Sunday, 28 August 2022

E. जहांगीर (१६०५ - १६२८)

  E. जहांगीर (१६०५ - १६२८)

 अकबर जोधाबाई पासून ३० ऑगस्ट १५६९ रोजी सलीमचा (१६०५ १६२८) जन्म झाला. अजमेरचे सुफी संत शेख सलीम चिश्तीला नवस केला. त्याच्याच आशिर्वादाने हे पुत्ररत्न झाल्याने त्याचे नाव सलीम ठेवले. अकबर त्याला प्रेमाने ‘शेखूबाबा’ म्हणत. अकबराला त्याच्या इतर दोन स्त्रियापासून मुराद १५७० आणि दानियल १५७२ ही दोन मुले झाली. अकबर दक्षिण भारताच्या मोहिमेत गुतंला असताना मोगल बादशाही हस्तगत करण्याच्या इराद्दयाने सलीमने अकबराविरुध्द १५९९ मध्ये बंड केले. त्यानंतर त्याने अबुल फाझलचा खून घडवून आणला त्यामुळे अकबर संतप्त झाला परंतु पुत्रप्रेमामूळे काहीच करु शकला नाही.  इ.स. १५९९ मध्ये मुराद आणि इ.स. १६०४ मध्ये दानियल तरुण वयातच मृत्यु पावल्यने सलीम हा मुघल बादशाहीचा एकमेव वारस शिल्लक राहिला. यानंतर अकबर गंभीररित्या आजारी पडला व त्याने सलीमची स्वतःचा वारस म्हणून घोषणा केली. अकबराच्या मृत्युनंतर सलीम ३ नोव्हेंबर १६०५ रोजी नुरुद्दीन महंमद जहांगीर बादशहा गाझी अशी पदवी घेऊन तो सिंहासनावर बसला.

 १.  राजपुत्र खुसरोचे बंड (इ.स. १७६०)

जहांगीर गादीवर येण्यापूर्वी खुसरोस गादीवर आणण्याचा प्रयत्न फसल्यापासून खुसरो आग्राच्या किल्ल्यात नजरकैद होता. परंतु सम्राट होण्याचे भूत खुसरोच्या डोक्यातून गेले नव्हते. एके दिवशी अकबराच्या समाधीचे दर्शन घेण्याच्या निमित्ताने तो आपल्या साथीदारांसह गुप्तपणे आग्र्याबाहेर पडला. हळूहळू त्याच्या समर्थकांची संख्या वाढू लागली. लाहोर प्रांताचा दिवाण अब्दुल रहमान खुसरोच्या पक्षास येऊन मिळाला. जहांगिरास खुसरोच्या पलायनाची बातमी समजताच तो स्वतः खुसरोच्या बंदोबस्तसाठी लाहोरला आला. खुसरोचा पराभव करून त्याला पकडले. सम्राटाने त्याचे डोळे काढून त्यास कैदेत टाकले. खुसरोस मदत केल्याबद्दल शिखांचा पाचवा धर्मगुरु अर्जुनसिंह याचाही जहांगीरने हत्या केला. यामुळे शिख मोगलाच्या विरोधात गेले.

 

२. मेवाडवर प्रभुत्व (१६१४- १६१५)

मेवाड हे एक प्रमुख राजपूत राज्य होते. बादशहा अकबर आपल्या कारकिर्दीत संपूर्ण मेवाडवर वर्चस्व प्रस्थापित करु शकला नाही. महाराणा प्रतापने अकबराशी झुंज दिली. राणा प्रतापनंतर राणा अमरसिंह मेवाडचा राजा झाला. खुसरोचा बंदोबस्त केल्यानंतर जहांगीरने मेवाडकडे लक्ष दिले. इ.स. १६०६ ते १६१३ पर्यंत मोगल सैन्याने मेवाडवर अनेकदा हल्ले चढविले. परंतु त्यांना अमरसिंहाने दाद दिली नाही. म्हणून इ.स. १६१४ मध्ये जहांगीरने नूरजहानच्या सल्ल्यावरुन राजपुत्र खुर्रम व मिर्झा अजीज कोका यांना मेवाडच्या स्वारीवर पाठविले. राजपुत्र खुर्रमने राजपुत्रास दहशत बसविण्यासाठी कत्तलीस सुरूवात केली. त्याने या स्वारीत अनेक शहरे, खेडी, शेती जाळून उध्वस्त केली. शूर राजपुत्रांनी मोगलांच्या हल्ला परतवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु खुर्रमच्या पराक्रमापुढे त्यांचे काहीही चालले नाही. शेवटी राणा अमरसिंहाने तहाच्या वाटाघाटी सुरु केल्या. इ.स. १६१५ मध्ये उभयपक्षात समेट झाला. अमरसिंहाने जहांगीरचे आधिपत्य मान्य केले. सम्राटाने अमरसिंहाच्या जिंकलेला प्रदेश त्यास परत केला. तहानंतर अमरसिंहाने मुलगा युवराज कर्ण याला मोगल दरबारात पाठविले. जहांगीरने कर्णाला फार सन्मानाने वागविते. अशा रितीने उभय पक्षात मागील ७५ वर्षापासून चालत आलेला लढा समाप्त झाला.

 

३. दक्षिण धोरण (इ.स. १६०८-१६२१):

मोगल सम्राट अकबराने प्रथम दक्षिण जिंकण्याची मोहीम हाती घेतली. दक्षिणेतील अहमदनगरची निजामशाही जिंकण्याचे अकबराच्या कारकिर्दीत अपूर्ण राहिलेले कार्य जहांगीरने हाती घेतले. यावेळी अहमदनगरामध्ये राज्याची सूत्रे मलिक अंबर या स्वामीभक्त व राजकारण धुरंधर दिवाणच्या हातात होती. इ.स. १६०८ मध्ये सम्राटाने अब्दूर रहिमला प्रचंड सैन्यानिशी दक्षिण भारत जिंकण्यास रवाना केले. त्यानंतर राजपुत्र परवेज, आसफखान व अनेक मोगल सरदारांना दक्षिण मोहिमेवर पाठविले. परंतु मलिक अंबरच्या मराठा सैनिकांनी गनिमी युध्दपध्दतीचा उपयोग करून मोगल सैन्यावर मात केली.

शेवटी इ.स. १६१६ मध्ये मेवाड विजेत्या राजपुत्र खुर्रमवर ही कामगिरी सोपविण्यात आली. खुर्रमच्या पराक्रमाची किर्ती ऐकून मलिक अंबरने इ.स.१६१७ मध्ये मोगलांशी तह केला. या तहानुसार मलीक अंबरने बालाघाटचा प्रदेश आणि अहमदनगरचा भूईकोट किल्ला मोगलास दिला. विजापूरच्या आदिलशहाने सोळा लाख रुपयांचा नजराणा खुर्रमला पाठवून त्याची मैत्री संपादन केली. राजपुत्र खुर्रम दक्षिण भारताची यशस्वी स्वारी करुन राजधानीस आला. सम्राट जहागीरने त्याचे थाटाने स्वागत करुन त्याला 'शहाजहान' अशी पदवी दिली. खर्रमने उत्तेरकडे प्रयाण करताच मलिक अंबरने सम्राटाशी केलेला तह झुगारुन निजामशाहीचे सर्व प्रदेश पुन्हा जिंकले. या कार्यात मलिक अंबरला विजापूर व गोवळकोंड्याच्या सुलतानांचीही मदत होती. जहांगीरने खुर्रमला पुन्हा दक्षिणेत पाठविले. त्याने मलिक अंबरचा त्याच्या मदतनीसासह पराभव केला. इ.स. १६२१ मध्ये मलिक अंबरने खुर्रमशी दुसऱ्यांदा तह केला. या तहानुसार मलिक अंबरने मोगलांकडून जिंकलेले प्रदेश परत कले. तसेच अहमदनगर, विजापूर व गोवळकोंडा या तिन्ही मुसलमान राज्यानी सम्राटास खंडणी देण्याचे मान्य केले. दक्षिण विजयाने खुर्रमचे राजकारणात महत्त्व वाढले.

 

४.कांगडा विजय ( इ.स. १६२० ) :

कांगडा किल्ला पंजाबच्या डोंगराळ प्रदेशात एक प्रसिध्द डोंगरी किल्ला म्हणून अजिंक्य समजला जात होता. अकबराला कांगड्याचा प्रदेश जिंकता आला नव्हता. तो आता जहांगीरने जिंकून घेण्याचे निश्चित केले. हा किल्ला जिंकण्याची जबाबदारी प्रथमतः मुर्तुजाखान या सरदारावर सोपविण्यात आली. परंतु आपसातील वैमनस्यामुळे त्याला किल्ला जिंकण्यात यश लाभू शकले नाही. शेवटी दक्षिणेतील विजय मिळवून परत आलेल्या राजपुत्र खुर्रमवर ही जबाबदारी सोपविण्यात आली. खुर्रमने किल्ल्याला वेढा देऊन तेथील सर्व रसद बंद पाडली. चौदा महिन्यांच्या सतत वेढ्यानंतर कांगड्याचा किल्ला शहाजहानच्या हाती नोव्हेंबर १६२० मध्ये आला. जहांगीरची एक महत्त्वाकांक्षा अशा रितीने पूर्ण झाली.

 

१.      वायव्य सरहद्द धोरण - कंदहार (इ.स. १६२२)

अफगाणिस्थानातील कंदहार हे व्यापारी व लष्करीदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र होते. मध्य आशिया इराण व तुर्कस्थान इ. देशांशी याच मार्गाने भारताचा प्राचीन काळापासून व्यापार चालत असे. कंदहारवर आपला ताबा ठेवण्यात मोगल सम्राट आणि इराणच्या शहात स्पर्धा चालत असे. जहांगीरच्या वेळी इराणमध्ये शहा अब्बासचे राज्य होते. त्याने कंदहार घेण्याचे अनेक वेळा प्रयत्न केले. परंतू या कार्यात शहाला इ.स. १६२२ पर्यंत यश मिळू शकले नाही. शहाने जहांगीरच्या दरबारी आपले वकील पाठवून सम्राटास अनेक मौल्यवान वस्तू भेटी दाखल दिल्या. साहजिकच जहांगीरचे कंदहारकडे दुर्लक्ष झाले. या बेसावधपणाचा फायदा घेऊन शहा अब्बासने इ.स. १६२२ मध्ये कंदहारच्या किल्ल्याला वेढा दिला. यावेळी मोगल साम्राज्यात सत्तेकरिता सम्राज्ञी नूरजहान व राजपूत खुर्रममध्ये गृहयुध्द चालू होते. शहा अब्बासने या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन कंदहार जिंकून घेतले. ते परत मिळवण्याचे जहांगीरचे प्रयत्न अयशस्वी झाल्याने कंदहार कायमचे मुघलांच्या ताब्यातून गेले.

 

२.      सम्राज्ञी नूरजहानचा कारभार

नूरजहान ही मध्यकालीन भारतीय इतिहासातील एक अत्यंत प्रभावशाली स्त्री होती. तिचे वडील मिर्झा गियासबेग इराणचे होते. आपले नशीब काढण्यासाठी भारतात येण्यास निघाला वाटेत कंदहार येथे नूरजहानचा जन्म झाला. तिचे नाव मेहरुन्नीसा असे ठेवण्यात आले. पूढे गियासबेगने अकबराच्या दरबारी असलेल्या शेर अफगाण (अली कुलीखान) या इराणी सरदाराशी लग्न लावून दिले. या विवाहापासून मेहरुन्नीसाला एक मुलगी झाली. तिचे नाव लाडली बेगम होते. जहांगीरने बंड केले तेव्हा शेर अफगाण त्याच्याकडे होता. पुढे जहांगीर बादशहा झाल्यानंतर तो बंडात सामील झाल्याचा संशय असल्याने बंगालच्या सुभेदारास शेर अफगाणला कैदेत टाकण्याबद्दल लिहिले. परंतु त्यात झालेल्या चकमकी सुभेदार व शेर अफगाण दोघेही ठार झाले. यानंतर मेहरुन्नीसा आपल्या वडिलांकडे परतली. आग्रा येथे जहांगीरच्या आईच्या तैनातीत ती असताना जहांगीरच्या नजरेस पडली. जहांगीरने इ.स. १६११ मध्ये तिच्याशी विवाह केला. जहांगीरवर तिने आपले एवढे वजन बसविले की, जहांगीर सर्वस्वी तिच्या तंत्राने वागू लागला. जहांगीरने तिचे नाव नूरजहान असे ठेवले.

 

i.नूरजहान गट (Nurjehan junta)

इ.स. १६०५ ते १६२७ हा जहांगीरच्या कारकिर्दचा कालखंड असला तरी इ.स. १६११ ते १६२७ या कालखंडातील त्याची कारकिर्द हो खऱ्या अर्थाने नूरजहानचीच कारकिर्द होय. सम्राट जहांगीर सुखासीन प्रवृत्तीचा असल्यामुळे साम्राज्याची सर्व सूत्रे महत्त्वाकांक्षी नूरजहानच्या हातात आली. आपल्या समर्थकांच्या मदतीने तिने दरबारात एक शक्तीशाली गट तयार केला होता. त्याला नूरजहान गट (Nurjehan junta) असे म्हणतात. या गटात तिचे वडील मिर्झा गियासबेग, आई अस्मतबेगम, भाऊ आसफखान व राजपुत्र खुर्रम ही मंडळी होती. नूरजहान या गटाची मुख्य सुत्रधार होती. जहांगीरच्या कारकिर्दीत राजसत्ता याच गटाच्या हातात होती. सम्राट जहांगीरच्या राज्यकारभारातील नूरजहानच्या प्रभूत्वाचे ऐतिहासिकदृष्या दोन कालखंड पडतात.

 

ii.पहिला कालखंड

इ.स. १६११ ते १६२२ चा होता या काळातील तिची कामगिरी साम्राज्य हितास पोषक होती. तिच्या आज्ञेवरुन राजपुत्र खुर्रम याने मेवाड, कांगडा व अहमदनगर विजय संपादन केले. तिच्याच संकेतावरून खुर्रमने खुसरोचा गुप्तपणे काटा काढला.

 

iii.दुसरा कालखंड

इ.स. १६२२ ते १६२७ पर्यंतचा आहे. या कालखंडात मातापित्यांच्या मृत्युमुळे तिच्या सत्तापिपासेवर अंकुश लावणारे कोणीही वडीलधारी शिल्लक राहिलेले नव्हते. या कालखंडात तिच्या सत्तेच्या आसुरी मोहामुळे साम्राज्यावर अनेक संकटे कोसळली साम्राज्यात अनेक बंडाचा उपद्रव होऊन शासनव्यवस्था खिळखिळी झाली. तिच्या जाचाला कंटाळून राजपूत खुर्रम आणि सेनापती महाबतखान यांनी बंडे केली. इ.स. १६२८ मध्ये जहांगीरच्या मृत्युनंतर राजपूत खुर्रम गादीवर आला. तो नूरजहांचा प्रखर विरोधक होता. तिने राजकारणातून अंग पाहून काढून घेतले. नूरजहान लाहोर येथे स्वतःच्या मुलगी लाडली बेगमकडे गेली. उर्वरित आयुष्य शांतपणे व्यतीत केल्यानंतर इ.स १६४५ मध्ये लाहोरला मृत्यु झाला.

 

३.      जहांगीरची योग्यता

 

नूरजहांनच्या हाती कारभार सोपविल्यावर शहाजहानसारखा कर्तृत्वान मुलगा व महाबतखानसारखा सरदार असल्याने जहांगीरने राज्यकारभारकडे लक्ष दिले नाही. इ.स. १६२१ पासून तो आजारी होता. प्रकृती सुधारण्यासाठी तो काबूलहून काश्मीरला गेला पण तिथे थंडी खुप असल्याने तो लाहोरकडे परत येत असतांना राजोरी येथे २९ आक्टोंबर १६२७ रोजी तो मरण पावला. लाहोरला शाहदरा येथे त्याचे दफन करण्यात आले. जहांगीर अकबराप्रमाणे कर्तबगार नव्हता परंतु त्याने राज्यात शांतता व चांगली व्यवस्था ठेवली. न्यायदान चांगले व्हावे म्हणून न्यायशृखंला राजवाडयात टांगली होती. त्याच्या काळात शेती, उद्योगधंदे, व्यापार, संगीत, शिल्पकला, चित्रकला इत्यादीची चांगलीच प्रगती झाली. त्याने विद्येस उत्तेजन दिले होते. तो स्वतः चांगला लेखक होता. जहांगीरने तुर्की भाषेत तुजुके ए-जहांगीरी किंवा जहांगीरनामा या नावाने आत्मचरित्र लिहिले आहे.

===========================================


No comments:

Post a Comment

Featured Post

previous year question papers

http://www.unipune.ac.in/university_files/old_papers.htm

Popular Posts