G3 (TYBA)
इतिहास : भारताचा स्वातंत्र्य लढा
सेमिस्टर ५
युनिट १: भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि वाढ (१२)
अ) भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे
ब) भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना.
क) मवाळ राष्ट्रवाद आणि जहाल राष्ट्रवाद
ड) क्रांतिकारी राष्ट्रवाद.
A.भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे
‘राष्ट्र’ हा शब्द ‘Natio’ ‘नशिओ’ या शब्दापासून बनला आहे त्याचा अर्थ ‘जन्म’ किंवा’वंश’ होय. “आपण एक आहोत या भावनेने एकत्र आलेला समाज म्हणजे ‘राष्ट्र’ होय.” ‘राष्ट्रवाद’ ही एक भावना आहे. ‘राष्ट्रवाद म्हणजे आपल्या राष्ट्रावर असणारे प्रेम, आपल्या राष्ट्राचा विकास व्हावा ही भावना होय. समान वंश, समान भाषा, समान संस्कृती, समान धर्म, समान इतिहास या सर्व समान घटकातून राष्ट्रवादाची भावना लोकात निर्माण होते. १८ व्या शतकामध्ये भारत राजकीयदृष्ट्या विविध राज्यात विभागला गेला होता. १९ व्या शतकात भारतात राष्ट्रवादाची भावना जागृत झाली. ती का झाली? याची कारणे पुढील प्रमाणे सांगता येतील .
१.ब्रिटीशांचा एकछत्री अंमल :
ब्रिटीश व्यापाराच्या निमित्ताने भारतात आले. त्यावेळी भारतातील राजे आपापसात लढत होते. या राजकीय परिस्थितीचा फायदा ब्रिटीशांनी घेतला. त्यांनी एका हातात तलवार व दुसऱ्या हातात तराजू घेऊन भारत जिंकला. १७५७ च्या प्लासी व १७६४च्या बक्सारच्या लढाईने बंगाल जिंकला, ब्रिटीशांची भारत विजयाची प्रक्रिया सुरु झाली. पुढे म्हैसूरचा टिपू सुलतान, मराठे, सिख, हे प्रदेश त्यांनी लढाईच्या मार्गाने जिंकून घेतले. तर उरलेले प्रदेश तैनाती फौज पद्धती, खालसा धोरण यांचा वापर करून संपूर्ण भारत आपल्या वर्चस्वाखाली आणला. यामुळे संपूर्ण भारत ब्रिटीशांच्या एकछत्री अंमलाखाली आला व अप्रत्यक्षरीत्या भारताचे राजकीय एकीकरण घडून आले.
२.ब्रिटिशांनी प्रशासकीय एकीकरण केले:
ब्रिटीशांनी भारत जिंकल्यावर इथे एक मजबूत प्रशासन यंत्रणा निर्माण केली. ही व्यवस्था पूर्वीच्या व्यक्तिगत प्रभाव असलेल्या प्रशासन व्यवस्थेपासून वेगळी होती. भारताच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत एकच न्याव्यवस्था, एकच कायदा, ‘कायद्यापुढे सर्व समान’(equality before law), ‘कायद्याचे राज्य’(Rule of Law), एकच चलनव्यवस्था या सगळ्यामुळे भारताचे प्रशासकीय एकीकरण झाले, यामुळे भारतीयांच्या मनात आपण एकाच देशाचे नागरिक आहोत हि भावना निर्माण झाली जी राष्ट्रवादाच्या उदयासाठी आवश्यक असते. एक ब्रिटीश इतिहासकार एडवर्ड बेवन म्हणतो, ‘The British Raj was like a steel-frame which held that injured body of India together till the gradual process of internal growth had join the dislocated bones, knit up the torn fibres and enabled the patient to regain inner coherence and unity’ ‘ब्रिटीश राजवटीने लोखंडी सांगाड्यासारखे भारताला जखडून ठेवले त्यामुळे तुटलेली हाडे व स्नायू जुळून शरीर पूर्ववत एकसंघ झाली.’
३. १८५७ च्या उठावापासून प्रेरणा :
१८५७ साली ब्रिटीश सत्तेच्या विरोधात सर्वात मोठा उठाव झाला . ब्रिटीशांनी हा उठाव मोडून काढला, त्यामुळे तो अयशस्वी झाला. जरी तो अयशस्वी झाला. तरी ‘भारतीचे पहिले स्वातंत्र्ययुध्द’ (Ist war of independance) म्हणून त्याने भारतीयांना सदैव प्रेरणा दिली. राष्ट्रवादाची भावना मजबूत होण्यासाठी या उठावाने मदत झाली.
४.पाश्चात्य शिक्षण :
ब्रिटीशांनी भारतात आधुनिक पाश्चात्य शिक्षणाला सुरुवात केली, यामागे त्यांचा उद्देश राज्यकारभाराच्या सोयीसाठी अत्यंत कमी पगारात कारकून मिळावेत हा होता. पण सुशिक्षित लोकांना स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, इ. मूल्य कळाली. भारतीयांना कोणतेही अधिकार नाहीत. आपण गुलामगिरीत आहोत. याची जाणीव झाली. अमेरिकन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती, यासारख्या राज्याक्रांत्यात सर्वसामान्य लोकांनी आपले अधिकार जसे मिळवले तसे आपणही आपले अधिकार का मिळवू नयेत? असा विचार या सुशिक्षितांच्या मनात येऊ लागला. लॉर्ड रेनोल्ड से म्हणतो, ‘पाश्चात्य ज्ञानाची मदिरा हिंदी तरुण लोकांच्या डोक्यात चढली. स्वातंत्र्य आणि राष्ट्रवाद यांच्या सुरईतून त्यांनी मनसोक्त हे ज्ञानपान केले आणि त्यांच्या विचारात एकदम क्रांतीच घडून आली.”
रॅम्से मॅकडोनाल्ड म्हणतो, ‘हिंदी लोकांनी हर्बर्ट स्पेन्सर चा व्यक्तिवाद व लॉर्ड मेकोलेचा उदारमतवाद या दोन तोफा आमच्याकडून पकडून नेल्या आहेत आणि आता त्या तोफांची तोंडे आमच्यावर रोखून ते हल्ला करत आहेत.” शा प्रकारे भारतीय समाजात जसा-जसा शिक्षणाचा प्रसार होऊ लागला तसतसा राष्ट्रवादाचाही प्रसार होऊ लागला.
५.इंग्रजी भाषेने राष्ट्रवादाच्या उदयास मदत:
ब्रिटीशांनी सुरु केलेले शिक्षण हे इंग्रजी भाषेतून होते. या भाषेने एक मोठी कामगिरी बजावली. ती म्हणजे भारतीयांना सवांद साधण्याची एक समान भाषा उपलब्ध झाली. भारतात बंगाली, मराठी, कानडी, गुजराती, अशी प्रत्येक प्रांतात वेगळी भाषा होती. त्यामुळे संवाद साधण्यास अडचण येत होती. बंगाली माणसाला मराठी माणसाशी बोलायचे असेल तर प्रथम मराठी शिकावी लागत होती. आता इंग्रजीने ही अडचण दूर केली. विविध भाषा बोलणारी मंडळी ज्यावेळी एकत्र आली तेंव्हा ते इंग्रजीतून संवाद साधू लागली. इंग्रजीमुळे वैचारिक देवाणघेवाण होऊन राष्ट्रवादाचा उदय होण्यास मदत झाली.
६.सामाजिक-धार्मिक सुधारणा चळवळी :
१९ व्या शतकात भारतात समाज सुधारणा चळवळी सुरु झाल्या.. ब्राम्हो समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज, रामकृष्ण मिशन इ.ची स्थापना झाली. या संस्थानी अंधश्रद्धा, कर्मकांडे, मूर्तीपूजा यासारख्या धर्मातील अनिष्ट गोष्टीना विरोध केला, धर्माचे खरे स्वरूप लोकांसमोर आणले. त्यामुळे भारतीयांच्या मनातील न्यूनगंड कमी झाला. स्वधर्म, स्वसंस्कृती यांच्याविषयी अभिमान निर्माण झाला.
या चळवळीच्या माध्यामतून समाजसुधारकांनी समाज सुधारणेचे काम केले. सतीबंदी, जातीभेदास विरोध, अस्पृश्यता, बालविवाह, जरठकुमारी विवाह, इ.ना विरोध केला, विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला. या समाज सुधारणा चळवळीमुळे भारतीय समाजात सामाजिक समता प्रस्थापित होऊन राष्ट्रवादाच्या उदयाचा पाया घातला गेला.
७.वृत्तपत्रांचे योगदान :
भारतात वर्तमानपत्रांची सुरुवात ब्रिटीशांनी केली. ही वृत्तपत्रे सरकारच्या धोरणाच्या बाजूने लिहित असत. सरकारच्या अन्यायी धोरणावर टीका करण्यासाठी व भारतीयांना जागे करण्यासाठी भारतीयांनी स्वतःची वर्तमानपत्रे सुरु केली. ‘दि इंडियन मिरर’(कलकत्ता), बॉम्बे समाचार, इंदुप्रकाश(मुंबई), ‘दि हिंदू(मद्रास), या वर्तमानपत्रांनी समाज जागृतीचे काम केले. जसजसा शिक्षणाचा प्रसार होऊ लागला, तसतशी वर्तमानपत्रांची संख्या वाढू लागली. प्रत्येक हिंदी नेत्याने स्वतःचे वर्तमानपत्र काढले
या वर्तमानपत्रांनी सरकारच्या चुकीच्या धोरणावर हल्ला चढवला. त्यामुळे सरकारला वर्तमानपत्रांवर निर्बंध घालणारा कायदा करावा लागला. अशाप्रकारे सरकारविरुद्ध असंतोष निर्माण करून राष्ट्रवादाचा प्रसार करण्याची कामगिरी वृत्तपत्रांनी केली.
८.प्रेरणादायी राष्ट्रवादी साहित्य :
या काळात राष्ट्रवादी साहित्याची निर्मिती झाली. बंगालीत बकीमचन्द्र चॅटर्जी, मायकेल मधुसूदन दत्त, रवींद्रनाथ टागोर, मराठीत लोकहितवादी, विष्णुशास्त्री चिपळूणकर, शि. म. परांजपे; हिंदीत भारतेंदू हरिश्चंद्र; तमिळ भाषेत सुब्रमण्यम भारती इ. लेखकांनी आपापल्या मातृभाषेत लेखन करून समाजात राष्ट्रवादास पोषक वातावरण तयार केले. याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे बंकिमचंद्राचे ‘वंदेमातरम’ हे गीत होय. या गीताने भारतीय माणसांची मने काबीज केली. त्या गीताचे शब्द उच्चारत आठ-दहा वर्षाच्या कोवळ्या मुलांनीही आपल्या छातीवर बंदुकीच्या गोळ्या झेलल्या. ‘वंदेमातरम’ हा शब्द उच्चारणे हा सुध्दा सरकारने गुन्हा ठरवला होता.
९.ब्रिटीशांचे वंशद्वेषाचे धोरण :
ब्रिटीश आपल्या वंशाला जगातील सर्वोत्कृष्ट वंश मानत. तर भारतीयांना कनिष्ट वंशाचे मानत. ब्रिटीशांची संस्कृती ही सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. तर भारतीय लोक मागासलेले आहेत. अशी ब्रिटीश राज्यकर्त्यांचा समज होता. ब्रिटीशांच्या वर्णद्वेषी धोरणाचा कळस म्हणजे त्याच्या हॉटेल व क्लब्ज वर ‘indians and dogs are not allowed” कुत्रे आणि भारतीय यांना प्रवेश नाही’ अशा आशयाच्या पाट्या असत. या सरकारी वंशद्वेषी धोरणामुळे भारतीय समाज दुखवला गेला.
१०.ब्रिटीशांनी केलेले आर्थिक शोषण :
ब्रिटीश राजवट भारतात येण्यापूर्वी भारत एक समृद्ध देश होता. ब्रिटीशांच्या येण्याने तो एका शतकात भिकेला लागला. सुरुवातीला ब्रिटीशांनी भारताशी व्यापार करण्यावर लक्ष केंद्रित केले. त्यावेळी भारतीय व्यावसायिकांना चांगले दिवस होते. पण भारतातील राजकीय सत्ता मिळाल्यावर त्यांनी कारागिरांकडून जबरदस्तीने कमी पैश्यात वस्तू घ्यायला सुरुवात केली. पुढे इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाल्यावर इंग्लंडमधील वस्तू भारतात खपवण्यासाठी भारतातील उद्योग जाणीवपूर्वक बंद पाडले. भारतातील व्यापारावर पूर्णपणे ब्रिटीश व्यापाऱ्यांचे वर्चस्व होते. भारतातील शेतीवर अत्यंत डोईजड महसूल आकाराला होता. अशाप्रकारे ब्रिटिशांनी भारताचे आर्थिक शोषण केले. या शोषणाच्या जाणीवेतून ‘आर्थिक राष्ट्रवादा’चा उदय आला. भारतातील दारिद्र दुर करायचे असेल तर ब्रिटीश राजवट जावून ‘स्वराज्य’ आले पाहिजे अशी भावना यामुळे वाढीस लागली.
११.दळवळणाच्या साधनात सुधारणा :
ब्रिटीशांनी भारतात रस्ते, रेल्वे, तारायंत्रे, पोस्ट, इ. दळणवळणाच्या सोयी सुरु केल्या. या सोयी भारताचे अधिक-अधिक शोषण करता यावे आणि राज्यकारभारावरची पकड घट्ट करणे यासाठी केल्या होत्या. हे त्यांचे हेतू साध्य झालेही. पण या सुधारणांचा भारतावर अप्रत्यक्ष चांगला परिणामही दिसून आला. दळवळणातील सुधारणामुळे भारतातील विविध प्रांत एकमेकाशी जोडली गेली. पंजाबमधील व्यक्तीला मद्रासला तर बंगालमधील व्यक्तीला मुंबईला जाणे सहज शक्य झाले. एका विचारांचे देशभरातील लोक एकत्र यायला मदत झाली. त्यामुळे विचारविनिमय वाढण्यास मदत झाली. रेल्वेची आणखी एक महत्वाची कामगिरी म्हणजे आता रेल्वेच्या डब्यात समाजातील सर्व जातिपंथाचे लोक एकत्र बसून प्रवास करू लागले, त्यामुळे जाती-पातीची बंधने शिथिल व्हायला मदत झाली. अशाप्रकारे दळवळणाच्या साधनात सुधारणा झाल्यामुळे राष्ट्रवादाची भावना वाढीस लागली.
१२.लॉर्ड लिटनची धोरणे :
लॉर्ड लिटन (१८७६-१८८०) हा कट्टर साम्राज्यवादी व्हाईसरॉय भारतात आला, त्याची अन्यायी धोरणांमुळे भारतीयांच्या असंतोषात भर पडली.
a. ब्रिटीश पार्लमेंटने खास कायदा करून इंग्लंडच्या राणीला ‘हिंदुस्थानची सम्राज्ञी’ घोषित केले. तेंव्हा लिटनने दिल्ली येथे खास दरबार भरवून तिला हा किताब दिला. यावेळी भारतात मोठा दुष्काळ पडला होता व लाखो लोक अन्नान करून मरत होते. अशा स्थितीत लिटनने या दरबारावर लाखो रुपयांची उधळण केली. परिणामी लिटनबद्दल ‘when Rome was burning Nero was fidding’ असे उदगार भारतीयांनी काढले.
b. वरील धोरणावर वर्तमानपत्रातून टीका होऊ लागली.परिणामी लिटनने १८७८ साली देशी वर्तमानपत्रावर निर्बंध आणणारा कायदा(व्हर्नाक्युलर प्रेस कायदा) केला या कायद्याद्वारे भारतीय वृत्तपत्रांची गळचेपी केली.
c. याच सुमारास लिटनने ‘Arms Acts’ पास करून हिंदी लोकांच्या हत्यारे बाळगण्यावर कडक निर्बंध टाकले.
d. अफगानिस्तानशी युद्ध उकरून काढले त्यावर भारतीयांचा कर रूपाने गोळा केलेला पैसा खर्च केला.
यामुळे हिंदी लोकात असंतोष निर्माण झाला त्यातून राष्ट्रसभेच्या उदयाची पार्श्वभूमी तयार झाली.
१३.ईल्बर्ट बिल प्रकरण:
न्यायालयीन क्षेत्रातील काळा-गोरा हा वंशभेद नष्ट करण्यासाठी लॉर्ड रिपनने ‘ईल्बर्ट बिल’ हा एक कायदा करण्याचे ठरवले. या बिलाला हिंदुस्थानातील इंग्रज समाजाने मोठा विरोध केला, विरोध करण्यासाठी संघटना उभारली व आंदोलन सुरु केले. शेवटी या आंदोलनामुळे सरकारला हे बिल मागे घ्यावे लागले. या बिल प्रकरणातून भारतीयांनी धडा घेतला कि, आपल्याला जर न्याय मिळवायचा असेल तर एकत्र येऊन संघटन बांधले पाहिजे, आंदोलन उभारले पाहिजे.
सारांश :
ब्रिटीशांनी भारताचे राजकीय व प्रशासकीय एकीकरण केले, तसेच पाश्चात्य शिक्षण व इंग्रजी भाषा यामुळे भारतीयांच्यात आधुनिक विचारांचा प्रसार झाला. सामाजिक-धार्मिक सुधारणा चळवळीना सुरुवात झाली. या चळवळीमुळे समता निर्माण होऊन राष्ट्रवादाचा उदय होण्यास मदत झाली. ब्रिटीशांच्या वर्णद्वेषाच्या वागणुकीमुळे भारतीयांची मने दुखावली. ब्रिटीशांमुळे आपली आर्थिक हलाखी ओढवली आहे. त्यासाठी स्वराज्याची गरज आहे अशी भावना निर्माण झली. लॉर्ड लिटनच्या धोरणामुळे भारतीयांच्या असंतोषात वाढ झाली, १८५७ च्या उठावाने भारतीयांना प्रेरणा मिळाली, या सर्वांचा परिणाम होऊन भारतात राष्ट्रवादाची भावना जागृत झाली.