I. औरंगजेबाचे धार्मिक धोरण
पहिली बाजू :
· औरंगजेब कट्टर सुन्नीपंथी होता. इस्लामवर त्याची प्रगाढ श्रध्दा होती. त्याने इस्लामला राजधर्म म्हणून मान्यता दिली. त्यास भारताचे परिवर्तन दारुल हर्ब (काफिरांचा देश) मधून दारुल इस्लाम (इस्लामांचा देश) मध्ये करावयाचे होते. जहांगीरचा भोगविलास आणि शहाजहानचा थाटमाट यापासून औरंगजेब शेकडो योजने दूर होता. त्याची राहाणी अत्यंत साधी होती. धर्मप्रसाराकरीता आपणास ईश्वराने या जगात पाठविले आहे अशी त्याची समजूत होती. स्वधर्माचा प्रसार करण्याकरिता त्याने हिंदूविरुध्द जिहाहादची घोषणा केली. हिंदूचे नागरिकत्वाचे अधिकार त्याच्या राजवटीत काढून घेण्यात आले. हिंदु धर्म व संस्कृती नष्ट करण्याचा त्याने जणू काही चंगच बांधला होता. अहमदाबादच्या सुप्रसिध्द चिंतामणी मंदिरात गोवध करण्यात येऊन मंदिराचे परिवर्तन त्याने मशिदीत केले. प्रांताधिकाऱ्यांना अशा सक्त आज्ञा सोडल्या की, त्यांच्या प्रदेशात जेवढी हिंदू देवालये असतील तेवढी नष्ट करण्यात यावीत सम्राटाच्या आज्ञेवरुन शेकडो वर्षापासून उभी असलेली हिंदूची बनारसचे विश्वनाथ, मथुराचे केशवदेव व पाटणाचे सोमनाथ इ. प्रसिध्द मंदिरे भुईसपाट केली.
· शासनव्येवस्थेचेही त्याने इस्लामीकरण करण्याचे ठरविले. त्यांच्या कारकिर्दीत सरकारी नोकऱ्या मिळणे दुरापास्त झाले. हिंदूनी इस्लाम धर्म स्विकारावा याकरिता नानातऱ्हेची प्रलोभने उदा. जहागीर, बक्षीस, पैसा व उच्च पदे इ. देत असे.
१२ एप्रिल १६७९ रोजी औरंगजेबाने काढलेल्या हुकुमानुसार स्त्रिया, मुले व भिकारी इत्यांदीना सोडल्यास अन्य सर्व हिंदूकडून सक्तीने जिझिया कर घेतला जाऊ लागला. हिंदूना प्रयाग येथे स्नान करण्यासाठी ज्यादा कर द्यावा लागत. तिर्थक्षेत्रांवर हिंदूकडून असाच कर घेतला जाऊ लागला. सम्राटाने मुसलमान व्यापाऱ्यांकडून जकात घेणे बंद केले. पण हिंदू व्यापाऱ्यांकडून मात्र ५१% जकात घेतली जाई.
इ.स. १६६५ मध्ये राजपूत सोडून अन्य हिंदूना हत्ती घोडयावर बसणे, पालखी व शास्त्रास्त्रे वापरणे इ. गोष्टी बंद करण्यात आल्या. हिंदूच्या उत्सव व मेळ्यांवर बंदी घालण्यात आली. हिंदूना सार्वजनिकरित्या कोणताही सण साजरा करणे त्याच्या धर्मांध राजवटीत अशक्य होते.
मासिरे आलमगिरीचा लेखक आणि औरंगजेबाचा चिटणीस साकी मुस्तैदखान लिहितो. बादशहाच्या काळात हिंदूची जितकी विटंबना झाली तितकी यापूर्वी कधीच झाली नाही.
एकंदरीत सम्राटाच्या या कट्टर धार्मिक धोरणाचा परिणाम मोगल साम्राज्यावर भयानक झाला. या धोरणामुळे त्याच्या बहुसंख्य हिंदू प्रजेत त्याच्याबद्दल तीव्र घृणा उत्पन्न झाली. सर्व साम्राज्यात बंडाचा वणवा पेटला. शीख, बुंदले, जाट, सतनामी, राजपूत व मराठे इ. त्याच्याविरुध्द गेले. संपूर्ण भारत देश त्याच्या अतिरेकी धर्मवेडेपणामुळे पेटला. ही बंडे मोडण्याकरिता त्याला प्रचंड सैन्य उभारावे लागले. युध्दात त्याचे लक्षावधी सैनिक मारले गेले. सम्राटाच्या धोरणामुळे देशातील शांतता व सुव्यवस्था कोलमडून पडली. मोगल साम्राज्य पूर्णपणे दुर्बल झाले.
दुसरी बाजू : .
बादशहा निश्चितच धार्मिक वृत्तीचा होता. त्याच्या उत्तरायुष्यात तो प्रार्थनेच्या वेळी वापरण्यात येणाऱ्या टोप्या शिवत असे. त्याने कुराण पाठ केले होते. पण त्याचा धर्मविषयक दृष्टिकोन कडवेपणाचा नव्हता. आपल्या प्रदीर्घ आयुष्यात त्याने वारंवार हिन्दू धर्मगुरूंशी सल्लामसलत केली. बैरागी शिवमंगलदास नामक हिन्दू धार्मिक नेत्याबरोबर बादशहा नेहमी चर्चा करीत असे. आणि त्याला अनेकदा इनामे आणि बक्षिसेही देत असे.’ हा उतारा वाचून आपण मोगल सम्राट अकबराविषयी वाचत आहोत असा वाचकाचा गैरसमज होईल. परंतु अविश्वसनीय वाटावे असे सत्य हे आहे, की हे वर्णन औरंगजेबाचे आहे!
· औरंगजेबाचे नाव काढले की जवाहरलाल नेहरूंपासून यच्चयावत सर्व हिन्दूंच्या तळपायाची आग मस्तकात जाते. ‘ही वॉज ट्रु मुस्लिम टु बी अनसक्सेसफुल इंडियन किंग’, असे नेहरूंनी औरंगजेबाच्या राजवटीचे निदान केले होते. अखिल हिन्दुस्तानचा शासनकर्ता म्हणून गौरविला जाण्याइतपत व्यापक आणि विशाल दृष्टिकोन औरंगजेबापाशी नव्हता आणि तो आत्यंतिक धर्मवेडा होता असे नेहरू म्हणतात. नेहरूंसारख्या धर्मनिरपेक्ष समजल्या जाणाऱ्या राष्ट्रनेत्याचे असे मत! मग इतरांचे तर आणखीनच औरंगजेबविरोधी!! परिणामी २०१५ साली दिल्लीतील औरंगजेब रस्त्याचे नाव बदलून त्याला माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात आले.
· ऑड्री ट्रुश्क या अभ्यासक महिलेने या घटनेनंतर औरंगजेबाच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कारकिर्दीचा मूळ फारसी कागदपत्रे, दस्तावेज आणि ग्रंथ वाचून ‘औरंगजेब: द मॅन अँड द मिथ’ हे पुस्तक लिहिले आहे. औरंगजेबाने आपली सुफी परंपरेशी असलेली नाळ कायम ठेवली होती असे ऑड्रीचे प्रतिपादन असून म्हणूनच महाराष्ट्रातील चिश्ती दर्ग्यापाशी त्याचे दफन करण्यात आले असे लेखिकेचे म्हणणे आहे. औरंगजेबाविषयीचे समज, गैरसमज आणि पूर्वग्रह बळावण्यात वसाहतवादी ब्रिटिश इतिहास लेखकांचा फार मोठा सहभाग होता असे लेखिका म्हणते. आपल्या वडिलांना कैदेत टाकले; भावांना ठार मारले याबद्दल त्याच्याविषयी साहजिकच घृणा वाटते. पाकिस्तानी नाटककार शाहिद नईम यांनी तर म्हटले आहे की दारा शुकोहला पराभूत करून औरंगजेबाने सिंहासन बळकावले नसते, तर फाळणी झाली नसती आणि उपखंडाचा इतिहासच बदलला असता. लेखिका त्याच्याशी सहमत नाही.
· त्याने बारा देवळे उध्वस्त केली हे खरे आहे. परंतु त्याने अनेक देवळांना संरक्षणही दिले; वतने दिली.
· ब्राह्मणांना जमीन दिली आणि त्यांचा छळ होणार नाही याची दक्षता घ्या असे आदेशही आपल्या सरदारांना दिले. होळीच्या उत्सवावर त्याने निर्बंध घातले म्हणून टीका करणाऱ्यांना लेखिका सांगू इच्छिते की त्याने मोहरम आणि ईदवरही निर्बंध घातले.
· शरीरस्वास्थ्य आणि आहार/उपचारपद्धती याबाबत तो हिन्दू हठयोग्याचा सल्ला घेत असे. प्रशासनात त्याने महत्त्वाच्या जागांवर अनेक हिन्दू सरदारांची नेमणूक केली होती.
· १६८१पासून त्याने आपला कारभार दक्षिणेत दख्खनमध्ये हलविला आणि तिथेच त्याचा १७०७ साली अंत झाला. औरंगजेब या विशेषनामाचे त्याच्या मृत्यूनंतर विशेषण बनत गेले. क्रूर, धर्मांध, अरसिक आणि कलाद्वेष्टा म्हणजे औरंगजेब असे समीकरण बनले. ते तथ्याला धरून अथवा इतिहासाशी सुसंगत नाही हे लेखिकेने तपशीलवार पुराव्यासकट मांडले आहे.
· तरुणपणी तो संगीतप्रेमी होता आणि हिराबाई झैनाबादी या गायिकेबरोबर त्याचे प्रेमसंबंध होते. त्याच्या शासनकालात संगीतावरील अनेक महत्त्वाच्या ग्रंथांची रचना झाली आणि त्याच्या अखेरच्या काळात उदयपुरी हा गायक कलाकार सतत त्याच्यासोबत असे. इतका, की हा माझ्या मागोमाग या जगाचा निरोप घेईल असे औरंगजेबाने आपल्या पत्नीला लिहिलेल्या पत्रात म्हटले आणि तसे घडलेही. त्याने जे क्रौर्य दाखविले अथवा त्याच्याकडून जे अत्याचार घडले ते शासनसंस्था चालविण्याच्या जिद्दीमुळे! त्यामागे धार्मिक प्रेरणा होती असा अर्थ काढणे योग्य नाही असे लेखिकेने म्हटले आहे.
=============================================
No comments:
Post a Comment