Monday 1 August 2022

1. बाबर - मोगल साम्राज्याचा संस्थापक (१५२६-१५३०)

 (ब) बाबर - मोगल साम्राज्याचा संस्थापक (१५२६-१५३०)


लोदी घराण्याचा शेवटचा सुलतान इब्राहिम लोदी बाबर बरोबर झालेल्या पानिपतच्या पहिल्या युध्दात ठार झाला. त्यानंतर दिल्लीची सुलतानशाही संपुष्टात येऊन तेथे मोगलांची सत्ता प्रस्थापित झाली. ही नवीन मोगल राजवट भारतात सुमारे दोनशे वर्ष प्रभावी ठरली. या राजवटीने पूर्वीचे सुलतान काळातील धार्मीक धोरण बदलून धर्म व राजकारण यामध्ये फरक केला. त्यामुळेच सर्वसाधारण भारतीयांनी मोगल राजवटीस सुलतानशाहीप्रमाणे परकीय मानले नाही. दिल्ली सत्तेशी सतत विरोधात असलेले राजपूत आता मोगल साम्राज्य स्थापनेसाठी रक्त सांडताना दिसून येतात. म्हणून संपूर्ण भारतात मोगलांना साम्राज्यविस्तार मोठया प्रमाणात करता आला. परंतू हेच राजपूत औरंगजेबाच्या धर्माविरोधात गेले तेव्हा मोगलसाम्राज्याचे पतन अपरिहार्य ठरले.


1. भारतात येण्यापूर्वी बाबर : 


जहिरुद्दिन महंमद बाबर हा भारतीय इतिहासाचा मोगल वंशाचा संस्थापक व महान साम्राज्यनिर्माता म्हणून प्रसिध्द आहे. बाबरचा जन्म सन १४८३ मध्ये फरगणा प्रातांत झाला त्याचे वडील उमरशेख मिर्झा हा फरगणाचा राजा होता. मातापित्याकंडून बाबर आपला संबंध चंगेझखान आणि तैमुरलंग या मध्य आशियातील दोन सुप्रसिध्द विजेत्यांशी लावीत असे. बाबर वडिलांच्या मृत्युनंतर फरगणा प्रातांचा राजा झाला. परंतु राज्याच्या संरक्षणासाठी त्याला आपल्या नातेवाईकांबरोबर युध्दे करावी लागली. तो महत्वाकांक्षी असल्याने त्याला मोठे साम्राज्य स्थापन करावयाचे होते. त्यासाठी समरकंदरचे राज्य मिळविण्याचा त्याने तीन वेळा प्रयत्न केला पण त्यात त्याला अपयश आले नंतर विशेष लढा न देता काबूल बाबरच्या ताब्यात आले आणि गझनी येथे राज्य स्थापन केले. यानंतर बाबरने आपली दृष्टी भारताकडे वळविली. भारतावर वर्चस्व स्थापन करण्यासाठी त्याने काबूल वरुन भारतावर इ.स. १५९९ ते १५२५ या दरम्यान एकूण पाच मोहिमा काढल्या त्यातील पाचव्या आणि अंतीम मोहिमेची परिणीती पानिपतच्या पहिल्या युध्दात झाली.


2.  पानिपतची पहिली लढाई (२१ एप्रिल १५२६)


भारतात या काळात एकछत्री राज्य नव्हते. लहान लहान अनेक राज्ये होती. दिल्ली येथे इब्राहिम लोदी राज्य करीत होता. दौलतखानच्या पुत्रास सुलतानाने क्रूरपणाने वागविल्यामूळे त्याने पंजाबात आपले स्वातंत्र्य पुकारले. इब्राहिम लोदीला पदच्युत करण्यासाठी त्याने बाबरची मदत मागितली या संधीचा फायदा घेऊन बाबर पंजाबात पुन्हा आला. त्याला गुजरातचा सुभेदार इब्राहिम लोदीचा काका आलमखानही येऊन मिळाला. दौलतखानशी वितुष्ट आल्याने बाबरने प्रथम दौलतखानचा पराभव केला. पूढे बाबरच्या कैदेतच तो मरण पावला. अशा प्रकारे संपूर्ण पंजाब प्रांत बाबरच्या ताब्यात आल्यानंतर मोर्चा दिल्लीकडे वळविला.


पंजाबातील घटनांची हकीकत सुलतान इब्राहिम लोदीला समजताच पंजाबची प्राप्ती व बाबरची प्रगती रोखण्यासाठी तोही आपले एक लाख सैन्य घेऊन दिल्लीहून निघाला. उभय पक्षाच्या सैन्याची गाठ पानिपतच्या ऐतिहासिक युध्दमैदानावर झाली. बाबर आणि इब्राहिम या दोघांचे सैन्य एकमेकांसमोर आठ दिवस पावेतो तळ देऊन पडली होती. २१ एप्रिल १५२६ रोजी इब्राहिमचे शाही सैन्य पूढे सरसावले बाबरने डावपेचाने आपल्या सैन्याची निमुळती रचना करुन शत्रूंच्या सैन्यात मुसंडी मारली. त्याचबरोबर शत्रुच्या सैन्याची फळी फुटली आणि सर्वच गोंधळ निर्माण झाला. बाबरने लागलीच आपल्या तुलुगामा पध्दतीचा अवलंबन करुन बरोबर आणलेला तोफखाना शत्रूवर डागला. विस्कळीत झालेल्या इब्राहिमच्या सैन्याचे धैर्य सुटले. बाबरच्या सैन्याने याचा फायदा घेऊन दिल्लीच्या सैन्याची कत्तल सुरु केली. त्यात इब्राहिम ठार झाला. सर्वशक्तीमान ईश्वराच्या अपार कृपेने या युध्दात आम्हाला विजय मिळाला असा उल्लेख बाबरने केला आहे.

या पहिल्या पानिपतच्या लढाईचे महत्त्व म्हणजे या लढाईने दिल्लीवरील लोदीची सत्ता संपुष्टात आली आणि तिथे मोगल घराण्याची सत्ता प्रस्थापित झाली. पानिपतच्या विजयानंतर बाबरने दिल्ली व आग्रा ही शहरे काबीज केली. स्वतःला बादशहा अशी पदवी धारण केली.


3. खानुवाची लढाई (१६ मार्च १५२७): राजपुतांच्या विरुद्ध


..राजपुतांचा पूर्ण पराभव केल्याशिवाय मोगल साम्राज्य भारतात टिकणे अशक्य आहे याबाबत बाबरला पूर्ण जाणीव होती. बाबरने दिल्लीस आपले राज्य स्थापन केले हे राजपूतांना आवडले नाही. मेवाडचा राणासंग याला दिल्ली येथे आपली सत्ता स्थापन करावयाची होती. बाबर तैमुरलंगाप्रमाणे लूट घेऊन पुन्हा परत जाईल व दिल्ली आपल्याला घेता येईल अशी राणासंगाची कल्पना होती. परंतु ती चुकीची ठरली. बाबर कायमचा भारतात राहाणार असे कळल्यानंतर त्याची घोर निराशा झाली होती. राणासंगाने आता बाबरला भारताबाहेर घालवून देण्याची निश्चय केला. राजपूतांमध्ये राणासंगाला फार मान होता आणि त्याने हाक देताच राजस्थानमधील सर्व राजे त्याच्या ध्वजासाली एकत्र आले. राणासंग आणि बाबर यांच्या सैन्याची गाठ फत्तेपूर शिक्रीपासून १० मैलावर खानुवा या ठिकाणी झाली. बाबरचा राजपूतांबरोबर लढण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. तरी त्याने न डगमगता आपले सैन्य जमा केले. तोफखाना सज्ज केला. १६ मार्च १५२७ रोजी दोघे सैन्यामध्ये मोठी लढाई झाली. बाबरने आपल्या युध्द कौशल्यावर विजय मिळविला. या लढाईच्या वेळी सैन्याला उत्साह निर्माण होण्यासाठी जे आवेशयुक्त भाषण केले त्याचा चांगला परिणाम झाला. बाबर विजयी झाला आणि राणासंगाचा पराभव होऊन तो लढाईत जखमी झाला. त्याच्या सैनिकांनी त्याला उचलून रणक्षेत्राबाहेर पाहोचविले.


खानुवाचे युध्द हे अत्यंत महत्वपूर्ण समजले जाते. शेवटपर्यंत या लढाईत विजयी कोण होतो याचा निर्णय लागत नव्हता इतक्या अटीतटीची ही लढाई झाली. लढाई फक्त दहा तास झाली परंतु तिचे परिणाम दूरवर झाले. परकीय शत्रूला भारताबाहेर घालविण्याचा राजपूतांचा प्रयत्न पूर्णपणे अयशस्वी झाला. भारतात बाबरने स्थापन केलेले मोगल साम्राज्य स्थिर झाले. बाबरच्या दृष्टीने खानुवाचा विजय पानिपतपेक्षा महत्वाचा होता. या विजयामुळे बाबरची एक धाडसी आक्रमक ही भूमिका संपून मोगल राज्य संस्थापक म्हणून त्याच्या आयुष्यात सुरूवात झाली. सत्तेचा केंद्रबिंदू आजपर्यंत काबूलमध्ये होते ते आता कायमचे भारतात आले.


4. घाघराचे युध्द (६ मे १५२९) : पठानांच्या विरुद्ध 


खानुवाच्या विजयाने बाबरचे आसन स्थिर झाले. राजपूतांचा जरी बंदोबस्त झाला तरी अद्याप अफगाणांचा विरोध मोडून काढावयाचा होता. इब्राहिम लोदीचा भाऊ महंमद लोदी याने बिहार मध्ये आपली सत्ता स्थापन केली. बाबरविरुध्द लढण्याकरिता एक लाख सैन्य उभारले होते. बाबरास त्याच्या हालचाली कळताच तो ससैन्य अफगाणांचा पारिपत्यास निघाला. बंगालचा सुलतान नुसरतशहा हा पण महंमद लोदीच्या मदतीस आला होता. ६ मे १५२९ रोजी बाबराने अफगाण व नुसरतशहा यांच्या संयुक्त सैन्याचा घाघरा येथील लढाईत पराभव केला. या युध्दाने अफगाणांची दिल्लीचे राज्य जिंकण्याची आशा धुळीला मिळाली आणि बिहारचा प्रदेश मोगलांच्या अंमलाखाली आला. युध्दानंतर नुसरतशहा आणि बाबर यांच्यात आता तह झाला या तहान्वये बंगालच्या स्वातंत्र्याला धक्का लावू नये आणि नुसरतशहाने बाबरच्या शत्रूला आश्रय देवू नये असे ठरले.


5. बाबरांचा मृत्यू व योग्यता : 


भारतात पाच वर्षाच्या कालावधीत बाबराने पानिपत, खानवा व घाघरा या लढाया जिंकून मोगलांचे राज्य सिंधूपासून बिहारपर्यंत प्रस्थापित झाले. या एकसारख्या दगदगीमुळे तो आजारी पडला. वयाच्या ४८ व्या वर्षी तो २६ डिंसेबर १५३० रोजी मृत्यु पावला. समकालीन आणि आधूनिक इतिहासकारांनी एकमुखाने बाबरास मध्यकाळातील आशियाचा अत्यंत प्रभावशाली सम्राट मान्य केले आहे. भारतात तोफखाना व दारुगोळ्याचा प्रयोग करणारा तो पहिला मूसलमान शासक होता. बाबर कडवा मुसलामान होता. हिंदूना तो काफीर समजत असे तर अफगांणावर त्याचा अजिबात विश्वास नव्हता. आयोध्या, मथुरा व चंदेरी येथील अनेक मंदिरे त्याने जमीनदोस्त केली होती. इतकेच नव्हे तर मथूथुरा व आयोध्या येथे त्याने कृष्ण व राम यांच्या जन्मस्थानी मशिदी उभारल्या बाबरच्या अकाली निधनामुळे त्याला योग्य राज्यव्यवस्था बसवता आली नाही म्हणून पूढे हुमायूनला त्रास झाला बाबर विद्या व कलांचा भोक्ता होता. त्याने आपले आत्मचरित्र तुर्की भाषेत बाबरनामा किंवा तुझुक ए बाबरी लिहिलेले आहे.


No comments:

Post a Comment

Featured Post

previous year question papers

http://www.unipune.ac.in/university_files/old_papers.htm

Popular Posts