूत शिल्पसौंदर्याची अनुभूती घ्यायची असेल, तर एखादा रविवार पळशीसाठी राखून ठेवा. पारनेर तालुक्यातलं हे छोटसं गाव कल्याण-निर्मल या भारताच्या पूर्व आणि पश्चिमेकडील दोन समुद्र किनाऱ्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरच्या टाकळी ढोकेश्वरपासून वीस किलोमीटर अंतरावर आहे. चहूबाजूनं दगडी तटबंदी असलेली अशी गावं आज दुर्मिळ झाली आहेत. वेशीचे चार दरवाजे बंद केले की, पूर्वी गाव एकदम सुरक्षित बनत असे. होळकरांचे कर्तबगार दिवाण असलेल्या पळशीकरांनी हे गावं वसवलं, तिथं देखणे चारमजली भव्य वाडे उभारले. दोनशे-सव्वादोनशे वर्षांपूर्वी उत्तर पेशवाईत बांधलेल्या या वास्तू पाहिल्या, की पुण्यातला शनिवारवाडा कसा असेल, याची कल्पना येते. या वाड्यांचं वैशिष्ट्य म्हणजे तिथं असलेली काष्ठशिल्पं. सागवानी लाकडात कोरलेली अशी शिल्पं महाराष्ट्रात फार कमी ठिकाणी बघायला मिळतात. हत्ती, घोडा, वानर, मासा याबरोबरच विविध प्रकारची फळं आणि फुलांची गुंफण इथं पहायला मिळते. त्यातील डाळिंब तर चक्क हलतं. साखळी इतकी नजाकतीनं कोरली आहे, की ती खरीखुरी भासावी. काही मानवी आकारही आहेत. त्यातील मूल घेतलेली महिला बघण्यासारखी आहे. केळी किंवा सुरूसारखी पानं कोरलेले बारा खांब लाजवाब. वरच्या मजल्यावर रंगमहाल आहे. त्याच्या सुबक लाकडी कमानी अजून शाबूत आहेत. मात्र, भिंतीवर काढलेली मराठा, माळवा शैलीतली चित्रं पुसली जाऊन नव्यानं कुणी आपली कला पेश केली आहे. या वाड्यातलं देवघरं आवर्जून बघायला हवं. तिथलं नक्षीकाम केलेलं लाकडी छत हल्लीच्या पीआेपीला लाजवेल असं आहे. या देवघरात ‘वासुदेव प्याला’ होता. तान्ह्या बाळकृष्णाला घेऊन यमुना आेलांडणारा वासुदेव त्यात दाखवलेला होता. या प्याल्यात पाणी अोतायचं. कृष्णाच्या पायाला पाणी लागलं, की ते अोसरतं, याचा अनुभव मी मागच्या भेटीत घेतला होता. या रविवारी ‘स्वागत अहमदनगर’ हेरिटेज वाॅकमध्ये मात्र हा वासुदेव प्याला पाहता आला नाही. मालकांनी तो नेला, असं समजलं. या वाड्याची काळजी गणेशदेवा पोळ घेतात. या वाड्याची दुरूस्ती सध्या सुरू असल्यानं आणखी काही शतकं हे वैभव आपल्याला पाहता येईल. या वास्तूजवळच असलेला वाडा आर्किटेक्ट लक्ष्मणराव पळशीकर यांनी छान जपला आहे. पूर्वजांनी दिलेलं संचित कसं जपावं, याचा आदर्श या दाम्पत्याकडून घ्यावा. 

गावाच्या वेशीबाहेर ‘धाकटी पंढरी’ म्हणून अोळखलं जाणारं पळशीकरांनी बांधलेलं विठ्ठल मंदिर आहे. राही आणि रूख्मिणीसमवेत असलेल्या या विठ्ठलाचं दर्शन घेतलं, की चहुबाजूनं फिरत तिथलं शिल्पसौैंदर्य डोळ्यांत साठवावं. चारही बाजूंना बुरूज असलेल्या तटबंदीच्या दर्शनभागी उत्तर हिंदुस्थानी शैलीतलं सुरया आणि देवतांच्या मूर्ती असलेलं प्रशस्त प्रवेशद्वार आणि शेजारी पुष्करणी आहे. नऊविध विद्यांच्या प्रतीक असलेल्या नऊ पायऱ्या चढून गेलं, की अठरा पुराणांचे प्रातिनिधीक स्वरूप असलेले अठरा खांब आणि त्याखाली असलेले विशाल दगडी कासव दिसतं. गाभाऱ्यात प्रवेश करताना रिद्धी-सिद्धी आणि ६४ योगिनी आपलं लक्ष वेधून घेतात. पांडुरंगाच्या प्रभावळीवर मत्स्य, कच्छादी दशावतार कोरलेले आहेत. मंदिराच्या बाहेरील भिंतींवर आणि कळसावर असलेली शिल्पं हे इथलं खरं वैभव आहे. यातील काही शिल्प मिनीएचर म्हणावीत, इतकी आकारानं लहान आहेत. नीट निरखून पाहिलं, तरच त्यातलं सौंदर्य लक्षात येतं. मोरांचे असंख्य आकार त्यात आहेत. पोपट आहेत, कारंजी आहेत. झुंजणारे हत्ती तर अप्रतिम. झाशीच्या राणीसारखी पाठीशी मूल घेऊन घोड्यावरून लढणारी वीरांगना इथं आहे, भाल्यानं शिकार करतानाचं शिल्प आहे. नगरच्या किल्ल्यांवर आढळणारं शक्तीसामर्थ्य दाखवणारं पायाखाली हत्ती आणि वरच्या बाजूला आकारानं मोठ्या असलेल्या सिंहाचं शिल्प या मंदिराच्या कळसाच्या समोर विराजमान झालं आहे.

 केवळ छन्नी आणि हातोडी वापरून दोन शतकांपूर्वी माळवा प्रांतातून आलेल्या शिल्पकारांनी या कलाकृती घडवल्या. सुशोभीकरण म्हणून काहींवर अलिकडे अाॅईलपेंट लावण्यात आला असला, तरी तो काढून मूळ स्वरूपात हे शिल्पवैभव जपण्यात येणार असल्याचं समजलं. काही वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या दोन बंधाऱ्यांमुळं पळशीचं जलदुर्भिक्ष्य तर दूर झालंच आहे, शिवाय या मंदिराला सुरेख असं जलवैभव प्राप्त झालं आहे. पानिपतच्या रणसंग्रामात मोठा पराक्रम गाजवणाऱ्या आनंदराव रामराव पळशीकरांच्या घरातील दोन सतींचं स्मारक आणि मंदिरं पलिकडं आहेत. जीर्णोद्धारामुळं ही मंदिरंही नव्यानं सजली आहेत. सध्या पावसाचे दिवस आहेत. सगळं वर्ष घरात बसून काढल्यानंतर मोकळा श्वास घेण्यासाठी, जगण्याचा नवा अर्थ शोधण्यासाठी कुठं जायचं असेल, तर पळशी हे उत्तम ठिकाण आहे....

भूषण देशमुख
अहमदनगर
bhushandeshmukh07@gmail.com

(छायाचित्रे `स्वागत अहमदनगर हेरिटेज वाॅक`च्या सदस्यांनी काढलेली आहेत.)


Friday, 18 June 2021

साधना साप्ताहिक जुने अंक

साधना साप्ताहिक जुने अंक

शिवाजी महाराजांची तीन नवी चित्रे

शिवाजी महाराजांची तीन नवी चित्रे
अहमदनगर कॉलेजच्या माजी इतिहास विभाग प्रमुख *प्रा. डॉ. वृषाली सुधीर तारे  यांचे चिरंजीव श्री. प्रसाद तारे* यांनी *छ.शिवाजी महाराजांच्या* तीन चित्रांचे संशोधन केले आहे. प्रसाद हे मेकॅनिकल इंजिनिअर असून टाटा टेक्नॉलॉजी मध्ये प्रकल्प व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत.
नगरच्या सुपुत्राला हार्दिक शुभेच्छा.
डॉ. वृषाली तारे मो.नं.91 90110 73115

Featured Post

🌟Practicals- इतिहास-भारताची राष्ट्रीय चळवळ (१९२० ते १९४७) History- Indian National Movement

  🌟 इतिहास विषय P ractical प्रॅक्टिकल  - परीक्षेचे स्वरूप :•    •             इतिहास विषय घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना practical / प्...

Popular Posts