Sunday, 28 August 2022

ब. अकबराचे धार्मिक धोरण

ब.  अकबराचे धार्मिक धोरण

 

प्रस्तावना :

सम्राट अकबराच्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाचे जे विविध वैशिष्ट्यपूर्ण पैलू आहेत त्यापैकी त्याचे ‘धर्मसहिष्णू धोरण’ हा पैलू विशेष महत्त्वाचा आहे. अकबर स्वतः मुस्लीम धर्मीय असला तरी त्याने अन्य धर्मीयांना सहिष्णुतेने वागविले व त्यांची सद्भावना आणि सहकार्य मिळविले. अकबराचे धार्मिक धोरण हे व्यापक व उदार स्वरूपाचे होते. त्याने हिंदूंवरील जाचक बंधने काढून टाकली, यात्राकर रद्द केला. सर्वांना आपले धार्मिक उत्सव साजरे करण्याची अनुमती दिली. इ.स. 1564 मध्ये त्याने हिंदूंना जाचक वाटणारा व हिंदू मुस्लीम भेदाभेद तीव्र करणारा 'जिझिया' कर रद्द केला. अकबराने स्वतःही वैयक्तिक पातळीवर धर्मसहिष्णुता विचार अनुसरला होता. तो हिंदू वेष परिधान करून गंध, टिळा लावून स्वतः भजनही करत असे. या विविध वैशिष्ट्यपूर्ण दृष्टिकोनामुळे अकबर हा एक विशाल दृष्टी असलेला राज्यकर्ता होता हे स्पष्ट होते. दीर्घकाळ त्याच्या राज्यात स्थिरता  शांतता असण्यामागे हेच सूत्र होते. त्याने सर्व धर्मीयांना बरोबर घेऊन त्यांच्याशी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन धर्मप्रभावित काळाचा विचार करता अकबराचे धार्मिक धोरण वैशिष्ट्यपूर्ण होते हे आपल्या लक्षात येते. अकबराच्या धार्मिक धोरणाचा विश्लेषणात्मक मागोवा घेणे महत्त्वाचे आहे.

 

I.          अकबराच्या धार्मिक धोरणाची जडणघडण :

अकबराच्या उदार धार्मिक धोरणामागे त्याची मानसिकता व त्याला लाभलेली पार्श्वभूमी अत्यंत महत्त्वाची होती.

 

i.           उदार वृत्तीचे मातापिता :

अकबराला हा सलोख्याचा विचार आई वडिलांकडून मिळाला होता. अकबराचे वडील हुमायून सुन्नी पंथीय असले तरी त्याने शिया पंथीयांचा द्वेष केला नाही. उलट त्यांच्याबद्दल हुमायूनच्या मनात आपुलकीचीच भावना होती. अकबराची आई हमीदाबानू बेग़म स्वतः शिया पंथीय होती. यामुळे सहिष्णुता व सद्भाव यांचे संस्कार अकबरावर घरातूनच झाले होते.

 

ii.          गुरू व पालकांचे संस्कार

अकबराचे बालपण धावपळीत गेल्यामुळे त्याला लिहिण्या-वाचण्याचे शिक्षण मिळाले नाही. परंतु त्याला लष्करी व व्यावहारिक शिक्षण देण्याचा प्रयत्न बैरामखान याने यशस्वी केला. तोच अकबराचा पालक व गुरू होता. त्याच्या विचारांचाही प्रभाव अकबराच्या सहिष्णू जडणघडणीवर झाला. बैरामखान व अब्दुल लतीफ यांच्या शिकवणुकीमुळे अकबर सहिष्णू वृत्तीचा बनला होता.

 

iii.           भक्ती चळवळीचा प्रभाव :

अकबराच्या काळात भक्ती पंथाचा प्रभाव वाढत गेला. भक्तिमार्ग संतांनी या काळात हिंदू-मुस्लीम यांच्यात प्रेम व औदार्याची भावना निर्माण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. भक्तिमार्गी संतांनी हिंदू-मुस्लीम वैमनस्य व कटुता कमी करणारे विचार लोकमानसात रुजविण्याचा प्रयत्न केला. हिंदू-मुस्लीम सलोखा व समन्वय यावर भर देऊन या संतांनी 'ईश्वर एकच आहे’ ही भावना लोकांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न केला. सहिष्णू विचारांच्या अकबराला या भक्ती विचाराने अधिक बळकट केले.

 

iv.           राजकीय अनिवार्यता:

अकबराच्या धर्मसहिष्णू वृत्तीमागे त्याची तत्कालीन राजकीय गरज महत्त्वाची होती. अकबराला मुघलांचे प्रचंड साम्राज्य उभारायचे होते. या साम्राज्यातील बहुसंख्य प्रजा हिंदू होती. याची अकबराला जाणीव होती. आपल्या साम्राज्याच्या स्थैर्यासाठी अकबराला आपल्या हिंदू प्रजेशी सद्भभावनेने वागणेच फायद्याचे ठरणार होते. तसेच अकबराचे सगेसोयरे भरवशाचे नव्हते, उलट त्यांच्याकडून अकबराला  धोक्याची शक्यता होती. अशा वेळी बहुसंख्य हिंदूशी सलोखापूर्वक व्यवहार करून आपले राज्य मजबूत करणे ही अकबराची राजकीय अनिवार्यता होती.

 

v.          रजपुतांशी ऋणानुबंध:

स्वतःच्या जन्मापासूनच अकबराची रजपुतांशी असलेले सौहार्दपूर्ण संबंध त्याच्या धार्मिक धोरणाला आकार देणारे ठरले. त्याने साम्राज्य विस्ताराच्या दृष्टीनेच रजपुतांशी सलोख्याचे संबंध ठेवले होते. त्याचा जन्मच अमरकोटला रजपुतांच्या छत्राखाली झाला होता. रजपूत राजांच्या मुलीशी या काळात अकबराचा विवाहही झाला होता. त्याने जैसरमेल व बिकानेर येथील राजांच्या मुलींशीही विवाह केले होते तसेच त्याने आपला मुलगा सलीम याचाही राजा भगवानदासच्या मुलीशी मोठ्या घाटात विवाह लावून दिला होता. रजपुतांशी असलेल्या त्याच्या या नातेसंबंधांमुळे त्याचे उदार धार्मिक धोरण विकसित होत गेले.

 

vi.         अकबराची धर्मविषयक धारणा:

अकबराची धर्मविषयक धारणा त्याच्या सहिष्णू धोरणाला मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरली. धर्मविषयावर तो दीर्घकाळ विचार व सल्लामसलत करत असे. विविध मची तत्त्वे, त्या धर्माचे स्वरूप, त्यांची वैशिष्ट्ये, त्यांच्यातील पंथ, ईश्वरस्वरूप याविषयी त्याला फार जिज्ञासा होती. सुन्नी- शिया मतभेदाचे मूळ काय आहे तसेच विविध धर्म व त्यांचे त्या-त्या धर्माबद्दलचे विचार आणि तत्त्वज्ञान काय आहे हे समजून घेण्याचा अकबर प्रामाणिक प्रयत्न करत होता. सर्व धर्मातील चांगल्या विचारांनी तो प्रभावित झाला होता. या विविध गोष्टींमुळे अकबराची धर्मसहिष्णू वृत्ती तयार झाली.

-------------------------------------------------------------

II.         अकबराच्या धार्मिक धोरणाचा विकास :

अकबराचे धार्मिक धोरण वैशिष्ट्यपूर्ण होते. धार्मिक कट्टरतेच्या काळात त्याने धर्मसमन्वयाचा केलेला पाठपुरावा हा निश्चितच महत्त्वपूर्ण होता. विविध कारणांनी अकबराची धर्मसहिष्णू मनोवृत्ती तयार होत गेली. त्याचा हा धर्मविषयक उदार दृष्टिकोन तो प्रत्यक्ष व्यवहारात आणण्याचा एक राज्यकर्ता म्हणून त्याने प्रयत्न केला त्यातूनच त्याच्या धार्मिक धोरणात उत्तरोत्तर विकास होत गेला. साधारणतः अकबराच्या या धार्मिक धोरणाचे बदलते स्वरूप विचारात घेऊन त्याचे तीन टप्प्यांत विभाजन करता येते.

अकबराच्या या धार्मिक धोरणाचे तीन टप्पे :

(a) हिंदूंविषयी उदारता

(b) सर्व धर्मीयांशी समन्वय व विचारमंथन

(c) सर्वधर्म सारसमन्वित नव्या धर्माची स्थापना (दिने-इलाही धर्मपंथ)

 

a.हिंदूंविषयी उदारता :

अकबराच्या सलोखामय धार्मिक धोरणाची सुरुवात हिंदूविषयी त्याच्या मनात निर्माण झालेल्या आपुलकीतून झाली. त्याचे बालपण व संगोपन या विविध टप्प्यात त्याची हिंदूविषयीची धारणा सलोख्याची बनत गेली. त्यामुळेच अकबराने हिंदूंविषयी या काळात उदार धोरणाचा अवलंब केला.

१.  त्याने इ.स. 1563 साली तीर्थयात्रा कर रद्द करून हिंदूंची सहानुभूती मिळविली.

२.      अंबरचा राजा बिहारीमलची कन्या जोधाबाईशी विवाह करून त्यांच्याशी नातेसंबंध प्रस्थापित केले. इतरही अनेक रजपूत घराण्यांशी त्याने विवाहसंबंध निर्माण केले.

३.      इ.स. 1564 मध्ये त्याने जिझिया कर रद्द करून आपले धार्मिक धोरण भक्कम केले.

४.      आपल्या राज्यकारभारात हिंदूंना अनेक मानाच्या प्रतिष्ठेच्या उच्च पदावर नेमले.

५.     इतर धर्मीयांना प्रार्थनास्थळे बांधण्यास, सण-समारंभ साजरे करण्यास परवानगी दिली.

६.      सक्तीच्या धर्मांतराला प्रतिबंध घातला.

७.     उत्कृष्ट धार्मिक ग्रंथाची पर्शियन भाषेत भाषांतरे करण्यावर भर दिला.

८.      बहुसंख्य हिंदू त्या वेळी युद्धकैदी होत होते. अकबराने युद्धकैद्यांनाच गुलाम म्हणून विकण्याची पद्धत बंद केली.

पहिल्या टप्प्यात अकबराने धार्मिक धोरणात हिंदूंविषयी अतिशय सलोखापूर्ण नीतीचा अवलंब केला, बहुसंख्य हिंदू असणाऱ्या हिंदुस्थानात आपल्याला साम्राज्य वाढवायचे व टिकवायचे असेल तर हिंदूंशी उदारतापूर्वक व्यवहार करणे फार गरजेचे आहे हे अकबराला माहीत होते..

 

b. सर्व धर्मीयांशी समन्वय व विचारमंथन: ‘इबादतखाना’

·       दुसऱ्या टप्प्यात अकबराची धर्मजिज्ञासा वृद्धिंगत झालेली दिसते. या काळात त्याचे साम्राज्यही बऱ्यापैकी स्थिर झाले होते. त्यामुळेच या काळात अकबराने हिंदूंप्रमाणेच हिंदुस्थानातील तत्कालीन इतर धर्मीयांच्या संदर्भातही सलोखापूर्वक धोरणाचा अवलंब केला. या काळात त्याला इतर धर्मातील चांगले धर्मविषयक विचार समजून घेण्याची जिज्ञासा निर्माण झालेली होती. यातून या काळात अकबराने त्यासाठी 'इबादतखाना' ही व्यवस्था अस्तित्वात आणली.

·       इबादतखाना म्हणजेच 'प्रार्थनागृह' होय. इ.स. 1575 मध्ये त्याने फत्तेपूरसिक्री येथे इबादतखाना बांधला होता. सुरुवातीला इस्लाम मुल्ला मौलवी येथे धर्मविषयक विचारमंथन करत होते. पण त्यातून त्यांच्यात विवाद व संघर्ष होऊ लागला यामुळे अकबराचे मन उद्विग्न झाले. यानंतर अकबराने इतर धर्मीयांनादेखील विचारमंथनासाठी तिथे पाचारण केले. स्वतः अकबर अतिशय जिज्ञासेने असे धर्मविषयक विचार ऐकत असे.

o    पारशी धर्मोपदेशक दस्तूरजी महर्जीला अकबराने इ.स. 1578 मध्ये इबादतखान्यात बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. यामुळे अकबराला पारशी धर्मातील अग्निपुजेचे महत्त्व समजले व त्यापासून अकबराने आपल्या महालात सतत अग्नी तेवत ठेवण्याची व्यवस्था केली.

o    हरिविजय सुरीया। जैन मुनीस इबादतखान्यात बोलावून इ.स. 1585 मध्ये त्याने जैन धर्मतत्त्वावर विचारविनिमय केला. त्यातून अहिंसेचे महत्त्व पटलेल्या अकबराने पशू, प्राणी हत्या बंद केली. स्वतः मांसाहार बंद केला. अनेक कैड्यांनाही त्याने बंधमुक्त केले.

o    पुरुषोत्तम देवी या हिंदू विचारवंतांशी चर्चा करून अकबराने हिंदू धर्मविषयक विचार व रीतिरिवाज शास्त्र समजून घेतले. हिंदू धर्मविचारांचा अकबरावर विलक्षण प्रभाव होता, हे त्याच्या अनुकरणातून दिसून येते. तो स्वतः गंध, टिळा लावत असे. हिंदू सण, उत्सव साजरे करत असे.

o    इबादतखान्यात त्याने ख्रिस्ती धर्मोपदेशकांशी विचारविनिमय केला. अकबराने लाहोरला चर्च बांधण्यासही ख्रिस्तींना संमती दिली होती. धर्माविषयी अकबराच्या मनात आदराचे स्थान निर्माण झाले.

o    शीख धर्माविषयी अकबराला आदर वाटत होता. शीख धर्मगुरूंशी अकबराचे चांगले सलोख्याचे संबंध होते. ज्या-ज्या वेळी तो पंजाबात जात असे त्या वेळी तो धर्मगुरूंशी विचारमंथन करत असे.

o     अकबराच्या या धर्मजिज्ञासेमुळे त्याचा सर्व धर्मीयांशी समन्वय साधला गेला. राज्यकर्त्यांची धर्मविषयक दृष्टी व्यापक असल्यानंतर राज्यात आपोआपच सलोखा व शांतीचे वातावरण टिकून राहते. हे अकबराच्या समन्वयवादी विचारांच्या माध्यमातून स्पष्ट होते.

 

याच काळात सन 1578 साली अकबराने शेख मुबारकचा सल्ला मानून धार्मिक क्षेत्रातील सर्वोच्च पद ग्रहण करण्याचा निर्णय घेतला. इस्लाम धर्मगुरूस पदभ्रष्ट करून अकबराने खुतबा वाचला. आपण सर्वोच्च धर्मगुरू असल्याची म्हणजेच सर्वज्ञतेची घोषणा केली. यामुळे अकबराला राजकीय व धार्मिक बाबतीत निरंकुश अधिकार मिळाले, कडव्या मुस्लिमांनी-अकबराविरुद्ध उठाव केले पण अकबराने वेळीच मोडून काढले.

 

c. दिने-इलाही धर्मपंथ :  सर्वधर्म सारसमन्वित नव्या धर्माची स्थापना

 

i.           दिन-ए- इलाहीची स्थापना:

अकबराच्या धार्मिक धोरणातील महत्त्वाचा भाग म्हणजे त्याने इ.स. 1582 साली स्थापन केलेला दिने-इलाही हा नवीन धर्मपंथ होय. अकबराने या पंथाची स्थापना अतिशय विचारपूर्वक केली. इबादतखान्यात अकबराने हिंदू, पारशी, जैन, ख्रिश्चन या धर्मातील तत्त्ववेत्त्यांशी चर्चा केली. यातून त्यांच्या असे निदर्शनास आले की सत्य हे सर्व धर्माचे पायाभूत तत्त्व आहे. सर्वच धर्मात मानवी जीवनासाठी काही उपयुक्त तत्त्व आहेत. अशा महत्त्वपूर्ण तत्त्वांचे संकलन करून नवीन धर्मपंथ स्थापन करावा यातूनच त्याने जातपात विरहित सर्वधर्म सारसमन्वित नव्या धर्मपंथाची योजना तयार केली. त्यातूनच अकबराचा दिने-इलाही हा नवा धर्मपंथ उदयास आला. हा धर्मपंथ 'तवाहिदे इलाही’ म्हणजेच ‘’एकेश्वरवादाचा पुरस्कार’ करणारा होता. काबूल मोहिमेवरून परत आल्यानंतर अकबराने खास दरबार भरवून इ.स. 1582 मध्ये दिने-इलाही धर्माची स्थापना केली. दिने-इलाही पंथाच्या अनुयायांच्या चार श्रेण्या निश्चित केल्या होत्या. या पंथाचा स्वीकार करणाऱ्यांची संख्या दोन हजारांच्या वर गेली नाही कारण या धर्माचा स्वीकार करण्याची अकबराने कोणावरही सक्ती केली नव्हती. ज्यांनी या धर्माचा स्वीकार केला नाही त्यांच्या बाबतही अकबराने कसलाही आकस केला नाही हा देखील अकबराच्या सहिष्णू दृष्टिकोनाचाच एक भाग होता. दिने-इलाहीची तत्त्वे अबुल फजलने ऐन-ए-अकबरी मध्ये दिने-इलाही पंथाच्या तत्त्वांची तपशीलवार माहिती दिली आहे. यामध्ये

ii. दिने-इलाहीची तत्त्वे :

1. अनुयायांनी परस्परांना भेटताना 'अल्ला हो अकबर' या 'जल्ले जलालहु’ असे अभिवादन करावे.

2. ईश्वर एक आहे. अकबर हा त्याचा प्रेषित आहे.

3. अनुयायांनी बादशाहला 'सिजदा' म्हणजेच साष्टांग नमस्कार घालावा व बादशाहप्रति श्रद्धा व्यक्त करावी.

4. सर्वांनी सूर्याची व अग्नीची उपासना करावी.

5. इतर धर्माबद्दल आदर दाखवावा.

6. मांसाहार करू नये, अशा लोकांसोबत भोजनही करू नये.

7. मालमत्ता, प्रतिष्ठा जीवित, धर्म व दान याचा त्याग करून बादशाहला सर्वश्रेष्ठ समजावे.

अशा प्रकारे सर्व धर्मातील तत्त्वांचे मिश्रण आपल्याला अकबराच्या दिने-इलाही या धर्मपंथात पाहायला मिळते.

 

iii.दिने-इलाहीचे यशापयश व महत्त्व:

दिने-इलाहीच्या यशापयशाचा विचार करता अनेक विवाद्य मुद्दे निदर्शनास येतात.

१.      अकबराचा हा धर्मपंथ विविध धर्मातील तत्त्वांचे संकलन करून निर्माण झाला होता. या धर्माचा स्वीकार करण्याची कोणतीही जबरदस्ती त्याने केली नाही. अकबराच्या आसपास असणाऱ्या खुशमश्कऱ्यांनीच हा धर्म स्वीकारला होता. त्यांच्या अनुयायांची संख्या ही दोन हजारांच्या आसपास होती.

२.      अकबराचे विचार तत्कालीन परिस्थितीचा विचार करता पुरोगामी होते. ते समाजाच्या पचनी पडणे अवघड होते. सनातनी मुस्लिमांनी त्याच्या या विचाराला विरोध केला.

३.      अकबरानेही या धर्माचा प्रसार करण्याचा किंवा धर्म लादण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. त्यामुळे या धर्माचा फारसा विस्तार झाला नाही.

४.      दिने-इलाहीमागे अकबराचा मुख्य हेतू धार्मिक नसून राजकीय होता. त्याला आदर्श राज्यकर्ता व साम्राज्य निर्माता व्हायचे होते. राष्ट्र घडविण्यास सर्वांना समान धर्म असावा असे त्याला आवश्यक वाटत होते. त्या वेळच्या प्रमुख धर्मीयांच्यात ऐक्य निर्माण करून देशात सांस्कृतिक व राजकीय ऐक्य स्थापन करण्याचा त्याचा प्रयत्न महत्त्वाचा होता.

 

d. सारांश : 'सुलह-इ-कुल'

 अशा प्रकारे अकबराचे धार्मिक धोरण हे त्या काळातील त्याच्या राजकारणाचाच एक भाग होता. त्याच्या या धार्मिक धोरणाचा तीन टप्प्यात विकास होत गेला, सर्व धर्माबाबत समान दृष्टी ठेवली पाहिजे यालाच 'सुलाह-इ-कुल' असे म्हणतात. हा त्याचा विचार तत्कालीन परिस्थितीत फारच पुरोगामी व क्रांतिकारक स्वरूपाचा होता. आपल्या प्रजेत एकता निर्माण करणारा, प्रसंगी स्वतःच्या धर्मावरही टीका करून त्यांचा रोष पत्करून प्रजेला एकत्र आणणारा तो राज्यकर्ता होता. त्यामुळे 'एक सुबुद्ध कल्याणकारी राजा म्हणून तो इतिहासप्रसिद्ध झाला.

 

धोरणांची राज्यात अंमलबजावणी केली. त्यानुसार इस्लाम, हिंदू, पारसी, जैन, ख्रिश्चन इत्यादी सर्व धर्मातील लोकांना आपली धर्ममंदीरे बांधण्याचे स्वातंत्र्य दिले. तसेच त्यांना पूजा स्वातंत्र्य दिले. आपआपल्या धर्माचा प्रचार, धार्मिक उत्सव साजरे करण्याची परवानगी दिली. सक्ती करून ज्या स्त्री-पुरूषांना मुस्लिम करण्यात आले होते. त्या सर्वाना आपल्या धर्मात जाण्याची अनुमती दिली. कोणत्याही धार्मिक भेदभाव न करता सर्व धर्मियांना त्यांच्या पात्रतेनुसार राज्यकारभारात पदे दिली. अथर्ववेद, रामायण, महाभारत इत्यादी हिंदू धर्मग्रंथांची फारसी भाषेत भाषांतरे करण्यात आली. सर्व प्रजेसाठी राजसत्ता हे तत्व त्याने स्विकारले. धर्माच्या आधारावर कोणतीही व्यक्ती आणि व्यक्तीच्या सामाजिक दर्जात फरक केला नाही.

---------------------------------------------------------------


No comments:

Post a Comment

Featured Post

previous year question papers

http://www.unipune.ac.in/university_files/old_papers.htm

Popular Posts