Sunday, 28 August 2022

अ. मनसबदारी पद्धत : लष्करी प्रशासन

 अ.             मनसबदारी पद्धत : लष्करी प्रशासन

 

प्रस्तावना :

मुघल सम्राट बाबर आणि हुमायून यांच्या प्रशासन सैन्यात मुघल, तुर्क उझबेग, पर्शियन आणि अफगाण लोकांची भरती केली होती. त्यांना वेतनाऐवजी जमिनी वतन, जहागिरी देण्याची सुरू केली. जहागीरदार स्वतःचे सैन्य निर्माण करू लागले. वेळ प्रसंगी ते केंद्रीय सत्तेविरुद्ध बंड करीत होते. अकबराच्या काळात जहागीदार वर्ग स्वैराचारी बनून स्वतंत्रपणे वागू लागला. म्हणून मुघल साम्राज्याला स्थैर्य प्राप्त करण्यासाठी अकबराने जी नवीन लष्करी व्यवस्था निर्माण केली तीच मनसबदारी पद्धत होय. मनसबदारीचे योग्य पद्धतीने वर्गीकरण करून अधिकाऱ्यांची श्रेणिबद्ध रचना केली. असे असले तरी मनसबदारी पद्धतीत काही गुण-दोष होते. त्याची माहिती थोडक्यात पुढील प्रमाणे :

 

१.      मनसबदारीचा उदय :

मनसबदारीचा मूळ उदय तुर्की लष्करी संघटनात दिसून येतो. त्यांनी लष्करामध्ये मनोऱ्यासारखी लष्करी अधिकारी व सैन्याची रचना केली. दिल्लीच्या सुलतानांनी तुर्कांकडून मनसबदारीचा वारसा घेतला. सुलतानाच्या मनसबदारीत दोष होता. तो म्हणजे मनसबदारीतील श्रेणिबद्ध रचनेतील खालचा अधिकारी वरच्या अधिकाऱ्याशी एकनिष्ठ राही. त्याचा सुलतानाशी काहीही संबंध नसे. हा दोष अकबराने दूर करीत पूर्वीच्या मनोऱ्याप्रमाणेच श्रेणिबद्ध रचना केली पण खालच्या श्रेणीतील अधिकारी हा वरच्या श्रेणीतील अधिकाऱ्याशी एकनिष्ठ न ठेवता त्याचा प्रत्यक्ष सम्राटाशीच संबंध ठेवला. असा मनसबदारीत बदल करून अकबराने इ.स. 1570 मध्ये नव्याने मनसबदारी पद्धत सुरू केली. 'मनसब' हा शब्द 'मनसिब' या अरबी भाषेतील शब्दावरून आलेला आहे. 'मनसब' शब्दाचा अर्थ पद, हुद्दा, श्रेणी, दर्जा असा आहे. अशी ही मनसबदारी पद्धत अकबराने आपल्या मुलकी व लष्करी व्यवस्थेत सुरू केली.

 

२.      मनसबदारांची श्रेणी :

·       अकबराच्या काळात मनसबदारांची 'मनसबदार', 'उमरा व 'उमरा-ए-आझम' अशा तीन श्रेणीत विभागणी केली होती.

10 ते 400 पर्यंतच्या हुद्देदार

'मनसबदार'

500 पासून 2,500 पर्यंत

'उमरा',

3,000 च्यावर

'उमरा-ए-आझम

 

साधारणपणे 10 ते 400 पर्यंतच्या हुद्देदार 'मनसबदार', 500 पासून 2,500 पर्यंतच्या हुद्देदारांना 'उमरा', 3,000 च्यावर असणाऱ्या हुद्देदारांना 'उमरा-ए-आझम असे म्हणत. सर्वांत कनिष्ठ हुद्दा 10 स्वारांचा तर सर्वांत वरिष्ठ हुद्दा 10,000 स्वारांचा होता. दसहजारी मनसबदार असाही त्याचा उल्लेख होत असे. प्रारंभी 5 हजार स्वारांची मनसबदारी ही फक्त राजकुटुंबापुरतीच मर्यादित होती पण नंतर मात्र 5 वरून 7 हजार झाली. अकबराने अनेक राजपूत सरदारांना 7 हजाराची मनसबदारी दिलेली होती.

·       'झात' आणि 'सवार’: अकबर

मनसबदारी पद्धतीत अकबराने 'झात' आणि 'सवार असे दोन हुद्दे तयार केले होते. मनसबदाराचा हुद्दा आणि त्याच्याकडे असणारे प्रत्यक्ष सैन्य यामध्ये तफावत जाणवत होती. पाच हजारी मनसबदार असेल तर त्याच्याकडे प्रत्यक्ष तीन हजार सैन्य असत. हा फरक दाखविण्यासाठीच 'झात' आणि 'सवार' हे हुद्दे तयार केले होते. झात हा वैयक्तिक हुद्दा असून त्याचा शासनयंत्रणेमधील मनसबदाराचा निश्चित दर्जा समजत होता. या हुद्द्याच्या आधारावरच प्रमाण निश्चित केले होते. सवार या हुद्देदारामुळे त्या अधिकाऱ्याच्या हाताखाली नेमके किती प्रत्यक्ष सैनिक होते त्याची माहिती मिळत होती. नंतर मशरून हा नवीन हुद्दा निर्माण झाला. एखाद्या ठिकाणी नेमणूक झालेल्या मनसबदाराला त्याच्याकडे असणाऱ्या सैन्यापेक्षा त्याला अधिक सैन्य नेमावे लागत होते. अशा मनसबदाराला हा नवीन हुद्दा देण्यात आला.

 

·       दु-अस्पा, सिंह-अस्पा, निम-अस्पा-जहांगीर :

जहांगीरच्या काळात दु-अस्पा, सिंह-अस्पा, निम-अस्पा असे तीन हुद्दे होते. ज्याच्या जवळ एक जादा घोडा आहे त्यास दु-अस्पा, ज्याच्या जवळ दोन जादा घोडे आहेत त्याला सिंह-अस्पा तर दोन स्वारांमध्ये एक जादा घोडा त्याला निम-अस्पा असे हुद्दे मिळाले होते.

 

३.      मनसबदारांची नेमणूक पद्धत:

 मनसबदारांची नेमणूक स्वतः सम्राट करीत असत, तर दिवाण, बक्षी यांच्या सही-शिक्क्याचे मनसबदाराला नेमणुकीचे पत्र मिळत होते. सम्राटाचा जन्मदिन किंवा विशेष समारंभ यांच्या निमित्ताने मनसबदाराला बढती दिली जात होती.

 

४. चेहरा व डाग पद्धत 

·       सुलतानशाहीतील अल्लाउद्दीन खिलजीप्रमाणे अकबरानेदेखील चेहरा आणि डाग पद्धत सुरू केली होती. प्रत्येक शिपायाचे हजेरीपत्रकावर त्याच्या शरीरावरील विशेष खुणांचेवर्णन व चेहऱ्यावरील वैशिष्ट्यांचे वर्णन यांची नोंद केली जात असे. यास चेहरा पद्धत म्हणत.

·       तर सैन्यातील घोड्यांच्या उजव्या मांडीवर मध्यवर्ती सरकारचा व डाव्या मांडीवर मनसबदाराचा शिक्का मारला जात होता. यास 'डाग पद्धत' असे म्हणत.

·       मनसबदाराची किंवा शिपायांची भरती करताना त्याला सरकारपुढे एक जामीन द्यावा लागे. जर मनसबदाराकडून सरकारचे काही नुकसान झाले आणि जर तो नुकसानभरपाई भरण्यास असमर्थ असेल तर त्याने दिलेल्या जमीनदाराकडून नुकसानभरपाई वसूल केली जात होती.  त्यामुळे जामीनदारदेखील सरकारशी बांधील होते.

 

५.      मनसबदाराचे वेतन :

मनसबदारांमध्ये नकदी मनसबदार व जहागीरदार असे दोन प्रकार होते. नकदी मनसबदारांना त्यांचे वेतन रोख स्वरूपात मिळत असे. तर जहागीरदारांना मात्र रोख वेतनाऐवजी जहागिरीच्या स्वरूपातून वतन मिळत होते.

जहागीरदार हा समाजात प्रतिष्ठित मनसबदार होता. त्याच्यावर महसूल कर, पट्ट्या यांचे उत्पन्न गोळा करण्याची जबाबदारी दिलेली होती. या कामासाठी त्याला आमील, अमीन, पोतदार व कारकून हे अधिकारी मदत करीत होते. जमा झालेल्या महसुलातील काही हिस्सा जहागीरदार स्वतःसाठी ठेवत व बाकीचा सरकारमध्ये भरत असत. जहागिरी पद्धतीमध्ये जहागीरदार सरकारला डोईजोड होऊ नयेत म्हणून त्यांच्यावर विशेषतः महसूल वसुलीबाबत सरकारमध्ये कानुंगो तर परगण्यामध्ये चौधरी हे दोन अधिकारी ठेवलेले होते. कोणत्याही मनसबदाराने काही गैरवर्तन केले तर चौकशी होऊन त्याला शिक्षा देण्याचे धोरण निश्चित केले होते.

 

६.      मुघल सैन्याचे प्रकार :

·       सैन्यात पायदळ, घोडदळ, हत्तीदल व तोफखाना असे चार भाग होते. लढाईच्या प्रसंगी तर पायदळ महत्त्वाचे होतेच पण त्याशिवाय कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठीही पायदळाचा वापर केला जात होता.

·       मुघल सम्राटाची सर्वांत जास्त भिस्त घोडदळावर होती. अकबराच्या सैन्यात 3 ते 4 लाख घोडदळ होते. त्याच घोडदळाच्या बळावर अकबराचे आशिया खंडातील सर्वांत बलाढ्य साम्राज्य म्हणून ओळखले जात होते. घोडदळाच्या रचनेत आणि व्यवस्थेत शिस्त राखण्यासाठी काही कठोर नियमांची अंमलबजावणी केली होती. जे घोडेस्वार शासनाकडून भरती केले जात, त्यांना घोडा आणि शस्त्रास्त्रही शासनाकडून मिळत असत. अशा घोडेस्वारांना 'बारगीर' म्हणत होते. मनसबदारांना मात्र स्वतःचे घोडेस्वार निर्माण करावे लागत होते. घोड्यांना डाग देण्याची प्रथा असल्याने घोड्यांची अदलाबदल होत नव्हती.

·       तोफखाना विभागाचा प्रमुख 'मीर-ए-अतिश' हा अधिकारी होता. मोठ्या व लांब पल्ल्याच्या तोफा आणि त्या अधिक संहारक कशा निर्माण होतील याकडे स्वतः अकबराचे लक्ष होते. तोफा ओढण्यासाठी हत्ती, उंट आणि बैलाचा वापर करीत होते. याशिवाय बंदुकधारी सैनिकही होते. लष्कराचे साहित्य वाहून नेण्यासाठी हत्तीदळाचा वापर केला. मुघल काळात आरमार दल अस्तित्वात होते.

 

७.     मनसबदारी पद्धतीचे गुण :

1. मनसबदारी पद्धतीमुळे मुघल साम्राज्याचे लष्करी सामर्थ्य वाढले होते.

2. पूर्वीची मनसबदारी पद्धतीमुळे जहागीरदारी पद्धत नष्ट झाली.

3. मनसबदारी पद्धतीमध्ये कोणतेही पद वंशपरंपरागत नव्हते. प्रत्येक मनसबदाराला आपले पद टिकविण्यासाठी, पदोन्नतीसाठी पराक्रमाची शर्थ व सम्राटाची मर्जी संपादन करून राहावे लागत होते.

4. मनसबदार हा प्रत्यक्ष सम्राटास जबाबदार असल्याने सेनाधिकाऱ्याकडून उठाव किंवा बंड होण्याची शक्यता नव्हती.

5. अकबर काळात मनसबदारी पद्धत ही अत्यंत कार्यक्षम असल्यामुळे त्यांचे दिल्याने साम्राज्य स्थिर व बळकट आणि सामर्थ्यशाली बनण्यास मदत झाली.

 

८.      मनसबदारी पद्धतीचे दोष :

१.      अकबरानंतर मात्र मनसबदारी पद्धतीत अनेक दोष निर्माण झाले. मनसबदारांना नेमून दिलेल्या सैन्यापेक्षा त्यांनी कमी सैन्य नेमले. सरकारकडून मात्र अधिक सैन्याचे वेतन घेतले. त्यामुळे सैन्य संख्येत भ्रष्टाचार झाला.

२.      मनसबदारांनी आपल्या नियंत्रणाखालील शिपायांना कमी वेतन

दिले, त्यामुळे शिपायांकडील लढाऊ वृत्तीचे मनोबल कमी होऊ लागले होते.

३.      मनसबदारी पद्धतीत वंशपरंपरागत पद्धत नसल्यामुळे ते विलासी जीवन जगत होते. अशा मनसबदारांकडून शूरवीर, तरुणांची भरती होण्याऐवजी बाजार बुणग्यांची भरती होऊ लागली. परिणामी मुघल सैन्य दुर्बल झाले.

४.      मनसबदारी पद्धतीत शेवटचा मनसबदार हा प्रत्यक्ष सम्राटाशी संबंधित असला तरी त्याचे वेतन मात्र सम्राटाशी संबंधित नसून वरच्या अधिकाऱ्याशी निगडित होते. त्यामुळे त्याच्या निष्ठा मनसबदाराप्रती निर्माण होत बादशहाप्रती नाही.

मनसबदारी पद्धतीत अनेक गुण-दोष होते. तरीही त्या वेळच्या परिस्थितीत ती एक चांगली पद्धती ठरली होती. मुघल साम्राज्यातील अधिकारी वर्गाला यामुळे भक्कम लष्करी यंत्रणेची ताकद मिळाली होती. मनसबदारी ही जहागिरी प्रथेपेक्षा काही प्रमाणात बरी होती, याच पद्धतीने लष्करी शक्तीचे केंद्रीकरण झाले. मोठ्या प्रमाणात लष्कर उभारणीसाठी त्याचा निश्चितच फायदा झाला.


K. मोगल साम्राज्याच्या पतनाची कारणे

K. मोगल साम्राज्याच्या पतनाची कारणे

 

मोगल साम्राज्याचे विघटन औरंगजेबाच्या कारकिर्दीतच सुरू झाले होते. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर झालेले मोगल सम्राट दुर्बल निघाले. त्यांनी साम्राज्य टिकविण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही. नादीरशहा आणि अहमदशहा अब्दाली यांच्या आक्रमणामुळे मोगलांची प्रतिष्ठा नष्ट झाली. त्याचे परिणाम जवळपास एका शतकात साम्राज्याचे अनेक तुकडे झाले. एवढया मोठया विशाल मोगल साम्राज्याचे पतनाचे प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे

 

१.      वारसा नियम नाही

सत्तारूढ सम्राटानंतर कोणी सिंहासनावर बसावे याबद्दल नियम नव्हता. त्यामुळे सम्राटाच्या मृत्यूनंतर शहाजदामध्ये सत्तेसाठी युध्द होत असे. त्यांचा निर्णय तलवारीच्या जोरावर होत असे. अशा वारसा युध्दामुळे मोगलांची शक्ती कमकुवत होत गेली. शहाजहान व औरंगजेबाने सत्तेसाठी आपल्या सर्व भावांना व प्रतिस्पध्र्थ्यांना ठार केले. होते. अशा युध्दामुळे राज्याचे प्रचंड नुकसान होत गेले व राज्यात असंतोष निर्माण होत झाला. इतर राजपूत्र व त्यांचा सहकारी वर्ग असंतुष्ट बनला. अशा असंतोषाच्या काळात मोगल साम्राज्य कमकुवत झाले.

 

२.      औरंगजेब जबाबदार

मोगल साम्राज्याच्या पतनास औरंगजेब सर्वाधिक जबाबदार आहे असे अनेक इतिहासकारांचे मत आहे. औरंगजेबाच्या कट्टर धार्मिकधोरणामुळे बहुसंख्य हिंदू प्रजा मोगल साम्राज्याच्या विरोधी बनली. साम्राज्यात ठिकठिकाणी बंडे मोगल साम्राज्याचे आधारस्तंभ असलेल्या राजपुतांच्या विरोधात सुरू झाली. औरंगजेब गेला. अजितसिंह व दुर्गादास राठोड याच्या नेतृत्वाखाली तीस वर्ष स्वातंत्र्य लढा दिला. या राजपूत लढयाचे मोगल साम्राज्यावर वाईट परिणाम झाले. तसेच औरंगजेबाची दक्षिण स्वारी ही त्याची फारमोठी चुक होती. कडव्या औरंगजेबाने विजापूर व गोवळकोंडा हि शिया राज्ये जिंकून घेतल्यानंतर त्यांनी आपले लक्ष मराठ्यांकडे वळविले. परंतु औरंगजेब मरेपर्यंत मराठ्यांना जिंकू शकला नाही. दीर्घकाळ चाललेल्या या युध्दामुळे राज्याचा खजिना रिकामा झाला.. मोठया प्रमाणात शक्ती खर्च झाली. उत्तरेकडील राज्यांकडे कमालीचे दुर्लक्ष झाले. परिणामी साम्राज्यात ठिकठिकाणी बंडे होऊन मोगल साम्राज्य कमकुवत झाले. त्याचप्रमाणे औरंगजेबाचा स्वभाव संशयी, कपटी साधनांचा अभाव व विश्वासघातकी असल्यामुळे त्याचा कोणावरी विश्वास नव्हता. औरंगजेबाने आपल्या मुलांना जवळ ठेवले नाही त्यामुळे त्यांना राज्यकारभाराचे चांगले प्रशिक्षण मिळाले नसल्यामुळे एवढया मोठया साम्राज्याचा गाडा चालविण्यास असमर्थ ठरले.

 

३.      औरंगजेबानंतर दुर्बल वारस

औरंगजेबानंतर आलेले सम्राट पराक्रमी नव्हते. बहादूरशहा प्रथम ते बहादूरशाह द्वितीय पर्यंत पदारूढ झालेले मोगल सम्राट दुर्बल, दुराचारी होते. बहादुरशहा पहिला वयाच्या ६२ व्या वर्षी सम्राट बनला. उतारवयात सम्राट बनल्यानंतर त्याचे नातू सम्राटाची स्वप्ने पाहू लागली. अशा परिस्थितीत सरदारांचे वर्चस्व वाढले त्यामुळे मोगल सम्राट महत्वाकांक्षी सरदारांच्या ताब्यात जाऊन हे सम्राट केवळ त्यांच्या हातातील बाहुले बनले.

 

४.     मोगल सैन्याची दुर्बलता

 मनसबदार पध्दतीमुळे सैन्यात अनेक दोष निर्माण झाले. प्रत्येक सैनिक सम्राटाला जबाबदार नसून आपल्या मनसबदार मालकास एकनिष्ठ असे. त्यामुळे दुर्बल सम्राट सत्तेवर येताच मनसबदार बंड पुकारीत. त्यामुळे साम्राज्याची सैन्य शक्ती दुर्बल बनत असे. शिवाय मनसबदारात एकमेकांबद्दल मत्सर व हेवेदावे होते. आपल्या प्रतिस्पर्धी मनसबदारास अपयश यावे म्हणून ते शत्रूला मदत करण्यास तयार असत. तसेच मोगलांकडे उच्च दर्जाचे कार्यक्षम आरमार नव्हते. सैन्यात शिस्त नव्हती सैनिकांना युध्दाचे अद्यावत शिक्षण दिले नाही.

 

५.     मोगल सरदारांचे नैतिक पतन

मोगल भारतात आले तेव्हा मोगल सरदार प्रभावशाली, पराक्रमी व प्रामाणिक होते. परंतु औरंगजेब नंतरच्या कारकिर्दीत ते विलासी, व्यसनी, आळसी व चरित्र्यहीन बनले होते. त्यामुळे त्यांच्यातील बौध्दीक शक्तीचा -हास झाला होता सरदारांचे वारसही दुर्बल व कर्तव्यशून्य निघाल्यामुळे ते मोगल साम्राज्याचे संरक्षण करू शकले नाही. मोगल साम्राज्यातील काही प्रांताचे सरदार महत्वाकांक्षी होते. त्यांनी आपली शक्ती वाढविली व कालांतराने ते सम्राटाला डोईजड झाले. अनेक कारस्थानी व महत्वाकांक्षी सरदारांनी स्वतंत्र राज्याची स्थापना केली. त्यामुळे मोगल साम्राज्याचे विघटन होऊ लागले.

 

६.      मोगल दरबारातील गटबाजी

मोगल सम्राटांच्या दरबारातील मुसलमानात अनेक गट होते. शियापंथी इराणी, पर्शियन व सुन्नीपंथी तुराणी, मध्य आशियन हे दोन गट विशेष प्रभावी होते. याशिवाय अरब, हबशी, रूमी, फिरंगी वगैरे लहान लहान गटही होते. उत्तरकालीन मोगल काळात सरदारांमध्ये वैयक्तीक स्वार्थामुळे कटकारस्थाने व गटबाजीला उधाण आले होते. या गटांमध्ये संघर्ष होऊन मोगल सत्ता दुर्बल बनली.

 

७.     आर्थिक संकट

एडवर्डच्या मतानुसार मोगल साम्राज्याची आर्थिक दुर्बलता हेच साम्राज्याच्या पतनाचे प्रमुख कारण होय. अकबराने समतोल अर्थव्यवस्था स्थापन केली. पण नंतरच्या काळात प्रजेवरील कराचे ओझे वाढत गेले. शहाजहानच्या काळात प्रचंड बांधकामावर पैसा खर्च झाला. औरंगजेबाच्या कट्टर धार्मिक धोरणामुळे प्रजा विरोधात गेली त्यासाठी त्याला प्रचंड सैन्य व पैसा खर्च करावा लागला. औरंगजेबाची दक्षिणेकडील स्वारी दीर्घकाळ चालल्यामुळे राज्याचा खजिना रिकामा झाला. औरंगजेब नंतरचे उत्तराधिकारी विलासी व ऐषआरामाने राहू लागले. त्यातच नादिरशहा व अहमदशहा अब्दालीच्या आक्रमणाने कोटयावधी रूपयाची आर्थिक लूट स्वदेशी नेली. त्यामुळे मोगल साम्राज्याची आर्थिक अवस्था अतिशय गंभीर बनली. आलमगीर द्वितीयच्या कारकिर्दीत अर्थव्यवस्था संपूर्ण कोलमडूनपडली. प्रचंड आर्थिक संकट निर्माण झाले. अशा परिस्थितीत मोगल साम्राज्य तग धरणे शक्य नव्हते.

 

८.      दळणवळणाच्या साधनांचा अभाव

औरंगजेबाने दक्षिण भारत जिंकल्यानंतर मोगल साम्राज्याचा प्रचंड विस्तार झाला. परंतु अशा विशाल साम्राज्यावर दळणवळणाच्या पुरेशा व जलद साधनांअभावी संपूर्ण साम्राज्यावर नियंत्रण ठेवणे अशक्य झाले. साम्राज्यात एखाद्या ठिकाणी बंड झाल्यास त्याची बातमी दिल्ली पर्यंत पोहचण्यास व त्यानंतर त्यांचा बंदोबस्त करण्यास बराच कालावधी निघून जात असे. यामुळे प्रशासन शिथिल होऊन या बंडखोरांमुळे मोगल साम्राज्याचे अनेक तुकडे झाले.

 

९.      सुभेदारांची स्वतंत्र होण्याची इच्छा

मोगलांचे विशाल साम्राज्य अनेक प्रांतात विभाजन झाले होते. या प्रांताचा प्रमुख सुभेदार असे. तो सम्राटाचा प्रतिनिधी म्हणून प्रांताचा राज्यकारभार पहात असे. औरंगजेबापर्यंत मोगल सम्राटांचा सर्व सुभेदारावर वचक होता परंतु औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगल साम्राज्य दुर्बल बनल्यानंतर प्रांतीय सुभेदार स्वतंत्र होण्याचा विचार करू लागले. आणि त्यातून महत्वाकांक्षी सुभेदार स्वतंत्र झाले. दक्षिण भारतातील सहा सुभ्यांवर सुभेदार निजाम उल मुल्क आसफजा याने हैद्राबादच्या निजामशाहीची स्थापना केली. बंगाल, बिहार व ओरीसा या प्रदेशावर अलीवर्धीखानची सत्ता स्थापन झाली. सादतखन बुऱ्हाण उल मुल्क याने आयोध्या प्रांतात आपल्या वंशाची स्थापना केली. राजपूत, मराठे, बुंदले, शिख, जाट वगैरे स्वतंत्र झाले त्यामुळे मोगल साम्राज्य लयास गेले.

 

१०.   राष्ट्रीय एकात्मतेचा अभाव

मोगल सम्राटांनी भारतात इस्लामी - राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रयत्न केला नाही. त्यामुळे भारतीय प्रजा मोगलांना परकीय समजत असल्यामुळे मोगलसाम्राज्य भारतीय जनतेत लोकप्रिय होऊ शकले नाही. मोगलांनी इस्लामला राजधर्म आणि फारशीला राजभाषा म्हणून मान्यता दिल्याबद्दल बहुसंख्य हिंदू प्रजेला त्यांच्याबद्दल कधीही आपलेपणा वाटला नाही. सम्राट अकबराने हिंदू आणि मुस्लिम यांच्यात सामाजिक व धार्मिक समन्वय साधण्याचा प्रयत्न केला परंतु नंतर कोणत्याही सम्राटाने असा प्रयत्न केला नाही. त्यांनी लोककल्याणाकडे दुर्लक्ष केले त्यामुळे लोकांमध्ये मोगलांबद्दल कधीही आपुलकी निर्माणझाली नाही. अशा राष्ट्रीय एकात्मतेच्या अभावामुळे मोगल साम्राज्य लयास गेले.

 

११.   परकीय आक्रमण

 औरंगजेबानंतर मोगल साम्राज्य कमकुवत झाले अशा परिस्थितीत अफगाणिस्थानातून नादीरशहा व अहमदशहा अब्दालीने मोगल साम्राज्यावर स्वाऱ्या करून कोटयावधी रूपयाची लूट स्वदेशी नेली. या स्वाऱ्यांमुळे मोगल साम्राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळाली. या संधीचा फायदा इंग्रजांनी उचलला आणि भारतीय राजकारणात हस्तक्षेप सुरू केला. भारतातील वेगवेगळया सत्तांच्या संघर्षात भाग घेतला तर काही सत्ताधिशांना मदत केली आणि त्यांनी नंतर आपली स्वतंत्र सत्ता बंगालमध्ये स्थापन केली. नंतर संपूर्ण भारतात साम्राज्यविस्तार करून मोगल सम्राटास पदच्युत करून त्यांना पेन्शन सुरू केली.

=========================================


H. औरंगजेबाचे दक्षिण भारत धोरण

 H. औरंगजेबाचे दक्षिण भारत धोरण

 

शहाजहानच्या कारकिर्दीत औरंगजेब दक्षिणचा सुभेदार होता. दक्षिण भारतात विजापूर व गोवळकोंडा ही प्रमुख मुसलमानी राज्ये होती. त्यांना नष्ट करण्याचे त्याचे धोरण होते. पण या दोन्ही राज्यांपेक्षा खरी काळजी शिवाजीची होती. विजापुरकरांशी शिवाजी महाराजांशी संघर्ष चालू असताना औरंगजेबाने शाहिस्तेखानास सैन्य घेऊन पाठविले. पुण्यास शाहिस्तेखान असतानांच शिवाजीने हल्ला करुन शाहिस्तेखानची बोटे कापली. सुरत ही मोगलांची व्यापारपेठ लुटून अमाप संपत्ती नेली. यानंतर आलेल्या राजा जयसिंगाने सर्व बाजूंनी नाकेबंदी करुन शिवाजीस पुरंदर येथे शरण आणले. एवढेच नव्हे तर शिवाजी आग्र्यास औरंगजेबाच्या भेटीस दाखल झाला. त्यानंतर शिवाजी आगऱ्याहून निसटून स्वदेशी सुखरुप परत आला. पुन्हा सुरत बागलाण, खानदेश व वऱ्हाड या मोगली मुलखावर स्वाऱ्या केल्या. पुरंदरच्या तहात गेलेला सर्व मुलूख परत मिळविला. इ.स. १६८० मध्ये शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. १ एप्रिल १६८२ रोजी औरंगजेब दक्षिण भारत जिंकण्यासाठी बुऱ्हाणपुरास दाखल झाला.

 

१.      विजापूर जिंकले (इ.स. १६८६)

विजापूरची सुत्रे यावेळी शरझाखान नावाच्या प्रधानच्या हाती होती. राजपुत्र अझमच्या नेतृत्वाखाली विजापूर शहराला वेढा देण्यात आला. विजापूरला संभाजी व गोवळकोड्यांला कुतुबशहा यांचे साह्य होते. विजापूर लवकर हाती येत नाही म्हणून औरंगजेबाने स्वतः इ.स. १६८६ मध्ये वेढा निकराने चालू केला तेव्हा सुलतान सिंकदर याने औरंगजेबाकडे शरणागती पत्करली. त्यास खान हा किताब देऊन दरसाल एकलाखाचे निवृत्ती वेतन देण्यात आले. सुलतानच्या बहिणीचा राजपूत आझमशी विवाह करुन देण्यात आला.

 

२.      गोवळकोंड्यावर स्वारी (१६८७)

विजापूरच्या विजयानंतर इ.स. १६८७ मध्ये औरंगजेब गोवळकोंड्याकडे वळला. याठिकाणी अबुल हसन गादीवर होता. त्याचा सर्व कारभार मादण्णा व आक्काण्णा या दोन हिंदू मुत्सदी पुरुषांकडे होता. मीर मोहमंद इब्राहीम हा गोवळकोंड्याचा सेनापती फितूर झाल्यामुळे सुलतानने शरणागती पत्कारली. मादण्णा व आक्काण्णा यांना ठार करण्यात आले. गोवळकोंड्याचा किल्ला ताब्यात आल्यावर सुलतान अबूल हसनला बंदी करुन दौलताबादच्या किल्ल्यावर पाठविण्यात आले. या विजयामुळे औरंगजेबास सात कोट नगद व अमाप सोने मिळाले.

३.      मराठ्यांशी युध्द

विजापूर व गोवळकोंडा विजयानंतर औरंगजेबाने आपले सर्व लक्ष मराठ्यांकडे वळविले. छत्रपती संभाजीच्या विरुध्द त्याने आपल्या फौजा पाठवून संभाजी महाराज व त्याचा मित्र कवी कलष हे मोठ्या प्रयत्नाने त्यांच्या तावडीत सापडले. इ.स. १६८९ मध्ये औरंगजेबाने त्यांना हालाहाल करून ठार मारले. संभाजी महाराजांच्या पश्चात त्याचा धाकटा भाऊ राजाराम याने इ.स. १७०० पर्यंत मराठ्यांचे नेतृत्व नेटाने केले. महाराष्ट्र बाहेर कर्नाटकात जिंजी येथे तो गेला. संताजी घोरपडे, धानाजी जाधव, रामचंद्र आमात्य, प्रल्हाद निराजी व खंडोबल्लाळ इ. त्याच्या सरदारांनी मोगल सैन्याचा प्रतिकार केला. राजारामाच्या मृत्युनंतर त्याची पत्नी ताराबाई हिने आपल्या अल्पवयीन मुलाच्या वतीने राज्यकारभाराची सुत्रे हाती घेऊन १७०७ औरंगजेबाच्या मृत्युपर्यंत मोगल सैन्याचा प्रतिकार यशस्वीपणे केला. २७ वर्षपर्यंत चालणाऱ्या या संघर्षात औरंगजेबास शेवटपर्यंत यश आले नाही.

====================================



I. औरंगजेबाचे धार्मिक धोरण

 I.          औरंगजेबाचे धार्मिक धोरण

 

पहिली बाजू : 

·       औरंगजेब कट्टर सुन्नीपंथी होता. इस्लामवर त्याची प्रगाढ श्रध्दा होती. त्याने इस्लामला राजधर्म म्हणून मान्यता दिली. त्यास भारताचे परिवर्तन दारुल हर्ब (काफिरांचा देश) मधून दारुल इस्लाम (इस्लामांचा देश) मध्ये करावयाचे होते. जहांगीरचा भोगविलास आणि शहाजहानचा थाटमाट यापासून औरंगजेब शेकडो योजने दूर होता. त्याची राहाणी अत्यंत साधी होती. धर्मप्रसाराकरीता आपणास ईश्वराने या जगात पाठविले आहे अशी त्याची समजूत होती. स्वधर्माचा प्रसार करण्याकरिता त्याने हिंदूविरुध्द जिहाहादची घोषणा केली. हिंदूचे नागरिकत्वाचे अधिकार त्याच्या राजवटीत काढून घेण्यात आले. हिंदु धर्म व संस्कृती नष्ट करण्याचा त्याने जणू काही चंगच बांधला होता. अहमदाबादच्या सुप्रसिध्द चिंतामणी मंदिरात गोवध करण्यात येऊन मंदिराचे परिवर्तन त्याने मशिदीत केले. प्रांताधिकाऱ्यांना अशा सक्त आज्ञा सोडल्या की, त्यांच्या प्रदेशात जेवढी हिंदू देवालये असतील तेवढी नष्ट करण्यात यावीत सम्राटाच्या आज्ञेवरुन शेकडो वर्षापासून उभी असलेली हिंदूची बनारसचे विश्वनाथ, मथुराचे केशवदेव व पाटणाचे सोमनाथ इ. प्रसिध्द मंदिरे भुईसपाट केली.

·       शासनव्येवस्थेचेही त्याने इस्लामीकरण करण्याचे ठरविले. त्यांच्या कारकिर्दीत सरकारी नोकऱ्या मिळणे दुरापास्त झाले. हिंदूनी इस्लाम धर्म स्विकारावा याकरिता नानातऱ्हेची प्रलोभने उदा. जहागीर, बक्षीस, पैसा व उच्च पदे इ. देत असे. 

  • १२ एप्रिल १६७९ रोजी औरंगजेबाने काढलेल्या हुकुमानुसार स्त्रिया, मुले व भिकारी इत्यांदीना सोडल्यास अन्य सर्व हिंदूकडून सक्तीने जिझिया कर घेतला जाऊ लागला. हिंदूना प्रयाग येथे स्नान करण्यासाठी ज्यादा कर द्यावा लागत. तिर्थक्षेत्रांवर हिंदूकडून असाच कर घेतला जाऊ लागला. सम्राटाने मुसलमान व्यापाऱ्यांकडून जकात घेणे बंद केले. पण हिंदू व्यापाऱ्यांकडून मात्र ५१% जकात घेतली जाई.

  • इ.स. १६६५ मध्ये राजपूत सोडून अन्य हिंदूना हत्ती घोडयावर बसणे, पालखी व शास्त्रास्त्रे वापरणे इ. गोष्टी बंद करण्यात आल्या. हिंदूच्या उत्सव व मेळ्यांवर बंदी घालण्यात आली. हिंदूना सार्वजनिकरित्या कोणताही सण साजरा करणे त्याच्या धर्मांध राजवटीत अशक्य होते. 

  • मासिरे आलमगिरीचा लेखक आणि औरंगजेबाचा चिटणीस साकी मुस्तैदखान लिहितो. बादशहाच्या काळात हिंदूची जितकी विटंबना झाली तितकी यापूर्वी कधीच झाली नाही. 

  • एकंदरीत सम्राटाच्या या कट्टर धार्मिक धोरणाचा परिणाम मोगल साम्राज्यावर भयानक झाला. या धोरणामुळे त्याच्या बहुसंख्य हिंदू प्रजेत त्याच्याबद्दल तीव्र घृणा उत्पन्न झाली. सर्व साम्राज्यात बंडाचा वणवा पेटला. शीख, बुंदले, जाट, सतनामी, राजपूत व मराठे इ. त्याच्याविरुध्द गेले. संपूर्ण भारत देश त्याच्या अतिरेकी धर्मवेडेपणामुळे पेटला. ही बंडे मोडण्याकरिता त्याला प्रचंड सैन्य उभारावे लागले. युध्दात त्याचे लक्षावधी सैनिक मारले गेले. सम्राटाच्या धोरणामुळे देशातील शांतता व सुव्यवस्था कोलमडून पडली. मोगल साम्राज्य पूर्णपणे दुर्बल झाले.

 

दुसरी बाजू : . 

  • बादशहा निश्चितच धार्मिक वृत्तीचा होता. त्याच्या उत्तरायुष्यात तो प्रार्थनेच्या वेळी वापरण्यात येणाऱ्या टोप्या शिवत असे. त्याने कुराण पाठ केले होते. पण त्याचा धर्मविषयक दृष्टिकोन कडवेपणाचा नव्हता. आपल्या प्रदीर्घ आयुष्यात त्याने वारंवार हिन्दू धर्मगुरूंशी सल्लामसलत केली. बैरागी शिवमंगलदास नामक हिन्दू धार्मिक नेत्याबरोबर बादशहा नेहमी चर्चा करीत असे. आणि त्याला अनेकदा इनामे आणि बक्षिसेही देत असे.’ हा उतारा वाचून आपण मोगल सम्राट अकबराविषयी वाचत आहोत असा वाचकाचा गैरसमज होईल. परंतु अविश्वसनीय वाटावे असे सत्य हे आहे, की हे वर्णन औरंगजेबाचे आहे! 

·       औरंगजेबाचे नाव काढले की जवाहरलाल नेहरूंपासून यच्चयावत सर्व हिन्दूंच्या तळपायाची आग मस्तकात जाते. ‘ही वॉज ट्रु मुस्लिम टु बी अनसक्सेसफुल इंडियन किंग’, असे नेहरूंनी औरंगजेबाच्या राजवटीचे निदान केले होते. अखिल हिन्दुस्तानचा शासनकर्ता म्हणून गौरविला जाण्याइतपत व्यापक आणि विशाल दृष्टिकोन औरंगजेबापाशी नव्हता आणि तो आत्यंतिक धर्मवेडा होता असे नेहरू म्हणतात. नेहरूंसारख्या धर्मनिरपेक्ष समजल्या जाणाऱ्या राष्ट्रनेत्याचे असे मत! मग इतरांचे तर आणखीनच औरंगजेबविरोधी!! परिणामी २०१५ साली दिल्लीतील औरंगजेब रस्त्याचे नाव बदलून त्याला माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात आले. 

·       ऑड्री ट्रुश्क या अभ्यासक महिलेने या घटनेनंतर औरंगजेबाच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कारकिर्दीचा मूळ फारसी कागदपत्रे, दस्तावेज आणि ग्रंथ वाचून ‘औरंगजेब: द मॅन अँड द मिथ’ हे पुस्तक लिहिले आहे. औरंगजेबाने आपली सुफी परंपरेशी असलेली नाळ कायम ठेवली होती असे ऑड्रीचे प्रतिपादन असून म्हणूनच महाराष्ट्रातील चिश्ती दर्ग्यापाशी त्याचे दफन करण्यात आले असे लेखिकेचे म्हणणे आहे. औरंगजेबाविषयीचे समज, गैरसमज आणि पूर्वग्रह बळावण्यात वसाहतवादी ब्रिटिश इतिहास लेखकांचा फार मोठा सहभाग होता असे लेखिका म्हणते. आपल्या वडिलांना कैदेत टाकले; भावांना ठार मारले याबद्दल त्याच्याविषयी साहजिकच घृणा वाटते. पाकिस्तानी नाटककार शाहिद नईम यांनी तर म्हटले आहे की दारा शुकोहला पराभूत करून औरंगजेबाने सिंहासन बळकावले नसते, तर फाळणी झाली नसती आणि उपखंडाचा इतिहासच बदलला असता. ल‌ेखिका त्याच्याशी सहमत नाही.  

·       त्याने बारा देवळे उध्वस्त केली हे खरे आहे. परंतु त्याने अनेक देवळांना संरक्षणही दिले; वतने दिली. 

·       ब्राह्मणांना जमीन दिली आणि त्यांचा छळ होणार नाही याची दक्षता घ्या असे आदेशही आपल्या सरदारांना दिले. होळीच्या उत्सवावर त्याने निर्बंध घातले म्हणून टीका करणाऱ्यांना लेखिका सांगू इच्छिते की त्याने मोहरम आणि ईदवरही निर्बंध घातले.

·       शरीरस्वास्थ्य आणि आहार/उपचारपद्धती याबाबत तो हिन्दू हठयोग्याचा सल्ला घेत असे. प्रशासनात त्याने महत्त्वाच्या जागांवर अनेक हिन्दू सरदारांची नेमणूक केली होती. 

·       १६८१पासून त्याने आपला कारभार दक्षिणेत दख्खनमध्ये हलविला आणि तिथेच त्याचा १७०७ साली अंत झाला. औरंगजेब या विशेषनामाचे त्याच्या मृत्यूनंतर विशेषण बनत गेले. क्रूर, धर्मांध, अरसिक आणि कलाद्वेष्टा म्हणजे औरंगजेब असे समीकरण बनले. ते तथ्याला धरून अथवा इतिहासाशी सुसंगत नाही हे लेखिकेने तपशीलवार पुराव्यासकट मांडले आहे. 

·       तरुणपणी तो संगीतप्रेमी होता आणि हिराबाई झैनाबादी या गायिकेबरोबर त्याचे प्रेमसंबंध होते. त्याच्या शासनकालात संगीतावरील अनेक महत्त्वाच्या ग्रंथांची रचना झाली आणि त्याच्या अखेरच्या काळात उदयपुरी हा गायक कलाकार सतत त्याच्यासोबत असे. इतका, की हा माझ्या मागोमाग या जगाचा निरोप घेईल असे औरंगजेबाने आपल्या पत्नीला लिहिलेल्या पत्रात म्हटले आणि तसे घडलेही. त्याने जे क्रौर्य दाखविले अथवा त्याच्याकडून जे अत्याचार घडले ते शासनसंस्था चालविण्याच्या जिद्दीमुळे! त्यामागे धार्मिक प्रेरणा होती असा अर्थ काढणे योग्य नाही असे लेखिकेने म्हटले आहे.

=============================================


G. औरंगजेबाचा राज्यविस्तार

 G. औरंगजेबाचा राज्यविस्तार 

 

औरंगजेब (इ.स. १६५८-१७०७) हा मोगल वंशातला शेवटचा प्रतापी सम्राट होऊन गेला. सुमारे ५० वर्षे त्याने भारताच्या एका विशाल प्रदेशावर राज्य केले. शहाजहानचा हा तीन नंबरचा मुलगा असून त्याने सम्राट होण्याच्या महत्वाकांक्षेमूळे आपल्या तीन भावांचा नायनाट करुन आणि बापाला कैदेत टाकून सत्ता मिळविली. आलमगिरी हे नाव धारण करुन तो इ.स. १६५८ मध्ये गादीवर बसला. वारसा युध्दाच्या रणधुमाळीने साम्राज्य अस्ताव्यस्त झाले होते. म्हणून त्याने सर्वप्रथम राज्यात सुव्यवस्था स्थापण्याचा प्रयत्न केला.

 

औरंगजेबाचा साम्राज्यविस्तार

 

१.      आसाम आणि कुचबिहार :

सम्राट औरंगजब गादीवर आल्यानंतर उत्तर पूर्वेकडील सीमेच्या संरक्षणाकडे लक्ष दिले. वारसा हक्काच्या युध्दामुळे निर्माण झालेला गोंधळाचा फायदा घेऊन आसाम व कुचबिहारच्या अहोम शासकांनी स्वतंत्र होण्याचे ठरविले. कुचबिहारचा शासक प्रेमनारायण याने शेजारचा काही मोगल प्रदेश ताब्यात घेण्याच्या दृष्टीने हालचाल केली. इ.स. १६५८ मध्ये त्याच्या सैन्याने आसामची राजधानी गोहाटी ताब्यात घेऊन प्रचंड लूट केली. तेव्हा प्रेमनाराणचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेबाने मीरजुमलाची बंगालच्या सुभेदारपदी नेमणूक केली. परंतु विशेष काही साध्य न होताच इ.स. १६६३ मध्ये मीरजुमलाचा मृत्यु झाला.

 

२.      शाहिस्तखान व छतगावचा विजय:

 मीरजुमलाचा मृत्युनंतर औरंगजेबाने त्याचा मामा शाहिस्तेखानची नेमणूक बंगालच्या राज्यपालपदी केली. इ.स. १६६५ मध्ये आरकानच्या राजाचा पराभव करुन आसामच्या बाह्य ठाण्यांवर कब्जा केला. इ.स. १६६६ च्या जानेवारी मध्ये त्याने छतगाव ताब्यात घेऊन त्याचे 'इस्लामाबाद’ असे नामकरण आणि अहोम राजे यांच्यातील संघर्ष अनेक वर्ष चालू होता. शेवटी इ.स. १६८१-८२ मध्ये अहोम शासकांनी सम्राटाशी तह केला. केले.

 

३.      पोर्तुगीजांचा बंदोबस्त :

भारताच्या पूर्व किनाऱ्यावर बंगाल प्रातांत पार्तुगीजांनी फार उच्छाद मांडला होता. बंगाल प्रांतातील लोकांना ते पकडत. त्यांना बाटवत व गुलाम म्हणून विकत. शाहिस्ताखानने या पोर्तुगीज चाच्यांविरुध्द सागरी मोहिम काढून त्यांचा पराभव केला. त्याने छतगाव हे मोगल लष्कराचे मुख्य ठाणे करुन पोर्तुगीज चाच्यांची पाळेमुळे खणून काढली. व हजारो बंगाली शेतकरी गुलांमाची पोर्तुगीज चाच्यांच्या तावडीतून मुक्तता केली.

 

४.     वायव्य सरहद धोरण :

वायव्य सरहद्दीवरील भटक्या पठाण टोळ्या दिल्लीच्या राज्यकर्त्यांकरिता एक कायमस्वरुपी डोकेदुखी होती. हा प्रदेश डोंगराळ असल्यामुळे हे टोळीवाले आसपासच्या प्रदेशात सदैव जाळपोळ, लुटालुट व कत्तल करुन आपला उदरनिर्वाह करीत असत. या टोळ्यापैंकी खटक आफ्रीडी व युसुफजाई या जाती विशेष कडव्या होत्या. दिल्ली आणि काबुलचा मार्ग सुरक्षित ठेवण्याकरीता मोगल सम्राटांची त्यांना पैसे देण्यास सुरुवात केली. इ.स. १६६७ मध्ये युसुफजाई टोळीप्रमुखाने मुघलांच्या पेशावर, अटक व हजारा जिल्ह्यात लुटालुट करुन धुमाकुळ घातला होता. औरंगजेबाने अमीनखानास ससैन्य घेऊन पाठविले. अमीनखानने युसुफजाई टोळीत इतकी दहशत निर्माण केली की बराच काळपर्यंत त्यांनी डोके वर काढले नाही. पूढे आफ्रीडी टोळीप्रमुख अकमलखानने बंड करुन सुभेदार अमीनखानास पकडले. बरेच द्रव्य घेतल्यानंतर त्यास सोडण्यात आले. शेवटी स्वतः औरंगजेब टोळीवाल्यांचा बंदोबस्तासाठी आला. त्याने कारस्थान, फंदफितुरी व पैसा चारुन टोळीवाल्यांशी समेट केला. अमीनखानच्या प्रयत्नामुळे टोळीवाले शेवटी शरण आले. इ.स. १६७५ पर्यंत औरंगजेब वायव्य सरहद्दीवर शांतता निर्माण करु शकला परंतु टोळीवाल्यांचा बिमोड करण्यात राज्याची अपार संपत्ती व प्राणहानी झाली.

============================================


Featured Post

🌟Practicals- इतिहास-भारताची राष्ट्रीय चळवळ (१९२० ते १९४७) History- Indian National Movement

  🌟 इतिहास विषय P ractical प्रॅक्टिकल  - परीक्षेचे स्वरूप :•    •             इतिहास विषय घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना practical / प्...

Popular Posts