Feb 19, 2022
छत्रपती शिवाजीराजांनी रयतेचे लोककल्याणकारी स्वराज्य
निर्माण केले. त्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केले. प्रसंगी जीवघेणा
संघर्ष केला. त्यांच्या जीवनात अनेक संकटे आली; परंतु ते हतबल झाले
नाहीत. संकटसमयी ते लढणारे होते; रडणारे नव्हते. त्यांनी हाती शस्त्र घेऊन
स्वराज्याच्या शत्रूंना धडा शिकविला. त्यांनी मोगल, आदिलशहा, पोर्तुगीज, सिद्धी
यांच्याविरुद्ध लढा दिला; पण तो लढा राजकीय होता, धार्मिक नव्हता.
याउलट त्यांचे कार्य सर्व धर्मांतील प्रजेच्या हिताचे होते.
छत्रपती शिवाजी
महाराजांनी आपल्या राज्यात भेदभाव केला नाही. याचे अनेक संदर्भ शिवचरित्रात अनेक
ठिकाणी आहेत. शिवाजीराजांच्या काळात अनेक जाती होत्या, अनेक धर्म होते; परंतु धर्मांधता
आणि जातीय विद्वेषाला त्यांनी पायबंद घातला. त्यांचे विचार आणि कार्य सकल
मानवजातीच्या कल्याणाचे होते. याबाबत समकालीन गोव्याचा पोर्तुगीज व्हॉइसरॉय
त्याच्या देशातील राजाला जानेवारी १६७०मध्ये पाठविलेल्या पत्रात पुढीलप्रमाणे
कळवितो, ‘शिवाजीमहाराज हे
प्रबळ राजे आहेत. त्यांची प्रजा त्यांच्यासारखीच मूर्तिपूजक असली, तरी ते सर्व
धर्मांना नांदू देतात. या भागातील (भारतातील) अत्यंत धोरणी व राजकारणी (मुत्सद्दी)
पुरुष म्हणून त्यांची ख्याती आहे.’ पोर्तुगीज व्हॉइसरॉयच्या पत्रावरून स्पष्ट होते, की छत्रपती
शिवाजीमहाराज व त्यांची प्रजा मूर्तिपूजक असली, तरी मूर्तिपूजा न करणाऱ्यांच्या धार्मिक अधिकारावर
त्यांनी अतिक्रमण केले नाही. याचा अर्थ त्यांनी बहुसांस्कृतिक मानसिकतेचा आदर
केला. आपल्या धार्मिक श्रद्धा त्यांनी परधर्मियांवर लादल्या नाहीत किंवा त्यांचा
धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार त्यांनी हिरावून घेतला नाही. यावरून स्पष्ट होते, की मध्ययुगीन
काळातील ते सर्वांत प्रगल्भ राजे आहेत. इतर धर्मियांनी आपल्या धर्माला अनुकूलच
वर्तन केले पाहिजे हा आततायीपणा त्यांच्या ध्येयधोरणात नव्हता. प्रागतिक विचारांबरोबरच
अनेक धर्मियांच्या धार्मिक श्रद्धा जोपासायला हव्यात ही अत्युच्च विचारधारा
शिवरायांची होती.
लोककल्याणकारी
प्रशासन
छत्रपती
शिवाजीमहाराज दक्षिण दिग्विजयासाठी तमिळनाडूत होते; तेथील प्रदेश त्यांनी जिंकून घेतल्यानंतर तिरूवाडी
येथे असताना डच व्यापारी काही सवलती मागून व्यापारी करार करण्यासाठी
शिवाजीराजांकडे आले. तेव्हा शिवाजीराजांनी डचांबरोबर केलेल्या व्यापारी करारात एक
कलम आवर्जून घातले. ते पुढीलप्रमाणे, ‘‘इतर कारकिर्दीत (हा भाग जिंकून घेण्यापूर्वी)
तुम्हाला स्त्री-पुरुष यांना गुलाम म्हणून खरेदी-विक्री करण्याची अनिर्बंध परवानगी
होती; परंतु माझ्या
राज्यात स्त्री-पुरुष यांना गुलाम म्हणून खरेदी-विक्री करण्याची परवानगी मिळणार
नाही असे काही करण्याचा प्रयत्न कराल, तर माझी माणसे तुम्हाला प्रतिबंध करतील. या कलमाचे
काटेकोर पालन झालेच पाहिजे.’ ज्या मध्ययुगीन काळात जगभर स्त्री-पुरुषांची गुलाम
म्हणून खरेदी-विक्री केली जात होती, त्या काळात शिवाजीमहाराजांच्या राज्यात
स्त्री-पुरुषांची गुलाम म्हणून खरेदी-विक्री केली जात नव्हती. युरोपसारख्या
पुढारलेल्या खंडातदेखील मध्ययुगीन काळात गुलामगिरी होती. त्या काळात
शिवाजीमहाराजांच्या स्वराज्यात गुलामीची प्रथा नव्हती. औद्योगिक क्रांतीत युरोप
आघाडीवर होता; परंतु मानवतावादी
धोरणात शिवाजीराजांचे स्वराज्य आघाडीवर होते याचा हा भक्कम पुरावा आहे. राज्य, राजकारण, राज्यकारभार, शासन आणि प्रशासन
हे लोककल्याणकारी असले पाहिजे हा शिवाजीमहाराजांचा आग्रह होता, हे डच व्यापारी
करारावरून स्पष्ट होते. ढाल-तलवारीच्या गदारोळात मानवता वृद्धिंगत झाली पाहिजे हे
शिवाजीमहाराजांचे धोरण होते.
बहुसांस्कृतिक
समाजव्यवस्था
पुण्याजवळील उरुळी
आणि फुरसुंगी येथील मशिदीच्या व्यवस्थापनात मोकदम चांदखान ढवळाढवळ करत असल्याचे
शिवरायांना समजले तेव्हा शिवाजीराजांनी त्याला समज दिली, ‘‘ज्याचा त्याचा
अधिकार त्याला मिळायला हवा.’’ बहुसांस्कृतिक समाजव्यवस्थेत ज्याचा त्याचा अधिकार
त्याला मिळावा, कोणावरही अन्याय
होऊ नये; परंतु
अन्याय-अत्याचार करणारे आततायी कृत्य शिवाजीराजांनी खपवून घेतले नाही.
शिवाजीराजांनी लोककल्याणासाठी हाती तलवार घेतली. ती त्या काळाची गरज होती. त्यांनी
अफजलखान, शाईस्तेखान यांचा
बंदोबस्त केला; परंतु जखमी
सैनिकांना औषधोपचार केला. अगदी शत्रूपक्षातील जखमी सैनिकांनादेखील त्यांनी जीवदान
दिले. अफजलखानाला ठार मारल्यानंतर शिवाजीराजांनी पुढे काय केले याचे वर्णन समकालीन
कृष्णाजी अनंत सभासद पुढीलप्रमाणे करतात, ‘‘मग राजे यांनी खानाचे पुत्रास व सरदार पळून गेले होते
त्यांस धरून आणिले. राजा खासा प्रतापगडाखाली उतरोन कुल आपले लोक व अफजलखानाचे लोक
व त्यांचे पुत्र भांडते माणूस होते तितकियांस भेटून, पोटाशी धरून, दिलासा करून, भांडते लोक जे पडले होते त्यांच्या लेकांस चालविले.’’
शिवाजीराजांनी दुष्ट अफजलखानाला मारले; परंतु त्याच्या मुलास अभय देऊन प्रेमाने वागविले, असे समकालीन सभासद
सांगतात. त्यांचे धोरण मानवतावादी होते.
प्रजाहित रक्षक
‘शेतकऱ्यांच्या एका काडीचीदेखील तसनस
(नासधूस) न व्हावी,’ अशी शिवाजीराजांची
आज्ञा होती. शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाच्या साधनांचे रक्षण झाले पाहिजे या
त्यांच्या सक्त सूचना होत्या. शिवाजीराजांनी आपल्या अधिकाऱ्यांना सांगितले, ‘संध्याकाळी झोपताना
तेलवातीचे दिवे विझवून झोपा अन्यथा पेटलेली वात उंदीर घेऊन जाईल व त्यामुळे
जनावरांचा चारा, पीक जळून खाक होईल.
स्वयंपाकघरातील विस्तव विझवून झोपा अन्यथा चारा नष्ट झाल्यावर शेतकऱ्यांचे पीक, फांदी, लाकूडफाटा आणाल, हे तर मोगलांपेक्षा
जास्त जुलूम केल्यासारखे होईल.’’ आई ज्या पद्धतीने मुलांची काळजी घेते त्याप्रमाणे
शिवरायांनी प्रजेची काळजी घेतली.
·
दुष्काळाप्रसंगी
शिवाजीराजांनी आपल्या अधिकाऱ्यांना सांगितले, ‘बैलजोडी दगावली असेल, तर शेतकऱ्यांना बैलजोडी द्या. खंडी-दोन खंडी धान्य
द्या. त्यासाठी आपल्या तिजोरीवर बोजा पडला तरी चालेल. वाढीदिडीने वसूल करू नका.
मुद्दलच तेवढी घ्या.’ शिवाजीराजे संकटसमयी श्रमकरी, कष्टकरी, शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी
रयतेला शून्य टक्के व्याजदराने कर्ज दिले. गरिबांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या
व्याज पद्धतीला त्यांनी आळा घातला. ते मानवतावादी होते, हे त्यातून स्पष्ट
होते. म्हणून शिवकाळात अत्याधुनिकता नसली तरी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नाहीत.
सर्जेराव जेधे यांना पाठविलेल्या पत्रात शिवाजीराजे म्हणतात, ‘‘तुमच्या इलाख्यात
मोगलांची फौज येत आहे. हयगय न करता रयतेला लेकराबाळासह सुरक्षितस्थळी पाठवा. हयगय
कराल, तर तुमच्या मस्तकी
रयतेचे पाप बसेल.’’ संकटसमयी रयतेला मदत करणे हेच खरे पुण्य आहे, संकटसमयी रयतेला
वाऱ्यावर सोडून देणे हे पाप आहे. अशी शिवाजीराजांची पापपुण्याची संकल्पना होती.
मानवतावादी धोरण
स्त्रियांचा
आदर-सन्मान केला पाहिजे. शत्रूची असली तरी तिचा आदर-सन्मान करावा, ही शिवाजीराजांची
राजनीती होती. शिवाजीराजांच्या या नैतिकतेचे वर्णन खाफीखानासारख्या समकालीन मोगल
इतिहासकारांनीदेखील केलेले आहे. शिवाजीराजांनी रणांगण गाजविले. अनेक शत्रूंचा
बंदोबस्त केला; परंतु
लोककल्याणकारी, मानवतावादी धोरण
त्यांनी कधीही सोडले नाही. त्यामुळेच समकालीन कृष्णाजी अनंत सभासद म्हणतात, ‘‘एवढा मराठा पातशहा
छत्रपती जाहला, ही गोष्ट काही
सामान्य झाली नाही.’’ शिवाजीराजांचे कार्य कर्तृत्व, जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा आणि
राष्ट्राच्या सीमा ओलांडून वैश्विक दर्जाचे आहे. त्यांच्या जीवनाचे तत्त्वज्ञान
मानवतावादी आहे.
No comments:
Post a Comment