Friday 30 September 2022

युनिट २ C.हडप्पा संस्कृतीतील धार्मिक जीवन :

 

C.हडप्पा संस्कृतीतील धार्मिक जीवन :

 

१.पुरुषदेवता:

मोहेंजोदडो येथे एक प्रतिमा सापडली आहे. या प्रतिमेवर एक देवता आहे. या देवतेच्या डोक्यावर त्रिशुलाकार मुकुट आहे. ही देवता ध्यानाला बसली आहे. तिच्या आसनाशेजारी हत्ती, वाघ, गेंडा, म्हैस, यांचे चित्र कोरली आहेत. यावरून काही इतिहास संशोधक मॉर्टीम व्हीलर यांनी निष्कर्ष काढला आहे की, ही देवता ‘शिव’ किंवा ‘शंकर’ असावी. कारण सुरुवातीच्या काळात शिवाची पूजा ‘पाशुपती’ रुपात करत होते. तसेच हडप्पा संस्कृतीत शिवलिंगाच्या आकाराचे दगड सापडले आहेत. पण हडप्पा संस्कृतीतील ही देवता ‘शिव’च होती असे ठामपपणे सांगता येत नाही.

2 .मातृदेवता:

एका मुद्रेवर स्त्रीचे चित्र कोरले आहे. या स्त्रीच्या पोटातून झाड उगवण्याचे दृश्य कोरले आहे. याचा संबंध सुफलनाशी(fertility) असावा. ही मातृदेवतेची प्रतिमा असावी. असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. उत्खननात अनेक छोट्या स्त्रीप्रतिमा सापडल्या आहेत. दुसऱ्या एका प्रतिमेवर सात स्त्रीया एका ओळीने उभ्या राहिल्या आहेत. या स्त्रियांच्या डोक्यावर पिंपळाची डहाळी आहे. ही ‘सप्तमातृकां’ची(सती आसरा, सात्यासरा) प्रतिमा असावी. यावरून हडप्पा संस्कृती ही मातृपुजकांची संस्कृती असावी हे लोक सप्तमातृकांच्या रुपात मातृदेवतांची पूजा केली जात होती.  

३.             .प्राणी पूजा:

हडप्पा संस्कृतीच्या उत्खननात वाघ, हत्ती, बैल, गेंडा, हरीण, बोकड, एकशिंग्या (unicorn), इ. प्राण्यांची चित्रे कोरलेले अनेक शिक्यांवर कोरली आहेत. यातील प्राण्यांच्या समोर नैवाद्याचे भांडे आहे. यावरुन या प्राण्यांची पूजा करत असावेत. ‘बैल’ हा प्राणी हडप्पा संस्कृतीत विशेष पूजनीय होता. ही आजच्या ‘बैलपोळा’ सणाची सुरुवात होती. असे मानता येईल. 

४.             झाडांची पूजा:

पिंपळ, वड या झाडांची पूजा करत असावेत. तशा स्वरूपाच्या मुद्रा सापडल्या आहेत. आजही भारतीय संस्कृतीत या झाडांची पूजा केली जाते.

५.             नागपूजा :

नागाची पूजा करत असल्याचे शिक्के सापडले आहेत. यावरून नागपूजा होत असावी. आज भारतात ‘नागपंचमी’ हा सण साजरा केला जातो.

६.             सूर्यपूजा व जलपूजा:

हडप्पा संस्कृतीतील काही शिक्क्यांवर सूर्यपूजा व जलपूजा करत असल्याची चित्रे कोरली आहेत. या निसर्गाच्या देणग्या आहेत. यामुळे मानवी जीवन समृद्ध बनले आहे. याची जाणीव लोकांना असावी. महास्नानगृहाचा वापर जलपुजेसाठी केला जात असावा.

७.            पशुबळी:

या संस्कृतीतील शिक्क्यांवर देवतेच्या पोटातून एक झाड बाहेर उगवलेले दाखवले आहे. त्यामागे एक शेतकरी कोयत्याने एका स्त्रीचा बळी घेत आहे असे कोरले आहे. धन-धान्य वृद्धीसाठी शेतकरी पृथ्वी देवतेला स्त्रीचा बळी देत असावेत.मोहेजोदाडो येथील काही शिक्क्यांवर बकऱ्याचा बळी देत असल्याचे चित्र कोरले आहे. यावरून पशुबळी व नरबळी देत असावे.

८.             अंधश्रद्धा व भूतप्रेत :

ताईत(तावीज), गंडेदोरे, इ. वरून संस्कृतीतील लोकांचा भूतप्रेत इत्यादी अघोरी शक्तींवर विश्वास असावा. जादूटोणा, मंत्र-तंत्र यावरही लोकांची श्रद्धा असावी.

९.             अंत्यसंस्काराची पद्धती:

मृतदेह दफन करणे आणि दहन करणे अशा दोन्ही पद्धती रूढ असाव्यात. काही ठिकाणी मृतदेहाबरोबर भांडी-कुंडी, अलंकार, पुरलेले आहेत. यावरून या लोकांचा मृत्यूनंतरच्या जीवनावर विश्वास होता.

निष्कर्ष :

·      हडप्पातील लोक पुरुषदेवता, मातृदेवता, वृक्षपूजा, प्राणीपूजा, जलपूजा, इ. अनेक देवदेवतांची पूजा करत होते.

·      मात्र विशेष बाब म्हणजे, एकही प्रार्थनास्थळ वा मंदिर सापडत नाही.

·      हडप्पावासीयांच्या  धार्मिक कल्पना या उत्खननात सापडलेल्या अवशेषांच्या(पुरातत्वशास्त्र) आधारे मांडली आहेत. हडप्पातील लिपी वाचता आल्यावर त्याबद्दल अधिक माहिती मिळेल. 

No comments:

Post a Comment

Featured Post

previous year question papers

http://www.unipune.ac.in/university_files/old_papers.htm

Popular Posts