Monday, 22 February 2021

शिव चरित्रातून काय धडा घ्याल? - डॉ कृष्णा पाटील

शिव चरित्रातून काय धडा घ्याल? - डॉ कृष्णा पाटील 
आज शिवजयंती आहे. नक्कीच उत्साहात साजरी केली पाहिजे मात्र त्याच वेळी शिवचरित्रातून विद्यार्थी, व्यक्ती, समाज आणि राज्यकर्ते काय धडा घेऊ शकतील याचा विचार झाला पाहिजे.

भारताच्या ५००० वर्षांच्या इतिहासात ५० हजार पेक्षा जास्त राजे होऊन गेले, पण या सर्वांच्या जयंती आपण साजरे करत नाही, इतकेच काय या राजांचे वंशजही त्यांची आठवण काढत नसतील, त्यांच्या समाध्यावर वर्षानुवर्षे कोणी साधी पणतीही लावत नसेल. मग अशा स्थितीत शिवाजी महाराजांच्या हयातीत व मृत्युनंतरही इतके लोकप्रेम का भेटतय, शिवजयंती एवढ्या मोठ्या उत्साहात आपण का साजरी करत आहोत याचे चिंतन होणे आवश्यक आहे.

आणि हो, शिवजयंतीच्या उत्साहात आपल्याला शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शाचा विसर पडू नये म्हणून मला ‘शिव चरित्रातून समाजातील प्रत्येक घटकांनी काय धडा घ्यावा’ यावर विचार करावा वाटला तोच मी तुमच्यासमोर मांडत आहे.

पहिला प्रश्न शिवाजी महाराजांकडून राज्यकर्त्यांनी काय धडा घ्यावा?

भारतातील दोन राजांची मी उदाहरणे देतो,
एक होता हैद्राबादचा निजाम ज्याच्या टेबलवर पेपरवेट म्हणून जो दगड ठेवला होता... तो आठ कोठीचा हिरा होता.....राजा श्रीमंत होता म्हणून तो आठ कोटीचा हिरा टेबलावरचे पेपर उडू नयेत म्हणून ठेऊ शकला मात्र हा पैसा आला कुठून ... प्रजेकडून, प्रजेला त्रास देऊन ....आणि त्याचा वापर मात्र स्वत:च्या शौकासाठी... हे योग्य आहे का? 

दुसरा जुनागढचा नवाब ज्यांन आपल्या लाडक्या कुत्र्याच लग्न लावण्यासाठी २ कोटी रुपये खर्च केले ....हा प्रजेचा पैसा त्याने आपल्या फालतू छंदावर खर्च केला.. यातून प्रजेला काय फायदा झाला.. निश्चितच काही नाही. 

अशा राजांच त्यांच्या प्रजेने स्मरण का कराव ज्यांनी लोकांच्या कल्याणाची काळजी केली नाही. राज्याचा वापर स्वत:साठी केला. 

राज्य का कराव ? असा प्रश्न यांना पडला असेल तर त्यांनी स्वत:ची तुंबडी भरायला असा सरळ अर्थ लावला...

या पार्श्वभूमीवर शिवाजी महाराज का राज्य करत होते? याचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यास ..त्यांच्या राजमुद्रेत व त्यांच्या कार्यात त्याच उत्तर आपल्याला सापडत.... महाराजांच्या राजमुद्रेच्या शेवटच्या ओळी आहेत.... ‘मुद्रा भद्राय राज्यते’ याचा अर्थ होतो... ही  मुद्रा लोक कल्याणासाठी कार्यरत आहे. म्हणजे शिवाजी महाराज जे राज्य करत होते. ते इथल्या रयतेसाठी, प्रजेसाठी, लोकांसाठी होय.. म्हणून तर त्यांच्या प्रत्येक निर्णयात, लढ्यात त्याचा प्रतिबिंब उमटत....

शिवाजी महाराजांनी १६७३ साली आपल्या सैन्याला उद्देशून एक जाहीरनामा काढला आहे. त्यात त्यांनी म्हंटले आहे  ‘रयतेच्या भाजीच्या देटालाही हात लावू नका’....’सैन्यातील घोड्यांना वैरण लागली तर रोख रक्कम देऊन खरेदी करा’.... साहजिकच रयतेला जराही त्रास देऊ नका अशी महाराजांची आज्ञा होती. ते पुढे  म्हणतात.. तुम्ही जर रयतेस त्रास दिलात तर रयत म्हणेल, .... ‘मोगल मुलकात आले त्याहून अधिक तुम्ही’... थोडक्यात मोगल व स्वराज्याचे सैन्य यात फरक काय असा प्रश्न रयत विचारेल. म्हणून रयतेला काडीचाही त्रास होईल असे वर्तन करू नका अशी महाराजांची सक्त ताकीद होती. यामुळेच शिवाजी महाराजांचे राज्य खऱ्या अर्थाने ‘रयतेचे राज्य’ म्हणून ‘स्वराज्य’ होते. लोकांना ते आपले राज्य वाटत होते.

नुकतच इशा अंबानीचा लग्न झाल, त्यात अमिताभ बच्चन वाढपी होता, शाहरुख ते सर्व बॉलीवूड वरातीत नाचले, या लग्नात ७३२ कोटी रुपये खर्च झाले,

चार ते पाच वर्षापूर्वी अजीज प्रेमजी यांच्या मुलाच लग्न झाल या लग्नात ‘आपली उपस्थिती हाच आहेर’ अशी टीप छापली होती. जर आहेर द्यायचीच इच्छा असेल तर रोख रक्कम द्या ती सामाजिक कार्याला देणगी म्हणून दिली जाईल अशी आणखी एक टीपही छापली होती. लग्न एकदम साधेपणे पार पडले. २० कोटी रुपये जमा झाले ते २०० शाळांच्या डिजिटलायजेशन साठी वापरण्यात आले.

यातील कोणत लग्न भारी अस तुम्हाला वाटत?
नक्कीच दुसर ज्यातून लोकांच कल्याण साधल...
तशी राज्य करण्याची संधी अनेक राजांना मिळाली मात्र ते राज्य लोकांच्या कल्याणसाठी राबवल ते शिवाजी महाराजांनी...

म्हणून आजच्या राज्यकर्त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे शिवाजी महाराजांनी रयतेच्या भाजीच्या देटाला हात लावू नका असा आदेश दिला होता. त्यांचा वारसा सांगणारे आपण देटासहित तर भाजी खात नाही न!, आपल्याला मिळालेली सत्ता ही लोकांच्या कल्याणासाठी वापरत आहोत न का स्वत:च्या. हे ध्यानात घेऊन राज्य केले पाहिजे 

सोबत शिवाजी महाराजांची धर्मसहिष्णुता, स्त्रीयांप्रती आदरभाव, अठरापगड जातीच्या मदतीने स्वराज्याची उभारणी, आरमाराची उभारणी, व्यापारास प्रोत्साहन, प्रजेच्या रक्षणासाठी केलेली किल्ल्यांची उभारणी याचाही वसा व वारसा आजच्या राजकर्त्यांनी घ्यावा.

शिवचरित्रातून विद्यार्थ्यांनी काय धडा घ्यावा ?

शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी ‘स्वराज्य’ स्वप्न पहिले आपले ध्येय निश्चित केले. तस तुम्हीही तुमच ध्येय निश्चित करा... ध्येयाशिवाय जगणं हे जगणंच नसत अस मला वाटत

स्वराज्याचे ध्येय प्राप्त करण्यासाठी महाराजांनी अखंड व प्रचंड मेहनत घेतली. तशी तुम्हीही तुमच ध्येय प्राप्त करण्यासाठी अहोरात्र तन, मन, धन अर्पण करून मेहनत घ्या.. ध्येय प्राप्ती होईपर्यंत कष्ट थांबवू नका..

शिवाजी महाराजांकडून नियोजन शिका, आत्मविश्वासाच बाळकडू घ्या ....

आणि ज्या दिवशी तुमच ध्येय सिद्ध होईल तीच शिवाजी महाराजांना जयंतीची तुमच्याकडून दिलेली सर्वोत्कृष्ट शुभेच्छा ठरेल... असा धडा शिवचरित्रातून घ्या.
धन्यवाद!

Featured Post

previous year question papers

http://www.unipune.ac.in/university_files/old_papers.htm

Popular Posts