Friday, 30 September 2022

युनिट २ C.हडप्पा संस्कृतीतील धार्मिक जीवन :

 

C.हडप्पा संस्कृतीतील धार्मिक जीवन :

 

१.पुरुषदेवता:

मोहेंजोदडो येथे एक प्रतिमा सापडली आहे. या प्रतिमेवर एक देवता आहे. या देवतेच्या डोक्यावर त्रिशुलाकार मुकुट आहे. ही देवता ध्यानाला बसली आहे. तिच्या आसनाशेजारी हत्ती, वाघ, गेंडा, म्हैस, यांचे चित्र कोरली आहेत. यावरून काही इतिहास संशोधक मॉर्टीम व्हीलर यांनी निष्कर्ष काढला आहे की, ही देवता ‘शिव’ किंवा ‘शंकर’ असावी. कारण सुरुवातीच्या काळात शिवाची पूजा ‘पाशुपती’ रुपात करत होते. तसेच हडप्पा संस्कृतीत शिवलिंगाच्या आकाराचे दगड सापडले आहेत. पण हडप्पा संस्कृतीतील ही देवता ‘शिव’च होती असे ठामपपणे सांगता येत नाही.

2 .मातृदेवता:

एका मुद्रेवर स्त्रीचे चित्र कोरले आहे. या स्त्रीच्या पोटातून झाड उगवण्याचे दृश्य कोरले आहे. याचा संबंध सुफलनाशी(fertility) असावा. ही मातृदेवतेची प्रतिमा असावी. असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. उत्खननात अनेक छोट्या स्त्रीप्रतिमा सापडल्या आहेत. दुसऱ्या एका प्रतिमेवर सात स्त्रीया एका ओळीने उभ्या राहिल्या आहेत. या स्त्रियांच्या डोक्यावर पिंपळाची डहाळी आहे. ही ‘सप्तमातृकां’ची(सती आसरा, सात्यासरा) प्रतिमा असावी. यावरून हडप्पा संस्कृती ही मातृपुजकांची संस्कृती असावी हे लोक सप्तमातृकांच्या रुपात मातृदेवतांची पूजा केली जात होती.  

३.             .प्राणी पूजा:

हडप्पा संस्कृतीच्या उत्खननात वाघ, हत्ती, बैल, गेंडा, हरीण, बोकड, एकशिंग्या (unicorn), इ. प्राण्यांची चित्रे कोरलेले अनेक शिक्यांवर कोरली आहेत. यातील प्राण्यांच्या समोर नैवाद्याचे भांडे आहे. यावरुन या प्राण्यांची पूजा करत असावेत. ‘बैल’ हा प्राणी हडप्पा संस्कृतीत विशेष पूजनीय होता. ही आजच्या ‘बैलपोळा’ सणाची सुरुवात होती. असे मानता येईल. 

४.             झाडांची पूजा:

पिंपळ, वड या झाडांची पूजा करत असावेत. तशा स्वरूपाच्या मुद्रा सापडल्या आहेत. आजही भारतीय संस्कृतीत या झाडांची पूजा केली जाते.

५.             नागपूजा :

नागाची पूजा करत असल्याचे शिक्के सापडले आहेत. यावरून नागपूजा होत असावी. आज भारतात ‘नागपंचमी’ हा सण साजरा केला जातो.

६.             सूर्यपूजा व जलपूजा:

हडप्पा संस्कृतीतील काही शिक्क्यांवर सूर्यपूजा व जलपूजा करत असल्याची चित्रे कोरली आहेत. या निसर्गाच्या देणग्या आहेत. यामुळे मानवी जीवन समृद्ध बनले आहे. याची जाणीव लोकांना असावी. महास्नानगृहाचा वापर जलपुजेसाठी केला जात असावा.

७.            पशुबळी:

या संस्कृतीतील शिक्क्यांवर देवतेच्या पोटातून एक झाड बाहेर उगवलेले दाखवले आहे. त्यामागे एक शेतकरी कोयत्याने एका स्त्रीचा बळी घेत आहे असे कोरले आहे. धन-धान्य वृद्धीसाठी शेतकरी पृथ्वी देवतेला स्त्रीचा बळी देत असावेत.मोहेजोदाडो येथील काही शिक्क्यांवर बकऱ्याचा बळी देत असल्याचे चित्र कोरले आहे. यावरून पशुबळी व नरबळी देत असावे.

८.             अंधश्रद्धा व भूतप्रेत :

ताईत(तावीज), गंडेदोरे, इ. वरून संस्कृतीतील लोकांचा भूतप्रेत इत्यादी अघोरी शक्तींवर विश्वास असावा. जादूटोणा, मंत्र-तंत्र यावरही लोकांची श्रद्धा असावी.

९.             अंत्यसंस्काराची पद्धती:

मृतदेह दफन करणे आणि दहन करणे अशा दोन्ही पद्धती रूढ असाव्यात. काही ठिकाणी मृतदेहाबरोबर भांडी-कुंडी, अलंकार, पुरलेले आहेत. यावरून या लोकांचा मृत्यूनंतरच्या जीवनावर विश्वास होता.

निष्कर्ष :

·      हडप्पातील लोक पुरुषदेवता, मातृदेवता, वृक्षपूजा, प्राणीपूजा, जलपूजा, इ. अनेक देवदेवतांची पूजा करत होते.

·      मात्र विशेष बाब म्हणजे, एकही प्रार्थनास्थळ वा मंदिर सापडत नाही.

·      हडप्पावासीयांच्या  धार्मिक कल्पना या उत्खननात सापडलेल्या अवशेषांच्या(पुरातत्वशास्त्र) आधारे मांडली आहेत. हडप्पातील लिपी वाचता आल्यावर त्याबद्दल अधिक माहिती मिळेल. 

युनिट २ : B. हडप्पा संस्कृतीतील नगररचनेची वैशिष्टे

B. हडप्पा संस्कृतीतील नगररचनेची वैशिष्टे

१. शहरांचे दोन भागात विभाजन :

हडप्पा संस्कृतीतील मोहेंजोदडो, हडप्पा, लोथल, कालीबंगन, अशी जवळजवळ सर्व शहरे दोन भागात विभाजित असल्याचे दिसून येते. या शहरांचे किल्ला (Upper City) व मैदानातील नगररचना (Lower city) अशी दोन भागात विभागणी दिसते. किल्ल्यात प्रशासकीय इमारती आहेत तिथे प्रशाकीय अधिकारी राहत असतील, तर मैदानावर सर्वसामान्य लोकांची घरे असावीत.

गुजरात मधील धोलाविरा शहराचे विभाजन मात्र तीन भागात विभागणी असल्याचे दिसून येते.

२. सांडपाण्याची व्यवस्था(Drainage System-ड्रेनेज सिस्टीम):

‘सांडपाणी वाहून नेण्याची व्यवस्था’ (Drainage System-ड्रेनेज सिस्टीम) हडप्पा संस्कृतीत शहरांमध्ये आढळून आली आहे. समकालीन इतर कोणत्याही संस्कृतीत अशी व्यवस्था अस्तित्वात असल्याचे दिसत नाही. प्रत्येक घरातून सांडपाणी शहरातील मुख्य गटारीला येऊन मिळते. मुख्य गटारीचे पाणी शहराच्या बाहेर नेऊन सोडले आहे. या गटारींचे बांधकाम पक्क्या विटांनी केले आहे. काही ठिकाणी या गटारी दगडी झाकणाने  झाकलेल्या आहेत. काही ठिकाणी गटारीतील अडकलेला कचरा काढण्यासाठी छिद्र ठेवली आहेत. आधुनिक सांडपाणी व्यवस्थेसारखी व्यवस्था असल्याची दिसून येते.

३. सार्वजनिक स्नानगृहे(The Great Public Batharoom):

मोहेंजोदडो येथे एक इमारत आहे. या इमारतीच्या मध्ये एक पाण्याचा छोटा तलाव आहे. तलावाच्या बाजूला छोट्या-छोट्या खोल्या आहेत. संशोधनाच्या मते, ही इमारत ‘सार्वजनिक महास्नानगृह’(The Great Batharoom) आहे. या इमारतीचा वापर धार्मिक विधी साठी करत असावेत. हडप्पा संस्कृतीत स्नानाला धार्मिक महत्व असावे.

४. धान्याची कोठारे: (Grainery)

हडप्पा संस्कृतीतील प्रत्येक शहरात ‘धान्याची कोठारे’ आहेत. या कोठारांचा वापर सरकारने गोळा केलेला महसूल साठवण्यासाठी करत असावेत किंवा व्यापाऱ्यांना धान्य साठवून ठेवण्यासाठी करत असावेत. आजच्या शासकीय कोषागाराप्रमाणे केला जात असावा.

५. काटकोनात छेदणारे रस्ते:

हडप्पा  संस्कृतीतील शहरांमध्ये अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे पक्के रस्ते बनवले आहेत. हे रस्ते विटांचा वापर करून पक्के बनवले आहेत. शहरातील प्रत्येक छोटा रस्ता मोठ्या रस्त्याला काटकोनात छेदतो. त्यामुळे बुद्धिबळाच्या पटासारखी रचना तयार होते. यावरून शहरातील रस्ते अत्यंत नियोजनपूर्वक तयार केल्याचे दिसून येते. तसेच रस्त्यावर दिवाबत्ती व कचराकुंडीची सोय आहे. रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश पडावा व स्वच्छता राहावी हा यामागील हेतू होता. या सर्व बाबीवरून नगरातील प्रशासन उत्कृष्ट असेल असा निष्कर्ष काढू शकतो. 

६. पक्क्या विटांचा वापर:

हडप्पा संस्कृतीत इमारती, रस्ते इ. साठी पक्क्या भाजलेल्या विटांचा वापर केला आहे. समकालीन कोणत्याही संस्कृतीत भाजलेल्या विटा वापरलेल्या नाहीत. काही संस्कृतीत सूर्यप्रकाशात वाळवलेल्या विटा वापरलेल्या आहेत. हडप्पा संस्कृतीत विटांचा वापर प्रचंड प्रमाणात केला आहे. विशेष बाब म्हणजे यातील बहुतांश विटा समान आकाराच्या आहेत.

७. शहरांना तटबंदी:

हडप्पा संस्कृतीतील प्रत्येक शहरांना तटबंदी आहे. तटबंदीच्या बाहेर खंदक खोडले आहेत. शहरात प्रवेश करण्यासाठी प्रवेशद्वार आहेत. प्रवेशद्वारांवर मोठ्या आकृत्या कोरल्या आहेत व हडप्पा संस्कृतीतील लिपीत काहीतरी लिहिले आहे. या तटबंदी शहरांचे पुरापासून व चोरांपासून रक्षण करण्यासाठी उभारल्या आहेत.

  

युनिट २ : A : हडप्पा संस्कृतीचा भौगोलिक विस्तार

युनिट 2 :

हरप्पा संस्कृती ( ब्राँझ युगीन संस्कृती)

A : हडप्पा संस्कृतीचा भौगोलिक विस्तार

अ.            या संस्कृतीला नाव कसे दिले? :

‘सिंधू संस्कृती’: संस्कृतीला नाव देण्याच्या एका पद्धतीनुसार या संस्कृतीचे अवशेष सिंधु नदीच्या खोऱ्यात सापडले. सुरुवातीच्या काळात ही संस्कृती सिंधू नदीच्या खोऱ्यापुरती मर्यादित असावी असे संशोधकांना वाटले त्यामुळे या संस्कृतीला ‘सिंधू संस्कृती’ असे म्हणतात.

हडप्पा संस्कृती’ : ही संस्कृती सिंधू नदीच्या खोऱ्याशिवाय भारताच्या मोठ्या भूभागावर आढळून आली. त्यामुळे संस्कृतीचे अवशेष ज्या ठिकाणी सर्वप्रथम सापडले. त्या ‘हडप्पा’ या ठिकाणाचे नाव या संस्कृतीला दिले. त्यानुसार या संस्कृतीला ‘हडप्पा संस्कृती’ असेही म्हणतात.

आ.         सिंधू संस्कृतीचा शोध कोणी व कसा लावला?:

ब्रिटिश राजवटीत भारतात रेल्वेचे रूळ टाकण्याचे काम सुरु होते. अशाच पद्धतीने पाकिस्तानातील पंजाब प्रांतात रूळ टाकत असताना काही विशिष्ट आकाराच्या विटा सापडल्या. त्यावरून भारत सरकारच्या पुरातत्व खात्याने येथे एखादी प्राचीन संस्कृती गाडली असावी असा अंदाज व्यक्त केला. त्यानुसार हरप्पा या गावाजवळ एका शहराचे अवशेष सापडले. त्याला हडप्पा असे नाव देण्यात आले. हडप्पा शहराचा शोध दयाराम सहानी यांनी १९२१ मध्ये लावला. तर ‘मृतांची टेकडी’ म्हणजे ‘मोहेजोदारो’ या शहराचा शोध राखालदास बॅनर्जी यांनी १९२३ साली लावला. भारत सरकारच्या त्या काळातील पुरातत्व खात्याचे प्रमुख जॉन मार्शल यांनी १९२४ मध्ये लंडनमधील वर्तमानपत्रात या संशोधनाला प्रसिद्धी दिली. व जगापुढे ‘सिंधू’ किंवा ‘हडप्पा’ संस्कृती आली.

 

इ.              हडप्पा संस्कृतीची व्याप्ती केवढी आहे?

हडप्पा संस्कृतीचे अवशेष सुरुवातीला सिंधू नदीच्या खोऱ्यात सापडले. त्यामध्ये हडप्पा, मोहेंजोदडो, सुरकोतडा, इ. ठिकाणांचा समावेश होता. पुढे लोथल, कालीबंगन, धोलाविरा, रूपड, इ. ठिकाणीही शहरांचे अवशेष सापडले. जवळ जवळ१५०० ठिकाणी उत्खनन झाले आहे. त्यातील १५० ठिकाणी शहरांचे अवशेष सापडले आहेत. हडप्पा संस्कृतीचा विस्तार उत्तरेला मांडा(जम्मू-काश्मीर) ते दक्षिणेला दायमाबाद(महाराष्ट्र), तर पूर्वेला आलमगीर (उत्तर प्रदेश) ते पश्चिमेला मकरान(बलुचिस्थान) च्या दरम्यान आहे. पूर्व पश्चिम विस्तार ११०० किमी, तर उत्तर दक्षिण विस्तार १४०० किमी आहे. एकूण क्षेत्रफळ १३ लाख चौरस किलो मीटर एवढ्या भूभागावर आहे. तर आकार त्रिकोणाकृती आहे. समकालीन जगातील कोणत्याही संस्कृती पेक्षा ही आकाराने जगातील सर्वात मोठी संस्कृती आहे. 

 

ई.             हडप्पा संस्कृतीतील प्रमुख स्थळे कोणती आहेत?:

a.         हडप्पा:

हडप्पा शहराचा शोध १९२१ साली दयाराम सहानी यांनी लावला. या शहराच्या नावावरून या संस्कृतीला ‘हडप्पा संस्कृती’ असे नाव देण्यात आले. हडप्पा शहर पाकिस्तानातील पंजाब प्रांतात आहे. हडप्पा हे नाव तेथील एका छोट्याश्या शहराचे नाव आहे. त्यावरून या शहराला हडप्पा हे नाव दिले आहे. हे सिंधू संस्कृतीचे एक प्रमुख शहर होते. हे शहर रावी नदीच्या काठावर वसलेले होते. या शहराचे विभाजन किल्ला व मैदानातील नगररचना असे दोन भागात झालेले होते. धान्याचे कोठार, कामगार वस्त्या, इ. चे अवशेष सापडतात. या शहराची निर्मिती सुनियोजितरित्या केलेली आहे. या शहराची लोकसंख्या साधारणत: २३५०० असेल. यावरून हे त्या काळातील एक अत्यंत मोठे शहर होते. 

b.         मोहेंजोदारो:

‘मोहेंजोदारो’ हे शहर पाकिस्तानातील सिंध प्रांतातील लाराखाना जिल्ह्यात सिंधू नदीच्या काठावर सापडले आहे. स्थानिक लोक या ठिकाणाला ‘मृतांची टेकडी’ असे म्हणत. ‘मोहेंजोदारो’ या शब्दाचा सिंधी भाषेतील अर्थ ‘मृतांची टेकडी’ असा होतो. तर काही लोक ‘मोहन’ म्हणजे ‘कृष्ण’ ची टेकडी असेही अर्थ लावला जातो. पण सिंधू संस्कृतीत या शहराची नाव काय होते, हे मात्र अज्ञात होते. त्या काळात या शहराची लोकसंख्या ४०,०००च्या आसपास असावी असा अंदाज संशोधकांनी काढला आहे. या शहराचे दोन भागात विभाजन झाले आहे. किल्ला व मैदानातील शहर. शहरात एक बाजारपेठ होती. तेथे एक मोठी विहीर आहे. या शहरात सांडपाणी वाहून नेण्याची सोय आहे. ‘सार्वजनिक महास्नानगृह’, धान्याची कोठारे, नृत्याच्या मुद्रेत असणारी तरुणी, धर्मगुरूचा पुतळा, त्रिमुखी पशुपतीचे प्रतिमा, इ. महत्वाचे अवशेष मोहेंजोदारो या शहरात सापडले आहेत. १९९७ साली युनेस्कोने ‘जागतिक वारसा स्थळां’च्या(World Heritage) यादीत मोहेंजोदारोचा समावेश करण्यात आला.

c.          लोथल:

‘लोथल’ हे ठिकाण गुजराथमधील अहमदाबादपासून ८० किमी अंतरावर ढोलक तालुक्यात सरगवाला गावाजवळ आहे. हे शहर भोगावा नदीच्या काठावरील नैसर्गिक बंदर होते. या ठिकाणाहून सिंधू संस्कृतीतील परराष्ट्र व्यापार चालत असावा. लोथलमध्ये ‘जहाजाची गोदी’(Dockyard) आहे. जहाजाच्या गोदीत जहाजांची निर्मिती, दुरुस्ती होते. लोथल हे शहर संशोधक एस. आर. राव यांनी १९५४ साली शोधून काढले. लोथल मध्ये धान्याच्या कोठाराचे अवशेष सापडले आहेत. इथे एक बाजारपेठ व मणी बनवणारे कारखान्याचे अवशेष सापडले आहेत. 

d.         धोलाविरा :

धोलाविरा हे हडप्पा संस्कृतीतील एक शहर आजच्या गुजरात मध्ये आहे. हे हडप्पा संस्कृतीतील चौथे मोठे शहर होते. धोलाविराचा शोध डी. पी. जोशी(१९६७) व डॉ. आर. एस. बिष्ट यांनी १९९० मध्ये लावला. हडप्पा संस्कृतीतील अनेक शहरे दोन भागात विभाजित आहेत धोलाविरा मात्र याला अपवाद आहे, धोलाविरा हे तीन भागात विभाजित आहे. धोलाविरा शहर हे वाळवंटी भागात असल्याने पावसाचे पाणी साठवण्यासाठी मोठा तलाव बांधला आहे. यावरून हडप्पा संस्कृतीती पाणी साठवण्याचे तंत्र लक्षात येते.  या शहराची लोकसंख्या अंदाजे २०००च्या आसपास असावी असा अंदाज काढला आहे.  धोलाविरा शहरात एक स्टेडियम सदृश्य इमारत आहे. येथील स्मशानभूमीवरून मृत्यूनंतरच्या जीवनावर या लोकांचा विश्वास असावा हे लक्षात येते. पाण्याचा साठा आटल्याने या शहराचा ऱ्हास झाला.

e.          कालीबंगन:

कालीबंगन म्हणजे ‘काळी बांगडी’ होय. कालीबांगन हे हडप्पा संस्कृतीतील राजस्थान मधील एक शहर आहे. हे शहर लुप्त झालेल्या सरस्वती नदीच्या काठावर आहे. याचा शोध बी. के. लाल व थापर यांनी लावला. या शहराची रचना मोहेंजोदारो सारखी आहे. काटकोनात छेदणारे रस्ते सापडतात. पण वैशिष्टपूर्ण बाब अशी की, सांडपाण्याच्या व्यवस्थेचे अवशेष सापडत नाहीत. येथे यज्ञ कुंडाचे पुरावे आहेत. तसेच जमीन नांगरत असल्याचे व दोन पिके घेत असल्याचे पुरावे सापडले आहेत. येथे भूकंप येऊन गेल्याचेही पुरावे सापडतात. सरस्वती नदी आटल्याने साधारणत: इ.स.पु. १७०० च्या  दरम्यान कालीबंगन शहर नष्ट झाले.

f.          राखीगढ :

राखीगढ हे शहर हरियाणा राज्यात सापडले आहे. १९९७ साली भारतीय पुरातत्व खात्याने केलेल्या उत्खननात हे शहर सापडले. हे एक हडप्पा संस्कृतीतील प्रमुख शहर होते. मोहेंजोदडोनंतर हडप्पा संस्कृतीतील आकाराने सर्वात मोहते शहर होते(२३० हेक्टर). या शहराला तटबंदी व प्रवेशद्वार आहे. या शहरात धान्याच्या कोठाराचे अवशेष आहेत. 

Friday, 16 September 2022

युनिट १. ३ : प्रागैतिहासिक काळ : अश्मयुग व ताम्रापाषण युग

 ३. प्रागैतिहासिक काळ : अश्मयुग व ताम्रापाषण युग

I..अश्मयुग :

पुथ्वीची उत्पत्ती ४०० करोड वर्षापूर्वी झाली. तर मानवाचे पृथ्वीवरील अस्तित्व अस्तित्व २० लाख वर्षापासून  आहे   मानवाच्या हाडाचे अवशेष २लाख ५० हजार वर्षापूर्वीचे आहेत. अलीकडे महाराष्ट्रात बोरी या ठिकाणी १४ लाख वर्षापूर्वीचे अवशेष सापडले आहेत. १८६३ साली रॉबर्ट ब्रूस फुट यांना मद्रासजवळ पल्लावरम येथे अश्मयुगीन दगडी हत्यारे सापडली. तेंव्हापासून भारतात प्रागैतिहासिक काळाच्या अभ्यासाला सुरुवात झाली. अश्मयुग हा प्रागैतिहासिक काळातील पहिला महत्वाचा टप्पा आहे.

अ.           अश्मयुग/पाषाणयुग म्हणजे काय?

“माणसाने ज्या काळात हत्यारे तयार करण्यासाठी दगड किंवा अश्म वापरले, त्या काळाला ‘अश्मयुग’ असे म्हणतात.”

“मानवाच्या इतिहासातील इ.स.पु.५ लाख ते इ.स.पु.१००० हा कालखंड अश्मयुग म्हणून ओळखला जातो.”

ब.            अश्मयुगाचे टप्पे : अश्मयुगाचे तीन टप्पे पडतात.

अ.           पुराणाश्मयुग

ब. मध्याश्मयुग

क. नवाश्मयुग

 

A. पुराणाश्म युग व त्याची वैशिष्ट्ये:

 

१. पुराणाश्म म्हणजे काय?

“अश्मयुगाच्या पहिल्या टप्प्याला ‘पुराणाश्मयुग’ असे म्हणतात.”

“इ.स.पु.५लाख ते इ.स.पु.१० हजार या कालखंडाला ‘पुराणाश्म युग’ म्हणतात”

२.शिकाऱ्यांचे युग:

पुराणाश्म युगात सुरुवातीच्या काळात मानव हा  भटका, अन्नशोधक होता. झाडाची पाने, फुले, फळे, कमी पडू लागली. त्याचवेळी माणूस मेलेल्या जनावरांचे मांस खात होता. पुढे तो मोठे मोठे मारून त्यांची शिकार करण्याची कला शिकला. या काळातील मानवाचा जास्तीत जास्त वेळ शिकार करण्यात जात असे त्यामुळे या काळाला ‘शिकाऱ्यांचे युग’ असे म्हणतात.

 

3. समूह करून राहू लागला:

सुरुवातील माणूस एकटा भटकंती करत होता. पण शिकारीमुळे त्याचा एकटेपणा संपला. पुराणाश्म युगात प्राणी आकाराने खूप मोठे असल्याने एकट्याने शिकार करणे शक्य नव्हते. त्यासाठी समूहाची गरज भासू लागली. त्यामुळे पुराणाश्म युगातील माणूस समूह करून राहू लागला.

,भाषेला सुरुवात:

पुराणाश्म युगातील मानव शिकारीमुळे व सुरक्षेसाठी समूह करून राहू लागला. समूह करून एकत्र राहिल्याने त्याने एकमेकाशी संवाद साधण्यासाठी बोलण्याची कला किंवा भाषा विकसित केली. सुरुवातील संकेत विकसित केले. हे संकेत कायम केल्याने विशिष्ट भाषा जन्माला आल्या. जगाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या भाषा विकसित झाल्या.  भाषा ही पुराणाश्म युगाची सर्वोत्कृष्ट देणगी आहे.

५.अग्नीचा शोध :

अग्नीचा शोध पुराणाश्म युगात लागला. निसर्गात पेटणाऱ्या वनव्यांचे निरीक्षण करून अग्नी कसा पेटवायचा व कसा विझवायचा याची कला पुराणाश्म युगातील मानवाने शिकून घेतली. स्वत:च्या शाररीक शक्तीव्यतिरिक्त मानवाला प्राप्त झालेली पहिली बाह्य शक्ती म्हणजे अग्नी होय. अग्नीची कला शिकून घेतल्यावर प्रकाश व उष्णता मिळवण्यासाठी, जंगली जनावरांना पळवून लावण्यासाठी मानवाने अग्नीचा वापर सुरु केला.

६.    निवासस्थाने :

पुराणाश्म युगातील माणूस दाट झाडीच्या आश्रयाने राहत असे. हा काळ हिमयुग असल्याने थंडीपासून रक्षण व्हावे म्हणून माणूस नैसर्गिक गुहांच्या आश्रयाने राहू लागला. या गुहा शक्यतो पाण्याच्या साठ्याजवळच्या असत.

      या काळात मानवाला शेती करण्याची कला अवगत नव्हती. कारण एकतर त्याला गरज वाटत नव्हती कारण लोकसंख्या कमी होती आणि हिमयुगाच्या थंडीमुळे कृत्रिमरित्या पेरलेली कोणतीही बी उगवणे शक्य नव्हते त्यामुळे पुराणाश्म युगातील मानव हा शेतकरी बनला नाही तो शिकारीच राहिला.


B. मध्याश्मयुग व त्याची वैशिष्ट्ये:

 

१. मध्याश्म युग म्हणजे काय?

‘‘पुराणाश्म व नवाश्मयुग यामधल्या काळात जी संस्कृती अस्तित्वात आली तिला ‘मध्याश्मयुग’ असे म्हणतात.”

“ अश्मयुगातील इ.स.पु. १०हजार ते इ.स.पु. ६हजार या कालखंडास ‘मध्याश्मयुग’ असे म्हणतात”

 

२. पशुपालकांचे युग:

मध्याश्म युगात मानवाने पशुपालन करायला सुरुवात केली. यापूर्वी पुराणाश्म युगात मानवाने शिकार करायला सुरुवात केली. शिकारीचे मांस खाऊन टाकलेले मांसाचे तुकडे, हाडे इतर प्राणी खात असत. काही प्राणी मानवाने खाऊन टाकलेले अवशेष खात काही प्राणी माणसाच्या मागोमाग हिंडू लागले, खूपकाळ मागे हिंडल्यावर या प्राण्यांना माणसांची भीती वाटेनाशी झाली. या प्रक्रियेतून जनवारे माणसाळायला सुरुवात झाली. अशा पद्धतीने माणसाने पाळीव बनवलेला पहिला प्राणी ‘कोल्हा’ होता. जो आज कुत्रा म्हणून परिचित आहे. हा कुत्रा पुढे माणसाला शिकारीत मदत करू लागला. कुत्र्यानंतर रानम्हैस, रानगाय, घोडा इ. प्राणी पाळीव करायला सुरुवात झाली. या प्राण्यांचे मांस व दुध माणसाला अन्न म्हणून मिळू लागले. ही पशुपालानाची सुरुवात होती. मध्याश्मयुगातील मानवाचा बराच वेळ पशुपालनात जाऊ लागला. त्यामुळे मध्याश्म युगाला ‘पशुपालकांचे युग’ असे म्हणतात.

 

३. शिकार व ‘शुद्रास्त्रे’ किंवा ‘लघुअस्त्रे’ :

मध्याश्म युगात मानव छोट्या प्राण्यांची शिकार करू लागला. मध्याश्म युगात वातावरण उबदार झाल्याने हरीण, वनगाय, नीलगाय, काळवीट, जंगली कुत्रा, कासव, मुंगुस इ. प्राण्यांची संख्या वाढली. आता मानव या छोट्या प्राण्यांची शिकार करू लागला. त्यासाठी तो आकाराने छोटी अस्त्रे वापरू लागला. त्याना  ‘शुद्रास्त्रे’ किंवा ‘लघुअस्त्रे’ म्हणतात. या शिकारीत त्याला कुत्र्याची मदत होऊ लागली. धनुष्यबाण, सुरा, चाकू, बाणाची टोके, मासे पकडण्याचे गळ इ. गोष्टींचे जनकत्व मध्याश्मयुगातील मानवास द्यावे लागते.

 

 ४. मांस भाजू खाऊ लागला:

मध्याश्म युगात मानव मांस बाजून खाऊ लागला. भाजलेले मांस हे कच्च्या मांसापेक्षा अधिक चविष्ट व रुचकर लागते हे माणसाच्या ध्यानात आले. यापूर्वी त्याने अग्नी पेटवण्याचे व विझवण्याचे तंत्र शिकून घेतले होते. त्याआधारे तो आता मांस भाजून खाऊ लागला. कोणत्याही काळात माणसाला लागलेला शोध जर त्याला उपयुक्त वाटत असेल तर मानव तो शोध पुढच्या काळात वाहून नेतो. तसेच त्याचा इतर वेगळा उपयोगही शोधतो. पुराणाश्म युगात मानवाने अग्नीचा शोध लावला. आता मध्याश्म युगात मानवाने या अग्नीचा वापर करून मांस भाजायला सुरुवात केली.

 

५.दफन करायला सुरु :

या काळात माणूस मेलेल्या माणसाचे दफन करू लागला. अनेक ठिकाणी दफन केलेले मृतावशेष सापडले आहेत. पुराणाश्म युगात माणूस समूह करून राहू लागला. त्यामुळे समूहातील सदस्याबद्दल प्रेम, आपुलकी, जिव्हाळा निर्माण झाला असेल. त्यामुळे आपल्या समूहातील सदस्य मेल्यावर त्याला पूर्वी उघड्यावर फेकून पुढे वाटचाल करत असे. पण सामुहिक जीवनातून निर्माण झालेल्या प्रेमापोटी तो त्याला मृत व्यक्तीला पुरू लागला. काही वेळा मृताला राहणायाच्या ठिकाणी पुरले आहे. यामागे मृत व्यक्तीची कृपा आपल्यावर राहावी ही भावना असावी. 

 

C.नवाश्मयुग :

१.             नवाश्मयुग म्हणजे काय?

“ अश्मयुगाच्या शेवटच्या टप्प्याला ‘नवाश्मयुग’ म्हणतात”

“भारतात इ.स.पु. ६ हजार ते इ.स.पु. १००० या अश्मयुगाच्या टप्प्यास ‘नवाश्मयुग’ असे म्हणतात.”

“शेतीचा शोध, पशुपालन, चाकाचा वापर, भांड्यांची निर्मिती, घर बांधणी, ही मध्याश्मयुगापेक्षा वेगळी व प्रगत अवस्था मध्याश्म युगाच्या शेवटी आली. तिला ‘ नवाश्मयुग’ असे म्हणतात.”

२.              ‘शेतकऱ्यांचे युग’:

       नवाश्मयुगाला ‘शेतकाऱ्यांचे युग’ असे म्हणतात. कारण नवाश्मयुगात मानवाने शेती करायला सुरुवात केली. नवाश्मयुगात वातावरण उबदार झाले. याकाळात लोकसंख्या वाढली. त्यामुळे शिकार व पशुपालन सोडून उदरनिर्वाहाचे साधन शोधणे आवश्यक झाले होते. शेतीचा शोध स्त्रीने लावला. पुरुष पशुपालन व शिकारीसाठी जंगलात गेल्यावर स्त्रीया मुलांना सांभाळण्यासाठी गुहेत राहत असत. भटकंतीच्या काळात गवताची बी जमिनीवर पडल्यावर ती कशी उगवून येते, याचे निरीक्षण केले होते. त्यातून स्त्रीने ती राहत असलेल्या ठिकाणी पहिल्यांदा धान्य उगविले. ही शेतीची सुरुवात होती. म्हणून स्त्रियांना शेतीचे जनक असे म्हणतात.

       शेती करायला लागल्यामुळे मानवाची भटकंती संपली. तो एका जागी स्थिर झाला. मानवी समाज व संस्कृती आकारास येऊ लागली. त्यामुळे शेती करायला सुरु होणे ही एक क्रांतिकारक घटना मानली जाते. त्यामुळे नवाश्मयुगाला ‘शेतकऱ्याचे युग’ असे म्हणतात.

३.             घरे बांधायला सुरुवात:

       शेतीमुळे मानवाला एका ठिकाणी नद्यांच्या सुपीक खोऱ्यात राहणे भाग पडले. त्यामुळे मानवाला घराची आवश्यकता वाटू लागली कारण इथे नद्यांच्या खोऱ्यात नैसर्गिक गुहा नव्हत्या. सुरुवातीची घरे ही माती, गवत व बांबूची बनवलेली असत. ही झोपडी सारखी घरे चौकोनी वा गोलाकार असत.

४.             मातीच्या भांड्यांची निर्मिती-चाकाचा वापर सुरु:

       शेतीत पिकलेले धान्य साठवणे, अन्न शिजवणे, जेवण करण्यासाठी, पाणी साठवण्यासाठी रांजण, पाणी पिण्यासाठी पेले इ. भांड्याची या काळात मोठ्या प्रमाणात निर्मिती झाली.

       नवाश्मयुगात मानवाला चाकाचा शोध लागला. डोंगरावून घरंगळत जाणारा दगड वा लाकडी ओंडका पाहून मानवाला चाकाची कल्पना सुचली असेल. निरीक्षण करून त्याने चाक तयार केले. लवकरच या चाकाचा वापर करून गोलाकार, सुबक व वेगवान भांड्याची निर्मिती केली. ही भांडी अग्नीचा वापर करून भाजली.

५.            कुटुंबसंस्थेचा जन्म :

नवाश्मयुगात मानवी समाजनिर्मितीच्या दृष्टीने पहिले दमदार पाऊल पडले, कुटुंबसंस्थेचा जन्म झाला. या काळात शेती करायला लागल्यामुळे मानव स्थिर झाला, वस्ती करून राहू लागला. त्यातून टोळी अवस्था संपली व कुटुंबसंस्था जन्माला आली. सुरुवातीची कुटुंबसंस्था मातृसत्ताक असावी. कुटुंबसंस्थेतूनच समाज व संस्कृती अस्तीत्वात येऊ लागली.

६.             दैवतांना सुरुवात:

       नवाश्मयुगात धार्मिक कल्पनांचा जन्म झाला. वादळ, वीज, पाऊस याचा अर्थ लोकांना कळत नव्हता. मानव सूर्य, पाणी, जमीन, वनस्पती, बैल यावर अवलंबून होता. त्यांची देव म्हणून पूजा होऊ लागली. याशिवाय मातृदेवतांची पूजा सुरु झाली.

 

===========================================================

 

II.ताम्रपाषाण संस्कृती

 ‘तांबे’ हा मानवाने वापरलेला पहिला धातू होता. तांब्याच्या वापराने ‘ताम्रपाषाण युग’ अस्तित्वात आले. ताम्रपाषाण युग हे नवाश्मयुगापेक्षा प्रगत अवस्था होती.

१.    ‘ताम्रपाषाण संस्कृती’ म्हणजे काय?

‘भूतकाळातील ज्या कालखंडात मानव तांब्याची हत्यारे व अवजारे वापरत होता, तसेच तांब्यासोबत दगडाची हत्यारे व अवजारेही वापरत होता, त्या काळाला ‘ताम्रपाषाण युग’ असे म्हणतात दगड व तांबे यांची हत्यारे व अवजारे एकत्रित वापरल्याने जी संस्कृती अस्तित्वात आली तिला ‘ताम्रपाषाण संस्कृती’  असे म्हणतात.

ताम्रपाषाण संस्कृतीचे अवशेष देशभर सापडत असले तरी प्रामुख्याने तीन ठिकाणे आहेत जी अत्यंत महत्वाची आहेत. ‘बनास संस्कृती’-राजस्थान, ‘माळवा संस्कृती’- मध्यप्रदेश, ‘जोरवे संस्कृती’-महाराष्ट्र यांचा समावेश होतो.

२.    अधिक धान्योत्पादन करायला सुरुवात :

ताम्रपाषण युगातील लोक गव्हू, तांदूळ, बाजरी, मसूर, उडीद, मुग, इ. पिके घेत असावेत. या सर्व धान्याचे अवशेष सापडतात. विशेषत: महाराष्ट्रातील नर्मदा नदीच्या तिरावरील ‘नवदातोली’ या ठिकाणी वरील सर्व पिकांचे अवशेष सापडले आहे. यावरून ताम्रपाषाण युगात नवाश्मयुगापेक्षा अधिक धान्योत्पादन करायला सुरुवात केल्याचे दिसून येते. (का?)एकतर ताम्रापाषण युगात लोकसंख्या वाढली, वाढत्या लोकसंख्येला अधिक धान्य उत्पादन करण्याची गरज होती. अधिक उत्पादन करणे तांब्याची हत्यारे व अवजारे वापरल्यामुळे शक्य झाले.

ताम्रपाषाण युगात महाराष्ट्रातील काळ्या रेगुर मातीत कापसाची लागवडही केली जात होती. कापसापासून कापड तयार करण्याचे तंत्र या लोकांना अवगत होते.

३.    छोटी-मोठी गावे वसायला सुरुवात :

नवाश्मयुगात मानव शेती करायला लागला. त्यामुळे त्याला एका जागी स्थिर राहणे भाग पडले. आता माणसाला नदीच्या खोऱ्यात शेताजवळ राहण्यासाठी घर बांधणे भाग पडले. एका जागी स्थिर होऊन घरे बांधून राहिल्यामुळे ठिकठिकाणी वस्त्या निर्माण झल्या. या वस्त्यांचे ताम्रपाषाण युगात रुपांतर छोट्या गावात व्हायला लागले. ताम्रापाषण युगातील ‘सर्वात मोठी वस्ती’ महाराष्ट्रातील ‘दायमाबाद’ येथे सापडली आहे. ही वस्ती जवळजवळ २० हेक्टर जागेत आहे. या ठिकाणी जवळजवळ ४००० लोक राहू शकतील एवढा मोठा या वस्तीचा आकार आहे. हे एक मोठे गाव असावे. तसेच या गावाच्या मध्ये एक किल्ल्यासारखी इमारत सापडली आहे. या ठिकाणाहून गावाचे प्रशासन चालत असावे.

अशा तऱ्हेने ताम्रापाषण काळात धान्याचे उत्पादन वाढल्यामुळे छोटी-मोठी गावे अस्तित्वात येऊ लागली.

४.    विविध व्यवसायांचा उदय :

ताम्रपाषाण युगात लोक शेती हा प्रमुख व्यवसाय होता त्याचबरोबर धातुकाम, कापडनिमिती, मातीची भांडी बनवणे, इ, विविध व्यवसायांचा उदय या काळात झाला. जीवनावश्यक वस्तू तयार करणारे व शेतीसाठी लागणाऱ्या वस्तू बनवणारे विविध व्यवसाय उदयास आले.

५.   दफनविधी व धार्मिक जीवन :

महाराष्ट्रातील जोरवे या ठिकाणी मृत व्यक्तीला एका मातीच्या कलशात घालून घरात पुरले आहे, यावरून मृत व्यक्तीची कृपा व त्याचा सहवास मिळावा अशी त्यामागे भावना असावी. मृत व्यक्तीला पुरताना त्याच्यासोबत त्याला उपयोगी पडणाऱ्या वस्तूसुध्दा पुरल्या आहेत. त्यावरून या लोकांचाही ‘मृत्यूनंतरच्या जीवनावर विश्वास’ असावा असा निष्कर्ष काढता येतो.

याकाळात  ‘मातृदेवता’ व ‘वृषभ’ यांची पूजा करत असावेत. आजच्या काळात आपण जो बैलपोळा साजरा करतो त्याची ही सुरुवात होती असे म्हणता येईल.   

 याकाळात घरांच्या बांधणीवरून व मृतदेहाच्या सोबत पुरलेल्या वस्तूंच्यावरून सामाजिक विषमता दिसू लागली: 

Featured Post

🌟Practicals- इतिहास-भारताची राष्ट्रीय चळवळ (१९२० ते १९४७) History- Indian National Movement

  🌟 इतिहास विषय P ractical प्रॅक्टिकल  - परीक्षेचे स्वरूप :•    •             इतिहास विषय घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना practical / प्...

Popular Posts