Sunday, 10 September 2023

युनिट २. A.अहिंसात्मक सत्याग्रहाचे तत्त्वज्ञान

 

प्रकरण 2 : गांधी युग

A.अहिंसात्मक सत्याग्रहाचे तत्त्वज्ञान]

B.असहकार चळवळ

C.सविनय कायदेभंग चळवळ

D.चले जाव आंदोलन/छोडो भारत आंदोलन

---------------------------------------------

A.          गांधीजींचे तत्त्वज्ञान

 

मोहनदास करमचंद गांधी हे महात्मा गांधीचे पूर्ण नाव होते. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजराथमधील पोरबंदर या ठिकाणी झाला. घरातील धार्मिक वातावरणाचा परिणाम त्याच्यावर झाला. भारतात शिक्षण पूर्ण झाल्यावर ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. १८९१ साली बॅरीस्टर होऊन ते भारतात परतले. त्यांचा भगवद्गीता, कुराण,बायबल असा सर्व धर्मग्रंथांचा अभ्यास होता. भारतात त्यांनी काही दिवस वकिली केली. त्यानंतर एका खटल्याच्या निमित्ताने १८९३ साली ते दक्षिण आफ्रिकेला गेले. तेथील भारतीयांवर अन्याय होत होता. तेथील गोरे हे काळ्यांना अत्यंत वाईट वागणूक देत. त्याची झळ गांधीनाही बसली. त्यांनी १८९४ ते १९१४ पर्यंत अहिंसात्मक सत्याग्रहाच्या मार्गाने आफ्रिकेतील काळ्यांना न्याय मिळवून दिला. १९१५ साली ते भारतात आले. भारतात त्यांनी असहकार चळवळ (१९२०-२२), सविनय कायदेभंग चळवळ (१९३० ते १९३२), छोडो भारत आंदोलन (१९४२ ते १९४५) आंदोलने केलीत, अहिंसात्मक सत्याग्रहाच्या मार्गाने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.

१.               सत्याग्रह :

अ.             सत्याग्रह संकल्पनेचा अर्थ :

गांधीचे तत्वज्ञान :

१. सत्याग्रह

२. अहिंसा

३. सर्वोदय संकल्पना

४. विश्वस्त कल्पना

५. राज्यविषयक विचार

६. रामराज्य व ग्राम स्वराज्य

सत्याग्रह म्हणजे ‘सत्याचा आग्रह’ होय. ‘अहिंसा’ व ‘निशस्त्र प्रतिकार’ हा सत्याग्रह करण्याचे मार्ग आहेत. ‘सत्याग्रह’ हा अन्यायाविरुध्द लढण्याचा मार्ग आहे. गांधीनी आपल्या ‘हिंद स्वराज्य’ या ग्रंथात असे सांगितले आहे कि, ‘भारताला स्वातंत्र्य शस्त्रबळाने किंवा बौद्धिक चर्चेने मिळणार नाही. ते सत्याग्रहाच्या मार्गाने सुटेल.’ त्यामुळे गांधीचा सशस्त्र क्रांतीला तीव्र विरोध होता. त्यामुळे गांधीजी व नेताजी सुभाषचंद्र यांचे मतभेद झाले. गांधीचा मते ‘सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने जे स्वातंत्र्य मिळेल हे लष्करशहा व सरंजामदार यांच्या हाती जाईल व सामान्य जनता स्वातंत्र्यापासून वंचित राहील. लोकांना स्वातंत्र्याचा फायदा होण्यासाठी लोकशाही निर्माण झाली पाहिजे. लोकशाही निर्माण करण्याचा सर्वोत्तम मार्ग सत्याग्रह हाच आहे’.

 ब. सत्याग्रहाचे मुलभूत नियम :

म .गांधीनी सत्याग्रहाचा लढा देताना काही मुलभूत नियम पालन करण्यास सांगितले आहेत.

1.    सत्याग्रह कुणीही करू शकत नाही. ज्यांना अन्याय सोसावा लागतो त्यांनीच सत्याग्रह करावा.

2.    सत्याग्रहाचा शब्दश: अर्थ सत्याविषयीचा आग्रह असा आहे

3.    विरोधकांना पूर्व कल्पना देऊनच सत्याग्रह करावा.

4.    विरोधाकाविषयी राग, द्वेष न ठेवता सहानुभूती ठेवावी.

5.    समोरच्या व्यक्तीतील चांगल्या गोष्टी आळवाव्यात त्याच्या चांगुलपणाची त्याला जाणीव करून द्यावी.

6.    अन्याय करणाऱ्याला अडचणीत आणणे हा सत्याग्रहाचा हेतू नसावा.

7.    सत्याग्रहाचा हेतू अन्याय करणाऱ्याला धडा शिकवणे हा नसून त्याच्या मनाचे परिवर्तन करणे हा असावा.

8.    प्रतीपक्षाने कितीही त्रास दिला तर असा त्रास जास्तीत जास्त सहन करावा.

9.    आमरण उपोषण हा सत्याग्रहाचा एक अविभाज्य भाग आहे. ते एक महान अस्त्र आहे. मात्र योग्य तालमीतून गेल्याशिवाय त्याला वापर करण्याचा लायकी येत नाही. त्याचा वापर वारंवार करू नये.

क.             सत्याग्रहाचे विविध मार्ग :

महात्मा गांधी यांनी सत्याग्रहाचे आंदोलन वेगवेगळ्या प्रकारे केले त्यातून सत्याग्रहाचे विविध मार्ग तयार झाले. त्यामध्ये असहकार, सविनय कायदेभंग, बहिष्कार, उपोषण, हिजरत(स्थलांतर), यांचा समावेश होतो.

२.               अहिंसा :

a.            अर्थ : सत्य हे गांधीजींचे ध्येय आहे. तर अहिंसा हा सत्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग होय. त्यामुळे सत्याएवढे अहिंसेला महत्व आहे. ‘अहिंसा’ म्हणजे ‘हिंसा न करणे’ होय. अहिंसा म्हणजे दुर्बलता नव्हे, अहिंसा म्हणजे पळपुटेपणा नव्हे, तुमच्याजवळ समोरच्याला मारण्याची क्षमता आहे व तुम्ही त्याला मारत नाही. त्याला माफ करता. ही शूरांची अहिंसा गांधीना अपेक्षित होती. अहिंसा हे तत्व गांधीजीनी शोधू काढले नाही ते जगातील सर्व संस्कृतीत, धर्मात आहे. गांधीनी याचा वापर राजकीय लढ्यात केला.

b.            सकारात्मक अर्थ’ : अहिंसेच्या कल्पनेला ‘सकारात्मक अर्थ’ आहे. ती काय करू नका हे सांगत नाही तर काय करा हे सांगते. तो म्हणजे दुसऱ्यावर प्रेम करणे, म्हणजे त्याच्या वृत्तीत बदल घडवून आणणे होय. तसेच याचा वापर करून लढा दिल्यास हिंसात्मक लढ्यापेक्षा काही सकारात्मक गोष्टी घडतील. जशा कि, अहिंसेत कटुता द्वेष याला थारा नाही. उलट ज्याच्या विरुद्ध आपण अहिंसात्मक लढा देतो, त्याला आपला मित्र बनविण्याचे सामर्थ्य अहिंसेत असते. हिंसेने हिंसाचार नष्ट होत नाही, तर उलट वाढतो. जगातून हिंसाचार नष्ट करण्यासाठी अहिंसा हा एकमेव मार्ग आहे. 

c.            अहिंसेची व्यावहारिकता :

गांधीच्या अहिंसा तत्वाला व्यवहाराची जोड आहे असे इतिहासकार बिपीन चंद्र याना वाटते. कारण,

ü     जनलढा होण्यासाठी :  हिंसात्मक लढ्यात सर्वसामान्य लोक, स्त्रिया, मुले, शेतकरी, शेतमजूर, कामगार, इ. मोठ्या संख्येने सहभागी होऊ शकत नाही. तेच लढा अहिंसात्मक असेल तर मात्र लोक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. कोणताही लढा जोवर जनतेचा लढा होत नाही तोवर त्याला यश मिळत नाही. गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्य लढा जन लढा झाला. त्यामुळे ब्रिटिशांना हा देश सोडून जावे लागले.

ü     शस्त्रासाठी पैसे लागत नाहीत : अहिसात्मक लढ्याचे दुसरे महत्व म्हणजे शस्त्राच्या आधारे लढा उभा करायचा तर शस्त्रात्रे खरेदी करण्यासाठी खूप पैसे लागतील. जे भारतीयांजवळ नव्हते. त्यामुळे तर शस्त्रास्त्रे खरेदी करण्यासाठी क्रांतीकारकांना ‘काकोरी कट’ रचून इंग्रजांचा खजिना लुटावा लागला.

ü     ब्रिटीशांची ताकद अफाट :  त्यांचे जगावर राज्य होते. प्रचंड पैसा व फौज होती सशस्त्र लढा मोडून काढणे त्याना सहज शक्य झाले असते. जशी त्यानी भारतातील क्रांतिकारी चळवळ दडपून टाकली.

ü     नैतिक अधिष्ठान : अहिंसात्मक लढ्याला नैतिक अधिष्ठान असते. उदा. धारासना सात्याग्रहाच्या वेळी तो सत्याग्रह कसा चालतो हे बघायला परदेशी पत्रकार आले होते. तेथे मिठागारात सरोजिनी नायडू यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह झाला. निशस्त्र सत्याग्रहिंची तुकडी मिठागराच्या दिशेने मिठाचा कायदा मोडण्यासाठी चालली होती. त्यांना अडवण्यासाठी ब्रिटीश पोलीस घोड्यावर बसून आले होते त्यांच्या हातात पितळी टोपी असलेल्या काठ्या होत्या. त्यांनी आपले घोडे सत्याग्रहींच्या अंगावर घातले, सत्याग्रहींची डोकी फोडली. पण लोक मारत खात होते. अजिबात प्रतिकार करत नव्हते. जखमींना दुसरा एक गट उचलून नेऊन त्याच्यावर उपचार करत होता. अनेक लोक अर्धमेले रक्तबंबाळ झाले होते. एक तुकडी जखमी झाल्यावर त्याची जागा दुसऱ्या तुकडीने घेतली. त्यानाही पोलिसांनी तसेच मारले, मग त्यांची जागा घ्यायला सत्याग्रहींची तिसरी तुकडी आली. मग चौथी. या सत्याग्रहाला जगभरातील वृत्तपत्रांनी प्रसिद्धी दिली. साहजिकच ब्रिटीश सत्तेचा क्रूर चेहरा जगासमोर आला व गांधीच्या लढ्याला जगभरातून नैतिक पाठबळ मिळाले. 

३.               ‘सर्वोदय’:

‘अंत्योदय’ हि कल्पना जॉन रस्किन याने ‘unto the last’ या ग्रंथात मांडली. त्यात समाजातील शेवटच्या घटकाच्या उन्नतीचा विचार केला आहे. त्यावर आधारित गांधीनी ‘सर्वोदय’ हि संकल्पना मांडली. दोन्हींचा अर्थ सारखा आहे. ‘सर्वोदय’ याचा अर्थ समाजातील सर्व घटकांचा उदय होय. ‘रामराज्य’ व ‘ग्राम स्वराज्य’ यांच्या विकासातून त्यांनी  सर्वोदय संकल्पना मांडली आहे.

४.               विश्वस्त संकल्पना :

ज्या व्यक्तीकडे गरजेपेक्षा जास्त संपत्ती आहे. त्याने ती संपत्ती स्वत:ची न मानता तिचे विश्वस्त बनावे. व अशा संपत्तीचा वापर गरीबांच्या कल्याणासाठी करावा. विशेषत; कारखानदार व जमीनदार यांनी त्यांच्या गरजेपुरती संपत्ती वापरावी उरलेल्या संपत्तीचे मालक स्वत:ला समजू नये. आपण तिचा सांभाळ करणारे आहोत हि संपत्ती समाजाची आहे. असे समजावे. अशी गांधींची ‘विश्वस्त संकल्पना’ आहे. साम्यवादी विचारानुसार लोकांनी भांडवलदारांच्या विरोधात क्रांती करावी त्यांची मालमत्ता सरकारला द्यावी व सरकारनी ती सर्वांसाठी वापरावी. पण महात्मा गांधीच्या मते असे करण्याची गरज नाही. भांडवलदार वर्ग स्वत:हून अतिरिक्त संपत्ती लोकंच्या कल्याणासाठी वापरतील. तसे न केल्यास राज्याने तसे करण्यास भाग पाडावे. गांधींचा व्यक्तीच्या मुलभूत सद्गुणांवर श्रद्धा होती. त्यामुळे ते असा विचार मांडतात.

याशिवाय गांधीजीचा ‘मोठे उद्योग व यांत्रिकीकरणाला विरोध’ आहे, कारण युरोपात औद्योगिक क्रांती झाली त्याचे दुष्परिणाम स्पष्ट दिसू लागले होते. औद्योगिकीकरण à साम्राज्यवाद à महायुद्ध à दारिद्य्र, बेरोजगारी, हा प्रवास त्यांना मान्य नव्हता. आपणही त्याच मार्गाने जाऊ नये. त्यापेक्षा ग्रामीण भागात लहान उद्योग काढावेत. त्या आधारे विकास करावा. त्याचबरोबर ‘श्रमाची प्रतिष्ठा’ व ‘शेतीआधारित अर्थव्यवस्थे’चे समर्थन गांधीजी करतात.

५.              गांधीजीचे राज्यविषयी विचार :

महात्मा गांधी अराज्यवादी (अनार्किस्ट) होते. राज्य नसलेला समाज त्यांना अभिप्रेत होता. मानवी स्वभावातील उणीवामुळे राज्य निर्माण झाले. राज्यसत्ता ही पाशवी व हिंसाचारी  असते. ती व्यक्तीच्या विकासाला घातक आहे कारण ते व्यक्तीच्या जीवनात हस्तक्षेप करते. त्यामुळे राज्य एक आपत्ती आहे, असे ते मानत. म. गांधी थोरोच्या विचारांनी प्रभावित झाले होते. कमीत कमी शासन करणारे शासन हे चांगले शासन असते यावर गांधीचा विश्वास होता. पण गांधीचे हे विचार व्यवहार्य नाही. राज्य ही सध्यातरी गरजेची बाब आहे. त्याशिवाय व्यक्ती शांततेत जगू शकत नाही.

६.               रामराज्य आणि ग्राम स्वराज्य :

गांधीजी आदर्श राज्याची कल्पना मांडताना ‘रामराज्य’ हा शब्द वापरतात. त्यात त्यांना रामायणातील रामाचे राज्य किंवा हिंदू धर्मियांचे राज्य असे म्हणायचे नाही . ज्या राज्यात उच्च नीचता नसेल, गरीब श्रीमंत, स्त्री-पुरुष, वंश, जात यावरून कोणताही भेद नसेल. जिथे व्यक्तीला स्वातंत्र्य असेल. जिथे विकेंद्रित लोकशाही असेल अशा राज्याला गांधी ‘राम-राज्य’ असे म्हणतात.

औद्योगिक क्रांतीने शहरीकरण झाले. पण आर्थिक विषमता वाढली. त्यामुळे शोषण वाढले. खेडी भकास झाली. अधिक दरिद्री झाली. गावातील कामे प्रांतिक, केंद्रीय शासन करू लागले. त्यांमुळे खेड्यातील उपक्रमशीलता संपली, स्वातंत्र्य संपले. यंत्र युगाने खेड्यातील साधेसुधे जीवन संपुष्टात आणले. माणसाचे जीवन यांत्रिक बनवले. त्यामुळे ते गांधीजी ‘ग्राम स्वराज्य’ हि संकल्पना मांडतात. त्यामध्ये प्रत्येक खेड्याने आपला कारभार आपण करावा. शासनाचे त्यावर कमीत कमी नियंत्रण असेल. खेड्यातल लोक परस्पराच्या सहकार्याने सर्वाच्या गरजा भागवतील. त्यामुळे शोषण संपेल. स्वातंत्र्य, समता, बंधुता निर्माण होईल. थोडक्यात ‘स्वयंपूर्ण खेडी’ होतील. असा आशावाद ‘ग्राम स्वराज्य’ कल्पनेमागे होता.

No comments:

Post a Comment

Featured Post

previous year question papers

http://www.unipune.ac.in/university_files/old_papers.htm

Popular Posts