Sunday, 28 August 2022

अ. मनसबदारी पद्धत : लष्करी प्रशासन

 अ.             मनसबदारी पद्धत : लष्करी प्रशासन

 

प्रस्तावना :

मुघल सम्राट बाबर आणि हुमायून यांच्या प्रशासन सैन्यात मुघल, तुर्क उझबेग, पर्शियन आणि अफगाण लोकांची भरती केली होती. त्यांना वेतनाऐवजी जमिनी वतन, जहागिरी देण्याची सुरू केली. जहागीरदार स्वतःचे सैन्य निर्माण करू लागले. वेळ प्रसंगी ते केंद्रीय सत्तेविरुद्ध बंड करीत होते. अकबराच्या काळात जहागीदार वर्ग स्वैराचारी बनून स्वतंत्रपणे वागू लागला. म्हणून मुघल साम्राज्याला स्थैर्य प्राप्त करण्यासाठी अकबराने जी नवीन लष्करी व्यवस्था निर्माण केली तीच मनसबदारी पद्धत होय. मनसबदारीचे योग्य पद्धतीने वर्गीकरण करून अधिकाऱ्यांची श्रेणिबद्ध रचना केली. असे असले तरी मनसबदारी पद्धतीत काही गुण-दोष होते. त्याची माहिती थोडक्यात पुढील प्रमाणे :

 

१.      मनसबदारीचा उदय :

मनसबदारीचा मूळ उदय तुर्की लष्करी संघटनात दिसून येतो. त्यांनी लष्करामध्ये मनोऱ्यासारखी लष्करी अधिकारी व सैन्याची रचना केली. दिल्लीच्या सुलतानांनी तुर्कांकडून मनसबदारीचा वारसा घेतला. सुलतानाच्या मनसबदारीत दोष होता. तो म्हणजे मनसबदारीतील श्रेणिबद्ध रचनेतील खालचा अधिकारी वरच्या अधिकाऱ्याशी एकनिष्ठ राही. त्याचा सुलतानाशी काहीही संबंध नसे. हा दोष अकबराने दूर करीत पूर्वीच्या मनोऱ्याप्रमाणेच श्रेणिबद्ध रचना केली पण खालच्या श्रेणीतील अधिकारी हा वरच्या श्रेणीतील अधिकाऱ्याशी एकनिष्ठ न ठेवता त्याचा प्रत्यक्ष सम्राटाशीच संबंध ठेवला. असा मनसबदारीत बदल करून अकबराने इ.स. 1570 मध्ये नव्याने मनसबदारी पद्धत सुरू केली. 'मनसब' हा शब्द 'मनसिब' या अरबी भाषेतील शब्दावरून आलेला आहे. 'मनसब' शब्दाचा अर्थ पद, हुद्दा, श्रेणी, दर्जा असा आहे. अशी ही मनसबदारी पद्धत अकबराने आपल्या मुलकी व लष्करी व्यवस्थेत सुरू केली.

 

२.      मनसबदारांची श्रेणी :

·       अकबराच्या काळात मनसबदारांची 'मनसबदार', 'उमरा व 'उमरा-ए-आझम' अशा तीन श्रेणीत विभागणी केली होती.

10 ते 400 पर्यंतच्या हुद्देदार

'मनसबदार'

500 पासून 2,500 पर्यंत

'उमरा',

3,000 च्यावर

'उमरा-ए-आझम

 

साधारणपणे 10 ते 400 पर्यंतच्या हुद्देदार 'मनसबदार', 500 पासून 2,500 पर्यंतच्या हुद्देदारांना 'उमरा', 3,000 च्यावर असणाऱ्या हुद्देदारांना 'उमरा-ए-आझम असे म्हणत. सर्वांत कनिष्ठ हुद्दा 10 स्वारांचा तर सर्वांत वरिष्ठ हुद्दा 10,000 स्वारांचा होता. दसहजारी मनसबदार असाही त्याचा उल्लेख होत असे. प्रारंभी 5 हजार स्वारांची मनसबदारी ही फक्त राजकुटुंबापुरतीच मर्यादित होती पण नंतर मात्र 5 वरून 7 हजार झाली. अकबराने अनेक राजपूत सरदारांना 7 हजाराची मनसबदारी दिलेली होती.

·       'झात' आणि 'सवार’: अकबर

मनसबदारी पद्धतीत अकबराने 'झात' आणि 'सवार असे दोन हुद्दे तयार केले होते. मनसबदाराचा हुद्दा आणि त्याच्याकडे असणारे प्रत्यक्ष सैन्य यामध्ये तफावत जाणवत होती. पाच हजारी मनसबदार असेल तर त्याच्याकडे प्रत्यक्ष तीन हजार सैन्य असत. हा फरक दाखविण्यासाठीच 'झात' आणि 'सवार' हे हुद्दे तयार केले होते. झात हा वैयक्तिक हुद्दा असून त्याचा शासनयंत्रणेमधील मनसबदाराचा निश्चित दर्जा समजत होता. या हुद्द्याच्या आधारावरच प्रमाण निश्चित केले होते. सवार या हुद्देदारामुळे त्या अधिकाऱ्याच्या हाताखाली नेमके किती प्रत्यक्ष सैनिक होते त्याची माहिती मिळत होती. नंतर मशरून हा नवीन हुद्दा निर्माण झाला. एखाद्या ठिकाणी नेमणूक झालेल्या मनसबदाराला त्याच्याकडे असणाऱ्या सैन्यापेक्षा त्याला अधिक सैन्य नेमावे लागत होते. अशा मनसबदाराला हा नवीन हुद्दा देण्यात आला.

 

·       दु-अस्पा, सिंह-अस्पा, निम-अस्पा-जहांगीर :

जहांगीरच्या काळात दु-अस्पा, सिंह-अस्पा, निम-अस्पा असे तीन हुद्दे होते. ज्याच्या जवळ एक जादा घोडा आहे त्यास दु-अस्पा, ज्याच्या जवळ दोन जादा घोडे आहेत त्याला सिंह-अस्पा तर दोन स्वारांमध्ये एक जादा घोडा त्याला निम-अस्पा असे हुद्दे मिळाले होते.

 

३.      मनसबदारांची नेमणूक पद्धत:

 मनसबदारांची नेमणूक स्वतः सम्राट करीत असत, तर दिवाण, बक्षी यांच्या सही-शिक्क्याचे मनसबदाराला नेमणुकीचे पत्र मिळत होते. सम्राटाचा जन्मदिन किंवा विशेष समारंभ यांच्या निमित्ताने मनसबदाराला बढती दिली जात होती.

 

४. चेहरा व डाग पद्धत 

·       सुलतानशाहीतील अल्लाउद्दीन खिलजीप्रमाणे अकबरानेदेखील चेहरा आणि डाग पद्धत सुरू केली होती. प्रत्येक शिपायाचे हजेरीपत्रकावर त्याच्या शरीरावरील विशेष खुणांचेवर्णन व चेहऱ्यावरील वैशिष्ट्यांचे वर्णन यांची नोंद केली जात असे. यास चेहरा पद्धत म्हणत.

·       तर सैन्यातील घोड्यांच्या उजव्या मांडीवर मध्यवर्ती सरकारचा व डाव्या मांडीवर मनसबदाराचा शिक्का मारला जात होता. यास 'डाग पद्धत' असे म्हणत.

·       मनसबदाराची किंवा शिपायांची भरती करताना त्याला सरकारपुढे एक जामीन द्यावा लागे. जर मनसबदाराकडून सरकारचे काही नुकसान झाले आणि जर तो नुकसानभरपाई भरण्यास असमर्थ असेल तर त्याने दिलेल्या जमीनदाराकडून नुकसानभरपाई वसूल केली जात होती.  त्यामुळे जामीनदारदेखील सरकारशी बांधील होते.

 

५.      मनसबदाराचे वेतन :

मनसबदारांमध्ये नकदी मनसबदार व जहागीरदार असे दोन प्रकार होते. नकदी मनसबदारांना त्यांचे वेतन रोख स्वरूपात मिळत असे. तर जहागीरदारांना मात्र रोख वेतनाऐवजी जहागिरीच्या स्वरूपातून वतन मिळत होते.

जहागीरदार हा समाजात प्रतिष्ठित मनसबदार होता. त्याच्यावर महसूल कर, पट्ट्या यांचे उत्पन्न गोळा करण्याची जबाबदारी दिलेली होती. या कामासाठी त्याला आमील, अमीन, पोतदार व कारकून हे अधिकारी मदत करीत होते. जमा झालेल्या महसुलातील काही हिस्सा जहागीरदार स्वतःसाठी ठेवत व बाकीचा सरकारमध्ये भरत असत. जहागिरी पद्धतीमध्ये जहागीरदार सरकारला डोईजोड होऊ नयेत म्हणून त्यांच्यावर विशेषतः महसूल वसुलीबाबत सरकारमध्ये कानुंगो तर परगण्यामध्ये चौधरी हे दोन अधिकारी ठेवलेले होते. कोणत्याही मनसबदाराने काही गैरवर्तन केले तर चौकशी होऊन त्याला शिक्षा देण्याचे धोरण निश्चित केले होते.

 

६.      मुघल सैन्याचे प्रकार :

·       सैन्यात पायदळ, घोडदळ, हत्तीदल व तोफखाना असे चार भाग होते. लढाईच्या प्रसंगी तर पायदळ महत्त्वाचे होतेच पण त्याशिवाय कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठीही पायदळाचा वापर केला जात होता.

·       मुघल सम्राटाची सर्वांत जास्त भिस्त घोडदळावर होती. अकबराच्या सैन्यात 3 ते 4 लाख घोडदळ होते. त्याच घोडदळाच्या बळावर अकबराचे आशिया खंडातील सर्वांत बलाढ्य साम्राज्य म्हणून ओळखले जात होते. घोडदळाच्या रचनेत आणि व्यवस्थेत शिस्त राखण्यासाठी काही कठोर नियमांची अंमलबजावणी केली होती. जे घोडेस्वार शासनाकडून भरती केले जात, त्यांना घोडा आणि शस्त्रास्त्रही शासनाकडून मिळत असत. अशा घोडेस्वारांना 'बारगीर' म्हणत होते. मनसबदारांना मात्र स्वतःचे घोडेस्वार निर्माण करावे लागत होते. घोड्यांना डाग देण्याची प्रथा असल्याने घोड्यांची अदलाबदल होत नव्हती.

·       तोफखाना विभागाचा प्रमुख 'मीर-ए-अतिश' हा अधिकारी होता. मोठ्या व लांब पल्ल्याच्या तोफा आणि त्या अधिक संहारक कशा निर्माण होतील याकडे स्वतः अकबराचे लक्ष होते. तोफा ओढण्यासाठी हत्ती, उंट आणि बैलाचा वापर करीत होते. याशिवाय बंदुकधारी सैनिकही होते. लष्कराचे साहित्य वाहून नेण्यासाठी हत्तीदळाचा वापर केला. मुघल काळात आरमार दल अस्तित्वात होते.

 

७.     मनसबदारी पद्धतीचे गुण :

1. मनसबदारी पद्धतीमुळे मुघल साम्राज्याचे लष्करी सामर्थ्य वाढले होते.

2. पूर्वीची मनसबदारी पद्धतीमुळे जहागीरदारी पद्धत नष्ट झाली.

3. मनसबदारी पद्धतीमध्ये कोणतेही पद वंशपरंपरागत नव्हते. प्रत्येक मनसबदाराला आपले पद टिकविण्यासाठी, पदोन्नतीसाठी पराक्रमाची शर्थ व सम्राटाची मर्जी संपादन करून राहावे लागत होते.

4. मनसबदार हा प्रत्यक्ष सम्राटास जबाबदार असल्याने सेनाधिकाऱ्याकडून उठाव किंवा बंड होण्याची शक्यता नव्हती.

5. अकबर काळात मनसबदारी पद्धत ही अत्यंत कार्यक्षम असल्यामुळे त्यांचे दिल्याने साम्राज्य स्थिर व बळकट आणि सामर्थ्यशाली बनण्यास मदत झाली.

 

८.      मनसबदारी पद्धतीचे दोष :

१.      अकबरानंतर मात्र मनसबदारी पद्धतीत अनेक दोष निर्माण झाले. मनसबदारांना नेमून दिलेल्या सैन्यापेक्षा त्यांनी कमी सैन्य नेमले. सरकारकडून मात्र अधिक सैन्याचे वेतन घेतले. त्यामुळे सैन्य संख्येत भ्रष्टाचार झाला.

२.      मनसबदारांनी आपल्या नियंत्रणाखालील शिपायांना कमी वेतन

दिले, त्यामुळे शिपायांकडील लढाऊ वृत्तीचे मनोबल कमी होऊ लागले होते.

३.      मनसबदारी पद्धतीत वंशपरंपरागत पद्धत नसल्यामुळे ते विलासी जीवन जगत होते. अशा मनसबदारांकडून शूरवीर, तरुणांची भरती होण्याऐवजी बाजार बुणग्यांची भरती होऊ लागली. परिणामी मुघल सैन्य दुर्बल झाले.

४.      मनसबदारी पद्धतीत शेवटचा मनसबदार हा प्रत्यक्ष सम्राटाशी संबंधित असला तरी त्याचे वेतन मात्र सम्राटाशी संबंधित नसून वरच्या अधिकाऱ्याशी निगडित होते. त्यामुळे त्याच्या निष्ठा मनसबदाराप्रती निर्माण होत बादशहाप्रती नाही.

मनसबदारी पद्धतीत अनेक गुण-दोष होते. तरीही त्या वेळच्या परिस्थितीत ती एक चांगली पद्धती ठरली होती. मुघल साम्राज्यातील अधिकारी वर्गाला यामुळे भक्कम लष्करी यंत्रणेची ताकद मिळाली होती. मनसबदारी ही जहागिरी प्रथेपेक्षा काही प्रमाणात बरी होती, याच पद्धतीने लष्करी शक्तीचे केंद्रीकरण झाले. मोठ्या प्रमाणात लष्कर उभारणीसाठी त्याचा निश्चितच फायदा झाला.


No comments:

Post a Comment

Featured Post

previous year question papers

http://www.unipune.ac.in/university_files/old_papers.htm

Popular Posts