Sunday, 3 September 2023

1. D जहालांचा कालखंड(१९०५ ते १९२०)

  

D.जहालांचा कालखंड(१९०५ ते १९२०)

                           २०व्या शतकाच्या सुरुवातीला भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत ‘जहाल युगाची’ सुरुवात झाली. ब्रिटीश राजवट भारतात आल्यावर जे बदल झाले, त्या बदलांना प्रतिक्रिया म्हणून म्हणून भारतात राष्ट्रवादाचा उदय झाला. त्यातून १८८५ साली कॉंग्रेसची स्थापना झाली. त्यानंतर १९०५ पर्यंत कॉंग्रेसवर मवाळ नेत्यांचे वर्चस्व होते. पण मवाळ नेत्यांची काम करण्याची पद्धती तरुणांना मान्य नव्हती. त्यामुळे “१९ व्या शतकाच्या शेवटी कॉंग्रेसमध्ये जेष्ठ नेत्यांच्या ध्येयधोरणांना आव्हान देणारा तरुण राष्ट्रावाद्यांचा एक गट कॉंग्रेसमध्ये संघटित झाला. ज्यामध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल, लाला लजपतराय (लाल, बाल, पाल)या नेत्यांचा समावेश होता. या तरुणांनी सरकारला वठणीवर आणण्यासाठी स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण या मार्गाचा अवलंब केला. या राष्ट्रवादी गटाला ‘जहाल’ असे म्हणतात तर त्यांचा प्रभाव असलेल्या १९०५ ते १९२० या  काळाला ‘जहालांचा कालखंड’ असे म्हणतात.

अ.जहालांची  विचारसरणी/तत्त्वज्ञान:  (जहालवाद म्हणजे काय?)

१.लोकमान्य टिळकांची चतुःसूत्री :

a.स्वराज्य :

                           ‘स्वतःच्या देशात स्वतःचे शासन असणे’ याला ‘स्वराज्य’ म्हणतात. हा जहालांच्या विचारसरणीचा आधार होता. त्यासाठी ‘HOME RULE’ (होम रूल) हे आंदोलन सुरु केले.

b.बहिष्कार   :

                           इंग्रजाची भारतातील शक्ती व्यापारात आहे. या भारतातील त्यांच्या शक्तीचा आधार काढून कणा मोडण्यासाठी परदेशी मालावर बहिष्कार टाकायचा.

क.स्वदेशी  :

                           स्वराज्याची प्रगती साधण्यासाठी ‘आपल्या देशात तयार झालेल्या वस्तू वापरणे’ यालाच ‘स्वदेशी’ म्हणतात.  परदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकल्यानंतर ज्या वस्तूंची कमतरता निर्माण होईल त्यासाठी स्वदेशी हा पर्याय असेल.

d.राष्ट्रीय शिक्षण  :

                           पाश्चात्य शिक्षण आपल्या देशाबद्दल प्रेम निर्माण करत नाही. राष्ट्रप्रेमाने भारावलेली पिढी तयार करण्यासाठी त्यांना त्या प्रकारचे शिक्षण द्यावे लागेल म्हणून जहालानी ‘राष्ट्रीय शिक्षणाचा पुरस्कार’ केला.

२.प्रत्यक्ष कृतीवर भर  :

                           जहालांचा नेमास्तांच्या सनदशीर राजकारणाच्या मार्गावर विश्वास नव्हता. अर्ज, विनंती, चर्चा, अधिवेशने, शिष्टमंडळ, इ. मार्ग या तरुण जहालाना मान्य नव्हते. यापेक्षा आता जनतेची चळवळ उभारून प्रत्यक्ष कृती करावी राज्यकर्त्यावर दडपण आणावे व आपल्या मागण्या मान्य करून घाव्यात अशी या जहालांची विचारसरणी होती. लोकमान्य टिळक म्हणतात, “राजकीय अधिकार मिळवायचे असतील तर आता लढावे लागेल, इंग्रजांवर प्रचंड दबाव आणावा लागेल, अधिकार प्राप्तीसाठी आता बलिदानाची तयारी ठेवावी लागेल.”

३.प्रखर राष्ट्रवादाचा पुरस्कार :

                           बहुजन समाजाला चळवळीत सामील करून घेण्यासाठी प्रखर राष्ट्रवादाचा पुरस्कार जहाल नेत्यांनी केला. राष्ट्राभिमान जागृत करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप इ. इतिहासातील महान व्यक्तींना स्फूर्तिस्थाने बनवले. त्यासाठी लोकमान्य टिळकांनी ‘शिवजयंती’ उत्सव सुरु केला. शिक्षणासाठी इंग्रजी ऐवजी मातृभाषेचा आग्रह धरला. कारण मातृभाषेतील शिक्षण सर्वसामान्यांना पटकन समजते. त्यासाठी राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा सुरु केल्या. राष्ट्रवादाची भावना जागृत करण्यासाठी धार्मिक भावनांचा वापर केला. त्यासाठी ‘गणेशोत्सव’, ‘दुर्गापूजा’ या उत्सवाचा वापर केला.

४.प्राचीन धर्माचे व संस्कृतीपासून प्रेरणा :`

                           फक्त ‘पाश्चात्य तेच श्रेष्ठ आणि आपण कनिष्ट’ अशी न्युनगंडाची भावना भारतीयात तयार झाली होती. त्यामुळे प्राचीन धर्म आणि संस्कृती यांचा श्रेष्ठत्व समाजसुधारकांनी प्रतिपादित केले होते. स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती, अॅनी बेंझट यांनी आत्मसन्मानाची भावना निर्माण केली होती. जहालानी याच प्रेरणेचा वापर करून स्वधर्म, स्वभाषा, स्वसंस्कृती बद्दल प्रेम निर्माण केले.        

ब.जहालांची  उदयाची कारणे :

१.आंतरराष्ट्रीय घटनांचा प्रभाव  :

                           हिंदी स्वातंत्र्याची चळवळ सुरु असताना आंतरराष्ट्रीय क्षेत्रात घडत असलेल्या घटनांचा तिच्यावर अप्रत्यक्ष परिणाम होत होता. सन १८९१ साली अॅबिसिनियाने (आफ्रिका खंडातील देश) इटलीचा पराभव केला. १९०५ साली जपानने रशियाचा पराभव केला. या दोन्ही युद्धात युरोपियनांचा पराभव झाला. या घटनामुळे युरोपियन संस्कृती श्रेष्ठ आहे. त्यामुळे ती अजिंक्य राष्ट्रे आहेत. त्यांचा पराभव अन्य खंडातील लोक करू शकत नाहीत, ही भावना आशियाई लोकांमधून नष्ट झाली. हिंदी समाजानेही मनात आणले तर ते इंग्रजांवर मात करू शकतात ही  भावना वाढीस लागली.

२.मवाळांचे अपयश  :

                           दरवर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात चार दिवसांसाठी एकत्र यायचे. चर्चा करायची. ठराव करायचे. शासनाकडे पाठवायचे व शासनाने त्याला कचराकुंडी दाखवायची हा मवाळांचा मार्ग तरुणांना निरर्थक वाटू लागला. या मवाळांच्या अपयशामुळे जहालांचा उदय झाला.    .

२.नैसर्गिक आपत्ती व शासनाची उदासीनता  :

                           १९ व्या शतकाच्या शेवटी हिंदी जनतेला भयंकर दुष्काळ व प्लेगच्या साथीना सामोरे जावे लागले. १८९६-९७ साली देशात भीषण दुष्काळ पडला. हा आतापर्यंच्या इंग्रजी राजवटीतील सर्वात भयंकर दुष्काळ होता. या दुष्काळाचा तडाखा २ कोटी लोकांना बसला व हजोर लोकांचे भूकबळी गेले. सरकारला याबद्दल काहीही देणेघेणे नव्हते. सरकारने याकडे हेतुपूर्वक दुर्लक्ष केले. साहजिकच हिंदी जनतेचे हाल व सरकारचे धोरण बघून हिंदी तरुणांची डोकी भडकू लागली.

                           लवकरच १८९९-१९०० साली पूर्वीपेक्षा भीषण दुष्काळ पडला. यातही हजारो लोक मृत्यूमुखी पडले. त्यातच पुण्यासारख्या ठिकाणी प्लेगची साथ आली. प्लेगच्या नावाखाली सरकारने लोकांवर अत्याचार केले. त्यामुळे हिंदी तरुणांच्या मनात राग उत्पन्न झाला. नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासठी लोकांची आर्थिक उन्नती होणे आवश्यक होते आणि जोपर्यंत सरकार हिंदी लोकांच्या पिळवणूकीचे धोरण सोडणार नाही तोवर हिंदी लोकांना अन्नान करून मरण्याची वेळ येणार होती. याला एकच मार्ग होता, तो म्हणजे लोकांचे संघटन करून सरकारचा प्रतिकार करणे या विचारातून जहालवाद पुढे आला.                                                                                                                                                                  

३.१८९२ च्या कायद्याने केलेली निराशा :

                           १८९२ साली सरकारने कायदा केला. त्या कायद्यानुसार हिंदी लोकांचे प्रतिनिधित्व वाढवण्यात आले होते. पण हे प्रतिनिधित्व पुरेसे नव्हते कारण व्हाईसरायच्या कार्यकारणीत सरकारनियुक्त लोकांचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे लोकनियुक्त प्रतिनिधी सरकारच्या निर्णयांवर फारसा प्रभाव पाडू शकत नव्हते. कॉंग्रेसच्या व्यासपिठावरून वारंवार हे प्रतिनिधित्व वाढवून मिळावेत यासाठी सरकारला ठराव पाठवले गेले पण सरकारवर याचा कोणताच परिणाम होत नव्हता हे पाहून हिंदी राष्ट्रवादी तरुण अस्वस्थ होऊ लागले. आता अधिक प्रभावी मार्गाचा अवलंब करण्याची आवश्यकता या तरुणांना वाटू लागली. त्यासाठी सरकारवर दबाव आणण्याची टिळकांची विचारसरणी जहालवादाचे प्रतिक बनले.

४.प्राचीन धर्माचे व संस्कृतीचे पुनरुजीवन  :`

आर्य समाज

स्वामी दयानंद सरस्वती

रामकृष्ण मिशन

स्वामी विवेकानंद

थिओसोफ़िकल सोसायटी

अॅनी बेंझट

                           इंग्रजी शिक्षणामुळे भारतात सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी सुरु झाल्या. यातील काही संस्थांनी प्राचीन धर्म आणि संस्कृती यांचा श्रेष्ठत्व समाजसुधारकांनी प्रतिपादित केले होते. ज्यामध्ये आर्य समाज, रामकृष्ण मिशन, थिओसोफ़िकल सोसायटी यांचा  समावेश होतो.

यांनी सांस्कृतिक पुनरुजीवनाच्या चळवळीस गती आणली. ज्यामुळे देशात नवा जोम, नवा उत्साह निर्माण झाला. कला,साहित्य, विज्ञान अशा क्षेत्रात भारतीय लोक चमकू लागले. बकीमचन्द्र चॅटर्जी, रवींद्रनाथ टागोर यांनी श्रेष्ठ साहित्य निर्माण केले. या पुनरुजीवनाच्या चळवळीमुळे भारतीयांना स्वतःच्या संस्कृतीबद्दल अभिमान वाटू लागला. तत्वज्ञान व धर्म या क्षेत्रात प्राचीन भारतीयांची कामगिरी जगात श्रेष्ठ होती असे उदगार ज्यावेळी   अॅनी बेंझट यांनी काढले असतील त्यावेळी निश्चित भारतीयांना त्याचा अभिमान वाटला असेल. यात शंका नाही.

५.लॉर्ड कर्झनची दडपशाही:

                           लॉर्ड कर्झन हा पक्का साम्राज्यवादी व्हाईसराय होता. त्याचा हिंदी माणसाच्या कार्यक्षमतेवर विश्वास नव्हता. इंग्रज हे श्रेष्ठ वंशांचे असून दुसऱ्यावर राज्य करण्यासाठी ते पृथ्वीवर आले आहेत. हिंदी लोक त्यांची कधीच बरोबरी करू शकत नाहीत, अशी त्याची विचारसरणी होती.

                           युरोपियन संस्कृतीचा त्याला गर्व होता. हिंदू संस्कृती कनिष्ट दर्जाची आहे. असा त्याचा समज होता.ज्या  भूमीत वेद उपनिषदे, गीता निर्माण झाली, ज्या भूमीत भगवान गौतम बुध्द व महावीर निर्माण झाले, त्या भूमीवर आपण हे उदगार काढत आहोत, याचा विसर त्याला पडला. त्याच्या या उद्दाम वूत्तीमुळे भारतीय तरुणांची माथी भडकल्याशिवाय राहणार नव्हती. कर्झन येथेच थांबला नाही. त्याने The Official Secrets Act, The Culcutta Corporation Act, Indian Universities Act  यासारख्या कायद्यांनी कारभार सुधारण्याच्या नावाखाली त्याने भारतीयांचे हक्क हिरावून घेतले. 

६.बंगालची फाळणी   :

                           लॉर्ड कर्झनचा सर्वात वादग्रस्त निर्णय म्हणजे बंगालची फाळणी होय. बंगाल प्रांत आकाराने खूप मोठा आहे त्यामुळे प्रशासनाच्या सोयीसाठी आम्ही बंगालची फाळणी करत आहोत असे कर्झनचे मत होते. पण फाळणी करताना मुस्लीम बहुसंख्य असलेला पूर्व बंगाल प्रांत बाजूला काढला यामागे हिंदू-मुस्लीमांमध्ये फुट पाडणे हा खरा हेतू होता. या त्याच्या कृत्यामुळे फाळणीला विरोध करणारे आंदोलन सुरु झाले. त्यातूनच जहाल चळवळीची वाट मोकळी झाली.

७.लाल-बाल-पाल यांचे नेतृत्व  :

                           महाराष्टातील नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे ‘बाल’ या नावानेही ओळखले जातात. ते कॉंग्रेसचे संस्थापक सदस्य होते. टिळकांनी, आगरकर व विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या मदतीने १८८० साली पुण्यात ‘न्यू इंग्लिश स्कूल’ ही शाळा काढली. ही शाळा ‘राष्ट्रीय शिक्षण’ देणारी शाळा होती. पुढे लोकांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी ‘केसरी’(मराठी)’‘मराठा’(इंग्रजी) हि वर्तमानपत्रे सुरु केली. तरुणानी संघटीत व्हावे, त्यांच्यात देशप्रेम निर्माण व्हावे म्हणून १८९३ मध्ये ‘गणेशोत्सव’ व १८९५ मध्ये ‘शिवजयंती’ उत्सव सुरु केली. १८९६-९७ साली महाराष्ट्रात प्लेगची साथ आली. प्लेगच्या साथीच्या नावाखाली सरकारने अनन्वित अत्याचार केला. ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’, ‘राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे’ या लेखांद्वारे सरकारची कडक शब्दात कानउघडणी केली. सरकारच्या अन्यायाचा राग येऊन चाफेकर बंधूनी पुण्याचा प्लेग कमिशनर रँडचा वध केला. चाफेकरांना फाशीची शिक्षा झाली व खुनाला टिळकांनी चिथावणी दिली म्हणून टिळकांना राजद्रोहाच्या आरोपाखाली अठरा महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा केली.

                           ‘पाल’ म्हणजे बिपिनचंद्र पाल होय. बिपीनचंद्र पाल व अरविंद घोष हे बंगालमधील दोन महत्वाचे जहाल नेते होते. त्यांनी ‘न्यू इंडिया’बंगाली’, या वर्तमानपत्राद्वारे बंगालमध्ये जहाल विचारांचा प्रसार केला. शिवजयंती व कालीपुजेच्या माध्यमातून युवकांना संघटित केले.

                           तर ‘लाल’ म्हणजे लाला लजपतराय होय. त्यांनी पंजाबमध्ये जहाल विचारांचा प्रसार केला.

A.                              जहालांची कामगिरी  : स्वदेशी चळवळ :

१.                                             बंगालची फाळणी(वंगभंग) विरोधी चळवळ -

                           लॉर्ड कर्झनचा सर्वात वादग्रस्त निर्णय म्हणजे ‘बंगालची फाळणी’ होय. बंगाल प्रांत अजगरासारखा पसरलेला होता. त्यात बिहार, ओरिसा व बंगाल हे प्रदेश समविष्ट होते. त्याचे क्षेत्रफळ १ लाख ९० हजार चौरस मैल होता, तर त्याची लोकसंख्या ८ कोटी एवढी प्रचंड होती. अशा या प्रदेशाचे प्रशासन सांभाळणे हे फार अवघड काम होते. हे कारण पुढे करून लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करण्याचा निर्णय घेतला. खरेतर बंगालच्या फाळणीची योजना १९०३ मध्ये सर अॅण्ड्र्यू फेझर यांनी तयार केली होती. पण फाळणी करताना मुस्लीम बहुसंख्य असलेला पूर्व बंगाल प्रांत बाजूला काढला. यामागे हिंदू-मुस्लीमांमध्ये फुट पाडणे हा खरा हेतू होता. या त्याच्या कृत्यामुळे फाळणीला विरोध करणारे आंदोलन सुरु झाले. त्यातूनच जहालवादी नेत्यांच्या हातात स्वातंत्र्य  आंदोलनाची सूत्रे गेली.

                           बंगालच्या फाळणीची घोषणा बॉम्बप्रमाणे बंगाली लोकांवर कोसळली. बंगाली लोकांची राष्ट्रीय अस्मिता खंडित करून त्यांची अवहेलना करण्याचा सरकारी डाव बंगाली लोक सहन करणार नव्हते. ‘सरकारने ही फाळणीची योजना मागे घेतली नाही, तर त्यास एका खंबीर राष्ट्रीय लढ्यास सामोरे जावे लागेल आम्ही एका न भूतो न भविष्यतो अशा आंदोलनाच्या उंबरठ्यावर उभे आहोत.’ असा इशारा बाबू सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी आपल्या बंगाली या वर्तमानपत्रात दिला आणि या इशाऱ्याप्रमाणे अभूतपूर्व असा लढा बंगालमध्ये सुरु झाला. शहरातून व खेड्यातून हजारो निषेधसभा भरल्या जाऊ लागल्या. काही ठिकाणी तर ५० हजारांच्या सभा झाल्या. वर्तमानपत्रांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. सर्व देशभर फाळणीविरोधी आंदोलन सुरु झाले.

      १.१:फाळणीच्या दिवशी......

                               १६ ऑक्टोबर १९०५ रोजी बंगालची फाळणी अमलात येणार होती हा दिवस ‘शोक दिवस’ म्हणून पाळण्यात आला. बंगाली लोकांमधील ऐक्य दाखवण्यासाठी लोकांनी गंगा नदीत स्नान केले, उपवास केला. या दिवशी लोकांनी एकमेकांना राखी बांधावी हि कल्पना गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी मांडली. आम्ही बंधू-बंधू असून आमचे ऐक्य कोणीही दुभंगू शकत नाही असा याचा अर्थ लावण्यात आला. जमीनदार, व्यापारी, वकील, विद्यार्थी, स्त्रिया उत्स्फूर्तपणे चळवळीत सामील झाल्या.

२.                                             बहिष्कार आंदोलन  -

                           फाळणीविरोधी आंदोलनात सरकारला वठणीवर आणण्यासाठी ‘बहिष्कार’ अस्त्राचा वापर बंगाली लोकांनी सुरु केला. कलकत्त्याच्या टाऊन हॉल मध्ये प्रचंड निषेध सभा भरली, इतके लोक आले कि सभा तीन ठिकाणी भरवावी लागली. ‘जोपर्यंत बंगालची फाळणी रद्द होत नाही तोपर्यंत ‘इंग्रजी मालावर बहिष्कार’ टाकण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.’ कापड, साखर, कागद, औषधे, रसायने, खेळणी, मीठ, दारू, सिगारेट, अशा परकीय मालावर बहिष्कार टाकला. परकीय मालाच्या होळ्या पेटवण्यात आल्या. यामुळे इंग्रजी मालाचा खप कमी होऊ लागला. या बहिष्काराच्या चळवळीमुले स्वदेशी चळवळीला उत्तेजन मिळाले

३.                                             स्वदेशीला उत्तेजन  -

                           स्वदेशी चळवळीमुळे स्वदेशी उद्योगांना चालना मिळाली. कापड, साबण, आगपेट्या, बँक, विमा, इ.स्वदेशी उपक्रमांना सुरुवात झाली. बंगालमध्ये प्रफुल्लचंद्र रॉय यांनी ‘बंगाल केमिकल्स’ हा स्वदेशी रसायन कारखाना सुरु केला.

४.                                            राष्ट्रीय शिक्षण  -

                           राष्ट्रीय शिक्षणाचा प्रारंभ पुण्यात टिळक, आगरकर व चिपळूणकर न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापना करून केला होता. बंगालमध्ये सुरेन्द्रनाथानी व पंजाबमध्ये आर्य समाजाने  राष्ट्रीय शिक्षणाची चळवळ सुरु केली होती. वंगभंग विरोधी चळवळीत या कार्याला गती आली. हजारो विद्यार्थ्यांनी सरकारी शाळांवर बहिष्कार टाकला व राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शाळात प्रवेश केला. तीन वर्षात ३०० प्राथमिक शाळा, २५ माध्यमिक शाळा सुरु झाल्या. रवींद्रनाथ टागोर यांची जगप्रसिध्द ‘शांतीनिकेतन’ या शाळेची स्थापना याच काळात झाली.

५.                                            पारंपारिक सणांना नवे रूप   -

                           लोकांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी व संघटन घडवण्यासाठी शिवजयंती, गणेशोत्सव, दुर्गापूजा या सणांचा आधार घेण्यात आला. पारंपारिक लोकसंगीत, चित्रकला, नाट्य यांना नव्याने महत्व देण्यात आले.

६.                                             चळवळीचे सामाजिक व सांस्कृतिक स्वरूप    -

                           जातीप्रथा, बालविवाह, हुंडा, मद्यपान या सामाजिक कुप्रथाना विरोध करणे हाही आंदोलनाचा एक भाग बनला. चळवळीला स्फूर्ती देणारी अनेक देशभक्तीपर गीते लिहिली गेली. रवींद्रनाथ टागोरांनी ‘आमार सोनार बांगला’ हे गीत याच चळवळीत लिहिले. हे गीत पुढे बांगलादेशने आपले राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले. चित्रकलेत युरोपियन शैलीऐवजी मुघल, राजपूत, अजंठा, या भारतीय शैलींचा स्वीकार करण्यात आला. या काळात बंकिमचंद्र चटर्जींनी लिहलेल्या ‘आनंदमठ’ कादंबरीतील ‘वंदेमातरम’ हे गीत अत्यंत लोकप्रिय झाले. ‘वंदे मातरम’ शब्द उच्चारणे हा गुन्हा ठरला.

७.                                            सरकारची दडपशाही-

                           सरकाने शाळा व महाविद्यालयांना अनुदान बंद करण्याची धमकी दिली, सभा उधळल्या, गोळीबार केला. अनेकांना हद्दपारीची शिक्षा दिल्या, वृत्तपत्रांवर निर्बंध आणले. लाल लजपतरायना अटक केली. टिळकांवर राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना ६ वर्षांची शिक्षा करण्यात आली. या सरकारच्या दडपशाहीमुळे चळवळ थंडावली.

B.                              निष्कर्ष :-

          बंगालमधील राष्ट्रवादी चळवळीला शह देण्यासाठी सरकारने बंगालची फाळणी केली. बंगालच्या फाळणीने जहालवादी आंदोलनाची सुरुवात झाली. ‘स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण’ या टिळकांच्या ‘चतु:सुत्री’वर आधारे जहालांचे आंदोलन सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचले, या आंदोलनाचे हे पहिले मोठे यश होते. १९११ साली सरकारने बंगालची फाळणी रद्द केली हे आंदोलनाचे दुसरे यश होते. या चळवळीमुळे राष्ट्रवादाची भावना वाढीस लागली हे चळवळीचे तिसरे यश होते. या आंदोलनामुळे देशात नवचैतन्य निर्माण झाले. 

No comments:

Post a Comment

Featured Post

previous year question papers

http://www.unipune.ac.in/university_files/old_papers.htm

Popular Posts