Tuesday, 22 June 2021

स्थानिक इतिहास: पळाशी गावचे कलावैभव- भूषण देशमुख

येथे क्लिक करा
पळशीचं शिल्पवैभव
-----
वर्षासहलीचा आनंद घेण्याबरोबर अदभूत शिल्पसौंदर्याची अनुभूती घ्यायची असेल, तर एखादा रविवार पळशीसाठी राखून ठेवा. पारनेर तालुक्यातलं हे छोटसं गाव कल्याण-निर्मल या भारताच्या पूर्व आणि पश्चिमेकडील दोन समुद्र किनाऱ्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरच्या टाकळी ढोकेश्वरपासून वीस किलोमीटर अंतरावर आहे. चहूबाजूनं दगडी तटबंदी असलेली अशी गावं आज दुर्मिळ झाली आहेत. वेशीचे चार दरवाजे बंद केले की, पूर्वी गाव एकदम सुरक्षित बनत असे. होळकरांचे कर्तबगार दिवाण असलेल्या पळशीकरांनी हे गावं वसवलं, तिथं देखणे चारमजली भव्य वाडे उभारले. दोनशे-सव्वादोनशे वर्षांपूर्वी उत्तर पेशवाईत बांधलेल्या या वास्तू पाहिल्या, की पुण्यातला शनिवारवाडा कसा असेल, याची कल्पना येते. या वाड्यांचं वैशिष्ट्य म्हणजे तिथं असलेली काष्ठशिल्पं. सागवानी लाकडात कोरलेली अशी शिल्पं महाराष्ट्रात फार कमी ठिकाणी बघायला मिळतात. हत्ती, घोडा, वानर, मासा याबरोबरच विविध प्रकारची फळं आणि फुलांची गुंफण इथं पहायला मिळते. त्यातील डाळिंब तर चक्क हलतं. साखळी इतकी नजाकतीनं कोरली आहे, की ती खरीखुरी भासावी. काही मानवी आकारही आहेत. त्यातील मूल घेतलेली महिला बघण्यासारखी आहे. केळी किंवा सुरूसारखी पानं कोरलेले बारा खांब लाजवाब. वरच्या मजल्यावर रंगमहाल आहे. त्याच्या सुबक लाकडी कमानी अजून शाबूत आहेत. मात्र, भिंतीवर काढलेली मराठा, माळवा शैलीतली चित्रं पुसली जाऊन नव्यानं कुणी आपली कला पेश केली आहे. या वाड्यातलं देवघरं आवर्जून बघायला हवं. तिथलं नक्षीकाम केलेलं लाकडी छत हल्लीच्या पीआेपीला लाजवेल असं आहे. या देवघरात ‘वासुदेव प्याला’ होता. तान्ह्या बाळकृष्णाला घेऊन यमुना आेलांडणारा वासुदेव त्यात दाखवलेला होता. या प्याल्यात पाणी अोतायचं. कृष्णाच्या पायाला पाणी लागलं, की ते अोसरतं, याचा अनुभव मी मागच्या भेटीत घेतला होता. या रविवारी ‘स्वागत अहमदनगर’ हेरिटेज वाॅकमध्ये मात्र हा वासुदेव प्याला पाहता आला नाही. मालकांनी तो नेला, असं समजलं. या वाड्याची काळजी गणेशदेवा पोळ घेतात. या वाड्याची दुरूस्ती सध्या सुरू असल्यानं आणखी काही शतकं हे वैभव आपल्याला पाहता येईल. या वास्तूजवळच असलेला वाडा आर्किटेक्ट लक्ष्मणराव पळशीकर यांनी छान जपला आहे. पूर्वजांनी दिलेलं संचित कसं जपावं, याचा आदर्श या दाम्पत्याकडून घ्यावा. 

गावाच्या वेशीबाहेर ‘धाकटी पंढरी’ म्हणून अोळखलं जाणारं पळशीकरांनी बांधलेलं विठ्ठल मंदिर आहे. राही आणि रूख्मिणीसमवेत असलेल्या या विठ्ठलाचं दर्शन घेतलं, की चहुबाजूनं फिरत तिथलं शिल्पसौैंदर्य डोळ्यांत साठवावं. चारही बाजूंना बुरूज असलेल्या तटबंदीच्या दर्शनभागी उत्तर हिंदुस्थानी शैलीतलं सुरया आणि देवतांच्या मूर्ती असलेलं प्रशस्त प्रवेशद्वार आणि शेजारी पुष्करणी आहे. नऊविध विद्यांच्या प्रतीक असलेल्या नऊ पायऱ्या चढून गेलं, की अठरा पुराणांचे प्रातिनिधीक स्वरूप असलेले अठरा खांब आणि त्याखाली असलेले विशाल दगडी कासव दिसतं. गाभाऱ्यात प्रवेश करताना रिद्धी-सिद्धी आणि ६४ योगिनी आपलं लक्ष वेधून घेतात. पांडुरंगाच्या प्रभावळीवर मत्स्य, कच्छादी दशावतार कोरलेले आहेत. मंदिराच्या बाहेरील भिंतींवर आणि कळसावर असलेली शिल्पं हे इथलं खरं वैभव आहे. यातील काही शिल्प मिनीएचर म्हणावीत, इतकी आकारानं लहान आहेत. नीट निरखून पाहिलं, तरच त्यातलं सौंदर्य लक्षात येतं. मोरांचे असंख्य आकार त्यात आहेत. पोपट आहेत, कारंजी आहेत. झुंजणारे हत्ती तर अप्रतिम. झाशीच्या राणीसारखी पाठीशी मूल घेऊन घोड्यावरून लढणारी वीरांगना इथं आहे, भाल्यानं शिकार करतानाचं शिल्प आहे. नगरच्या किल्ल्यांवर आढळणारं शक्तीसामर्थ्य दाखवणारं पायाखाली हत्ती आणि वरच्या बाजूला आकारानं मोठ्या असलेल्या सिंहाचं शिल्प या मंदिराच्या कळसाच्या समोर विराजमान झालं आहे.

 केवळ छन्नी आणि हातोडी वापरून दोन शतकांपूर्वी माळवा प्रांतातून आलेल्या शिल्पकारांनी या कलाकृती घडवल्या. सुशोभीकरण म्हणून काहींवर अलिकडे अाॅईलपेंट लावण्यात आला असला, तरी तो काढून मूळ स्वरूपात हे शिल्पवैभव जपण्यात येणार असल्याचं समजलं. काही वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या दोन बंधाऱ्यांमुळं पळशीचं जलदुर्भिक्ष्य तर दूर झालंच आहे, शिवाय या मंदिराला सुरेख असं जलवैभव प्राप्त झालं आहे. पानिपतच्या रणसंग्रामात मोठा पराक्रम गाजवणाऱ्या आनंदराव रामराव पळशीकरांच्या घरातील दोन सतींचं स्मारक आणि मंदिरं पलिकडं आहेत. जीर्णोद्धारामुळं ही मंदिरंही नव्यानं सजली आहेत. सध्या पावसाचे दिवस आहेत. सगळं वर्ष घरात बसून काढल्यानंतर मोकळा श्वास घेण्यासाठी, जगण्याचा नवा अर्थ शोधण्यासाठी कुठं जायचं असेल, तर पळशी हे उत्तम ठिकाण आहे....

भूषण देशमुख
अहमदनगर
bhushandeshmukh07@gmail.com

(छायाचित्रे `स्वागत अहमदनगर हेरिटेज वाॅक`च्या सदस्यांनी काढलेली आहेत.)


No comments:

Post a Comment

Featured Post

previous year question papers

http://www.unipune.ac.in/university_files/old_papers.htm

Popular Posts