Thursday, 22 December 2022

वाचणीय पुस्तके

वाचणीय पुस्तके
*०१) ययाती* = वि. स. खांडेकर 
*०२) वळीव* = शंकर पाटील
*०३) एक होता कार्वर* = वीणा गवाणकर
*०४) शिक्षण* = जे. कृष्णमूर्ती
*०५) अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम* = शंकरराव खरात
*०६) शिवाजी कोण होता*- गोविंद पानसरे
*०७) बनगरवाडी* = व्यंकटेश माडगुळकर
*०८) तीन मुले* = साने गुरुजी
*०९) तो मी नव्हेच* = प्र. के. अत्रे.
*१०) आय डेअर* = किरण बेदी
*११) तिमिरातुन तेजाकड़े*- डॉ. नरेंद्र दाभोलकर
*१२) मृत्युंजय* = शिवाजी सावंत
*१३) फकिरा* = अण्णाभाऊ साठे
*१४) जागर* - 
*१५) अल्बर्ट एलिस* - अंजली जोशी
*१६) प्रश्न मनाचे* - डॉ. हमीद आणि नरेंद्र दाभोलकर
*१७) समता संगर*- डॉ. नरेंद्र दाभोलकर
*१८) निरामय कामजीवन* = डॉ. विठ्ठल प्रभू
*१९) ठरलं डोळस व्हायचं*- डॉ. नरेंद्र दाभोलकर
*२०) मी जेव्हा जात चोरली* - बाबुराव बागुल
*२१) गोपाळ गणेश आगरकर* = ग. प्र. प्रधान
*२२) कुमारांचे कर्मवीर* - डॉ. द. ता. भोसले
*२३) खरे खुरे आयडॉल*- यूनिक फीचर्स
*२४) सत्याचे प्रयोग* = मो. क. गांधी
*२५) प्रकाशवाटा* - प्रकाश आमटे
*२६) अग्निपंख*- डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
*२७) लज्जा* - तसलीमा नसरीन
*२८) दैनंदिन पर्यावरण* - दिलीप कुलकर्णी
*२९) रणांगण* = विश्राम बेडेकर
*३०) बटाट्याची चाळ* = पु.ल.देशपांडे
*३१) श्यामची आई* = साने गुरुजी
*३२) माझे विद्यापीठ ( कविता )* = नारायण सुर्वे
*३३) बि-हाड* - अशोक पवार
*३४) व्यक्ति आणि वल्ली* = पु.ल.देशपांडे
*३५) माणदेशी माणसं* = व्यंकटेश माडगुळकर
*३६) उचल्या* = लक्ष्मण गायकवाड
*३७) अमृतवेल* = वि.स.खांडेकर
*३८) नटसम्राट* = वि.वा.शिरवाडकर
*३९) हिरवा चाफा* = वि.स.खांडेकर
*४०) क्रोंचवध* = वि.स.खांडेकर
*४१) झोंबी* = आनंद यादव
*४२) इल्लम* = शंकर पाटील
*४३) ऊन* = शंकर पाटील
*४४) झाडाझडती* = विश्वास पाटील
*४५) नाझी भस्मासुराचा उदयास्त* = वि.ग. कानिटकर
*४६) बाबा आमटे* = ग.भ.बापट
*४७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर* = शंकरराव खरात
*४८) इस्त्राइलची शेती*- 
*४९) बहाद्दुर थापा* - संतोष पवार
*५०) सेकंड सेक्स* - सिमोन
*५१) आई* = मोकझिम गार्की
*५२) स्वभाव , विभाव* = आनंद नाडकर्णी
*५३) बलुत* = दया पवार
*५४) कर्ण , खरा कोण होता* = दाजी पणशीकर
*५५) स्वामी* = रणजीत देसाई
*५६) वपुर्झा ( भाग १-२ )* = व. पु. काळे
*५७) पांगिरा* = विश्वास पाटील
*५८) पानिपत* = विश्वास पाटील
*५९) युंगंधर* = शिवाजी सावंत
*६०) छावा* = शिवाजी सावंत
*६१) श्रीमान योगी* = रणजीत देसाई
*६२) जागर खंड – १* = प्रा. शिवाजीराव भोसले
*६३) जागर खंड – २* = प्रा. शिवाजीराव भोसले
*६४) वावटळ*- व्यंकटेश माडगुळकर
*६५) ग्रेटभेट* - निखिल वागळे
*६६) भारताचा शोध* = पंडित जवाहरलाल नेहरू
*६७) गोष्टी माणसांच्या* = सुधा मूर्ती
*६८) वाईज अंड आदर वाईज*
*६९) उपेक्षितांचे अंतरंग* = श्रीपाद महादेव माटे
*७०) माणुसकीचा गहिवर* = श्रीपाद महादेव माटे
*७१) यश तुमच्या हातात* = शिव खेरा
*७२) आमचा बाप अन आम्ही* = डॉ. नरेंद्र जाधव
*७३) कोसला* = भालचंद्र नेमाडे
*७४) गांधीनंतरचा भारत*- रामचंद्र गुहा
*७५) आधुनिक भारताचे निर्माते*- रामचंद्र गुहा
*७६) नापास मुलांची गोष्ट* = अरुण शेवते
*७७) एका कोळियाने* = अन्रेस्ट हेमींग्वे
*७८) महानायक* = विश्वास पाटील
*७९) आहे आणि नाही* = वि. वा. शिरवाडकर
*८० ) चकवा चांदण* – एक विनोपनिषद = मारुती चितमपल्ली
*८१) मिरासदार*- द. मा. मिरासदार
*८२) सुरेश भट यांचे* सर्व कविता संग्रह
*८३) ग्रामगीता* = राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
*८४) स्पर्धा काळाशी*- अरुण टिकेकर, अभय टिळक
*८५) बदलता भारत*- भानु काळे
*८६) कोल्हाटयाचं पोरं*- किशोर काळॆ
*८७) साता उत्तराची कहानी*- ग. प्र. प्रधान
*८८) मध्ययुगिन भारताचा इतिहास*- मा. म. देशमुख
*८९) तोत्तोचान* = तेत्सुको कुरोयानागी
*९०) शिक्षक असावा तर …?* = गिजुभाई
*९१) समग्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर*- चांगदेव खैरमोडे
*९२) समग्र महात्मा फुले*- राज्य सरकार
*९३) झोत*- रावसाहेब कसबे
*९४) ओबामा* - संजय आवटे
*९५) एकेक पान गळावया*- गौरी देशपाडे
*९६) आई समजुन घेताना*- उत्तम कांबळे
*९७) छत्रपति शाहू महाराज* - जयसिंगराव पवार
*९८) अमृतवेल*- वि. स. खांडेकर
*९९) महात्म्याची अखेर*-जगन फडणीस
*१००) बुद्ध आणि त्याचा धम्म*- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Friday, 30 September 2022

F. हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाची कारणे

 

प्राचीन जगाच्या इतिहासात इजिप्त मधील इजिप्तशियन संस्कृती, चीनमधील चीनी संस्कृती, मध्य आशियातील मेसापोटेमिया किंवा बॅबिलोनीयन संस्कृती सोबतच भारतातील हडप्पा संस्कृती महत्वाची मानली जाते. या संस्कृतीतील नगररचना विशेषत: सांडपाण्याची व्यवस्था, नगर नियोजन, पक्क्य भाजलेल्या विटांचा वापर, वजनमाप, शेती व व्यापारातील कौशल्य, इ. वैशिष्टे तत्कालीन जगातील इतर कोणत्याही संस्कृतीत आढळत नाही. अशी ही संस्कृती इ.स.पु. १७५० पर्यंत ऱ्हास पावली. ही संस्कृती कोणत्या कारणामुळे नष्ट झाली असेल त्याची कारणे इतिहासकारांनी पुढीलप्रमाणे शोधून काढली आहेत.

१.             आर्यांच्या आक्रमणामुळे :

हडप्पा संस्कृती सिंधू नदीच्या खोऱ्यात होती. हडप्पाच्या ऱ्हासानंतर सिंधू व गंगा नदीच्या खोऱ्यात ‘वैदिक संस्कृती’चा उदय झाला. वैदिक संस्कृतीचे निर्माते आर्य लोक होते. भारतात खैबर खिंडीमार्गे आर्यांचे आगमन इ.स.पु. १५०० नंतर सुरु होते आणि याच काळात हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास होतो. यावरून हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास आर्यांच्या आक्रमणामुळे झाला असेल असा सिंद्धात इतिहासकार मांडतात. त्यांनी आपल्या मताच्या पुष्टीसाठी खालील पुरावे दिले आहेत.


i . आर्य लोक भटके, रानटी, युद्धप्रिय व पशुपालक होते. आर्यांजवळ लोखंडाची हत्यारे व घोडे होते. या दोन्हींची युद्धप्रिय आर्यांना युद्धात मदत होत होती. या आर्यांनी हडप्पा संस्कृतीतील नगरांवर आक्रमण केले असेल व ही नगरे नष्ट झाली असतील असा एक निष्कर्ष इतिहासकारांनी काढला आहे. कारण हडप्पा संस्कृतीतील लोक शांतताप्रिय, व्यापारी होते. त्यांच्याजवळ ब्राँझ(कास्य)ची हत्यारे व अवजारे होती, आर्यांची लोखंडाची हत्यारे सिंधूवासीयांच्या श्रेष्ठ होती. या शांतताप्रिय, ब्राँझची हत्यारे वापरणाऱ्या सिंधूवासियांचा रानटी युद्धप्रिय, लोखंडी हत्यारे वापरणाऱ्या आर्यांसमोर निभाव लागला नसेल.

ii. आर्यांची प्रमुख देवता ‘इंद्र’ होती. इंद्र देवांचा राजा व युद्धाचा देव होता. आर्यांचा प्रमुख ग्रंथ असेलेल ऋग्वेदात इंद्राला ‘पुरंधर’ असे म्हटले आहे. ‘पूर’ म्हणजे ‘नगर’, ‘पुरंधर’ म्हणजे ‘पुरांचा(नगरांचा) विध्वंस करणारा’ होय. ही नगरे हडप्पा संस्कृतीतील होती. असे इतिहासकारांचे मत आहे.

२.             पुरामुळे:



हडप्पा संस्कृती ही सिंधू नदीच्या खोऱ्यात होती. या सिंधू व सहा उपनद्यांना(झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज, सरस्वती) तिच्या उपनद्यांना वर्षांतून दोन वेळेस पूर येत होता. एकदा पावसाळ्यात पावसामुळे व दुसऱ्यांदा उन्हाळ्यात हिमालयातील बर्फ वितळून. या पुरापासून आपले रक्षण व्हावे म्हणून हडप्पा संस्कृतीतील शहरांना तटबंदी आहे. पण वारंवार येणाऱ्या महापुरामुळे नद्यांच्या काठावरील शहरे नष्ट झाली असतील किंवा महापुरांना कंटाळून लोकांनी इतरत्र स्थलांतर केले असेल. त्यामुळे शहरे ओस पडली असतील. उदा. सिंधू नदीच्या काठावरील हडप्पा शहर एकावर एक असे सात वेळा वसले आहे. प्रत्येक स्तरावर नदीतील वाळूचे अवशेष सापडतात. त्यावरून हे शहर सात वेळा आलेल्या पुरामुळे वारंवार नष्ट झाली असावी. त्यामुळे हे लोक शहर सोडून इतरत्र राहायला गेले असतील.

३.             दुष्काळामुळे:




हडप्पा संस्कृतीतील जी शहरे नद्यांच्या काठावर होती. त्यातील काही शहरे पुरामुळे नष्ट झाली असे इतिहासकार मानतात. पण जी शहरे नद्यांच्या काठावर नव्हती त्यांना हा पुरांचा सिद्धांत लागू होत नाही. अशी शहरे दुष्काळामुळे नष्ट झाली असावीत. दुष्काळामुळे काही शहरांजवळचे पाण्याचे साठे आटले असतील. त्यामुळे या शहरातील लोकांना इतरत्र स्थलांतर करावे लागले असेल. असा विचार इतिहासकारांच्या एका गटाने मांडला आहे.

४.             भूकंपामुळे :



काही संशोधकांच्या मते भूकंपामुळे ही शहरी संस्कृती नष्ट झाली असेल. एकतर भूकंपामुळे वास्तूंची पडझड झाली असावी. दुसरीकडे भूकंपामुळे नद्यांच्या पात्रात बदल झाला असेल व नद्यांचे पाणी शहरात घुसले असेल व शहरे राहण्यास लायक राहिली नसतील. त्यामुळे शहरातील लोकांनी इतरत्र स्थलांतर केले असावे.

५.             भूगर्भातील हालचालीमुळे:




बऱ्याचवेळा नैसर्गिकरित्या भूगर्भीतील समुद्राची पातळी आत सरकली जाते किंवा समुद्र मानवी वस्तीत आक्रमण करतो. असे हडप्पा संस्कृतीतही झाले असावे, असे काही संशोधकांना वाटते. हडप्पा संस्कृतीची जी बंदरे असणारी शहरे समुद्राच्या काठाला होती, त्यातील काही बंदर असणारी शहरे समुद्र आत सरकल्यामुळे ओस पडली. तर काही शहरे समुद्राने आक्रमण केल्यामुळे नष्ट झाली असावीत. उदा. लोथल(गुजरात)येथे जहाजाची गोदी होती(जहाजाची गोदी म्हणजे जिथे जहाजे तयार, दुरुस्त केले जातात किंवा थांबतात असे ठिकाण.), सद्या हे लोथल समुद्रापासून ५ किमी लांब आहे, याचा अर्थ समुद्र आत सरकारला व लोथल बंदर ओस पडले, लोथल शहर नष्ट झाले.

६.             व्यापारातील घट :



हडप्पा  संस्कृतीतील  शहरे ही व्यापारामुळे निर्माण झाली होती. यामुळे शहरांचे अस्तित्व व्यापारावर अवलंबून होते. आर्यांची आक्रमणे, पूर, दुष्काळ, भूकंप, भूगर्भातील हालचाली या आपत्तींचा परिणाम व्यापारावर झाला असेल. त्यामुळे व्यापाराचे मार्ग बदलले असतील व व्यापारी मार्ग बदलल्याने शहरांमधून होणारा व्यापार थंडावला असेल व शहरे ओस पडली असतील. असा निष्कर्ष सुप्रसिद्ध इतिहासकार इरफान हबीब यांनी काढला आहे.

निष्कर्ष :

वरील चर्चेवरून लक्षात येते कि,

i. हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास हा कोणत्याही एका कारणाने झालेला नाही. काही शहरे आर्यांच्या आक्रमणामुळे, काही शहरे पुरामुळे, काही शहरे भूकंप, भूगर्भातील हालचालीमुळे नष्ट झाली.

ii. शहरे नष्ट झाली असली तरी संपूर्ण संस्कृती एकाच वेळी अचानक नष्ट झाली नाही. या संस्कृतीतील सर्वच्यासर्व लोक एकाच वेळी मृत्युमुखी पडलेले नाहीत.(तसा पुरावा सापडत नाही.) शहरातील इमारती, बंदरे, सारख्या इ. भौतिक बाबी नष्ट झाल्या. पण हडप्पा संस्कृतीतील धर्म, अध्यात्म, शेतीचे ज्ञान, व्यवसायिक कौशल्य, विज्ञान-तंत्रज्ञान, इ. गोष्टी नष्ट झाल्या नाहीत. त्या या शहरातून इतरत्र स्थलांतर केलेल्या लोकांसोबत ग्रामीण भागात नेल्या. शहरे राहायला लायक नसल्यामुळे हे लोक इतरत्र ग्रामीण भागात राहायला गेले असतील व त्यांनी या हडप्पा संस्कृतीतील वरील सर्व बाबी आपल्या सोबत ग्रामीण भागात नेल्या असा निष्कर्ष काढता येऊ शकतो कारण हडप्पानंतर सिंधू नदीच्या खोऱ्यात उत्तर हडप्पा संस्कृती उदयास आल्याचे दिसून येते.

युनिट २ : E. कला, कारागिरी व तंत्रज्ञान:


a. मातीची भांडी,        b.शिक्के,              c.मणी,    

d.प्रतिमा किंवा मूर्ती,     e.मातीच्या मूर्ती,

f.धातुकाम,        g.लिपी

 

a.मातीची भांडी :

मातीची भांडी बनवण्याचा व्यवसाय कसा होता?: मातीची भांडी तयार करणे हा एक मोठा व्यवसाय असावा. उत्खननात भांड्यांचे खूप मोठ्या प्रमाणात अवशेष सापडले आहेत. या भांड्यांवर विविध चित्रे काढली आहेत. पाणी साठवणे, धान्य साठवणे यासाठी भांड्यांचा वापर सर्रास केला जात होता. जमिनीत भांडे गाडून ठेवून त्याचा वापर सोने-चांदीचे अलंकार व मौल्यवान वस्तू लपवून ठेवण्यासाठी करत होते. तसेच शौचकूप व स्नानगृहातही मातीच्या भांड्याचा वापर केला आहे. एकूणच, भांड्याचे मोठ्या प्रमाणात सापडणारे अवशेष हा व्यवसाय मोठा व महत्वाचा असल्याचे साक्ष देतात.

भांडी बनवण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरत? त्यावर कोणती  कलाकुसर(art)काढत?: भांडी बनवण्यासाठी नदीकाठची माती वापरली आहे. त्यात बारीक वाळू व अभ्रक मिसळले आहे. ही भांडी लाकडी चाकावर तयार केली असावीत.(मात्र या चाकाचे अवशेष सापडलेले नाहीत) चाकावर तयार केलीली भांडी विशिष्ट अशा भट्ट्यांमध्ये भाजत असत. त्यांचे अवशेष सापडले आहेत. भट्टीच्या तळाला लाकडे रचत. त्यावर कच्ची मडकी ठेवत व भट्टी पेटवत असावेत. धूर जाण्यासाठी धुरांड्याची सोय केल्याचे दिसून येते.

या भाजलेल्या भांड्याना भगवा(गेरुआ) रंग देत. हा रंग हार्मुज(फारस खाडी) येथून आणत असावेत. नंतर त्यावर काळ्या रंगाने डिझाईन व चित्रे काढली आहेत. या कलाकारीत चौकोन, त्रिकोण, गोल, सूर्य, पक्षी, गवत खाणारे प्राणी, झाडावर बसलेले पक्षी, मानवी आकृती, लहान मुले. इ. अनेक चित्रे कोरली आहेत. लहान भांड्यांना लाल, हिरवा, पिवळा रंग दिला आहे. .

---------------------------------------

  b. शिक्के किंवा मुद्रा (Seals):

शिक्के व मुद्रा का महत्त्वाच्या आहेत? :

हडप्पा संस्कृतीतील ‘शिक्के’ किंवा ‘मुद्रा’(seals) हे या संस्कृतीच्या अभ्यासाचे एक महत्वाचे साधन आहे. या मुद्रा आकर्षक असून त्या चमकदार पांढऱ्या रंगाच्या आहेत. त्या हडप्पा संस्कृतीच्या जवळपास सर्वच ठिकाणी सापडतात. एकट्या मोहेंजोदडो येथे १२०० मुद्रा सापडल्या आहेत. या मुद्रा चौकोनी व आयताकार अशा दोन आकारात आहेत. चौकोनी मुद्रांवर पशु-पक्षांची चित्रे कोरली आहेत तर आयताकार मुद्रांवर लेख कोरले आहेत. या मुद्रांचा वापर मालावर शिक्का म्हणून मारण्यासाठी, चलन म्हणून, ताईत म्हणून, धार्मिक कार्यासाठी करत असतील.

मुद्रा बनवण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरत?:

या मुद्रा प्रामुख्याने सेलखडी किंवा जिप्सम पासून तर काही सियटायटच्या मऊ दगडात कोरून बनवल्या आहेत. जिप्समच्या दगडाला कठीण हत्याराने कापून आकार देत. त्याचा पृष्ठभाग चाकूने घासून गुळगुळीत बनवत. या गुळगुळीत पृष्ठभागावर छोट्या आकाराच्या छिन्नीने किंवा छोट्या चाकूने चित्र वा लेख कोरून काढत. नंतर या मुद्रा भाजत. 

सुप्रसिद्ध मुद्रा कोणत्या आहेत?:

या मुद्रांमधील सर्वाधिक प्रसिद्ध मुद्रा ‘पशुपती’ची आहे. मोहेंजोदडो येथे ही मुद्रा सापडली आहे. त्यावर एक व्यक्ती आसनावर बसली आहे. तिच्या डोक्यावर त्रिशुलाकार मुकुट आहे. ती ध्यानाला बसली आहे. तिच्या आसनाशेजारी हत्ती, वाघ, गेंडा, म्हैस, यांचे चित्र कोरली आहेत. यावरून इतिहास संशोधक मॉर्टीम व्हीलर यांनी निष्कर्ष काढला आहे की, ही देवता ‘पशुपती’ असावी तिलाच ‘शिव’ किंवा ‘शंकर’ असेही म्हणतात. म. के. ढवळीकर यांना मात्र हे मान्य नाही.

प्राण्यांची चित्रे कोरलेल्या मुद्रावर बैलाचे चित्र सर्वाधिक मुद्रांवर कोरले आहे. हा बैल धष्टपुष्ट असून, त्याला वळणदार शिंगे, उंच वशिंड, लांब पोळी आहे. तो आपल्याकडील ‘नंदीबैला’सारखा दिसतो. असे बैल सिंध प्रांतात आजही आढळतात.

याशिवाय एक शिंग असलेला एक प्राणीही (Unicorn) कोरला आहे. मात्र अशा कोणत्याच प्राण्याचे अवशेष आढळले नाहीत किंवा आजही असा प्राणी अस्तित्वात नाही. तो एक मिथक प्राणी असावा.

एका मुद्रेवर दोन सिंहाशी झुंजणारा एका व्यक्तीचे चित्र कोरले आहे. ही व्यक्ती बैबिलोनियामधील कथेतील गिल्मिशसारखी वाटते.

-----------------------------------------

C.मणी (BEEDS) :

मणी का महत्वाचे आहेत? :

हडप्पा संस्कृतीत मोठ्या प्रमाणात, विविध आकाराचे व विविध मोल्यवान दगडांचे व धातूंचे मणी व माळा सापडल्या आहेत. या मण्यांच्या अभ्यासावरून गरीब-श्रीमंत भेद लक्षात येतो, धार्मिक जीवनावर प्रकाश पडतो, व्यापाराची, व्यवसायाची माहिती मिळते त्यासाठीही मणी महत्वाचे आहेत.

मणी बनवण्याचा व्यवसाय कसा होता?:

मोठ्या प्रमाणात सापडणाऱ्या अवशेषावरून मणी बनवणे हा एक मोठा व प्रसिद्ध व्यवसाय असावा. सेलखडी, अगेट, कार्नेलीयन, लाजवर्द, इ. खड्यांपासून व सोने, चांदी, तांबे या धातूपासून तसेच शंख, माती इ. पासूनही मणी बनवत असत. या मण्यांचे अवशेष मोहेंजोदाडो, हडप्पा, चन्हुदाडो, बनवली, धोलाविरा, लोथल, सुरकोटडा, इ. ठिकाणी सापडले आहेत. सोबत मणी बनवणाऱ्या कारागीरांच्या वस्त्यांचे व त्यांच्या कारखान्यांचे अवशेषही सापडले आहेत. हडप्पा संस्कृतीतील हे मणी बनवणारे कारागिर मेसापोटेमियन संस्कृतीत गेले त्यांचा उल्लेख ‘मेलूहा’ असा येतो.

मणी बनवण्यासाठी कोणते तंत्रज्ञान व कला वापरत? :

हडप्पा संस्कृतीत मणी बनवण्याचे तंत्र प्रगत झाले होते. मोल्यवान खडे आयात करत. त्यावर कठीण व खर्चिक प्रक्रिया केली जात असे. अनेकवेळा तापवत, धातूच्या हत्याराने दगडाला कापून मण्याचा आकार देत. विशिष्ट टोकदार हत्याराने त्याला छिद्र पाडत. घासुन चमकदार बनवत(पॉलिश करत). असे तंत्र ठरले असल्याने मोठ्या प्रमाणात मणी तयार करणे शक्य झाले.

---------------------------------------------------  

मूर्तिकाम :

हडप्पा संस्कृतीतील मूर्ती का महत्वाच्या आहेत? : हडप्पा संस्कृतीत सापडलेल्या मातीच्या व धातूच्या मुर्त्या सापडतात. त्या तत्कालीन मुर्तीकलेची माहिती देतात. शिवाय लोकांच्या धर्मश्रद्धा, केशभूषा, शरीररचनेचे ज्ञान, नृत्यकला, वस्त्रे, अलंकार, इ. माहितीही मूर्त्यांच्या आधारे होते. त्यामुळे  मुर्त्या महत्वाच्या आहेत.

महत्वाच्या मुर्त्या कोणत्या आहेत? त्या काय माहिती देतात? :

हडप्पा संस्कृतीत प्रामुख्याने माती, दगड व धातूच्या मुर्त्या सापडतात. त्यातील सर्वात प्रसिद्ध मुर्त्या पुढीलप्रमाणे:

       मोहेंजोदडो येथे धर्मगुरुची मूर्ती’ सापडली आहे. ती चूनखडीच्या दगडाची आहे. तिची उंची २० सेंटीमीटर आहे. ही मूर्ती हडप्पा संस्कृतीत सापडलेल्या मुर्त्यांपैकी सर्वात मोठी मूर्ती आहे. या मूर्तीतील व्यक्ती पुरुष असून तिने आपल्या एका खांद्याभोवती शालीसारखे वस्त्र गुंडाळले आहे. त्यावर तीन पाकळ्यांच्या लाल रंगाची नक्षी कोरली आहे. मूर्ती अर्धी तुटली असल्याने कंबरेच्या खाली कोणते वस्त्र परिधान केले आहे ते लक्षात येत नाही. या व्यक्तीचे डोळे अर्धवट मिटलेले आहेत. त्यावरून ती ध्यानधारणा करत असावी  वा मूर्तीला दैवी भास देण्यासाठी डोळ्यांची रचना तशी केली असावी. मूर्तीतील व्यक्तीच्या डोक्यावर लांब केस असून ते बांधले आहेत. कपाळावर एक पट्टी बांधली आहे. त्याच्या मधोमध एक मणी जोडला आहे. अशीच पट्टी दंडावरही बांधली आहे. या व्यक्तीने दाढी वाढवली आहे मात्र मिशा काढून टाकल्या आहेत. तिच्या कानाला पाळीला भोक आहे. त्याचा वापर अलंकार घालण्यासाठी करत असावा. ही पुरोहित वा धर्मगुरूची आहे असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे तर काही संशोधक ती राजाची मूर्ती असावी असाही निष्कर्ष काढतात.

       याशिवाय अशीच एक ‘शिरोविहीन पुरुष मूर्ती’ हडप्पा येथेही सापडली आहे. मात्र त्या मूर्तीला शीर(मुंडके) नसून हात-पाय तुटले आहेत व फक्त धड शिल्लक आहे. या मूर्तीचे अवयव रेखीव आहेत, स्नायू पिळदार आहेत. या मूर्तीला डोके, हात, पाय हे सुट्टे-सुट्टे खोबणीत बसवण्याची सोय आहे. या मूर्तीवरून लक्षात येते की, या मूर्तीकाराला शरीररचनाशास्त्राचे चांगले ज्ञान होते. त्यावरून काही इतिहासकार ही मूर्ती हडप्पा संस्कृतीतील न मानता नंतरच्या काळातील मानतात. पण ज्या स्तरात ही मुती सापडली आहे त्यावरून ती हडप्पा काळातीलच आहे.

       ब्राँझच्या ‘नर्तिकेची मूर्ती’ हडप्पा संस्कृतीतील प्रसिद्ध मूर्ती आहे. ती मोहेंजोदडो येथे सापडली आहे. ती १० सेंटीमीटर उंचीची आहे. तिला Lost  Wax technique वापरून बनले असावे. या मूर्तीतील स्त्री डावा पाय गुडघ्यात वाकवून उभी आहे. डावा हात गुडघ्यावर ठेवला आहे. त्यावरून ती नृत्याच्या मुद्रेत उभी आहे असा संशोधकांनी निष्कर्ष काढला आहे.

        याशिवाय टेराकोटा फिगर्स’(Terracotta Figure) म्हणजे मातीच्या छोट्या-मोठ्या अनेक मुर्त्या आहेत. यामध्ये बैल, म्हैस, कुत्रा, माकड, इ. प्राण्याच्या मातीच्या मुर्त्या आहेत. यातील स्त्रीमूर्ती मातृदेवतेच्या असाव्यात असा निष्कर्ष अभ्यासकांनी काढला आहे. 

-------------------------------------------------------

धातुकाम :

धातू वितळवून त्यापासून विविध वस्तू बनविण्याची कला सिंधूवासियांना ज्ञात होती. हडप्पा संस्कृतीतील लोकांनी सोने, चांदी, तांबे, ब्राँझ, इ. धातू तयार करणे व त्यापासून विविध वस्तू तयार करण्याचे ज्ञान होते.

तांबे व ब्राँझ : हडप्पा संस्कृतीतील लोकांनी सर्वाधिक वापरलेला धातू ‘तांबे’ होता. तांब्यापासून चाकू, छिन्नी, बाणाची टोके, भाल्याची टोके, कुऱ्हाडी, तलवार, मासे पकडण्याचे गळ बनवले जात. हडप्पा, मोहेजोदडो, लोथल या ठिकाणी तांब्याच्या भट्टीचे(furnace) चे अवशेष सापडले आहे. तांबे व जस्त एकत्र करून ब्राँझ(कास्य) बनवत. ब्राँझपासून नर्तिकेची मूर्ती, बैल, पक्षी, कुत्रा इ. मुर्त्या मोहेंजोदडो येथे सापडल्या आहेत.

सोने : सोने या धातूचे सदैव मानवाला आकर्षण वाटले आहे. प्राचीन काळात स्वर्णधुळीला चाळून व धुऊन सोने हा धातू मिळवत असत. सोन्यापासून अलंकार बनवत असत. मात्र त्याचे सोन्याचे प्रमाण खूप कमी होते. त्यात चांदी अधिक प्रमाणात आहे.

चांदी : भारतात चांदीचा सर्वप्रथम वापर हडप्पा संस्कृतीतील लोकांनी केला. चांदीपासून भांडी व अलंकार बनवत.

लोथल येथे लोखंड या धातूचे अवशेष सापडले आहेत. मात्र हे शुद्ध लोखंड नाही. कच्च्या लोखंडापासून लोखंड शुद्ध करण्याची प्रक्रिया हडप्पातील लोकांना ज्ञात नसावी. कोठे सापडत नाहीत त्यावरून लोखंड हा धातू हडप्पा संस्कृतीतील लोकांना ज्ञात नव्हता.

 

---------------------------------

Featured Post

🌟Practicals- इतिहास-भारताची राष्ट्रीय चळवळ (१९२० ते १९४७) History- Indian National Movement

  🌟 इतिहास विषय P ractical प्रॅक्टिकल  - परीक्षेचे स्वरूप :•    •             इतिहास विषय घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना practical / प्...

Popular Posts