Sunday, 28 August 2022

K. मोगल साम्राज्याच्या पतनाची कारणे

K. मोगल साम्राज्याच्या पतनाची कारणे

 

मोगल साम्राज्याचे विघटन औरंगजेबाच्या कारकिर्दीतच सुरू झाले होते. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर झालेले मोगल सम्राट दुर्बल निघाले. त्यांनी साम्राज्य टिकविण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही. नादीरशहा आणि अहमदशहा अब्दाली यांच्या आक्रमणामुळे मोगलांची प्रतिष्ठा नष्ट झाली. त्याचे परिणाम जवळपास एका शतकात साम्राज्याचे अनेक तुकडे झाले. एवढया मोठया विशाल मोगल साम्राज्याचे पतनाचे प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे

 

१.      वारसा नियम नाही

सत्तारूढ सम्राटानंतर कोणी सिंहासनावर बसावे याबद्दल नियम नव्हता. त्यामुळे सम्राटाच्या मृत्यूनंतर शहाजदामध्ये सत्तेसाठी युध्द होत असे. त्यांचा निर्णय तलवारीच्या जोरावर होत असे. अशा वारसा युध्दामुळे मोगलांची शक्ती कमकुवत होत गेली. शहाजहान व औरंगजेबाने सत्तेसाठी आपल्या सर्व भावांना व प्रतिस्पध्र्थ्यांना ठार केले. होते. अशा युध्दामुळे राज्याचे प्रचंड नुकसान होत गेले व राज्यात असंतोष निर्माण होत झाला. इतर राजपूत्र व त्यांचा सहकारी वर्ग असंतुष्ट बनला. अशा असंतोषाच्या काळात मोगल साम्राज्य कमकुवत झाले.

 

२.      औरंगजेब जबाबदार

मोगल साम्राज्याच्या पतनास औरंगजेब सर्वाधिक जबाबदार आहे असे अनेक इतिहासकारांचे मत आहे. औरंगजेबाच्या कट्टर धार्मिकधोरणामुळे बहुसंख्य हिंदू प्रजा मोगल साम्राज्याच्या विरोधी बनली. साम्राज्यात ठिकठिकाणी बंडे मोगल साम्राज्याचे आधारस्तंभ असलेल्या राजपुतांच्या विरोधात सुरू झाली. औरंगजेब गेला. अजितसिंह व दुर्गादास राठोड याच्या नेतृत्वाखाली तीस वर्ष स्वातंत्र्य लढा दिला. या राजपूत लढयाचे मोगल साम्राज्यावर वाईट परिणाम झाले. तसेच औरंगजेबाची दक्षिण स्वारी ही त्याची फारमोठी चुक होती. कडव्या औरंगजेबाने विजापूर व गोवळकोंडा हि शिया राज्ये जिंकून घेतल्यानंतर त्यांनी आपले लक्ष मराठ्यांकडे वळविले. परंतु औरंगजेब मरेपर्यंत मराठ्यांना जिंकू शकला नाही. दीर्घकाळ चाललेल्या या युध्दामुळे राज्याचा खजिना रिकामा झाला.. मोठया प्रमाणात शक्ती खर्च झाली. उत्तरेकडील राज्यांकडे कमालीचे दुर्लक्ष झाले. परिणामी साम्राज्यात ठिकठिकाणी बंडे होऊन मोगल साम्राज्य कमकुवत झाले. त्याचप्रमाणे औरंगजेबाचा स्वभाव संशयी, कपटी साधनांचा अभाव व विश्वासघातकी असल्यामुळे त्याचा कोणावरी विश्वास नव्हता. औरंगजेबाने आपल्या मुलांना जवळ ठेवले नाही त्यामुळे त्यांना राज्यकारभाराचे चांगले प्रशिक्षण मिळाले नसल्यामुळे एवढया मोठया साम्राज्याचा गाडा चालविण्यास असमर्थ ठरले.

 

३.      औरंगजेबानंतर दुर्बल वारस

औरंगजेबानंतर आलेले सम्राट पराक्रमी नव्हते. बहादूरशहा प्रथम ते बहादूरशाह द्वितीय पर्यंत पदारूढ झालेले मोगल सम्राट दुर्बल, दुराचारी होते. बहादुरशहा पहिला वयाच्या ६२ व्या वर्षी सम्राट बनला. उतारवयात सम्राट बनल्यानंतर त्याचे नातू सम्राटाची स्वप्ने पाहू लागली. अशा परिस्थितीत सरदारांचे वर्चस्व वाढले त्यामुळे मोगल सम्राट महत्वाकांक्षी सरदारांच्या ताब्यात जाऊन हे सम्राट केवळ त्यांच्या हातातील बाहुले बनले.

 

४.     मोगल सैन्याची दुर्बलता

 मनसबदार पध्दतीमुळे सैन्यात अनेक दोष निर्माण झाले. प्रत्येक सैनिक सम्राटाला जबाबदार नसून आपल्या मनसबदार मालकास एकनिष्ठ असे. त्यामुळे दुर्बल सम्राट सत्तेवर येताच मनसबदार बंड पुकारीत. त्यामुळे साम्राज्याची सैन्य शक्ती दुर्बल बनत असे. शिवाय मनसबदारात एकमेकांबद्दल मत्सर व हेवेदावे होते. आपल्या प्रतिस्पर्धी मनसबदारास अपयश यावे म्हणून ते शत्रूला मदत करण्यास तयार असत. तसेच मोगलांकडे उच्च दर्जाचे कार्यक्षम आरमार नव्हते. सैन्यात शिस्त नव्हती सैनिकांना युध्दाचे अद्यावत शिक्षण दिले नाही.

 

५.     मोगल सरदारांचे नैतिक पतन

मोगल भारतात आले तेव्हा मोगल सरदार प्रभावशाली, पराक्रमी व प्रामाणिक होते. परंतु औरंगजेब नंतरच्या कारकिर्दीत ते विलासी, व्यसनी, आळसी व चरित्र्यहीन बनले होते. त्यामुळे त्यांच्यातील बौध्दीक शक्तीचा -हास झाला होता सरदारांचे वारसही दुर्बल व कर्तव्यशून्य निघाल्यामुळे ते मोगल साम्राज्याचे संरक्षण करू शकले नाही. मोगल साम्राज्यातील काही प्रांताचे सरदार महत्वाकांक्षी होते. त्यांनी आपली शक्ती वाढविली व कालांतराने ते सम्राटाला डोईजड झाले. अनेक कारस्थानी व महत्वाकांक्षी सरदारांनी स्वतंत्र राज्याची स्थापना केली. त्यामुळे मोगल साम्राज्याचे विघटन होऊ लागले.

 

६.      मोगल दरबारातील गटबाजी

मोगल सम्राटांच्या दरबारातील मुसलमानात अनेक गट होते. शियापंथी इराणी, पर्शियन व सुन्नीपंथी तुराणी, मध्य आशियन हे दोन गट विशेष प्रभावी होते. याशिवाय अरब, हबशी, रूमी, फिरंगी वगैरे लहान लहान गटही होते. उत्तरकालीन मोगल काळात सरदारांमध्ये वैयक्तीक स्वार्थामुळे कटकारस्थाने व गटबाजीला उधाण आले होते. या गटांमध्ये संघर्ष होऊन मोगल सत्ता दुर्बल बनली.

 

७.     आर्थिक संकट

एडवर्डच्या मतानुसार मोगल साम्राज्याची आर्थिक दुर्बलता हेच साम्राज्याच्या पतनाचे प्रमुख कारण होय. अकबराने समतोल अर्थव्यवस्था स्थापन केली. पण नंतरच्या काळात प्रजेवरील कराचे ओझे वाढत गेले. शहाजहानच्या काळात प्रचंड बांधकामावर पैसा खर्च झाला. औरंगजेबाच्या कट्टर धार्मिक धोरणामुळे प्रजा विरोधात गेली त्यासाठी त्याला प्रचंड सैन्य व पैसा खर्च करावा लागला. औरंगजेबाची दक्षिणेकडील स्वारी दीर्घकाळ चालल्यामुळे राज्याचा खजिना रिकामा झाला. औरंगजेब नंतरचे उत्तराधिकारी विलासी व ऐषआरामाने राहू लागले. त्यातच नादिरशहा व अहमदशहा अब्दालीच्या आक्रमणाने कोटयावधी रूपयाची आर्थिक लूट स्वदेशी नेली. त्यामुळे मोगल साम्राज्याची आर्थिक अवस्था अतिशय गंभीर बनली. आलमगीर द्वितीयच्या कारकिर्दीत अर्थव्यवस्था संपूर्ण कोलमडूनपडली. प्रचंड आर्थिक संकट निर्माण झाले. अशा परिस्थितीत मोगल साम्राज्य तग धरणे शक्य नव्हते.

 

८.      दळणवळणाच्या साधनांचा अभाव

औरंगजेबाने दक्षिण भारत जिंकल्यानंतर मोगल साम्राज्याचा प्रचंड विस्तार झाला. परंतु अशा विशाल साम्राज्यावर दळणवळणाच्या पुरेशा व जलद साधनांअभावी संपूर्ण साम्राज्यावर नियंत्रण ठेवणे अशक्य झाले. साम्राज्यात एखाद्या ठिकाणी बंड झाल्यास त्याची बातमी दिल्ली पर्यंत पोहचण्यास व त्यानंतर त्यांचा बंदोबस्त करण्यास बराच कालावधी निघून जात असे. यामुळे प्रशासन शिथिल होऊन या बंडखोरांमुळे मोगल साम्राज्याचे अनेक तुकडे झाले.

 

९.      सुभेदारांची स्वतंत्र होण्याची इच्छा

मोगलांचे विशाल साम्राज्य अनेक प्रांतात विभाजन झाले होते. या प्रांताचा प्रमुख सुभेदार असे. तो सम्राटाचा प्रतिनिधी म्हणून प्रांताचा राज्यकारभार पहात असे. औरंगजेबापर्यंत मोगल सम्राटांचा सर्व सुभेदारावर वचक होता परंतु औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगल साम्राज्य दुर्बल बनल्यानंतर प्रांतीय सुभेदार स्वतंत्र होण्याचा विचार करू लागले. आणि त्यातून महत्वाकांक्षी सुभेदार स्वतंत्र झाले. दक्षिण भारतातील सहा सुभ्यांवर सुभेदार निजाम उल मुल्क आसफजा याने हैद्राबादच्या निजामशाहीची स्थापना केली. बंगाल, बिहार व ओरीसा या प्रदेशावर अलीवर्धीखानची सत्ता स्थापन झाली. सादतखन बुऱ्हाण उल मुल्क याने आयोध्या प्रांतात आपल्या वंशाची स्थापना केली. राजपूत, मराठे, बुंदले, शिख, जाट वगैरे स्वतंत्र झाले त्यामुळे मोगल साम्राज्य लयास गेले.

 

१०.   राष्ट्रीय एकात्मतेचा अभाव

मोगल सम्राटांनी भारतात इस्लामी - राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रयत्न केला नाही. त्यामुळे भारतीय प्रजा मोगलांना परकीय समजत असल्यामुळे मोगलसाम्राज्य भारतीय जनतेत लोकप्रिय होऊ शकले नाही. मोगलांनी इस्लामला राजधर्म आणि फारशीला राजभाषा म्हणून मान्यता दिल्याबद्दल बहुसंख्य हिंदू प्रजेला त्यांच्याबद्दल कधीही आपलेपणा वाटला नाही. सम्राट अकबराने हिंदू आणि मुस्लिम यांच्यात सामाजिक व धार्मिक समन्वय साधण्याचा प्रयत्न केला परंतु नंतर कोणत्याही सम्राटाने असा प्रयत्न केला नाही. त्यांनी लोककल्याणाकडे दुर्लक्ष केले त्यामुळे लोकांमध्ये मोगलांबद्दल कधीही आपुलकी निर्माणझाली नाही. अशा राष्ट्रीय एकात्मतेच्या अभावामुळे मोगल साम्राज्य लयास गेले.

 

११.   परकीय आक्रमण

 औरंगजेबानंतर मोगल साम्राज्य कमकुवत झाले अशा परिस्थितीत अफगाणिस्थानातून नादीरशहा व अहमदशहा अब्दालीने मोगल साम्राज्यावर स्वाऱ्या करून कोटयावधी रूपयाची लूट स्वदेशी नेली. या स्वाऱ्यांमुळे मोगल साम्राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळाली. या संधीचा फायदा इंग्रजांनी उचलला आणि भारतीय राजकारणात हस्तक्षेप सुरू केला. भारतातील वेगवेगळया सत्तांच्या संघर्षात भाग घेतला तर काही सत्ताधिशांना मदत केली आणि त्यांनी नंतर आपली स्वतंत्र सत्ता बंगालमध्ये स्थापन केली. नंतर संपूर्ण भारतात साम्राज्यविस्तार करून मोगल सम्राटास पदच्युत करून त्यांना पेन्शन सुरू केली.

=========================================


No comments:

Post a Comment

Featured Post

previous year question papers

http://www.unipune.ac.in/university_files/old_papers.htm

Popular Posts