Pages
- Home
- मध्ययुगीन भारत - मुघल कालखंड(1526-1707)
- Heritage Walk-Discovery of History of Ahmednagar
- Visit to a Historical Museums
- Study tours- अभ्यास सहल
- ppt
- 4.6 कोटी इंग्रजी इ पुस्तके National Digital Library
- Help to Diwyang students
- Tree Plantation
- Alumni
- List of Departmental Activities
- Syllabus
- list of projects by students
- Result Analysis
- E content development
- Guest Lectures
- Savitribai Phule Jayanti: Savitribai Phule birth anniversary
- Dr Babasaheb Ambedkar
- e books
- Historical Movies Club (ऐतिहासिक सिनेमा मंडळ)
- मराठ्यांचा इतिहास लेख
Thursday, 16 November 2023
Sunday, 5 November 2023
Sunday, 10 September 2023
युनिट २ . B. असहकार चळवळ (१९२०-२२)
B. असहकार चळवळ (१९२०-२२)
प्रस्तावना :
‘एक लाख गोरे तीस कोटी हिन्दी लोकांवर सत्ता
गाजवू शकतात ही किती आश्चर्याची आणि शरमेची गोष्ट आहे. हे जरी ते मनगटाच्या जोरावर
अमलात आणतात हे खरे असले, तरी ते अनेक प्रकारांनी आमचे सहकार्य मिळवून अमलात आणतात
.....आपण जर असहकार पुकारला तर ब्रिटीश पाशवी बळाने हिंदुस्थानावर एक क्षणही आपली
पकड ठेवू शकत नाही. -महात्मा गांधी
असहकार चळवळीच्या वेळी गांधीजीनी
व्यक्त केलेले मत या चळवळीमागे महात्मा गांधीजींची भूमिका होती ते स्पष्ट करते.
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील म. गांधीनी १९२० मध्ये सुरु केलेले ‘असहकार चळवळ’
हे पहिले मोठे आंदोलन होते. आफ्रिकेत काळ्या लोकांना गोऱ्याकडून न्याय मिळवून
देताना त्यानी ‘अहिंसात्मक सत्याग्रह’ ही अनोखी लढण्याची पद्धती विकसित केली होती.
१९१५ साली भारतात आल्यावर त्यांनी भारतभ्रमण करून इथल्या परिस्थितीचा अभ्यास केला.
चम्पारण्य व खेडा हे शेतकऱ्यांसाठी तर अहमदाबाद येथे गिरणी कामगारांसाठी सत्याग्रह
केला. या दरम्यान भारतात अशा काही घटना घडल्या ज्यातून असे वातावरण निर्माण झाले
कि, गांधीना ‘असहकार चळवळ’ सुरु करावी लागली.
चित्र : जालियानवाला
बाग हत्याकांड काल्पनिक चित्र
चित्र : जालियानवाला बाग नकाशा
चित्र : जालियानवाला
बाग स्मारक
अ.
कारणे :
1.
रौलट
कायदा(१९१९):
पहिल्या महायुद्धाच्या काळात सरकारने
राजद्रोही कारवायांना आळा घालण्यासाठी ब्रिटिश सरकारने ‘भारत सुरक्षा
कायदा’ केला. महायुद्ध संपल्यावर हा कायदा मागे घेणे आवश्यक होते. उलट सरकारने
हा कायदा आणखी कडक करण्यासाठी मि. रौलट यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. या
समितीच्या शिफारसी आधारे सरकारने नवा कायदा पास केला त्याला ‘रौलट
कायदा’(फेब्रुवारी १९१९) असे म्हणतात. आता या कायद्यानुसार
रौलट
कायदा
राजद्रोहाचा आरोप
असलेल्या व्यक्तीचा खटला खास कोर्टापुढे व गुप्तपणे चालवला जाईल. यात झालेल्या
निर्णयाविरुद्ध अपील करता येणार नव्हते. तसेच सरकार कोणलाही केवळ शंकेवरून
वारंटशिवाय अटक करू शकत होते. त्याचा जामीन नाकारू शकत होते, तसेच ठिकाण न
सोडण्याचे आदेश देऊ शकत होते. वारंटशिवाय कोणत्याही स्थळाची झडती घेऊ शकत होते.
असा हा कायदा सरकारला जबरदस्त अधिकार देणारा होता. पण सारांशत: हा
कायदा न्याय तत्वाची व व्यक्तीस्वातंत्र्याची पायमल्ली करणारा होता.
चित्र : जालियानवाला बाग आकडेवारी
रौलट कायद्याविरुद्ध भारतात प्रचंड असंतोष निर्माण झाला. कारण
आता महायुद्ध संपले होते अशा कायद्याची अजिबात गरज नव्हती त्यामुळे हा कायदा
भारताची स्वातंत्र्य चळवळ दडपण्यासाठी सरकारने बनवला होता. ‘BLACK BILL’
किंवा ‘काळा कायदा’ म्हणून या कायद्याचा भारतभर निषेध होऊ लागला. म.
गांधीनी या कायद्याला विरोध केला, असा कायदा सरकारने पास केला तर आपण आंदोलन करू
असा इशारा दिला तरीही सरकारने हा कायदा पास केला. त्यामुळे ‘हा जुलमी कायदा मी
कायद्याच्या पुस्तकात राहू देणार नाही’ असा निश्चय करून म. गांधीनी ३० मार्च
१९१९ या दिवशी देशव्यापी हरताळ पाळण्याचे ठरविले.
2.
जालियानवाला
बाग हत्याकांड :
भारताच्या इतिहासातील अत्यंत कटू
प्रसंग म्हणून ‘जालियानवाला बाग हत्याकांडा’ची नोंद केली जाते. ही घटना म्हणजे
इंग्रज राज्यकर्त्यांच्या चारित्र्याला लागलेला भयंकर कलंक होता. या
हत्याकांडाच्या स्मृती हिंदुस्थान कधीच विसरू शकत नाही. अलीकडेच २०१२ साली
इंग्लंडचे पंतप्रधान डेविड केमरून यांनी आपल्या भारतभेटीत जालियानवाला बागेला भेट
दिली त्यावेळी त्यांनी या घटनेबद्दल भारतवासीयांची माफी मागितली.
पंजाबमध्ये रौलट कायद्याविरुध्द
जनतेने आंदोलन सुरु केले. जनता हरताळ, निषेध व मोर्चे या मार्गांनी सरकारचा निषेध
करत होती. या दरम्यान पंजाबमधील नेते सैफुद्दीन किचलू यांना सरकारने अटक केली, १३
एप्रिल १९१९ रोजी या अटकेचा व रौलट कायद्याचा निषेध म्हणून अमृतसरमधील
जालीयावाला बाग येथे एक सभा भरली होती. याचवेळी बैसाखीचा सण होता त्यामुळे या
ठिकाणी खूप गर्दी जमली. या सभेला २०,००० लोक जमले होते. सरकारने सभाबंदीचा आदेश दिला होता, पण लोकांना
त्याची कल्पना नव्हती.
चित्र : जनरल डायर अमृतसरचा खाटिक हा ग्रंथ
मुखपृष्ठ
या जालियानवाला बागेची रचना अशी होती
कि तिला सर्व बाजून उंच तटबंदी आहे व येण्याजाण्यासाठी एकच चिंचाळा दरवाजा आहे.
अशी सभा सुरु असताना जनरल डायर या इंग्रज अधिकाऱ्याने बागेच्या आतील बाजूस
दरवाज्याच्या समोर आपले सैन्य उभे केले. सोबत आपली चिलखती वाहने लावून बागेच्या
बाहेर जाणारा रस्ता बंद केला आणि जमलेल्या निशस्त्र व निरपराध लोकांवर बंदुकीच्या
१६,०० फैरी झाडल्या. गोळ्या संपल्या तेंव्हाच त्याने हा गोळीबार बंद केला.
शेकडो माणसे मेली, हजारो लोक लहान मुले जखमी झाले ते रात्रभर तळमळत राहिले.
त्यांना पिण्यास पाणीही मिळाले नाही. मृतांचा सरकारी आकडा ४०० होता प्रत्यक्ष
१००० पेक्षा जास्त लोक मृत झाले होते.
चित्र : इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड
कैम्र्रुन यांनी स्मृती स्थळाला भेट दिली व माफी मागितली
या क्रूर हत्याकांडाने भारतीय समाज
हादरून गेला. ब्रिटीश सत्तेवरचा म. गांधीसारख्या व्यक्तीचा विश्वास उडाला. या
हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी ‘सर’ ही ब्रिटीश सरकारने
दिलेली पदवी परत केली. भारतभर हत्याकांडाचा निषेध झाला. त्यावेळी पंजाबचा गवर्नर
मायकेल ओडवायर हा होता. या हत्याकांडाबद्दल त्याने डायरला शाबासकी दिली.
सरकारने लोकांचा विरोध पाहून या हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी हंटर कमिशन नेमले.
३. हंटर कमिशन :जालियानवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या ‘हंटर कमिशन’ समोर साक्ष देताना डायर म्हणाला ‘गोळ्या
संपल्या म्हणून तो थांबला अन्यथा त्याने आणखी लोकांना ठार मारले असते’. यातून
त्याने उद्दामपणे आपल्या कृत्याचे समर्थन केले. ज. डायरला कमिशनने दोषी धरले पण
सरकार व ओडवायर यांना दोषमुक्त केले. डायरला शिक्षा झाली नाही. भारतातील
इंग्रजांनी ‘ब्रिटीश साम्राज्याचा त्राता’ असे म्हणून डायरचा गौरव
केला. त्याच्यासाठी फंड उभा केला. यामुळे भारतीय खूप चिडले. लोकांच्यात असंतोष
निर्माण झाला. त्यातच या काळात खिलाफत चळवळ सुरु झाली. पुढे १९४२ मध्ये
उधमसिंग या भारतीय क्रांतीकारकाने मायकेल ओडवायरची लंडन मध्ये गोळ्या घालून हत्या
केली व जालियानवाला बाग हत्याकांडाचा बदला घेतला त्यासाठी त्याने २३ वर्षे वाट
बघितली.
४.
खिलाफत चळवळ :
असहकार चळवळ ही खिलाफत चळवळीतून सुरु
झाली. मुस्लीम धर्माचा प्रेषित ‘महमद पैगंबर’ हा होता. त्याच्यानंतर ‘खलिफा’
हा पैगंबरचा वारस होता. ‘खलीफा’ हा इस्लाम धर्मातील ‘सर्वोच्च धर्मगुरू’ होता.
त्याचबरोबर तो ‘इस्लामी साम्राज्याचा प्रमुख’ होता. त्याच्या राज्याला ‘खिलाफत’
असे म्हणत. ही खिलाफत तुर्कस्थानपुरती मर्यादित होती. पहिले महायुध्द सुरु झाले.
तेंव्हा तुर्कस्थानचा खलिफा हा इंग्रजांच्या विरोधात व जर्मनीच्या बाजूने युद्धात
उतरला. भारतीय सैन्यात जे मुस्लीम सैनिक होते त्यांच्या पुढे प्रश्न उभा राहिला
की, आपल्या धर्माच्या सर्वोच्च धर्मगुरूच्या विरोधात आपण कसे लढायचे? यावर
ब्रिटीशांनी तोडगा काढला की, जरी खलिफा युद्धात हरला तरी त्याचे राज्य म्हणजे
खिलाफत नष्ट केली जाणार नाही. असे आश्वासन त्याने मुस्लिमांना दिले. त्यामुळे
मुसलमान युद्धात खलिफाविरुद्ध लढले. युद्धात खलिफा हरला व ब्रिटीश आपले आश्वासन
विसरले. त्यांनी खिलाफत नष्ट केली, तेंव्हा खिलाफतीच्या पुनर्स्थापनेसाठी
तुर्कस्थानातून एक चळवळ सुरु झाली तिला ‘खिलाफत चळवळ’ असे म्हणतात.
तिचा प्रसार जगभर झाला. भारतात खिलाफत चळवळ सुरु झाली.
चित्र : खिलाफतीची
स्थापना :
चित्र : भारतीय खिलाफत चळवळीचे नेते अली
बंधू
तेंव्हा म. गांधीनी खिलाफत
चळवळीला पाठींबा दिला. गांधीना ही हिंदू-मुस्लीम ऐक्याची संधी वाटली.
गांधीजी म्हणतात, ‘आपल्या देशात हिंदू,
पारसी, ख्रिश्चन इ. अनेक समाज असेन यापैकी एकाचा हितसंबध म्हणजे सर्वांचा हितसंबध
अशी भावना असेल तरच आपण राष्ट्र म्हणून जगू शकू व हीच काळाची कसोटी आहे. आम्ही
हिंदू-मुस्लीम ऐक्याच्या घोषणा करतो व मुस्लिमांचे हितसंबध ज्यावेळी धोक्यात येतात
त्यावेळी अलिप्त राहतो तर ऐक्याची घोषणा पोकळ ठरेल.’ अशाप्रकारे खिलाफतीला
पाठींबा देण्यामागे म. गांधीची भावना उद्दात्त होती.
अशाप्रकारे जालियानवाला
बाग हत्याकांडाविरुद्ध न्याय मिळण्यासाठी, खिलाफतीला पाठींबा म्हणून म. गांधीनी
असहकार आंदोलन सुरु केले.
ब.
असहकार चळवळीची वाटचाल :
१. असहाकारचा ऐतिहासिक ठराव :
असहकार चळवळ हाती घेण्यासाठी सप्टेंबर
१९२० रोजी कोलकत्याला राष्ट्रसभेचे एक खास अधिवेशन भरविण्यात आले.
त्यात म. गांधींनी ‘असहाकारचा ठराव’ मंजूर करून घेतला. सी.आर. दास, बिपिनचंद्र
पाल, बेझंट, मालवीय इ. नेत्यांनी ठरावाला विरोध केला. पण बऱ्याच चर्चेनंतर तो
मंजूर झाला. पंजाबमधील अत्याचार व खलीफावरील अन्याय दूर करण्यात ब्रिटीश सरकार
अपयशी ठरले, असे अन्याय होऊ नये म्हणून ‘स्वराज्य’ हा एकच पर्याय जनतेपुढे आहे.
स्वराज्य मिळण्याचा मार्ग ‘असहकार’ हा आहे. जनतेने कशा तऱ्हेने सरकारशी असहकार
करावा. याविषयी हा ठराव पुढीलप्रमाणे मार्गदर्शन केले, त्यामध्ये सरकारी समारंभावर, सरकारी
शाळांवर, सरकारी पदव्या, सन्मानांवर, न्यायालये व वकीलीवर, सरकारी नोकऱ्यांवर,
निवडणुका व मतदानावर, ब्रिटीश मालावर, बहिष्कार टाकण्यात निर्णय घेण्यात आला.
२.
एका वर्षात स्वराज्य :
जर वरील ठरावाची अंमलबजावणी झाली व
लोकांनी अहिसात्मक सत्याग्रहाच्या तत्वाचे पालन केले तर भारताला एका वर्षात स्वराज्य
मिळू शकते असे गांधीनी जाहीर केले.
३. चळवळीचे नकारात्मक रूप:
i.सरकारी पद व पदव्यांचा त्याग :
सरकारने दिलेल्या पदव्या, सन्मान हे
सन्मान नसून गुलामीच्या साखळ्या आहेत अशी भावना लोकांच्या मनात होती. त्यामुळे अशा
अनेक लोकानी सरकारकडून मिळालेल्या पद, पदव्या सन्मान यांचा त्याग केला. अशा सन्मानाना
आता पूर्वीसारखी सामाजिक प्रतिष्ठा राहिली नाही.
ii.परदेशी वस्तूंवर बहिष्कार :
परदेशी वस्तूवरील बहिष्कार हा या
चळवळीतील सर्वात यशस्वी कार्यक्रम ठरला. स्वयंसेवकांनी घरोघरी जावून
लोकांकडून परदेशी वाशुत जमा करून त्याची सार्वजनिक होळी करायला सुरुवात केली.
विदेशी कपडे विकणाऱ्या दुकानांसमोर
निदर्शने आयोजित केली
सन |
आयात कापड कोटी रुपये |
१९२०-२१ |
१०२ |
१९२१-२२ |
५७ |
यावरून लक्षात येते कि असहकार
चळवळीमुळे ब्रिटीशांची कापडाची आयात निम्म्याने घटली. १९२०-२१ साली ती १०२
कोटी रु. होती ती घसरून १९२१-२२ साली ५७ कोटी रु झाली.
iii.सरकारी शाळा महाविद्यालयांवर बहिष्कार :
सरकारी
शाळांवर व महाविद्यालयांवर बहिष्कार टाकण्याच्या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद
मिळाला. चळवळीच्या पहिल्या महिन्यातच हजारो विद्यार्थ्यांनी सरकारी शाळा
महाविद्यालये सोडली व सरकारी शाळात प्रवेश घेतला. या चळवळीत अनेक शिक्षकांनी आपली
नोकरी सोडून स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला. प्रा. रंगराव दिवाकर या
प्राध्यापकाने धारवाड येथील महाविद्यालयाची नोकरीचा राजीनामा देऊन चळवळीत उडी
घेतली.
चित्र : सरकारी शाळांवर
बहिष्कार(प्रातिनिधिक चित्र)
iv.न्यायालये व वकिलीवर बहिष्कार :
लोकांनी न्यायालयांवर बहिष्कार टाकून
स्थानिक लवाद नेमून त्यांच्यामार्फत आपले खटले सोडवून घेतले. अनेक नामांकित
वकिलांनी आपली चांगली कमाई असलेली वकिली सोडून दिली. चित्तरंजन दास.
मोतीलाल नेहरू, राजेंद्रप्रसाद, सी. राजगोपालाचारी, व्ही. व्ही. गिरी. अशा
नामांकित वकिलांनी आपली वकिली सोडली. त्यांच्या त्यागामुळे अनेक जणांना प्रोत्साहन
मिळाले, शेकडो वकिलांनी आपली वकिली सोडून दिली.
चित्र : सरकारी
न्यायालयावर बहिष्कार
v.निवडणुका व मतदानावर बहिष्कार :
१९१९ च्या कायद्यानुसार भारतीयांना
आता कायदेमंडळावर प्रतिनिधित्व मिळाले होते त्यानुसार आता निवडणुका होणार होत्या
पण असहकार चळवळीच्या कार्यक्रमानुसार या निवडणुकावर बहिष्कार टाकण्यात आला.
राष्ट्रीय सभेच्या सर्व उमेदवारांनी आपल्या उमेदवारी मागे घेतल्या. तसेच ज्यांना
मतदानाचा हक्क मिळाला होता त्यांनी मतदानही केले नाही. पण कॉंग्रेस सोडून इतर लोक
उभे राहिले ते निवडून गेले आपण कायदेमंडळावर बहिष्कार टाकला तर कायदेमंडळ काही करू
शकत नाही हि आशा फोल ठरली.
vi.सरकारी नोकऱ्यांवर बहिष्कार :
ब्रिटीश सत्ता ही नोकरशाहीवर चालत
होती. भारतीयांनी सरकारी नोकऱ्यांचा त्याग करून सरकारशी असहकारिता दाखवून द्यावी
या उद्देशाने हा कार्यक्रम आखला होता. वकील, प्राध्यापकांची संख्या अधिक नसली, तरी
सरकारी नोकरांची संख्या अधिक होती. अनेक लोकांनी भारवून सरकारी नोकरींचे राजीनामे
दिले.
तसेच सावरकरांचे के सहकारी व्ही.
व्ही. एस. अय्यर, महाराष्ट्रातील क्रांतिकारी सेनापती पांडुरंग महादेव बापट व
बंगाली क्रांतिकारक सूर्यसेन हे सर्व सशस्त्र क्रांतीवर विश्वास ठेवणारे
क्रांतिकारक अहिंसात्मक असहकार चळवळीत उत्साहाने सहभागी झाले.
vii.प्रिन्स ऑफ वेल्स च्या भेटीवर बहिष्कार :
याच दरम्यान केंद्रीय कायदेमंडळाच्या
उदघाटनासाठी ब्रिटनचा युवराज ‘प्रिन्स ऑफ चार्ल्स’ भारतात येणार होता. राष्ट्रीय
सभेने युवराजाच्या स्वागत सोहळ्यावर बहिष्कार घालण्याचे आवाहन जनतेला केले होते.
नोव्हेंबर १९२१ रोजी युवराज मुंबईत आला. मुंबईत युवराजाच्या स्वागतासाठी केवळ
अधाकारी, व्यापारी, जमीनदार तेवढे उपस्थित होते. राष्टीय सभेच्या आवाहनानुसार शाळा
व महाविद्यालयातून विद्यार्थी बाहेर पडले. कामगारांनी कारखान्यातील काम बंद केले.
गांधीजीनी सार्वजनिक सभा घेतली हि सभा मुंबईत एल्फिस्टन मिलच्या मैदानात घेतली
गांधीजींचे भाषण झाल्यावर परदेशी कपड्याची होळी करण्यात आली. सभा संपल्यावर लोक
परत जात असतानाच राजपुत्राच्या स्वागतासाठी गेलेल्या लोकांशी त्यांची गाठ पडली. या
दोघांमध्ये हिंसक संघर्ष झाला. तीन दिवस दंगल चालली सुमारे ५९ जण मृत्यूमुखी पडले.
बाकी देशभर सर्वत्र हरताळ शांततेत पार पडला. युवराजाचे स्वागत निर्मनुष्य रस्ते व
बंद दुकानांनी केले.
४.चळवळीचे विधायक रूप:
i. ‘स्वदेशी फंड’ :
चित्र : टिळकांची अंत्ययात्रा
असहकारचळवळ सुरु करण्यापूर्वी १ ऑगस्ट १९२० रोजी लोकमान्य
टिळकांचा मृत्यू झाला. स्वातंत्र्य चळवळीला हा एक मोठा धक्का होता. पण आता
गांधीच्या नेतृत्वाखाली असहकार चळवळ हाती घेण्यात आली. तेंव्हा कॉंग्रेसने लो. टिळकांच्या
स्मरणार्थ १ कोटी रुपयांचा ‘स्वदेशी फंड’ गोळा करण्याचे ठरविले. लवकरच तो जमा
झाला. या फंडातून २० लाख चरखे घराघरातून फिरू लागले. हातमागावरील खादीचा जोरदार
प्रचार होऊ लागला.
ii. स्वदेशीला प्रोत्साहन- खादी व
हस्तउद्योगांना प्रोत्साहन
परकीय मालावर बहिष्कार हा या चळवळीचा एक महत्वाचा भाग होता.
याची दुसरी बाजू होती स्वदेशीचा वापर होय. या चळवळीत स्वदेशी कापड व इतर मालाच्या
वापरावर भर देण्यात आला. त्यामुळे स्वदेशी वस्तू तयार करणारे अनेक कारखाने सुरु
झाले. यामुळे स्वदेशी उद्योगांना प्रोत्साहन मिळाले तसेच हातमागांचे पुनरुजीवन
झाले.
चित्र : परदेशी कपड्याची होळी .
iii. हिंदू-मुस्लीम ऐक्य :
या चळवळीत गांधीना अपेक्षित असलेले
हिंदू-मुस्लीम ऐक्य व मैत्रीचा अविष्कार अनेक ठिकाणी दिसू लागला. दिल्लीतील
जामा मशिदीच्या व्यासपिठावरून आर्य समाजाचे नेते स्वामी सहजानंद यांनी भाषणे
दिली आणि त्यांच्या भाषणांना गर्दी जमू लागली. दिल्ली परिसरातील
मुस्लिमांनी उत्स्फूर्तपणे गोहत्या बंदी केली.
iv. दारूबंदीचा प्रसार :
दारूच्या दुकानासर्मोर निदर्शने
करण्यात आली. त्यामुळे सरकारला दारूच्या विक्रीतून जो महसूल मिळत असे त्यात
लक्षणीयरित्या घट झाली. सरकारचे जेवढे नुकसान जास्त तेवढे चळवळीचे यश अधिक होते.
v. अस्पृश्यता निवारण :
हिंदू-मुस्लीम ऐक्याला जेवढा
प्रतिसाद मिळाला तसा प्रतिसाद अस्पृश्यता निर्मुलन कार्यक्रमाला मिळाला नाही.
मात्र अस्पृश्यता निवारण हे या चळवळीचे एक महत्वाचे वैशिष्ठे मानायला हवे कारण हा
मुद्दा स्वातंत्र्य चळवळीच्या व्यासपीठावर आला.
चित्र : हरिजन वस्तीत महात्मा
चित्र : राष्ट्रीय शाळा
vi. राष्ट्रीय शिक्षण :
सरकारी शाळांवर बहिष्कार टाकण्यात
आला. विद्यार्थ्याची सोय व्हावी म्हणून राष्ट्रीय शाळांची स्थापना करण्यात आली. या
काळात काशी विद्यापीठ, गुजराथ विद्यापीठ, टिळक विद्यापीठ पुणे, दिल्ली येथे
जामिया-मिलीया इस्लामिया विद्यापीठ, इ. ची स्थापना करण्यात आली.
राष्ट्रीय शिक्षणाच्या चळवळीला सर्वात जबरदस्त प्रतिसाद बंगाल प्रांतात मिळाला,
तेथे सुमारे ८०० राष्ट्रीय शाळा व महाविद्यालयांची स्थापना करण्यात आली.
४.चौरी चौरा घटना – असहकार चळवळ
मागे घेतली :
१९२२ पर्यंत कॉंग्रेसचे
४०,००० कार्यकर्ते तुरुंगात होते. चळवळ अगदी
जोमात होती, या चळवळीचा पुढचा टप्पा म्हणून म. गांधीनी सविनय कायदेभंग आंदोलन
हाती घेण्याचा निर्णय घेतला. याचदरम्यान ५ फेब्रुवारी १९२२ रोजी उत्तर
प्रदेशातील चौरी चौरा या गावी एक भीषण हिंसक घटना घडली. त्या गांवी एका मिरवणुकीवर
पोलिसांनी गोळीबार केला व दारुगोळा संपताच त्यांनी कचेरीचा आश्रय घेतला.
संतापलेल्या लोकांनी पोलीस कचेरी पेटवून दिली त्यात २१ पोलीस जाळून खाक झाले.
आता गांधींना हि वार्ता समजताच या अहिंसात्मक आंदोलनाला हिंसक वळण लागले हे
त्यांच्या लक्षात आले त्यामुळे ते आंदोलन तहकूब केले.
क.
असहकार चळवळीचे मूल्यमापन :
चळवळ अचानक मागे घेतल्यामुळे सर्वाना
आश्चर्याचा धक्का बसला. प. मोतिलाल नेहरू, लाला लजपतराय, सुभाषचंद्र बोस इ.
नेत्यांनी गांधीच्या या निर्णयावर टीका केली. एक ठिकाणच्या लोकांनी
a.
सर्वसामान्य लोकांची चळवळ
करण्याची क्षमता मर्यादित असते ते सदासर्वकाळ चळवळ करू शकत नाही त्यांना त्याच्या
पोटापाण्याचा उद्योग करावा लागतो. त्यामुळे चळवळ लांबवली तर त्याच्यातील लोकांचा
सहभाग घटतो.
b.
ब्रिटीशांची पोलीस लष्कर
अशी ताकद प्रचंड होती जर चळवळीला हिंसक वळण लागले असते तर ती सरकारला लगेचच दडपून
टाकता आली असती त्यामुळे गांधीनी ती अगोदरच मागे घेऊन अत्यंत योग्य निर्णय घेतला
असे म्हणावे लागेल.
१.
स्वातंत्र्य
चळवळीचे नेते म्हणून म. गांधीचा उदय:
लोकमान्य टिळकांच्या मृत्युनंतर
नेतृत्वाची एक पोकळी निर्माण झाली असती पण गांधीच्या नेतृत्वाने ती भरून निघाली.
या चळवळीचे सर्वात मोठे यश म्हणजे म. गांधीचा कॉंगेसचे व राष्ट्रीय लढ्याचे
नेतृत्व म्हणून उदय झाला. त्यांना लोकांचा अभूतपूर्व असा प्रतिसादही मिळाला
लोकांनी गांधीचे नेतृत्व स्वीकारले.
२.
चळवळ
सर्वसामान्य लोकांपर्यत पोहोचली :
असहकार चळवळीने नवे युग सुरु झाले.
जे टिळकांना जमले नाही ते गांधीनी करून दाखवले. सुशिक्षित मध्यमवर्गाची व शहरी
भागापुरती चळवळ खेड्यात, खेड्यातील प्रत्येक घरात पोहोचली.सर्व राष्ट्र या चळवळी
मुळे ढवळून निघाले.
३.
राष्ट्रवादी
भावनेत वाढ :
वकिलांनी आपल्या चांगल्या चालणाऱ्या
वकिली सोडली, विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्या, ४०००० लोक तुरुंगात तर ४० लाख लोक
तुरुंगाबाहेर देशासाठी हालअपेष्टा सहन करत होते. एकंदर यातून राष्ट्रवादी भावनेत
वाढ झाली असेच म्हणावे लागेल.
प. जवहालाल नेहरू म्हणतात, ‘This movement
put a new life into Indian Nationalism’
४.
जनतेच्या
मनातील सरकारची भीती नष्ट होऊ लागली:
या चळवळीने सामान्य माणसाची तुरुंगाबद्दलची
व सरकारबद्दलची भीती नष्ट केली. साधी साधी माणसे हजारोंच्या संख्येने तुरुंगात
गेले लाठ्या खाल्या. बंगालमध्ये तुरुंग खच्चून भरले शेवटी सरकारला ‘प्रीझंस
कॅम्प(तात्पुरते तुरुंग)’ तयार करावे लागले तेही भरून गेले शेवटी सरकारला प्रश्न
पडल या सत्याग्रहिंचे करायचे काय, तेंव्हा सरकारने लोकांना मुक्त केले तर लोकांनी
तुरुंगातून बाहेर जायला नकार दिला शेवटी लोकांना जबरदस्तीने तुरुंगाच्या बाहेर
आणून सोडावे लागले. शिखांसारख्या लढाऊ वृत्तीच्या लोकांनी पोलिसांच्या लाठ्या
खाल्या पण परत हात उगारला नाही. थोडक्यात सामान्य माणसाच्या मनात जी ब्रिटिश
सरकारबद्दल भीती होती ती नष्ट झाली.
५.
नेते व
कार्यकर्त्यांची एक नवी पिढी तयार झाली:
पूवी राजकारण हि फावल्या वेळेत
करायची कृती असायची आता. लोकांनी वकिली सोडल्या, विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्या न
ते राजकारणासाठी पूर्णवेळ देऊ लागले. त्यातून कार्यकर्त्याची व नेत्यांची एक पिढी
तयार झाली.
६.
विधायक
कार्यक्रमाना सुरुवात :
स्वदेशी
मालाचा पुरस्कार, परदेशी मालावर बहिष्कार, दारूबंदी, अस्पृश्यता निवारण एक अनेक
विधायक कार्यक्रम या चळवळीच्या काळात सुरु झाले. या चळवळीमुळे लाखो चरखे घराघरातून
फिरू लागले. स्वदेशी कापडाच्या उत्पादनाला मोठी चालना मिळाली.
Featured Post
previous year question papers
http://www.unipune.ac.in/university_files/old_papers.htm
Popular Posts
-
प्राचीन जगाच्या इतिहासात इजिप्त मधील इजिप्तशियन संस्कृती , चीनमधील चीनी संस्कृती , मध्य आशियातील मेसापोटेमिया किंवा बॅबिलोनीयन संस्कृती ...
-
https://z-lib.is/
-
३. प्रागैतिहासिक काळ : अश्मयुग व ताम्रापाषण युग I..अश्मयुग : पुथ्वीची उत्पत्ती ४०० करोड वर्षापूर्वी झाली. तर मानवाचे पृथ्वीवरील अस्त...
-
प्रकरण १ साधने व प्रागैतिहासिक काळ ---------------------------------------------- अ. प्रारंभिक इतिहासाचे महत्व ब. इतिहासाची साधने : १. पुर...
-
B. हडप्पा संस्कृतीतील नगररचनेची वैशिष्टे १. शहरांचे दोन भागात विभाजन : हडप्पा संस्कृतीतील मोहेंजोदडो , हडप्पा , लोथल , कालीबंगन , अश...