Friday, 30 September 2022

युनिट २ : E. कला, कारागिरी व तंत्रज्ञान:


a. मातीची भांडी,        b.शिक्के,              c.मणी,    

d.प्रतिमा किंवा मूर्ती,     e.मातीच्या मूर्ती,

f.धातुकाम,        g.लिपी

 

a.मातीची भांडी :

मातीची भांडी बनवण्याचा व्यवसाय कसा होता?: मातीची भांडी तयार करणे हा एक मोठा व्यवसाय असावा. उत्खननात भांड्यांचे खूप मोठ्या प्रमाणात अवशेष सापडले आहेत. या भांड्यांवर विविध चित्रे काढली आहेत. पाणी साठवणे, धान्य साठवणे यासाठी भांड्यांचा वापर सर्रास केला जात होता. जमिनीत भांडे गाडून ठेवून त्याचा वापर सोने-चांदीचे अलंकार व मौल्यवान वस्तू लपवून ठेवण्यासाठी करत होते. तसेच शौचकूप व स्नानगृहातही मातीच्या भांड्याचा वापर केला आहे. एकूणच, भांड्याचे मोठ्या प्रमाणात सापडणारे अवशेष हा व्यवसाय मोठा व महत्वाचा असल्याचे साक्ष देतात.

भांडी बनवण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरत? त्यावर कोणती  कलाकुसर(art)काढत?: भांडी बनवण्यासाठी नदीकाठची माती वापरली आहे. त्यात बारीक वाळू व अभ्रक मिसळले आहे. ही भांडी लाकडी चाकावर तयार केली असावीत.(मात्र या चाकाचे अवशेष सापडलेले नाहीत) चाकावर तयार केलीली भांडी विशिष्ट अशा भट्ट्यांमध्ये भाजत असत. त्यांचे अवशेष सापडले आहेत. भट्टीच्या तळाला लाकडे रचत. त्यावर कच्ची मडकी ठेवत व भट्टी पेटवत असावेत. धूर जाण्यासाठी धुरांड्याची सोय केल्याचे दिसून येते.

या भाजलेल्या भांड्याना भगवा(गेरुआ) रंग देत. हा रंग हार्मुज(फारस खाडी) येथून आणत असावेत. नंतर त्यावर काळ्या रंगाने डिझाईन व चित्रे काढली आहेत. या कलाकारीत चौकोन, त्रिकोण, गोल, सूर्य, पक्षी, गवत खाणारे प्राणी, झाडावर बसलेले पक्षी, मानवी आकृती, लहान मुले. इ. अनेक चित्रे कोरली आहेत. लहान भांड्यांना लाल, हिरवा, पिवळा रंग दिला आहे. .

---------------------------------------

  b. शिक्के किंवा मुद्रा (Seals):

शिक्के व मुद्रा का महत्त्वाच्या आहेत? :

हडप्पा संस्कृतीतील ‘शिक्के’ किंवा ‘मुद्रा’(seals) हे या संस्कृतीच्या अभ्यासाचे एक महत्वाचे साधन आहे. या मुद्रा आकर्षक असून त्या चमकदार पांढऱ्या रंगाच्या आहेत. त्या हडप्पा संस्कृतीच्या जवळपास सर्वच ठिकाणी सापडतात. एकट्या मोहेंजोदडो येथे १२०० मुद्रा सापडल्या आहेत. या मुद्रा चौकोनी व आयताकार अशा दोन आकारात आहेत. चौकोनी मुद्रांवर पशु-पक्षांची चित्रे कोरली आहेत तर आयताकार मुद्रांवर लेख कोरले आहेत. या मुद्रांचा वापर मालावर शिक्का म्हणून मारण्यासाठी, चलन म्हणून, ताईत म्हणून, धार्मिक कार्यासाठी करत असतील.

मुद्रा बनवण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरत?:

या मुद्रा प्रामुख्याने सेलखडी किंवा जिप्सम पासून तर काही सियटायटच्या मऊ दगडात कोरून बनवल्या आहेत. जिप्समच्या दगडाला कठीण हत्याराने कापून आकार देत. त्याचा पृष्ठभाग चाकूने घासून गुळगुळीत बनवत. या गुळगुळीत पृष्ठभागावर छोट्या आकाराच्या छिन्नीने किंवा छोट्या चाकूने चित्र वा लेख कोरून काढत. नंतर या मुद्रा भाजत. 

सुप्रसिद्ध मुद्रा कोणत्या आहेत?:

या मुद्रांमधील सर्वाधिक प्रसिद्ध मुद्रा ‘पशुपती’ची आहे. मोहेंजोदडो येथे ही मुद्रा सापडली आहे. त्यावर एक व्यक्ती आसनावर बसली आहे. तिच्या डोक्यावर त्रिशुलाकार मुकुट आहे. ती ध्यानाला बसली आहे. तिच्या आसनाशेजारी हत्ती, वाघ, गेंडा, म्हैस, यांचे चित्र कोरली आहेत. यावरून इतिहास संशोधक मॉर्टीम व्हीलर यांनी निष्कर्ष काढला आहे की, ही देवता ‘पशुपती’ असावी तिलाच ‘शिव’ किंवा ‘शंकर’ असेही म्हणतात. म. के. ढवळीकर यांना मात्र हे मान्य नाही.

प्राण्यांची चित्रे कोरलेल्या मुद्रावर बैलाचे चित्र सर्वाधिक मुद्रांवर कोरले आहे. हा बैल धष्टपुष्ट असून, त्याला वळणदार शिंगे, उंच वशिंड, लांब पोळी आहे. तो आपल्याकडील ‘नंदीबैला’सारखा दिसतो. असे बैल सिंध प्रांतात आजही आढळतात.

याशिवाय एक शिंग असलेला एक प्राणीही (Unicorn) कोरला आहे. मात्र अशा कोणत्याच प्राण्याचे अवशेष आढळले नाहीत किंवा आजही असा प्राणी अस्तित्वात नाही. तो एक मिथक प्राणी असावा.

एका मुद्रेवर दोन सिंहाशी झुंजणारा एका व्यक्तीचे चित्र कोरले आहे. ही व्यक्ती बैबिलोनियामधील कथेतील गिल्मिशसारखी वाटते.

-----------------------------------------

C.मणी (BEEDS) :

मणी का महत्वाचे आहेत? :

हडप्पा संस्कृतीत मोठ्या प्रमाणात, विविध आकाराचे व विविध मोल्यवान दगडांचे व धातूंचे मणी व माळा सापडल्या आहेत. या मण्यांच्या अभ्यासावरून गरीब-श्रीमंत भेद लक्षात येतो, धार्मिक जीवनावर प्रकाश पडतो, व्यापाराची, व्यवसायाची माहिती मिळते त्यासाठीही मणी महत्वाचे आहेत.

मणी बनवण्याचा व्यवसाय कसा होता?:

मोठ्या प्रमाणात सापडणाऱ्या अवशेषावरून मणी बनवणे हा एक मोठा व प्रसिद्ध व्यवसाय असावा. सेलखडी, अगेट, कार्नेलीयन, लाजवर्द, इ. खड्यांपासून व सोने, चांदी, तांबे या धातूपासून तसेच शंख, माती इ. पासूनही मणी बनवत असत. या मण्यांचे अवशेष मोहेंजोदाडो, हडप्पा, चन्हुदाडो, बनवली, धोलाविरा, लोथल, सुरकोटडा, इ. ठिकाणी सापडले आहेत. सोबत मणी बनवणाऱ्या कारागीरांच्या वस्त्यांचे व त्यांच्या कारखान्यांचे अवशेषही सापडले आहेत. हडप्पा संस्कृतीतील हे मणी बनवणारे कारागिर मेसापोटेमियन संस्कृतीत गेले त्यांचा उल्लेख ‘मेलूहा’ असा येतो.

मणी बनवण्यासाठी कोणते तंत्रज्ञान व कला वापरत? :

हडप्पा संस्कृतीत मणी बनवण्याचे तंत्र प्रगत झाले होते. मोल्यवान खडे आयात करत. त्यावर कठीण व खर्चिक प्रक्रिया केली जात असे. अनेकवेळा तापवत, धातूच्या हत्याराने दगडाला कापून मण्याचा आकार देत. विशिष्ट टोकदार हत्याराने त्याला छिद्र पाडत. घासुन चमकदार बनवत(पॉलिश करत). असे तंत्र ठरले असल्याने मोठ्या प्रमाणात मणी तयार करणे शक्य झाले.

---------------------------------------------------  

मूर्तिकाम :

हडप्पा संस्कृतीतील मूर्ती का महत्वाच्या आहेत? : हडप्पा संस्कृतीत सापडलेल्या मातीच्या व धातूच्या मुर्त्या सापडतात. त्या तत्कालीन मुर्तीकलेची माहिती देतात. शिवाय लोकांच्या धर्मश्रद्धा, केशभूषा, शरीररचनेचे ज्ञान, नृत्यकला, वस्त्रे, अलंकार, इ. माहितीही मूर्त्यांच्या आधारे होते. त्यामुळे  मुर्त्या महत्वाच्या आहेत.

महत्वाच्या मुर्त्या कोणत्या आहेत? त्या काय माहिती देतात? :

हडप्पा संस्कृतीत प्रामुख्याने माती, दगड व धातूच्या मुर्त्या सापडतात. त्यातील सर्वात प्रसिद्ध मुर्त्या पुढीलप्रमाणे:

       मोहेंजोदडो येथे धर्मगुरुची मूर्ती’ सापडली आहे. ती चूनखडीच्या दगडाची आहे. तिची उंची २० सेंटीमीटर आहे. ही मूर्ती हडप्पा संस्कृतीत सापडलेल्या मुर्त्यांपैकी सर्वात मोठी मूर्ती आहे. या मूर्तीतील व्यक्ती पुरुष असून तिने आपल्या एका खांद्याभोवती शालीसारखे वस्त्र गुंडाळले आहे. त्यावर तीन पाकळ्यांच्या लाल रंगाची नक्षी कोरली आहे. मूर्ती अर्धी तुटली असल्याने कंबरेच्या खाली कोणते वस्त्र परिधान केले आहे ते लक्षात येत नाही. या व्यक्तीचे डोळे अर्धवट मिटलेले आहेत. त्यावरून ती ध्यानधारणा करत असावी  वा मूर्तीला दैवी भास देण्यासाठी डोळ्यांची रचना तशी केली असावी. मूर्तीतील व्यक्तीच्या डोक्यावर लांब केस असून ते बांधले आहेत. कपाळावर एक पट्टी बांधली आहे. त्याच्या मधोमध एक मणी जोडला आहे. अशीच पट्टी दंडावरही बांधली आहे. या व्यक्तीने दाढी वाढवली आहे मात्र मिशा काढून टाकल्या आहेत. तिच्या कानाला पाळीला भोक आहे. त्याचा वापर अलंकार घालण्यासाठी करत असावा. ही पुरोहित वा धर्मगुरूची आहे असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे तर काही संशोधक ती राजाची मूर्ती असावी असाही निष्कर्ष काढतात.

       याशिवाय अशीच एक ‘शिरोविहीन पुरुष मूर्ती’ हडप्पा येथेही सापडली आहे. मात्र त्या मूर्तीला शीर(मुंडके) नसून हात-पाय तुटले आहेत व फक्त धड शिल्लक आहे. या मूर्तीचे अवयव रेखीव आहेत, स्नायू पिळदार आहेत. या मूर्तीला डोके, हात, पाय हे सुट्टे-सुट्टे खोबणीत बसवण्याची सोय आहे. या मूर्तीवरून लक्षात येते की, या मूर्तीकाराला शरीररचनाशास्त्राचे चांगले ज्ञान होते. त्यावरून काही इतिहासकार ही मूर्ती हडप्पा संस्कृतीतील न मानता नंतरच्या काळातील मानतात. पण ज्या स्तरात ही मुती सापडली आहे त्यावरून ती हडप्पा काळातीलच आहे.

       ब्राँझच्या ‘नर्तिकेची मूर्ती’ हडप्पा संस्कृतीतील प्रसिद्ध मूर्ती आहे. ती मोहेंजोदडो येथे सापडली आहे. ती १० सेंटीमीटर उंचीची आहे. तिला Lost  Wax technique वापरून बनले असावे. या मूर्तीतील स्त्री डावा पाय गुडघ्यात वाकवून उभी आहे. डावा हात गुडघ्यावर ठेवला आहे. त्यावरून ती नृत्याच्या मुद्रेत उभी आहे असा संशोधकांनी निष्कर्ष काढला आहे.

        याशिवाय टेराकोटा फिगर्स’(Terracotta Figure) म्हणजे मातीच्या छोट्या-मोठ्या अनेक मुर्त्या आहेत. यामध्ये बैल, म्हैस, कुत्रा, माकड, इ. प्राण्याच्या मातीच्या मुर्त्या आहेत. यातील स्त्रीमूर्ती मातृदेवतेच्या असाव्यात असा निष्कर्ष अभ्यासकांनी काढला आहे. 

-------------------------------------------------------

धातुकाम :

धातू वितळवून त्यापासून विविध वस्तू बनविण्याची कला सिंधूवासियांना ज्ञात होती. हडप्पा संस्कृतीतील लोकांनी सोने, चांदी, तांबे, ब्राँझ, इ. धातू तयार करणे व त्यापासून विविध वस्तू तयार करण्याचे ज्ञान होते.

तांबे व ब्राँझ : हडप्पा संस्कृतीतील लोकांनी सर्वाधिक वापरलेला धातू ‘तांबे’ होता. तांब्यापासून चाकू, छिन्नी, बाणाची टोके, भाल्याची टोके, कुऱ्हाडी, तलवार, मासे पकडण्याचे गळ बनवले जात. हडप्पा, मोहेजोदडो, लोथल या ठिकाणी तांब्याच्या भट्टीचे(furnace) चे अवशेष सापडले आहे. तांबे व जस्त एकत्र करून ब्राँझ(कास्य) बनवत. ब्राँझपासून नर्तिकेची मूर्ती, बैल, पक्षी, कुत्रा इ. मुर्त्या मोहेंजोदडो येथे सापडल्या आहेत.

सोने : सोने या धातूचे सदैव मानवाला आकर्षण वाटले आहे. प्राचीन काळात स्वर्णधुळीला चाळून व धुऊन सोने हा धातू मिळवत असत. सोन्यापासून अलंकार बनवत असत. मात्र त्याचे सोन्याचे प्रमाण खूप कमी होते. त्यात चांदी अधिक प्रमाणात आहे.

चांदी : भारतात चांदीचा सर्वप्रथम वापर हडप्पा संस्कृतीतील लोकांनी केला. चांदीपासून भांडी व अलंकार बनवत.

लोथल येथे लोखंड या धातूचे अवशेष सापडले आहेत. मात्र हे शुद्ध लोखंड नाही. कच्च्या लोखंडापासून लोखंड शुद्ध करण्याची प्रक्रिया हडप्पातील लोकांना ज्ञात नसावी. कोठे सापडत नाहीत त्यावरून लोखंड हा धातू हडप्पा संस्कृतीतील लोकांना ज्ञात नव्हता.

 

---------------------------------

No comments:

Post a Comment

Featured Post

previous year question papers

http://www.unipune.ac.in/university_files/old_papers.htm

Popular Posts