Sunday 28 August 2022

F.शहाजहान (इ.स. १६२८ ते १६५८)

  F.शहाजहान (इ.स. १६२८ ते १६५८)

 जहांगीरला खुसरो, परवेझ, खुर्रम व शहीरयार असे चार मुले होते. त्यात खुर्रम ऊर्फ शहाजहान हा पराक्रमी व कर्तबगार होता. शहाजहानचा जन्म ५ जानेवारी १५९२ रोजी झाला. त्याची आई जगत गोसावी मारवाडचा राजा उदयसिंह याची कन्या होय. नूरजहानने मोगल दरबारात स्वतःचा एक प्रबळ गट तयार केला होता त्यात खुर्रम एक महत्वाचा दुवा होता. म्हणुनच नूरजहाने त्याचा विवाह आपला भाऊ आसफखानची मुलगी अर्जुमंदबानू जी पूढे मुमताजमहल या नावाने प्रसिध्द झाली हिच्याशी लावून दिला. वास्तविक जहांगीरचा लष्करी विजयाचा इतिहास हा खुर्रमच्याच विजयाचाच इतिहास आहे. त्याने कांगडा, मेवाड आणि अहमदनगर मोहिमेत नेत्रदिपक यश मिळविले. त्याच्या अहमदनगर मोहिमेतील यशावर खुश होऊनच जहांगीरने त्याला ‘शहाजहान’ हा किताब दिला. वयाच्या ३६ व्या वर्षी तो गादीवर आला. खुसरो व परवेझ हे जहांगीर असतानाच मरण पावले होते. सत्तेवर आल्यानंतर शहाजहाने असफखानकडून शहीरयारला मारुन टाकले. अशा प्रकारे वारसदारास मारुन गादीच्या वारसाबद्दलची आपल्या मागची कटकट मिटवून टाकली.

 

शहाजहानच्या राज्यकारभारातील टप्पे:

 

१.      खानजहान लोदीचे बंड (इ.स १६२८ ते १६३०) :

खानजहानने जहांगीरच्या मृत्यूनंतर शहरीयारचा पक्ष घेतला असला तरी त्याचे कर्तृत्व लक्षात घेऊनच शहाजहाने त्याला दक्षिणेची सुभेदारी दिली परंतु त्याने लाच घेऊन बालाघाटचा प्रदेश अहमदनगरच्या सुलतानच्या हवाली केला. शहाजहानने खानजहानला बालाघाटचा प्रदेश पुन्हा जिंकण्याचा आदेश दिला. परंतु त्यात खानजहानला अपयश आल्याने शहाजहानने महबतखानची नेमणूक दक्षिणेचा सुभेदार म्हणून केली. व खानजहानला माळव्याच्या सुभेदारीवर पाठविले. परंतु खानजहानने माळव्याच्या सुभेदारीवर जाण्यास नकार देऊन अहमदनगरच्या सुलतानाच्या आश्रयाने शहाजहानविरुध्द बंड केले. तेव्हा शहाजहान स्वतः इ.स. १६२९ मध्ये दक्षिणेत आला तेव्हा खानजहान उत्तरेस पळाला व इ.स. १६३१ ला मोगल सैन्याशी झालेल्या चकमकीत तो आपल्या साथीदारासह मारला गेला.

 

२.      जुझारसिंह बुंदेल्याचे बंड (इ.स. १६२८ ते १६३५)

अबुल फझलच्या मारेकरी ओरछाचा राजा वीरसिंह बुंदेला याने बुंदेलखंडात लुटालुट करुन प्रचंड संपत्ती जमा केली होती. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलगा जुझारसिंह बुंदेला गादीवर आला. शहाजहानला या सर्व घटनांची माहिती असल्याने त्याने जुझारसिंहकडे त्या संपत्तीची मागणी करताच जुझारसिंहाने बंडाचे निशाण उभारले. १६३२ मध्ये गोंडवनातील चौरागडचा प्रदेश जिंकला तेव्हा त्याचा बंदोबस्त करण्यासाठी शहाजहानने राजपुत्र औरंगजेबास त्याचा बंदोबस्त करण्यास पाठविले. चौरागडच्या युध्दात औरंगजेबाने त्याचा पूर्ण पराभव केला. इ.स. १६३५ मध्ये तो मृत्यु पावला. जुझारसिंहचा खजिना जप्त करण्यात येऊन देवीसिंहास ओरछाच्या गादीवर बसविण्यात आले. परंतु बुंदेल्यांना ही नेमणूक पसंत पडली नसल्याने त्यांनी चंपतराय व छत्रसाल यांच्या नेतृत्वात मोगलांशी लढा चालू ठेवला.

 

३.      पोर्तुगीजांचा पाडाव (इ.स. १६३२)

सम्राट अकबराच्या कारकिर्दीत पोर्तुगिजांनी बंगाल मधील हुगळी येथे व्यापारी केंद्र स्थापन केले होते. त्यांना मिठाचा व्यापार करण्याची परवानगी मिळाली होती. परंतु पोर्तुगिजांनी व्यापारबरोबरच स्थानिक प्रजेची लुटमार करण्यास व त्यांना बाटविण्यास सुरुवात करताच शहाजहानने ढाक्याचा राज्यपाल कासिमखानला पार्तुगिजांचा बंदोबस्त करण्याची आज्ञा केली. कासिमने हुगळीस वेढा देऊन पोर्तुगिंजाची मालमत्ता लूटली. या युध्दात अनेक पोर्तुगिंजाची कत्तल करण्यात आली. हुगळी मोगलांच्या ताब्यात आले. पोर्तुगिजांनी सम्राटापूढे शरणागती पत्करली. युध्दात ४०० पोर्तुगिंजाना कैद करण्यात आले. अनेकांचा सक्तीने मुसलमान करण्यात आले.

४.     दक्षिण धोरण :

खानजहानने बंड केले तेव्हापासून शहाजहानचे लक्ष दक्षिणेकडे होते. निजामशाही बुडवून टाकण्याचा त्याने चंग बांधला. मलिक अंबरच्या मृत्युनंतर त्याचा मुलगा फत्तेखान हा शहा मूर्तजा यांचे न पटून मूर्तजाने फत्तेखानला कैदेत टाकले तेव्हा शहाजी भोसले हा निजामशाहीच्या दरबारी प्रमूख बनला. परंतु शहाजहानने शहाजीच्या जहागिरास मान्यता देऊन त्याला मनसबदार केले. हा काळ मोठा दुष्काळाचा होता. सर्व मुलुख हैराण झाला होता. निजामशाहीत ज्या घडामोडी घडत होत्या त्यामुळे निजामशाही आयतीच आपल्या मिळेल असे वाटून शहाजहानने शहाजी व आदिलशहा यांच्याकडे दुर्लक्ष केले. तेव्हा या दोघांनी प्रसंग ओळखून निजामशहीचे रक्षण करण्याचे ठरविले. त्यातच इ.स. १६३६ मध्ये आदिलशहाने मोगलांपुढे आपला निभाव लागणार नाही म्हणून तह केला. शहाजीदेखील नाईलाजाने तहास तयार झाला. निजामशाहीचे राज्य मोगल व विजापूरकर यांनी वाटून घेतले. खानदेश, वऱ्हाड, नांदेड, अहमदनगर हे प्रांत मोगलांना मिळाले. शहाजहानने औरंगजेबाची सुभेदार म्हणून नेमणूक केली.

 

५. कंदाहारविषयक धोरण

सम्राट जहांगीरच्या कारकिर्दीत इराणच्या शहाने कंदहार जिंकून घेतले. शहाजहानने ते पुनः मिळविण्याचा निर्धार केला. कारण भौगोलिक आणि लष्करीदृष्टया ते अतिशय मोक्याचे ठिकाण होते. इराणच्या शहा अंतर्गत बंडाळी मोडण्याच्या कार्यात गुतलेला आहे हे पाहून शहाजहानेन कंदाहारचा इराणी राज्यपाल अलीमर्दानशी गुप्तपणे संधान साधले. इ.स. १६३८ मध्ये तो किल्ला शहाजहानच्या ताब्यात देऊन अलीमर्दानने मोगल दरबारी नोकरी स्विकारली. सात वर्ष कंदाहारचा किल्ला मोगलांच्या ताब्यात होता. परंतु मध्य अशियाच्या युध्दात मोगलांच्या पराभवाची बातमी ऐकून इ.स. १६४८ मध्ये शहा अब्बासने कंदाहार पुन्हा मोगलांकडून जिंकून घेतले.. शहाजहानने राजपुत्र औरंगजेब व वजीर सादुल्लाखान यांना कंदाहारच्या मोहिमेवर पाठविले. यावेळी काबूल येथे राहून युध्दाचे संचलन खुद्द शहाजहान करीत होता. तरीही कंदाहार घेण्यात मोगलांना यश मिळू शकले नाही. इ.स. १६५२-५३ मध्ये पुन्हा कंदाहार जिंकण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. कंदाहार स्वारीत एकंदर १२ कोटी रुपये खर्च करुनही यश मिळाले नाही.

 

६.      वारसा हक्काचे युध्द (इ.स. १६५७ - १६५८)

सप्टेंबर १६५७ मध्ये शहाजहान आजारी पडला आणि त्याने आपल्या आजारपणात त्याचा सर्वात वडिल मुलगा दारा याला राज्यकारभार चालविण्याची आज्ञा केली. शहाजहानला मुमताज पासून दारा, शुजा, औरंगजेब व मुराद ही चार मुले होती. इतर तिघे भाऊ दाराचा द्वेष करीत. दारा हा धार्मिक क्षेत्रात उदारमतवादी होता. शहाजहान दाराला शक्यतो आपल्याजवळ ठेवित असे. दारा पंजाब व दिल्लीचा राज्यपाल होता. शुजा, औरंगजेब आणि मुराद हे अनुक्रमे बंगाल, दक्षिण भारत व गुजरात या प्रातांचे राज्यपाल होते. शहाजहानचा शेवटचा आजार समजून त्याची सर्व मुले गादी मिळविण्याच्या मागे लागली. त्यासाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब करण्यास तयार होते. त्यापैकी प्रत्येकाला हे ही माहित होते की, राज्यावरील हक्क सोडला तरीही त्यांना कोणीही जिवंत सोडले नसते. म्हणूनच राज्यपद किंवा मृत्यु याशिवाय त्यांना कोणताही पर्याय नव्हता आणि म्हणूनच शहाजहाननंतर गादीसाठी वारसा युध्द अटळ आहे. याची सर्वांना स्पष्ट कल्पना होती. औरंगजेबाने मुरादला आपल्या बाजूस वळवून घेतले. दिल्लीचे राज्य मिळवून देतो असे वचन दिले. भोळा मुराद त्यात फसला. तो आपल्या सैन्यासह औरंगजेबाला मिळाला. शुजाने आपले स्वातंत्र्य जाहिर केले व तो राजधानिकडे निघाला. मुराद व औरंगजेबाने मिळून दारावर स्वारी केली तेव्हा सामुगड येथे लढाई होऊन दाराचा पराभव झाला. नंतर औरंगजेब मुरादसह आग्रा येथे गेला. विश्वासघाताने शहाजहानास कैद केले. मुरादलाही कैद केले. दाराचा विश्वासघाताने खुन केला आणि शेवटी इ.स. १६५८ मध्ये औरंगजेब बादशहा झाला. शहाजहान मरेपर्यंत औरंगजेबाच्या कैदेतच होता. इ.स.१६६६ मध्ये तो मरण पावला. अशा रितीने धूर्त औरंगजेबाने आपल्या प्रतिस्पर्धी भावांचा निकाल लावून वारसा युध्दात विजय संपादित केला होता.

 

७.     जहांगीरची योग्यता :

शहाजहाचे युग मध्ययुगीन भारतातील सुवर्ण युग शहाजहानच्या कारकिर्दिला मुघल राम्राज्याचे सुवर्णयुग म्हणतात. याबाबतीत आधुनिक इतिहासकारात बराच मतभेद आहे. जे इतिहासकार त्याच्या कारकिर्दिस सुवर्ण युग मानीत नाहीत. त्यांनी शहाजहानच्या कारकिर्दीवर अनेक आरोप केले आहेत डॉ. व्ही. ए. स्मिथ असे म्हणतात, आधुनिक इतिहासकारांनी शहाजहानच्या कारकिर्दीचे अतिशयोक्तिपुर्ण वर्णन केलेले आहे. त्याच्या दरबारातील ऐश्वर्यसंपन्नता, साम्राज्य विस्तार, वैभव समृध्दी शांतता, भव्य इमारती विशेषत: ताजमहलचे सौंदर्य यामुळे आधूनिक इतिहासकारांचे डोळे दिपले. म्हणूनच त्यांनी शहाजहानच्या आपराधाकडे डोळेझाक करुन त्याच्या सद्गुणांचे भरमसाठ वर्णन केलेले आहे. शहाजहानचे चारित्र्य पुत्र, भ्राता, पिता व विधुर या दृष्टीने अत्यंत दूषित होते. राजकीय कामकाजात तो निर्दयी, विश्वासघातकी व तत्वहीन होता. न्याय देण्यात तो अमानुष व भावनाहीन होता. दयेचा स्पर्शही त्याला कधीही झाला नव्हता. शहाजहानच्या ३० वर्षाच्या कारकिर्दीस सुवर्णयुग मानले जाते. वरवर पाहिले असता तो मोठा समृध्दीचा काळ होता तरीही त्याच्याच कारकीर्दीत मोगल साम्राज्याच्या हासाची लक्षणे दिसू लागली. शहाजहाने इमारती बांधण्यात अवाढव्य खर्च केला. त्यामुळे त्याच्या साम्राज्याची आठवण येते परंतु याच कारणांमुळे त्याच्या श्रमजीवी व शेती करणाऱ्या रयतेवर करांचा असह्य भार पडला होता. प्रजेचे दिवाळे निघाले होते. या गोष्टी त्याच्या पश्चात गादीवर येणाऱ्या सम्राटाच्या राजवटीत प्रकट झाल्या. शहाजहानची कारकिर्दी मध्यकालीन इतिहासात सुवर्णयुगाच्या नावाने प्रसिध्द आहे. परंतु हे केवळ कला आणि विशेषत: वास्तुकलेच्याच दृष्टीने खरे मानता येईल असे स्पष्ट मत डॉ. ए.एल. श्रीवास्तव यांनी दिलेले आहे.

 

शहाजहानच्या कारकिर्दीस सुवर्णयुग मानणाऱ्यांनी वरील विविध आरोपांचे खंडन केले. इतिहासकार एल्फिन्स्टन लिहितो, भारताच्या सम्राटांत शहाजहान हा सर्वाधिक वैभवशाली होता. त्याचे सेवक, त्याचा दरबार, त्याचे एश्वर्य एवढे अवाढव्य होते की, त्याच्या पूर्वजच्याही कारकिर्दीत ते इतके वाढलेले नव्हते. निरनिराळ्या योजेना व खात्यांवर तो अवाढव्य पैसा खर्च करीत असे परंतु त्याचबरोबर त्याने अधिक करही लादले नव्हते. त्याला कधीही पैशांची गरज पडली नव्हती. मूरलँड लिहितो, शहाजहानची कारकिर्द शेतकऱ्यांकरीता शांततेचे व सामाधानाचेयुग होते त्याला कारण शहाजहानची सुव्यवस्था होती. ट्रॅव्हर्नियर शहाजहानच्या कारकिर्दीसंबंधी म्हणतो, शहाजहान आपल्या प्रजेवर एखाद्या राजाप्रमाणे शासन करीत नसे तर आपल्या मुलांप्रमाणे तो प्रजेचा सांभाळ करीत असे. शहाजहानच्या ३० वर्षाच्या प्रदीर्घ राजवटीत संपूर्ण देशात राजकीय स्थैर्य शांतता व सुव्यवस्था नांदत होती. राज्यकारभाराकडे तो जातीने लक्ष देई. देश धनधान्याने समृध्द होता लोक सुखी व संपन्न होते. देशाचे वार्षिक उत्पन्न ४५ कोटी रु. होते. संगीत व चित्रकलेची त्यास आवड होती. त्याने अनेक जगप्रसिध्द इमारती बांधल्या. त्याने बांधलेले ताजमहाल हे संगमरवरात साकार झालेले एक मनोहर स्वप्न आहे. एकंदरीत राजकीय, आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक दृष्ट्या शहाजहानच्या काळात देशाची खुप भरमसाठ झाली. असा काळ पूर्वी कधीही झाला नाही.

============================================


No comments:

Post a Comment

Featured Post

previous year question papers

http://www.unipune.ac.in/university_files/old_papers.htm

Popular Posts